एक इजाजत.भाग -७१

वाचा एक अलवार फुलणारी प्रेमकथा!
एक इजाजत!
भाग-७१

“तुम्हाला कळत कसं नाहीये, मला त्यांना भेटणं फार गरजेचं आहे.”


“सॉरी मॅम, प्लीज ट्राय टू अंडरस्टॅंड मी..”


“ए इंग्रजाची औलाद, तुला एवढं मराठीतं सांगतेय ते कळत नाहीये का?”


“मॅम, यू कॅन्ट टॉक विथ मी लाईक धीस.”


“फक्त बोलतेच आहे, आता बऱ्या बोलाने आत जाऊ दिले नाहीस तर काय करेन ना माझा नेम नाहिये.” मनस्वी इंगा दाखवत म्हणाली.


एकतर काल रात्रभर विचार करून करून तिची झोप पार उडाली होती. त्यात मुंबईला यायचंय म्हणून पहाटे उठून तयार झाली होती. मुंबईला आली खरी; पण प्रकाशशी निट बोलणं न झाल्यामुळे रुखरुख लागली होती. इथे आदीच्या ऑफिसला येऊन तासाभरापासून त्याला भेटायचं म्हणून तिचे विनवण्या करणे चालू होते आणि त्यात यश न आल्यामुळे तिच्या अंगाचा नुसता तीळपापड होवू लागला होता.

“मॅम, प्लीज बिहेव युअरसेल्व.”


“मी अजूनपर्यंत तरी मायसेल्फनीच बिहेव करतेय गं. मी कोण आहे ते तुला ठाऊक आहे? अगं, डॉक्टर आहे मी. इथे कुणाच्या जीवनमरणाचा प्रश्न समोर उभा आहे आणि तुमचं काय अपॉइंटमेंट अपॉइंटमेंट चाललंय?” ती रागात विचारत होती. तिचा तो अवतार बघून ती मुलगीही काही क्षणासाठी घाबरून गेली.


“बाहेर कसला आरडाओरडा चाललाय? सीसीटीव्ही मध्ये बाहेरचा गोंधळ बघून केबिनमध्ये असलेल्या आदित्यने त्याच्या सेक्रेटरीला विचारले.


“सर, अपॉइंटमेंट नसतानाही तुम्हाला भेटायला म्हणून एक मॅडम आल्या आहेत आणि त्याच आपल्या रिसेप्शनवर वाद घालत आहेत.”


“कोण आहेत? कुठल्या प्रोजेक्टच्या संदर्भात आल्या आहेत का? बघू दे तरी.” तो उठत म्हणाला.


“सर, मी बघतो ना.”


“मग आतापर्यंत काय करत होतात?” खुर्चीवरून उठून आदी बाहेर जायला निघाला.


“सर, सॉरी सर.”


“सर, मी हॅन्डल करतो. तुम्ही प्लीज शांत व्हा.” त्याला समजवण्याचा प्रयत्न करत सेक्रेटरी रिसेप्शनकडे जायला निघाला मात्र त्याच्या कुठल्याच बाबीला न जुमानता आदी रागातच केबिनबाहेर आला.


“व्हॉट द हेल इज गोइंग ऑन? गोंधळ घालायला हे काय मच्छीमार्केट वाटले की काय?” त्याच्या धारदार आवाजाबरोबर तिथे एकदम शांतता पसरली आणि त्याचवेळी मनस्वीचे लक्ष त्याच्याकडे गेले.


सहा फूट उंच, निमगोरा, हँडसम.. गुगलवरच्या फोटोपेक्षा प्रत्यक्षात जबरदस्त रुबाबदार दिसणारा आदित्य तिच्यासमोर उभा होता.


“हॅलो, मिस्टर आदित्य धनराज..”

त्याच्या कडक आवाजाने सर्व शांत झाले असले तरी संधी साधून ती धावत त्याच्यासमोर आली आणि तिचे वागणे पाहताच आदीचे अंगरक्षक पुढे सरसावले.


“हेय, हू आर यू? कोण आहात तुम्ही? आणि हा काय तमाशा लावलाय?” त्याच्या आवाजातील जरब कायम होती.


“मी डॉक्टर मनस्वी..”


“डॉक्टर? ओ माय गॉड! सॉरी डॉक्टर, माझ्या स्टॉफला तुम्ही इथे येणार हे ठाऊक नव्हतं त्यामुळे त्यांनी तुम्हाला आत येऊ दिले नाही. त्यांच्या वागण्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. प्लीज काम इनसाईड.” त्याच्या आवाजाचा पारा उतरून कमालीचा नरम झाला होता.


त्याचे एवढ्या आदराने तिला केबिनमध्ये बोलावल्याचे बघून त्याचे संपूर्ण स्टॉफ मेम्बर्स आपण खूप मोठी चूक केल्याप्रमाणे एकमेकांकडे बघत होते. तर मनस्वी? तिचा तर तिच्या कानावर विश्वास बसत नव्हता. तिला पुरते बोलूही न देता अगदी मृदू शब्दात त्याने आत बोलावण्यामुळे थोडीथोडकी नव्हे तर ती चांगलीच शॉक झाली होती. मात्र चेहऱ्यावर ते भाव येऊ न देता ती शांतपणे त्याच्या मागोमाग आत आली.


“डॉक्टर, प्लीज सीट डाऊन. काय घेणार? कॉफी की चहा?”

त्याचे आदरतिथ्य बघून आपण चुकून एखाद्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये तर आलो नाहीये असा तिला भास झाला. डोक्यात जाम लोचा झाला होता.


“थँक यू. तसा चहा आवडला असता; पण काय ना सध्या डोक्याचं पार दही झालंय. तेव्हा ही सिच्यूएशन बघता आय वूड प्रिफर कॉफी.” ती प्रामाणिकपणे उत्तरली.


“लगेच आत दोन कॉफी पाठवा आणि मी सांगत नाही तोवर कोणालाही आत सोडू नका. अगदी कोणालाही. इट्स माय ऑर्डर.” त्याने सेक्रेटरीकडे बघून म्हटले तसे तो ही इथे नकोय हे उमजून ‘यस सर’ म्हणत तो केबिन बाहेर गेला.


“सो, मिस्टर आदित्य तुम्ही मला आधीपासूनच ओळखता तर?” केबिनचे दार बंद होताच मनस्वीने त्याच्या चेहऱ्यावर नजर रोखत विचारले.


“फ्रँकली स्पिकिंग, मी तुम्हाला आज पहिल्यांदा भेटतोय. यू नो, डॉक्टर रॉय? त्यांनी मला तुमच्याबद्दल सांगितलंय आणि मग मलाही वाटलं की एकदा तुम्हाला भेटायला हवं. म्हणजे आज मी मिटिंग अरेंज करायला सांगणारच होतो; पण तुम्ही स्वतःच इथे आलात, त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे.” तो स्मित करून म्हणाला.


“डॉक्टर रॉय? त्यांनी माझ्याबद्दल तुम्हाला काय सांगितलं?” त्याचे उत्तर ऐकून ती फक्त कोमात जायची बाकी होती.

कालपासून ती त्याला भेटायला यायचा प्लॅन करत होती आणि त्याच्याही मनात तेच होते हे ऐकून तिला नवल वाटले. त्यात तो डॉक्टर रॉय कोण आणि तो का यांच्या मध्ये कडमडतोय याचे आश्चर्यही.


“ते तुमचे कौतुक करत होते. मम्माच्या केसबद्दल तुम्हा दोघांचं डिस्कशन झालंय ना? डॉक्टर, तुम्हाला काय वाटतं? मम्मा किती दिवसात बरी होईल?” हळव्या स्वरात त्याने प्रश्न कला.


“एक्सक्युज मी, तुम्ही काय बोलताय मला कळलेलं नाहीये. तुमच्या मम्माबद्दल मी का कोणाशी डिस्कस करू? आय डोन्ट इव्हन नो हर.” ती बारीक डोळे करुन म्हणाली.


“आर यू शुअर की तुम्ही डॉक्टर आहात?” तो तिच्याकडे बघून तिरकसपणे म्हणाला तशी ती खवळली.


“यस, आय एम अ डॉक्टर अँड नॉट गुगल की सगळ्यांच्या कुंडल्या स्वतःकडे जमा करुन ठेवू. डॉक्टर आहे याचा अर्थ असा होत नाही ना? की मी जगातील ओळख नसलेल्या असलेल्या सगळ्या पेशन्टचे डिटेल्स माझ्याकडे ठेवायचे?” ती ठसक्यात म्हणाली तसा तोही चवताळला.


“व्हॉट डू यू मिन? जर माझ्या मम्माबद्दल चर्चा करायला तुम्ही इथे आला नाहीत तर का आला आहात?” त्याच्या स्वरात मघाची जरब डोकावत होती.


“द्याट्स द मेन पॉईंट. तुमच्या मॉमबद्दल मला काही माहिती नाही आणि काही देणं-घेणंही नाही. मी तर तुम्हाला याचा जाब विचारायला आलेय.” पर्समधून त्याने चंपाला दिलेल्या चेक टेबलवर ठेवत ती म्हणाली आणि अचानक समोर काजवे चमकावेत अशी त्याची अवस्था झाली.


“हा चेक मी चंपाजींना दिला होता, तुमच्याकडे तो कसा आला?” पापण्यांची उघड झाप करत तो तिच्याकडे पाहत म्हणाला.


“ते फारसं महत्वाचं नाहीये. एवढी रक्कम तुम्ही त्यांना का ऑफर केलीत याचं उत्तर मला हवं आहे.” ती शांतपणे म्हणाली.


“माझ्या पर्सनल बाबींचे उत्तर तुला द्यायला मी बांधील नाही, कळलं ना? आणि ए, मला जाब विचारणारी तू आहेस तरी कोण गं? माझ्याच ऑफिसमध्ये येऊन मघापासून काय अरेरावी चालवली आहेस?” त्याचा संयम सुटत चालला होता.


“हेय, हॅलोऽऽ. माझ्याशी बोलताना असं लिमिट क्रॉस करून नाही बोलायचं. मी कोण आहे हे तुला जाणून घ्यायचं आहे ना? तर ऐक. मी मनस्वी आहे. डॉक्टर मनस्वी, डॉटर ऑफ डॉक्टर प्रकाश.” तिने त्याच्याच तोऱ्यात उत्तर दिले.


“डॉक्टर प्रकाश! ओह आय सी. तरीच एवढया तोऱ्यात बोलते आहेस तर? हिवरेवाडीतील हिवरेपाटलांचे रक्त असेच. कायम दुसऱ्यावर तोरा दाखवायचा. तूही तोच वारसा पुढे चालवणार त्यात नवल ते काय? शेवटी द ग्रेट डॉक्टर प्रकाशची तू मुलगी ना? प्रेम एकासोबत करायचं आणि दुसऱ्या कुणाशी लग्न करून मोकळं व्हायचं. तू ही तशीच..”

‘सपाऽऽक!’

पुढे काही बोलायच्या आधीच त्याच्या गालावर मनस्वीचे पाचही बोटे उमटली.


“एऽऽ आदित्य धनराज. मी कशी का असेना, आय डोन्ट केअर; पण बाबांविषयी चुकीचा एकही शब्द ऐकून घेणाऱ्यातील नक्कीच नाहीये कळलं ना? तू असशील बडे बाप की औलाद, एक मोठा व्यावसायिक. आपल्या श्रीमंतीचा तोरा आपल्याजवळ ठेवायचा. शब्दांची किंमत काय असते ना ते फक्त आणि फक्त माझ्या बाबांकडून मी शिकलेय; त्यांच्या मनाची श्रीमंती मी अनुभवलीय. तेव्हा त्यांच्या विरुद्ध एकही चुकीचा शब्द काढायचा नाही.” त्याची कॉलर पकडून प्रत्येक शब्दावर जोर देत ती बोलत होती.


“आर यू आऊट ऑफ युअर माईंड?” तिच्या हातून कॉलर सोडवून घेत त्याने तिला बाजूला ढकलले.


“हो, मी ठार वेडी झाले आहे. त्या चंपाजी तर काय
म्हणत होत्या की आदित्य धनराज खूप मोठा माणूस आहे, अगदी प्रकाशसारखा आहे. पण तू हे सिद्ध करून दाखवलंस की माझ्या बाबांसारखं दुसरं कुणी असूच शकत नाही आणि मला हे माहिती होतं.


खूप माज आहे ना तुला तुझ्या पैशांचा? या पैश्यांच्या बदल्यात तू चंपाजींना घेऊन जाणार होतास? कुठे घेऊन जाणार होतास? मी तर या तुझ्या श्रीमंतीचेच तुकडेच करते. माझ्या बाबांपासून तू त्यांना दूर करू बघतोस होय? पण ते अशक्य आहे केवळ अशक्य.” टेबलावरचा चेक टराटरा फाडत ती बोलता बोलता रडू लागली.
:
क्रमश:
©®Dr. Vrunda F.(वसुंधरा..)
*साहित्यचोरी गुन्हा आहे.*
*****


🎭 Series Post

View all