एक इजाजत.भाग -७६

वाचा एक अलवार फुलणारी प्रेमकथा!
एक इजाजत!
भाग -७६

“पप्पा, मी आदी आणि ह्या डॉक्टर.. डॉक्टर मनस्वी.”

मनावर दगड ठेवून त्याने तिची ओळख करून दिली. डोळे उघडे असले तरी स्वतःच्या मुलाला न ओळखणारा तो तिला काय लक्षात ठेवणार होता?


मात्र नवल घडावे तसे ती समोर येताच त्याची नजर ओळखीने हलली आणि ओठातून पुसटसे शब्द बाहेर पडले..

“क-म-ली..!”


“कमली.. कमली..” त्याचा आवाज स्पष्ट होत होता.


“कोण कमली?” मनस्वीने आदिकडे पाहिले.


“तू.. तूच कमली आहेस ना? मला तुझ्यासोबत न्यायला आलीहेस का? मला माफ कर कमली, मी तुझा गुन्हेगार आहे. माझ्यामुळे तुझं बाळ गेलं. माझ्यामुळे तूही गेलीस. मला क्षमा कर.” सलाईन लावलेले हात जोडण्याचा प्रयत्न करत धनराज बोलत होता.


“अहो काय करताय? तुमच्या हाताचे सलाईन निघेल अशाने.” काळजीने मनस्वी त्याचे हात विलग करायला गेली.


“नाही, कमली मला हात लावू नकोस. मी तुझा गुन्हेगार आहे. मी.. मी..” तो बेडवरून हायपर होत उठण्याचा प्रयत्न करत म्हणाला.


“सिस्टर, यांना लवकर झोपेचे इंजेक्शन द्या.” किंचित घाबरून मागे सरत तिने आदित्यचा हात घट्टपणे पकडला.


“क-म-ली..” इंजेक्शनच्या प्रभवाने धनराजने हळूहळू डोळे मिटले. ओठावर मात्र तिचेच नाव होते.


“मनस्वी, तू ठीक आहेस ना?”

आदी तिला बाहेर घेऊन येत काळजीने विचारत होता. धनराज चे हे रूप बघून मनातून तर तोही शॉक झाला होता. चंपाकडून ऐकून त्याला कमलीबद्दल ठाऊक होते; पण मनस्वीला बघून तो असा का रिऍक्ट झाला हे त्याच्यासाठी कोडेच होते.

“हो, मी ठीक आहे; पण ही कमली कोण? आणि..” ती त्याला विचारत होती तोच तिचा मोबाईल वाजण्याचा आवाज ऐकू आला. प्रकाश तिला केव्हाचा कॉल करत होता.


“हॅलो बाबा..” कॉल घेत असताना चुकून तिच्या बोटाने स्पीकर ऑन झाले.


“मनू, बेटा तू कुठे आहेस? अजूनपर्यंत तुझा एकही कॉल आला नाहिये. तू ठीक तर आहेस ना?”


“बाबा, मी बरी आहे. एका पेशंटला बघतेय. पाचच्या फ्लाईटने निघतेच आहे.”


“मनू, तुझे पेशंट तिकडे मुबंईमध्ये कसे? आणि तुझ्या आवाजाला काय झालेय? श्वास का असे वाढलेत?”


“ओह, बाबा. ती ना एक थोडीशी कॉम्प्लिकेटेड केस आहे, त्यामुळे थोडे घाबरले होते. बट नाऊ आय एम ओके. मी आले की तुम्हाला सांगेनच की.” श्वासावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत ती म्हणाली.


“मनू..”


“बाबा प्लीज ट्रस्ट मी आणि आता मी फोन ठेवते. बाय.” म्हणत तिने कॉल कट देखील केला.


“आदित्य, बघितलंस बाबांना माझी किती काळजी आहे ते? माझे वाढलेले श्वास देखील त्यांना जाणवले.” ती हळवेपणे म्हणाली.


“मनू?” तो मात्र तिच्याकडे टक लावून पाहत होता.


“हां? हं.” ती किंचित हसली.


“तू मनू आहेस?” त्याने पुन्हा तिला विचारले.


“हं. हो.. म्हणजे माझं नाव मनस्वी आहे ना तर बाबा लाडाने मला मनू म्हणतात. तसेही अनाथाश्रममात असताना माझे नाव मनूच होते.”


“मनू.. म्हणजे मनस्वी! ओ माय गॉड!” त्याने डोक्याला हात लावून घेतला.


“काय झालं? मी मनू आहे हे ऐकून तू एवढा का रिऍक्ट होतो आहेस? आणि हे कमलीप्रकरण काय आहे हे कळेल का?” ती गोंधळून म्हणाली.


“कमली.. ती असा एक धागा आहे जीने सगळ्यांना एकत्र बांधण्याचं काम केलंय. कधी प्रत्यक्षात तर कधी अप्रत्यक्षपणे.” तो तिचा चेहरा नजरेत सामावून घ्यायचा प्रयत्न करत म्हणाला. त्याला त्याचे पडलेले कोडे उलगडू लागले होते.


“कसे?”


“दैवाचा खेळ गं हा. दुसरं काय म्हणू? तुला वाईट वाटणार नसेल तर एक विचारू?”


“विचार की. मला काही माहिती करून घ्यायचे असले की तू आधी मलाच उलट प्रश्न करणार याची मला सवय झालीये. काय जाणून घ्यायचेय ते बिनधास्त विचार, मला काही वाईट वाटणार नाही.”


“मनू.. मिन्स मनस्वी, तुला कधी तुझ्या खऱ्या बाबांबद्दल जाणून घ्यावं असं वाटलं नाही का गं?”


“वाटायचं ना. जेव्हा मी अनाथाश्रमात होते तेव्हा कधीकधी माझे बाबा कोण असतील हा प्रश्न पडायचा; पण मग बाबा मला तिथून घेऊन गेलेत तेव्हा हेच माझे बाबा आहेत हे मनाला पटलं होतं. मी कधीतरी त्यांना विचारायचे, की ते मला असं सोडून का गेले होते? तेव्हा केवळ मिठीत घेऊन ते मला सॉरी म्हणायचे. यापुढे असं घडणार नाही असं प्रॉमिस करायचे.


जेव्हा मी पंधरा वर्षांची झाले ना तेव्हा त्यांनी स्वतः मला मी त्यांची दत्तक मुलगी आहे हे सांगितलं. माझी आई कोठेवाली होती हे सांगितलं. तेव्हा मला फार वाईट वाटायचं. माझ्या खऱ्या वडिलांचा राग यायचा. वाटायचं कधी भेट झालीच तर वयाचं बंधनं विसरून ज्याच्यामुळे मी जन्माला आले त्याला एक सणसणीत चपराक द्यावी. मात्र मी जसे मोठी होत गेली ना तेव्हा वाटू लागले की देवाने खरच एकदा तरी माझी त्या व्यक्तीशी भेट घडवून आणावी आणि मी त्यांना थँक्स म्हणावं. कारण त्यांनी मला स्वीकारले नाही म्हणून मला डॉक्टर प्रकाश सारखे बाबा मिळालेत.” ओल्या झालेल्या डोळ्यांच्या कडा पुसत ती खिन्न हसली.


“तुला ठाऊक आहे आदित्य? माझे बाबा म्हणून मी डॉक्टर प्रकाशशिवाय कोणाचीच कल्पना करू शकत नाही. ही इज बेस्टेस्ट! पुढचे जितकेही जन्म असतील ना तेव्हा तेच मला माझे बाबा म्हणून हवेत रे.”


“आणि या जन्मात तुझे खरे बाबा तुझ्यासमोर आले तर? तर तू आता या घडीला काय करशील?”


“असा का विचारतो आहेस? तू ओळखतोस त्या माणसाला?” तिने डोळे रोखून विचारले.


“हम्म. दुर्दैवाने याचे उत्तर हो आहे.” त्याच्या डोळ्यातील अश्रू घरंगळत गालावर आले.


%कोण आहे तो नराधम? मला कळेल?”


“तू आत्ता ज्यांना भेटून आलीस तेच. धनराज.. धनराज सेठ.” तिच्यावरची नजर खाली घेत तो उत्तरला.


“आणि तुला हे आधीपासूनच ठाऊक होतं; जे तू मला आता सांगतो आहेस? मला इथे क्षणभरही थांबायचे नाहीये. मिस्टर आदित्य, तुम्ही मला इतकावेळ जी मदत केलीत त्याबद्दल थँक यू सो मच अँड गुडबाय.” तिची पर्स घेऊन ती रडतच जायला निघाली.


“नाही मनू, प्लीज गैरसमज करून घेऊ नकोस. त्यांची एक मुलगी आहे हे मला ठाऊक होतं; पण तुझी शपथ घेऊन सांगतो गं, ती मुलगी तू आहेस हे मला आत्ता कळलंय. अनाथाश्रमातील मनू म्हणजे तू आहेस हे कळल्यावर.” तिचा हात पकडत तो म्हणाला.


“मला काही एक ऐकायचं नाही आहे. जाऊ दे मला.”


“कमलीबद्दल तुला जाणून घ्यायचं होतं ना? ते तरी ऐकून घे. ती दुर्दैवी स्त्री तुझी जन्मदात्री होती. तुझी आई.” तो म्हणाला तसे ती गर्रकन त्याच्याकडे वळली.


“नेमका कोण आहेस रे तू? माझ्या आयुष्याची आणखी कुठली गुपितं तुझ्याकडे आहेत?”


“चंपाजींकडून हे कळलं तेच तुला सांगतो आहे. कमली म्हणजे चंपा म्हणून कोठीवर गेलेल्या रत्नाची पहिली मैत्रीण आणि धनराज सेठच्या आयुष्यात चंपा येण्यापूर्वीची त्यांच्या शरीराची भूक भागवणारी एक स्त्री.

चंपानंतर त्यांनी तिला आपल्या आयुष्यातून वजा करून टाकले. ती मात्र त्यांना जीव लावून बसली. एका गोंडस मुलीच्या जन्मानंतर तो लेकीला स्वीकारेल या आशेने पुन्हा त्याची गरज भागवू लागली, पण तिचं दुर्दैव की दुसऱ्या प्रेग्नन्सीमध्ये ती बाळासकट स्वतःला गमावून बसली आणि त्या छोट्या मनूची रवानगी अनाथाश्रमात झाली.”

मनूच्या जन्माची कहाणी, चंपाने तिला दिलेले मनू हे नाव, छोट्या मनुवर या वस्तीची सावली पडू नये म्हणून कमलीची तिथून दूर केलेली रवानगी, तिचा मृत्यू आणि शीलाआंटीचे मनूला अनाथाश्रमात घेऊन जाणे.. जे त्याला ठाऊक होतं ते सारे त्याने मनस्वीला सांगून टाकले.

“म्हणून म्हणालो की कमली म्हणजे आपल्या सर्वांना एकत्र जोडणारा धागा आहे.” तो तिच्याकडे पाहत म्हणाला.


“आदित्य.. मी तुला का भेटायला आले? का मला तुझ्या घरी येण्याची दुर्बद्धी सुचली? इथे नसते आले तर मला हे काहीच कळले नसते.मला हे जाणून घ्यायचेही नव्हते.” ती हुंदका देत म्हणाली.


“आपल्या प्राक्तनात हेच असेल. हे सत्य अशाप्रकारे समोर यावे हे कदाचित नियतीनेच लिहून ठेवले असेल आणि तुझ्या घरी काय म्हणतेस गं? हे घर आता तुझंही आहे. तू मान्य कर अथवा करू नकोस, पण तू धनराज सेठची मुलगी आणि पर्यायाने माझी बहीण आहेस हे सत्य आहे. त्यामुळे हा बंगला, कपंनी या साऱ्यावर तुझाही तेवढाच हक्क आहे, जेवढा माझा आहे.”


“आदित्य, हे सारं माझ्या आकलनापलीकडचं आहे. तू हे असं माझ्याशी नको बोलूस. धनराज सेठ नावाच्या कुठल्याच व्यक्तीबरोबर माझा काहीही संबंध नाहीये. मी केवळ माझ्या बाबांची मुलगी होते आणि त्यांचीच आहे.”


“पण तू माझी बहीण तर होवू शकतेस ना? मनू, तुला भेटल्यापासून पहिल्यांदा मी एवढं कुणाशी बोलतोय गं. तुला न ओळखताहीआपल्यात एक नातं आहे असं वाटत होतं. आजच्या एका भेटीत कितीतरी वेळा वाटून गेलं की तू माझी बहीण असतीस तर? आणि आता पटलंय की तू माझीच ती वेडूली गोडुली बहीण आहेस गं.

तरी मनू मी तुला पुन्हा विचारतोय.. मनू, खरंच तू माझी बहीण होवू शकतेस?”

काय उत्तर देईल मनस्वी? आदित्यला भाऊ स्वीकारेल की त्याच्या आयुष्यातून कायमची निघून जाईल? वाचा पुढील भागात.

कदाचित हे आजच्या भागात लिहू शकले असते पण बहीण भावाचे असे भावस्पर्शी नाते लिहिताना माझेच मन दाटून येत आहे. प्रयत्न करूनही माझ्याने पुढे लिहिणे झालेच नाही. खूप दिवसांनी मनाची ही अवस्था झालीये. तेव्हा मनूचे उत्तर तुम्हाला उद्याच वाचायला मिळेल आज नाही.
:
क्रमश:
©®Dr. Vrunda F.(वसुंधरा..)
*साहित्यचोरी गुन्हा आहे.*
*****

🎭 Series Post

View all