एक इजाजत.भाग -७४

वाचा एक अलवार फुलणारी प्रेमकथा!
एक इजाजत!
भाग -७४


“रत्नाच्या मेडिकल राऊंडसाठी तर तेही तिच्याबरोबर मुंबईला यायला निघाले होते, मात्र त्यांना मध्ये दुसरं काम आलं नि ते जाऊ शकले नाहीत. त्यानंतर रत्ना कधीच परत आली नाही या गोष्टीला ते कितीतरी दिवस स्वतःला जबाबदार ठरवत होते.”


“आणि त्यावर तुम्ही सर्वांनी विश्वास ठेवला हेच तर चुकलं.”


“म्हणजे?” तिचे डोळे विस्फारले.


“म्हणजे.. म्हणजे तुला कसं सांगू? त्यांचं निरागस रत्नाबरोबर मुंबईला जायचं म्हणून सांगणं आणि मग जळगावी उतरणं हे सगळं प्लॅन्ड होतं गं. त्यांच्या प्लॅनचा तो एक भाग होता.”


“कसला प्लॅन? मला कळेल असं सांगशील?” अजून पुढचे काही ऐकण्याआधीच तिच्या उरात धडकी भरली.


“रत्नाला प्रकाशच्या आयुष्यातून बाहेर काढण्याचा प्लॅन!”


“काही काय बोलतोस? अण्णा असे का करतील?”


“मघाशी म्हणालो तसं त्यांचं नाव, त्यांचं स्टेटस जपण्यासाठी. त्यांचं घराणं म्हणजे गावातील बडी असामी. असं असताना आपल्याच शेतात राबणाऱ्या मजुराच्या लेकीला त्यांनी सून म्हणून स्वीकारले असते तर त्यांच्या नावाला सो काल्ड ‘बट्टा’ लागला असता ना? म्हणून मग त्यांनी आपल्या मुलाला ते त्याच्यासोबत आहेत असं भासवत राहिले आणि इकडे चंपाचा काटा काढण्याची तयारी करू लागले आणि त्यांना साथ दिली ती गजा आणि दिवाकर या त्यांच्या दोन चमच्यांनी.”


“हो. त्या दोघांनी तर तिला मुंबईला पोहचवण्याचे काम स्वीकारले होते पण घाटात त्यांच्यावर हल्ला झाला आणि रत्ना तिच्या कुठल्यातरी श्रीमंत प्रियकरासोबत पळून गेली असे त्यांनी गावात येऊन शपथेवर सांगितले. बाबाकडून तर मला हेच कळले होते.”


“आणि त्यांनी त्यांच्या सांगण्यावर अगदी सहज विश्वास ठेवला? हे गं कसलं प्रेम?”


“नाही आदित्य, बाबांच्या प्रेमावर शंका घेऊ नकोस. त्यांना तर काहीच ठाऊक नव्हते. रत्नाच्या ऍडमिशन बद्दल आठ दिवस लोटूनही काहीच खबरबात कळली नाही म्हणून ते स्वतः गावाला गेले तेव्हा त्यांना ते माहिती झाले. त्यांचा त्यावर विश्वास बसला नव्हता; पण दिनकर आणि गजाने जे चित्र उभे केले त्यावर सर्वांनी विश्वास ठेवला तेव्हा त्यांनाही ठेवावा लागला.


रत्नाच्या आईवडिलांनी देखील ते मान्य केले होते. त्यामुळे ती कोणासोबत तरी पळून गेली यावर शिक्कामोर्तब झाला होता. त्यामुळे कोणी पोलिसात जाण्याची तसदी घेतली नाही.


“किती खोटं चित्र उभं करण्यात आलं होतं गं?”


“म्हणजे? तुला काय म्हणायचं आहे? हल्ला झालाच नव्हता का?”


“झाला होता; पण गजा आणि दिनकरवर नव्हे तर रत्नावर हल्ला झाला होता. तिच्या शरीरावर तो हल्ला झाला होता आणि तो हल्ला गजा आणि दिनकरने केला होता.”


“कसं शक्य होतं हे?” तोंडावर हात ठेवून ती म्हणाली.


“शक्य होतं. कारण अण्णांनी त्यांना ही कामगिरी दिली होती. घाटात रत्नाला संपवून टाकायची आणि ती पळून गेली अशी गावात येऊन बतावणी करायची. त्या नाराधमांनी मात्र त्या निरागस कोवळ्या मुलीवर शारीरिक अत्याचार केले गं. दोघांनी तिच्यावर जबरदस्ती केली होती आणि नंतर ती कायमची संपली असं समजून घाटात ढकलून दिले होते.”


“किती भयंकर आहे हे सगळं. असं काही घडलं असेल अशी बाबांनी स्वप्नातही कल्पना केली नसेल रे.” तिच्या अंगावर सरसरून काटा उभा राहिला आणि डोळ्यातून अंखड पाणी वाहायला लागले.


“रत्नाची कर्मकहाणी इथेच संपत नाही. तिचं दैव बलवत्तर किंवा नशीब फुटकं म्हणून ती वाचली आणि मदतीसाठी याचना करू लागली. तिथून जाणाऱ्या एका गर्भश्रीमंत इसमाने दया दाखवून तिला मदत करण्याच्या हेतूने स्वतः सोबत मुंबईला आणले. मात्र तोही तसाच.. शरीराचा भुकेला अन् सोबत समाजातील स्टेटसला जपणारा.


त्याला तिचे शरीर तर हवे होते आणि नावही खराब व्हायला नको होते. म्हणून मग सुवर्णमध्य काढून तो तिला नाशिकला शीलाआँटीच्या कोठीवर घेऊन आला आणि पुढे चंपा तिथली सर्वात जास्त किंमत असलेली वेश्या म्हणून प्रसिद्ध झाली.”


“किती किती वाईट घडलेय त्यांच्यासोबत. काहीतरी कारण होते म्हणून रत्नाची चंपा झाली हे दिसत होतं. मात्र त्यामागे एवढी दुःखमयी कहाणी असेल असं कधीच वाटलं नाही.” ती हुंदके देत म्हणाली.


“एक सांगू? तिचा प्रकाश तिला घ्यायला आला तेव्हा तिलाही त्याच्यासोबत जावं असं लाखवेळा वाटलं होतं गं; पण स्वतःचे हे कलंकित शरीर घेऊन त्यांच्यासोबत जायची कधी हिंमत झाली नाही. शिवाय त्यामुळे अण्णासाहेब आणि तुझ्या बाबांचे संबंध दुरावलेले त्यांना आवडणार नव्हते म्हणून मग त्यांनी रत्नाचे आयुष्य विसरून चंपाचे आयुष्य स्वीकारले.”


आदी बोलायचा थांबला तरी मनस्वीचे अश्रू थांबायचे नाव घेत नव्हते. चंपाची झालेली पहिली भेट, ते आरस्पानी सौंदर्य बघून तिची दिपलेली नजर, तिच्या सात्विक सोज्वळ रूपावर भाळलेली ती आणि त्यानंतर पायाभरणीला येताना मुद्दाम केलेला भडक मेकअप आणि तिचे वागणे.. सारं आठवून तिला आणखी रडायला येत होते. प्रकाश आणि तिला एकत्र करण्याचा प्रयत्न करू नकोस हा सल्ला तिने का दिला असावा हेही तिला उमगले होते.


चंपाच्या वाट्याला आयुष्यभर केवळ सोसणेच आले होते. प्रकाशवरच्या प्रेमाची शिक्षा म्हणून ती प्रेमाग्नीत पार पोळली होती आणि इकडे प्रकाश देखील तिच्या विरहात कायम जळत आला होता. दोघांच्या प्रेमाची ही शोकांतिका मनस्वीला आणखी रडायला भाग पाडत होती.


“हेय अगं, किती रडशील? आमच्या मुंबईत पूर येईल की अशाने. आधीच इथे एवढं खारं पाणी आहे त्यात तुझ्या अश्रुंची पुन्हा भर!” तिला टीश्यू पेपर देत तो हसवण्याचा प्रयत्न करत म्हणाला.

“इट्स नॉट फनी एट ऑल! आदित्य हे ऐकून मी सुन्न पडल्यासारखी झालेय रे. रडू आवरता आवरत नाहीये. मग हे सगळं चंपाजींनी कसं सहन केलं असेल रे?” तिचा पुन्हा हुंदका.


“काय करणार? करावं लागलं. एकतर तिथून पळून जाऊनही त्यांच्या घरच्यांनी त्यांना स्वीकारले नसते आणि दुसरे म्हणजे या कामाचे त्यांना पैसे मिळत होते. त्या पैश्यातून आपला भाऊ बरा होईल ही वेडी आशा मनात बाळगून त्या महिन्याकाठी आजही पैसे पाठवत असतात.” स्वतःच्या डोळ्यातील बाहेर झळकणारे पाणी पुसत तो उत्तरला.


“पण आदित्य तुला हे सारं कसं ठाऊक? म्हणजे मला चुकीचं समजू नकोस बट आय एम क्युरिअस की तू तिथे चंपाजींना भेटायला का गेला होतास? म्हणजे स्त्रियांना उपजत सिक्स्थ सेन्स असतो. एखाद्याची नजर किंवा स्पर्श त्या माणसाबद्दल जाणून घ्यायला पुरेशी असते. मी मघापासून तुझ्यासोबत आहे पण तू मला खूप चांगला वाटलास, मग तुला अश्या ठिकाणी जायची गरज का पडली? आणि चंपाजींनी तुलाच हे सारं का सांगितलं?”


“मी तिथे एकदा नव्हे तर गेल्या दोन वर्षात कित्येकदा गेलोय.” तो खिन्न होत म्हणाला.


“कशासाठी?”


“सत्य जाणून घेण्यासाठी आणि चंपाजींना त्रास देण्यासाठी म्हणून.” त्याचे निर्वीकारपणे उत्तर.


“काय? तू असे कसे करू शकतोस? त्या देवीसमान स्त्रीशी तुझे कसले वैर होते?”


“एका स्त्रमुळे माझं घर उध्वस्त झालं होतं. शोध घेतल्यावर कळलं, ती स्त्री म्हणजे चंपा आहे, एक वेश्या. पार खवळलो होतो गं मी. या बायका किती नीच असतात असं वाटायचं मला. तिथे गेल्यावर मात्र मला कळलं माझे वैर यांच्याशी नसून खरा वैरी माझ्या घरातच आहे.” तो शून्यात बघत म्हणाला.


“मी समजले नाही रे.”


“घाटातील जखमी रत्नाला मुंबईत आणणारा आणि त्यानंतर तिला चंपा बनवून शीलाआंटीच्या कोठीवर नेणारा नीच मनुष्य दुसरा तिसरा कोणी नसून माझे पप्पा होते.. धनराज सेठ!” चंपाने त्याला सांगितलेली व्यथा थोडक्यात सांगून त्याने एक आवंढा गिळला.


“हाय रे कर्मा! मी यावर काय बोलू? म्हणून तुला तुझ्या नावानंतर धनराज नाव ऐकून राग यायचा तर.” ती हळवे होत म्हणाली.


“या नावाची किळस वाटते गं मनस्वी मला. त्यांचा मुलगा न होता एखाद्या गरीब घरातील किंवा चंपाजीसारख्या स्त्रीच्या पोटी जन्माला आलो असतो तर बरं झालं असतं असं कधी वाटतं.” त्याचा हुंदका शेवटी बाहेर पडलाच.


“हेय, आदित्य! रिलॅक्स. तू का स्वतःला त्रास करून घेतोस?” ती त्याला सावरत म्हणाली.


“कसं सांगू? हे सारं कळल्यापासून सगळ्याचा खूप त्रास होतो गं मला. माझ्या मनातील वेदना ना मी कुणाला सांगू शकत ना ही शेअर करू शकत. एक गर्भश्रीमंत असल्याचा शाप घेऊन मी जन्माला आलो. मम्मा कायम तिच्या मौजमस्तीत मग्न आणि पप्पांची ही काळी बाजू.. दोघांचं प्रेम असं मला कधी लाभलंच नाही. मित्रमैत्रिणीपासूनही मी कायम दूर राहिलो.

चंपाजींना मी केवळ त्रास द्यायच्या हेतूने भेटलो होतो पण मनस्वी त्यांना पहिल्यांदा पाहिलं ना तेव्हा माझ्या मनात एक वेगळीच शांतता लाभली आणि मग दरवेळी त्यांना भेटायचा मोह होत गेला. काहीतरी वेगळेपण एक आपलेपणा होता त्यांच्या वागण्यात. त्यांच्या प्रेमात कधी पडलो मला कळलंच नाही गं. ते प्रेम एक पुरुष म्हणून नव्हतं. एका लेकराचं होतं.. आईच्या प्रेमासाठी आसूसलेल्या बाळाचं.


आज वाटतंय की मला एखादं भावंड असतं तर किमान त्याच्याशी तरी मी बोलू शकलो असतो.” बोलता बोलता तिच्यापुढे त्याने अश्रुंची वाट मोकळी केली.
:
क्रमश:
©®Dr. Vrunda F.(वसुंधरा..)
*साहित्यचोरी गुन्हा आहे.*
*****

🎭 Series Post

View all