एक इजाजत.भाग -७३

वाचा एक अलवार फुलणारी प्रेमकथा!
एक इजाजत!
भाग -७३


“आता तुझे अण्णासाहेबच घे ना, त्यांच्याकडे पैसा होता, सत्ता होती, नाव होतं म्हणूनच त्यांना रत्ना त्यांची सून म्हणून नको होती. हेच अण्णा जर गरीब असते तर रत्ना आणि त्यांच्या प्रकाशच्या प्रेमाला त्यांनी विरोध केला नसता.” तो ओघात बोलून गेला.


“अण्णासाहेब? म्हणजे तुम्ही बाबांच्या अण्णाबद्दल बोलत आहात काय? तुम्ही त्यांना ओळखता? कसे ओळखता?”

“ओळखायला काय? आतापर्यंत आपणतरी एकमेकांना कुठे ओळखत होतो? तसेच अण्णासाहेबांबद्दलही.”


“तसं असेल तर तुमचा खूप मोठा गैरसमज झालाय. ते बाबा आणि रत्नाच्या प्रेमाच्या विरोधात कधीच नव्हते. उलट बाबांचे शिक्षण पूर्ण झाल्यावर तेच आबासाहेबांना सारं काही सांगणार होते.


“अशा माणसांचे हेच तर गमक आहे. सुरुवातीलाच आपण अशी माणसं ओळखायला चुकतो आणि मग चुकीचे घडत गेले तरी तेच योग्य आहे असे आपल्याला वाटू लागते. मी माझ्या पप्पांना ओळखायला चुकलो आणि तुझे बाबा त्यांच्या अण्णांना.” एक दीर्घ श्वास घेत तो म्हणाला.


“हे बघा सर, असं कोड्यात बोलू नका. जे आहे ते स्पष्ट सांगा. तुमच्या पप्पांच्या कथा ऐकायला मला वेळ नाही आणि मुळात माझ्याकडे असाही जास्त वेळ नाहीय. तुम्ही अण्णांचा विषय काढला म्हणून मी इथे थांबलेय नाहीतर केव्हाच निघून गेले असते.”


“मनस्वी, तुझा राग पूर्वीपासूनच असा नाकावर चढून बसलेला असतो का गं? म्हणजे जरा काही मनाविरूद्ध ऐकलंस की तुझं ढ्या ढ्या ढ्या गोळ्या झाडणं सुरु होत असतं. तुझ्या पेशंटशी तू अशीच वागतेस का?”


“मिस्टर आदित्य धनराज.. माझ्या प्रोफेशनवर घसरायचं नाही हं. आजही पुण्यातील मोठमोठ्या हॉस्पिटल्समध्ये बेस्ट डॉक्टर म्हणून माझं नाव रिकमेंड केले जाते.”

तिचे उत्तर ऐकून तो जोराने हसायला लागला.


“हसायला काय झालं?”


“म्हणजे तू पुण्याची आहेस होय? तरीच तुझं बोलणं एवढं स्पष्ट असतं. ॲक्च्युली तुझा हा ट्रॅक ना भारी वाटतो. असं एकदम ‘आदित्य धनराज’ म्हणून गरजतेस ना तेव्हा खरंच मी कोणीतरी मोठी हस्ती आहे असं वाटतं.” तो हसतच म्हणाला.


“ओह सॉरी अगेन. म्हणजे असा ओरडून बोलण्याचा माझा पिंड नाहीये; पण इथे आल्यापासून काय झालंय माहिती नाही.” ती ओशाळून म्हणाली.

“अगं सॉरी नको म्हणूस. खरं तर हे तुझं बोलणं मला आवडतंय. फक्त ते आदित्य नंतर धनराज लावू नकोस ना. ते ऐकायला जरा जड जातं. जस्ट कॉल मी आदित्य. मला चालेल.”


“ओके.. आदित्य! आता मला सांग की तू अण्णासाहेबांबद्दल असं का म्हणालास?”


“ते मी सांगेनच. पहिले मला हे सांग जो चेक मी चपाजींना दिला होता तो तुझ्याकडे कसा आला?”


“त्याचा इथे काय संबंध?”


“संबंध आहे. तुझ्याकडे जर हा चेक नसता तर मला भेटायला तू इथवर आली नसतीस. तेव्हा मला हे कळायला हवं. तू मला हे सिक्रेट सांग.
मी तुला अण्णासाहेबांचं सिक्रेट सांगतो.” खुर्चीला डोके टेकवून आरामात बसत तो म्हणाला.


“पक्का बिझनेस माईंडेड आहेस तर तू.”


“ते आहेच.” त्याच्या ओठावर मंद हसू.


“मी लहान असताना नाशिकच्या अनाथाश्रमात वाढले. पुढे योगायोगाने बाबांनी मला दत्तक घेऊन वाढवले. मात्र मी मोठी होत असताना त्यांनी माझ्यासमोर अट ठेवली की डॉक्टर होऊन मी नाशिकमधील शालिमार वस्तीतील बायकांसाठी काम करायचं. त्या वस्तीसाठी हॉस्पिटल बांधायचे.

चार दिवसापूर्वीच तिथल्या बांधकामाचा श्रीगणेशा झाला त्यावेळी मी त्यांना आमंत्रित केले होते. तेव्हा तिथून निघताना त्यांनी तो चेक मला दिला. हॉस्पिटल लवकरात लवकर बांधून व्हावे यासाठी त्यांची मदत म्हणून.” तिने जे घडले ते थोडक्यात सांगून टाकले.


“व्हॉट? चंपाजी आणि प्रकाश.. आय मिन डॉक्टर प्रकाश एकमेकांना भेटलेत? माय गॉड! हे ऐकून मी किती आनंदी झालो माहिती आहे? त्यांनी भेटावं असं मला कित्येक दिवसांपासून वाटत होतं. काय बोललेत ते दोघं? चंपाजी त्यांच्यासोबत यायला तयार झाल्या का?” उत्सुकतेच्या भरात त्याचे प्रश्नावर प्रश्न सुरु होते.


“असं काहीच घडलं नाही. उलट मी त्या दोघांना एकत्र आणण्याचे प्रयत्न करायचे नाही असे चंपाजींनी मला बजावलं.” ती कोरडे हसून म्हणाली.


“म्हणजे तू त्यांना यापूर्वी कधी भेटली होतीस का?”


“हो. मागच्या बारा दिवसांपूर्वी भेटले होते. आदित्य तुझ्या प्रश्नोत्तराचा तास झाला असेल तर आता माझ्या प्रश्नांची उत्तरं देणार का?”

तो मात्र विचारात हरवला होता. बारा दिवसांपूर्वी.. म्हणजे तो चंपाला शेवटचा भेटला त्याच्या आदल्या दिवशी चंपाला ही भेटली होती तर. तेव्हा तो किती चिडला होता. त्याला भेटण्याच्या दिवसात चंपाने इतर कोणाला भेटू नये असा अलिखित करारच होता. करार मोडला म्हणून चिडलेला तो आणि फक्त पुरुषांना भेटणार नाही त्या व्यतिरिक्त इतर कोणाला भेटायला ही चंपा मुखत्यार आहे असं म्हणणारी चंपा. आज त्याला त्या दिवशीच्या वागण्याचे हसू येत होते.


“आदित्य ,मी काहीतरी विचारते आहे.”

“हो. विचार की. पण त्यापूर्वी काही खाऊन घ्यायचं का? तुला भूक लागली असेल ना?”


“चंपाजी म्हणाल्या होत्या की तू त्यांना माझ्या बाबासारखा वाटतोस; पण म्हणून तू माझे बाबा व्हायचा प्रयत्न करू नकोस कळलं ना? माझ्या प्रश्नांची उत्तरे मिळाली की माझ्या खाण्याचे मी बघून घेईल.”


“तू पूर्वी मांजर होतीस का गं? अशी फिसकन अंगावर येतेस? चंपाजी मलाही नेहमी म्हणायच्या की मला बघून त्यांना प्रकाशची आठवण येते म्हणून मी काय लगेच स्वतःला त्यांचा प्रकाश समजलो नाही ना? मी कोण आहे हे मला चांगलंच ठाऊक आहे.”

तो म्हणाला त्यावर काही न बोलता मनस्वी केवळ टेबलवर दोन्ही हात ठेवून त्यावर हनुवटी टेकवून त्याच्याकडे एकटक पाहत होती.


“अशी काय बघतेस?”


“जर बाबांनी लग्न केलं असतं तर त्यांचा मुलगा म्हणजे माझा भाऊ तुझ्यासारखा असता का हे बघतेय. तसे तुझ्या माहितीसाठी सांगते की तुझा रंग आणि उंची सोडली तर तुझे कुठलेच फिचर बाबांसारखे नाहीयेत.” नाक वाकडे करत ती.


“खरंच तू वेडूली आहेस. अगं, त्यांनी माझ्या फिजिकल अपीअरन्स वरून नाही तर स्वभावामुळे माझी तुलना तुझ्या बाबांशी केली. तिच्याकडे बघून गोड हसत तो म्हणाला.


“वेडूली? म्हणजे काय?”


म्हणजे थोडीशी वेडी आणि जराशी वेंधळी.. त्या दोघांनी मिळून बनलेला शब्द..वेडूली. तुझ्यासाठी हा परफेक्ट वर्ड आहे ना?” ती मिश्किल हसत म्हणाला.

“आदित्यऽऽ”

त्याला मारायला टेबलवरची फाईल पकडत ती उठली तसे त्याने तिचा हात पकडला.


“अगं वेट, वेट.. तू वेडूली नाहीस, गोडुली आहेस. मांजरीसारखी गुरगुरणारी.. पण गोड. कदाचित मला एखादी बहीण असती तर तिही अशीच असती, काहिशी तुझ्यासारखी. जस्ट लाईक टॉम अँड जेरी!” तो म्हणाला तसे तिच्याही ओठावर हलकेच हसू उमटले.


“खरंच तुला माझ्यात बहीण दिसतेय?” हातातील फाईल परत टेबलवर ठेवत म्हणाली.


“हम्म. म्हणजे ॲक्च्युली आय डोन्ट नो. पण असं वाटलं की बहीण असती तर कदाचित तुझ्यासारखी असती.” तो खांदे उडवत म्हणाला.

“आणि त्याच वाटण्यातून वाटलं की तू काही खाऊन घ्यावेस. बाकी काही नाही.”


“ओह! तू किती छान आहेस? आजवर बाबांशिवाय मी कुठल्याच पुरुषावर जास्त विश्वास ठेवला नाही. शाळा कॉलेजमध्ये असताना तसे बरेच फ्रेंड्स होते. मात्र ते नातं मी तिथल्यातिथेच ठेवले. एखादा मुलगा कधी लाईन क्रॉस करतोय असं वाटलं तर मीच रस्ता बदलत होते.

सॉरी आदित्य कदाचित तुझ्याकडे देखील मी त्याच चष्म्यातून पाहिले असावे.”


“इट्स ओके गं. मला जसं वाटलं तसं तुलाही वाटलं पाहिजे हे गरजेचं नाहीये ना? बरं, आतातरी तुझी काही हरकत नसेल तर आमच्या कॅन्टीनचे जेवण चाखून बघ. तुला नक्की आवडेल.”


“तू बॉस असून कॅन्टीनचे जेवण जेवतोस?”


“हम्म, जेवणाच्या बाबतीत एम्प्लॉयी आणि बॉस असे आमचे नाते नसते. कामाच्या वेळी काम, मात्र इतर वेळी आम्ही सगळे मिळून राहतो. कपंनी चालवणे हे एकट्याचे काम नसते ना गं. इट्स अ टिमवर्क. आपण जर आपल्या टीममेम्बर्सशी प्रेमाने राहिलो तर तेही आपल्याला त्यांचे हंड्रेड परसेन्ट आउटपुट्स देतात. शेवटी चुका सगळ्यांकडूनच होतात पण माणसं जोडणं ही देखील एक कला आहे ना? बोलता बोलता इंटरकॉम वरून त्याने दोघांसाठी आत जेवण पाठवायला सांगितले.


“तुला सांगू? तू सेम माझ्या बाबांसारखं बोलतोस. बाबांनीही इतक्या वर्षात भरपूर माणसं जोडली. त्यांची मायेची सारी माणसं दुरावली पण त्यांनी त्यांच्या स्वभावामुळे इतर खूप सारी माणसं बांधून ठेवली. इव्हन आमच्या वॉचमन काकांपासून तर वार्डबॉय, नर्सेस आणि स्वयंपाक करणारया काकू.. सगळ्यांशी प्रेमाचं नातं आहे.

आता पटतंय कदाचित तुझ्या नी बाबांच्या सारख्या वागण्यामुळे चंपाजींना तू बाबासारखा वाटला असावास.”


“देवाला ठाऊक.” तिच्याकडे बघून स्मित करत तो म्हणाला. कदाचित तो प्रकाशसारखा आहे हे तिला पटतंय याचा त्याला आनंद झाला असावा.


“अण्णांबद्दल काय बोलत होतास?” जेवणानंतर तिने त्याला लगेच प्रश्न केला. तसा इतकावेळ तिला धीर धरवत नव्हता पण त्याला वाईट वाटू नये म्हणून जेवण होईपर्यंत ती गप्प राहिली होती.


“तुम्ही सगळे एकत्र राहत असणार ना? मग त्यांच्या स्वभावाचा पैलू तुझ्यासमोर कधी आला नाही का?


“मी म्हटलं ना की बाबांच्या मायेची माणसं सुटली म्हणून? रत्ना त्यांच्या आयुष्यातून निघून गेल्यावर बाबांनी हिवरेवाडी कायमची सोडली. घरचे लग्नाचा दबाव आणायचे म्हणून मग त्यांनी घरच्यांशीही संबंध तोडले. त्यानंतर त्यांच्या आयुष्यात मी आल्यावर तर हिवरेवाडीचा उल्लेख मी केवळ त्यांनी सांगितलेल्या आठवणीमधूनच ऐकला आहे. पण आदित्य, त्या आठवणीत त्यांनी अण्णांबद्दल कधीच चुकीचे उद्गार काढले नाहीत.

उलट अण्णा त्यांच्या सोबत होते हेच त्यांनी सांगितलंय. रत्नाच्या मेडिकल राऊंडसाठी तर तेही तिच्याबरोबर मुंबईला यायला निघाले होते मात्र त्यांना मध्ये दुसरं काम आलं नि ते जाऊ शकले नाहीत. मात्र त्यानंतर रत्ना कधीच परत आली नाही या गोष्टीला ते कितीतरी दिवस स्वतःला जबाबदार ठरवत होते.”

“आणि त्यावर तुम्ही सर्वांनी विश्वास ठेवला हेच तर चुकलं.”

“म्हणजे?” तिचे डोळे विस्फारले.

पुढील भाग लवकरच!
:
क्रमश:
©®Dr. Vrunda F.(वसुंधरा..)
*साहित्यचोरी गुन्हा आहे.*
*****

🎭 Series Post

View all