एक इजाजत. भाग-७२

वाचा एक अलवार फुलणारी प्रेमकथा!
एक इजाजत!
भाग -७२


“हो, मी ठार वेडी झाले आहे. त्या चंपाजी तर काय
म्हणत होत्या की आदित्य धनराज खूप मोठा माणूस आहे, अगदी प्रकाशसारखा आहे. पण तू हे सिद्ध करून दाखवलंस की माझ्या बाबांसारखं दुसरं कुणी असूच शकत नाही आणि मला हे माहिती होतं.


खूप माज आहे ना तुला तुझ्या पैशांचा? या पैश्यांच्या बदल्यात तू चंपाजींना घेऊन जाणार होतास? कुठे घेऊन जाणार होतास? मी तर या तुझ्या श्रीमंतीचेच तुकडेच करते. माझ्या बाबांपासून तू त्यांना दूर करू बघतोस होय? पण ते अशक्य आहे केवळ अशक्य.” टेबलावरचा चेक टराटरा फाडत ती बोलता बोलता रडू लागली.


कालपासूनच्या कोंडलेल्या तिच्या भावनांचा उद्रेक होऊन आधी शब्दावाटे आणि नंतर अश्रूवाटे तो बाहेर पडू लागला होता.


तिचे ते चेक फाडताना बघून आदीला तिचा प्रचंड राग आला मात्र क्षणात तिच्या डोळ्यातील बरसणारा श्रावण बघून त्याला कसे व्यक्त व्हावे ते कळत नव्हते.


“हे बरं आहे. आधी माझ्या गालावर असला नसला जोर एकवटून थापड लगावायची. त्यानंतर हा दोन करोडचा चेक फाडायचा आणि आता स्वतःच रडायचं. बाई गं तुला नेमकं काय सिद्ध करायचं आहे?”


खुर्चीवर बसून ओंजळीने तोंड झाकून घेत हुंदके देणाऱ्या मनस्वीच्या पुढ्यात दोन्ही हात बांधून घेत आदी उभा होता.


“दोन करोड, दोन करोड काय करतो रे? सांगितलं ना पैश्यांचा माज मला नाही दाखवायचा.” रडत रडतच त्याच्यासमोर एक बोट नाचवत ती म्हणाली.


“आणखी काही सांगायचं राहिलंय?” तिच्या त्या कृतीने ओठावर आलेले हसू लपवत त्याने विचारले.


“हो. चंपाजीपासून दूर राहायचं. त्यांच्या आसपास देखील भटकायचं नाही.” डोळे पुसत ती.


“याचं खोटं आश्वासन मी नाही देऊ शकणार. त्यांची आठवण आली की मी त्यांना भेटायला बिनदिक्कत जाऊ शकतो.”


“त्या केवळ बाबांच्या आहेत. त्यांना हे असे पैसे देऊन विकत घ्यायचा प्रयत्न करू नकोस, समजलं ना आदित्य धनराज?”


त्याच्या आणि चंपाच्या नात्याकडे वेगळ्या दृष्टीकोनातून पाहणाऱ्या तिचा या क्षणी राग येण्याऐवजी त्याला कीव वाटली होती. एक पुरुष आणि स्त्री..दोघं एकत्र असले की माणसं एका विशिष्ट चष्म्यातून का बघतात हेच त्याला उमगत नव्हते.


“मी जाईन, तुला काय करायचे ते कर आणि तुला त्यांचा एवढा पुळका का आहे गं? प्रकाश तर लग्न करून मोकळा झालाय ना?”


“ए, पायरीने बोलायचे. बाबांचा असा एकेरी उल्लेख करायचा नाही. अँड फॉर युअर काईंड इन्फॉर्मेशन, बाबांनी कधीच लग्न केलं नाही.”


“सॉरी! रत्नाचा प्रकाश असं डोक्यात फिट झालं होतं म्हणून एकेरी उल्लेख निघाला. बाय द वे त्यांनी लग्न केलं नाही तर मग ही मुलगी कुठून झाली? डॉटर ऑफ डॉक्टर प्रकाश?” तो कुत्सितपणे हसला.


“मुलं व्हायला काय लग्न केलेच पाहिजे असे कुठे लिहिले आहे का? बिनालग्नाचेही पेरेंट्स बनता येतं की. तुला मी हे का सांगतेय ते ठाऊक नाही, पण तुझ्या डोळ्यावरचा काळा चष्मा दूर व्हावा यासाठी स्पष्ट करतेय की मी माझ्या बाबांची ॲडॉप्टेड डॉटर आहे आणि त्याचा मला अभिमान आहे. कारण त्यांनी माझ्यावर सख्ख्या बापाहून अधिक जीव लावला आहे.”


“म्हणजे त्यांनी लग्न केलेच नाही? पण का?”


“कारण त्यांनी खरे प्रेम केले होते आणि त्यांच्या प्रेमाला शब्द दिला होता की ते आयुष्यभर त्यांची वाट बघत राहतील. तो त्यांनी पाळला. एका अनाथ मुलीला दत्तक घेऊन तिचे आयुष्य मार्गी लावले. चपाजींना दिलेला शब्द त्यांनी खरा करून दाखवला. ही खरी त्यांची श्रीमंती आहे आणि हे खरे प्रेम आहे. काही नातं नसताना एका अनाथ बाळाला आपलं मानून प्रेम देणं सोपं नसतं आणि त्यातही ते बाळ एका वेश्येचे आहे हे ठाऊक असताना तर मुळीच नाही.”

ती जे सांगत होती ते ऐकून आदीला थोबाडीत मारून घेतल्यासारखे वाटले. रत्नाच्या प्रेमाखातर प्रकाश खरोखर आयुष्यभर लग्न न करता राहिला होता आणि आतापर्यंत आदीने त्याच्यावर वाटेल तसे आरोप केले होते.


“मनस्वी, आय एक सॉरी, रिअली सॉरी. मला हे काहीच ठाऊक नव्हतं गं. म्हणजे चंपाजींनी मला हे सांगितलंच नव्हतं.” तो तिला माफी मागत म्हणाला.


“त्यांनी कुणाला सांगायला त्यांना स्वतःला तरी हे माहिती असायला हवं होतं ना? आणि मुळात त्या तुला हे सर्व का सांगतील? त्यांचा एवढा कोण लागून गेला आहेस तू?” ती त्याच्यावर पुन्हा फुत्कारली.


“तुझ्या अशा वागण्यामुळे ना मला तू डॉक्टर आहेस की नाही याचा खरंच डाऊट येतो. सारखं काय गं चिडून बोलतेस? अशी चिडचिड करणे आरोग्याला धोकादायक असते हे तुला शिकवलंच नाहीये?”


“मिस्टर आदित्य..” तिचा बोट पुन्हा बाहेर आला.


“दरवेळी दुसऱ्यावर बोट ठेवणं हे बरोबर असतंच असं नव्हे. हे घे पाणी पी. या क्षणी खरं तर ना मला तुझा राग यायला हवा; पण तो का येत नाहीये माहित नाही. कदाचित तू लहान आहेस म्हणून असेल.” तिच्या हातात पाण्याचा ग्लास ठेवत तो शांतपणे म्हणाला.


“मी लहान नाहीये.” तिच्या नाकावर पुन्हा राग.


“लहानच आहेस म्हणून तुला काही कळत नाहीये. एक लक्षात घे की प्रत्येक स्त्री आणि पुरुषामध्ये केवळ एकच नातं नसतं गं. चंपाजी मला आईसारख्या वाटल्या. त्यांच्याबद्दल माझ्या मनात नितांत आदर आहे आणि त्या आदरापोटीच मी ते दोन करोड त्यांना देऊ केले होते. त्यांनी शलिमार गल्ली सोडली नाही तरी त्यांनी तिथले काम सोडावे म्हणून. हा चेक त्यांना देण्यामागे बाकी दुसरा कुठलाच उद्देश नव्हता.” खाली पडलेल्या चेकच्या कपट्याकडे पाहत तो म्हणाला.


“..विश्वास ठेव. हे पैसे कुठल्याच वाईट कामाचे नाहीयेत..”चंपाचे ते वाक्य तिला आठवले आणि आदीचे आत्ताचे बोलणे ऐकून मनुने तोंडावर हात ठेवून घेतले.6l


“ओह माय गॉड! आय एम रिअली सॉरी! ॲक्च्युली खूप, खूप सॉरी. म्हणजे माझ्या मनात तुमच्याबद्दल असं काही आलंच नाही. म्हणजे.. चंपाजी म्हणाल्या की तुम्ही अगदी माझ्या बाबांसारखे आहात; त्यामुळे मला राग आला होता. तुमच्याकडे बघण्याचा दृष्टीकोनच बदलला होता म्हणून मी तुम्हाला काय काय बोलून गेले. खरंच सॉरी. प्लीज मला माफ करा.” खुर्चीवरून उठत ती दोन्ही हातांनी कान पकडून माफी मागत होती.


“खरंच लहान आहेस तू. राग आला तेव्हा मला एकेरी संबोधत होतीस आणि आता चुकीची जाणीव झाली तर रिस्पेक्ट देऊन बोलायला लागलीस.” नकळतपणे तिच्या डोक्यावर हात ठेवून त्याने तिला हलकेच टॅप केले.


“पुन्हा तेच? मी लहान नाहीये; पण बाबांना कुणी काही म्हटले तर ते सहन करू शकत नाही.” डोक्यावरून त्याचा हात खाली घेत ती म्हणाली.


“ओके, सॉरी अगेन. प्लीज बस ना. आपण बसून बोलूयात. काय ना सारखं उभं राहून बोलायची मला सवय नाहीये. बडी बाप की बिगडी हुई औलाद आहे ना मी.” तो मिश्किलीने म्हणाला.


“प्लीज सर असं बोलून तुम्ही मला आणखी एम्बरेस करू नका.” ती खाली पाहत म्हणाली.


“हेय, अगं मी ते मस्करीत बोललो. तू आधी बैस आणि प्लीज इतकं सगळं ऐकून घेतल्यानंतर तुझ्या तोंडून हे सर वगैरे ऐकणं मला जरा जास्तच जड जातेय. तेव्हा हे सर म्हणणं किंवा रिस्पेक्ट देणं बंद कर. जस्ट कॉल मी आदी ऑर आदित्य आणि मी तुझी खेचत नाहीये तर सिरीयसली सांगतोय.” त्याच्या खुर्चीवर विराजमान होत तो तिला सहज करत म्हणाला.


“सॉरी, ते बाबा..” ती बसत बोलायला लागली.


“इट्स ओके अगं. कितीवेळा सॉरी म्हणशील? उलट तुझे तुझ्या बाबावरचे प्रेम बघून मला तुझा हेवा वाटला बघ. मला माझ्या पप्पांवर असं भरभरून प्रेम कधी करताच नाही आलं.”


“का?” त्याच्यावर डोळे रोखत तिने निरागसपणे विचारले.


“असंच. प्रत्येक सुखाच्या मागे एक दुःखाची किनार असतेच की.” तो खिन्नपणे म्हणाला.


“एवढे श्रीमंत असून तुम्ही दुःखी आहात?” पापण्यांची उघडझाप करत ती म्हणाली.


दुःख गरिबी आणि श्रीमंती पाहून येत नाही. पण जर का तसं असेल तर मी म्हणेन की श्रीमंत लोक गरिबांपेक्षा जास्त दुःखी असतात कारण त्यांना त्यांचं नाव, त्यांचं स्टेटस जपण्याची जास्त खुमखूमी असते.


आता तुझे अण्णासाहेबच घे ना, त्यांच्याकडे पैसा होता, सत्ता होती, नाव होतं म्हणूनच त्यांना रत्ना त्यांची सून म्हणून नको होती. हेच अण्णा जर गरीब असते तर रत्ना आणि त्यांच्या प्रकाशच्या प्रेमाला त्यांनी विरोध केला नसता.” तो ओघात बोलून गेला.


“अण्णासाहेब? म्हणजे तुम्ही बाबांच्या अण्णाबद्दल बोलत आहात काय? तुम्ही त्यांना ओळखता? कसे ओळखता?”

मनस्वीच्या प्रश्नाचे उत्तर आदी देऊ शकेल?वाचा पुढील भागात.
:
क्रमश:
©®Dr. Vrunda F.(वसुंधरा..)
*साहित्यचोरी गुन्हा आहे.*
*****

🎭 Series Post

View all