एक इजाजत.भाग-७७

वाचा एक अलवार फुलणारी प्रेमकथा!
एक इजाजत!
भाग -७७

“पण तू माझी बहीण तर होवू शकतेस ना? मनू, तुला भेटल्यापासून पहिल्यांदा मी एवढं कुणाशी बोलतोय गं. तुला न ओळखताही आपल्यात एक नातं आहे असं वाटत होतं. आजच्या एका भेटीत कितीतरी वेळा वाटून गेलं की तू माझी बहीण असतीस तर? आणि आता पटलंय की तू माझीच ती वेडूली गोडुली बहीण आहेस गं.

तरी मनू मी तुला पुन्हा विचारतोय.. मनू, खरंच तू माझी बहीण होवू शकतेस?

त्याचा प्रश्न ऐकून ओंजळीने चेहरा झाकून घेत मनस्वीने त्याच्यापासून बाजूला तोंड फिरवले. तिचे हुंदके थांबता थांबत नव्हते.


“मनू, आय एम सॉरी, खरंच सॉरी. तू इतकी रडू नकोस ना गं. हे बघ, मला तुला दुखवायचे नव्हते. इथे आल्यावर असं काही घडेल अशी मला कल्पना असती तर मीच तुला इथे घेऊन आलो नसतो. माझं चुकलंच. नात्याची अशी जबरदस्ती नाही ना गं करता येत? मला कितीही वाटलं तरी मी तुझ्यावर कुठलाच निर्णय थोपवणार नाहीये. तू अशी रडू नकोस ना गं. प्लीज.” बोलता बोलता त्यालाच रडू कोसळले. तिच्या मनाच्या वेदना त्याच्या डोळ्यातून वाहू लागल्या होत्या.


“बस! इतकंच? आपल्या लहान बहिणीला एवढंच बोलून मनवशील?” त्याच्याकडे वळून तिचे रडून लाल झालेले डोळे पुसत त्याला भुवई उंचावून तिने प्रश्न केला.


“काय म्हणालीस तू? लहान बहीण?” त्याने आश्चर्याने दोन्ही हात तोंडावर हात ठेवले.

ती त्यांच्या नात्याला नकार देईल असे वाटत असताना तिचे असे विचारणे त्याच्यासाठी खूप मोठे धक्कादायी होते.


“आता लहान आहे तर लहानच म्हणेन ना?” तिचे नाक पुसत ती.


“लहान आणि तू? तू तर खूप मोठी आहेस की गं.” तो रडता रडता हसत होता.


“नाही मी लहानच आहे. तुझ्यापेक्षा खूप खूप लहान आहे.” त्याच्या हातावर मारत ती म्हणाली.


“एवढी मोठी असलेली लहान मुलगी. मोठ्या भावाला असं कुणी मारतं होय?” डोळ्यातून रोखू न शकणाऱ्या अश्रुसह तो विचारत होता.

“हेय मनू, लहान असतानाच तू मला का भेटली नाहीस गं?” भावनिक होत त्याने त्याचे हात पसरले आणि तीही त्याच्या मिठीत शिरली. कितीतरी वेळ दोघांचे केवळ हुंदके ऐकू येत होते.


“मनू, आता पुरे झाले. नाहीतर खरंच मुंबईत पूर यायचा.” मिठी सैल करून त्याने तिचे डोळे पुसले.


“आदित्य, माझे बाबा म्हणजे माझे विश्व आहेत. त्यांच्यामुळे मला कधीच दुसऱ्या नात्याची गरज भासली नाही. मी खूप हट्टी आहे. बाबाकडून सर्व हट्ट पुरवून घेते. बहीण म्हणून स्वीकारताना माझा हट्टीपणा तुला त्रासदायक तर नाही ना वाटणार?”


“कधीच नाही. तू इथे आल्यापासून तुझे हट्ट मी पुरवत आहेच की.” तिच्या नाकाला हळूच ओढत तो म्हणाला.


“आँऽऽ आदित्य. “


“आणि काय गं? तू लहान आहेस ना? मग मोठया भावाला अशी नावाने हाक मारणार?” तो मिश्किलीने दादागिरी करत म्हणाला.


“ए, खरंच की रे. मी तुला काय म्हणू?”


“काहीही म्हण गं. तुला वाटेल ती हाक दे, कधीही दे. मी कुठेही असलो तरी तुझ्यासाठी कायम अवेलेबल असेन. पण मी तुला मनू म्हटलेले चालेल ना?”


“चालेल की. बाबा तर मला काय काय म्हणत असतात. मनू, मन्या, मनुड्या.. आणि जर खूप जास्त सिरीयस असले तर मग मनस्वी.” ती हसून म्हणाली.


“तुझ्या बाबांवर तुझा खूप जीव आहे ना गं?”


“खूप जास्त.”


“मग त्यांना आणि चंपाजींना एकत्र आणायला काय करणार आहेस? मी माझ्या परीने त्या अण्णासाहेबांना सरळ करून बरोबर माफी मागायला लावली असती; पण चंपाजींनी माझ्याकडून शब्द घेतला आहे म्हणून मी शांत आहे. तुझं तसं नाहीये. तू तुझ्या बाबांसाठी हे करू शकतेस.”


“माझ्या आयुष्याचं ध्येय तर तेच आहे, बाबांना त्यांची रत्ना मिळवून देणे. पण जोपर्यंत चंपाजी त्यांच्या साच्यातून बाहेर पडून स्वतःच रत्ना असणं मान्य करत नाहीत तोपर्यंत त्यांचं एक होणं शक्य नाही.” ती ओठ दुमडून म्हणाली.


“त्या दोघांना एकत्र आणायला हॉस्पिटलचे एखादे इव्हेंट होणे गरजेचे आहे नि त्यासाठी हॉस्पिटलचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हायला हवे. पैश्यांचा तू विचार करू नकोस. तुला काही अडचण येत असेल तर त्यासाठी मी आहेच आणि हो पैशांचा माज वगैरे दाखवत नाहीये हं मी.”


“पण तरीही मी तुझ्याकडून का मदत घेऊ?”


“चंपाजींकडून घेतली होती ना? तशीच. तू तर तो चेकही फाडून टाकला आहेस आणिआता मी तुझा भाऊ आहे तेव्हा तुला मदत करणं माझं कर्तव्य आहे.”


“कर्तव्य?” तिला हसूच आले. दोन मिनिटांपूर्वी त्यांच्या नात्याची बाजू समोर आलेली आणि हा थेट कर्तव्याची भाषा बोलत होता.


“हो कर्तव्यच. कारण जे माझं आहे ते सगळं तुझं आहे असे मी कितीही म्हटले तरी तू ते मान्य करणार नाहीस. तेव्हा किमान भावाच्या नात्याने तरी हे करू दे.” तो बोलत होता नि ती हसत होती.


“हसू नकोस गं मनू, तुझा भाऊ म्हणून मला खरंच काहीतरी करू दे ना. अगं, आजवरच्या इतक्या सगळ्या वर्षांची आपली भाऊबीज, रक्षाबंधन यांचा हिशोब केला तर तो आकडा कितीतरी मोठा होईल.”


“हो. प्लस माझे वाढदिवस..”


“हां, तेही आहेच की”.


“आदी काहीही हं तुझं. तुझ्याकडून पैसे उकळण्यासाठी मी हे नातं मान्य केलंय का?”


“अगं तो तुझा हक्क आहे. मनू तू हॉस्पिटल उभारून जे कार्य करते आहेस ना ते खूप कौतुकास्पद आहे गं. यात मलाही माझा खारीचा वाटा उचलू दे ना. तेवढाच मनावरचा भार तरी हलका होईल.” तो पुन्हा भावनिक झाला.


“बरं, ते पुढे बघूया. आता तू मला एअरपोर्टला सोडून देणार आहेस ना?


“खरं तर नको जाऊ म्हणायचं होतं. मात्र असं म्हटल्यावर तू थांबणार थोडीच आहेस? तेव्हा तुला सोडून द्यावे लागेलच. तू थोडी फ्रेश होवून बाहेर ये. तोवर मी कुकला कॉफी करायला सांगतो. कॉफी घेतली की निघूया.” तो बाहेर जात म्हणाला.

______


“मनू, थँक्स. तू इथे आलीस नि माझ्या आयुष्याचे एक निराळे पर्व सुरु झालेय. मला माझी छोटी बहीण मिळालीय. जीला आता मला कधीच हरवायचे नाहीये. तिला निरोप देताना तो भाऊक होत म्हणाला.


“मी आहेच. तू मात्र काळजी घे. आँटीबद्दल मी माझ्या फ्रेंड्ससोबत डिस्कस करेनच. बाय.” त्याला साईड हग करत ती आत निघून गेली.


तो एअरपोर्टवरून परत जाताना कारमध्ये तिचाच विचार करत होता. तिच्या त्याला भेटायला येण्याने त्याच्या आयुष्यातील एक पोकळी भरून निघाली होती. किती दिवसांनी त्याला असं रिलॅक्स वाटत होतं. उघड्या डोळ्यांसमोर आजचा पूर्ण घटनाक्रम त्याला आठवत होता.

त्याला भेटण्यासाठी म्हणून ऑफिसला आल्यावर तिने घातलेला धिंगाणा, डोक्यावर घेतलेले ऑफिस, प्रकाशविरुद्ध चुकीचं बोललेले सहन न करता त्याला मारलेली थापड, त्याच्यावर चिडणारी, काहीसा हक्क गाजवणारी, हट्ट करणारी, त्याच्याशी भावनिकतेने जुळलेली ती आणि सरतेशेवटी त्याला भाऊ म्हणून स्वीकारणारी ती!


काही तासातच तिच्या कितीतरी निरनिराळ्या छटा त्याला दिसल्या होत्या आणि प्रत्येक छटेने त्याला तिच्यात गुंतवले होते.


‘मनू मी चंपाजींच्या प्रकाशसारखा आहे की नाही ते ठाऊक नाही पण तू मात्र थेट त्यांच्यासारखी आहेस. तेवढीच कणखर अन् मधुर. हट्टी तरीही दुसऱ्याचे मन जपणारी. मला जशी बहीण हवी होती, अगदी तू तशीच आहेस गं. माझी गोडुली.. अहं वेडूली!’ त्या उपमेने त्यालाच हसू आले.

कमली कशी होती ते तर त्याला ठाऊक नव्हते पण चंपाच्या स्वभावाचे प्रतिबिंब तिच्यात उतरल्याचे मात्र त्याला जाणवत होते. तिच्याच विचारात तो घरी कधी पोहचला त्याला कळले नाही.

________


विमानाने आकाशात उड्डाण घेतले आणि वरून दिसणाऱ्या मुंबापुरीला बघून मनस्वीचे डोळे उगाचच पाणावले. ती तर इथे केवळ आदीचे रहस्य जाणून घ्यायला आली होती मात्र जाताना कित्येक उलगडलेले गुपितं सोबत घेऊन जात होती.

डोळे मिटून ती एकेक घटनांचा क्रम जुळवू पाहत होती.

“तू हमारी मनू हैं ना? चंपाने बताया था मुझे। बडी डॉक्टर बन गयी हो तुम। यह सुनकर हम कितना खुश हुए क्या बताऊं?”

शीलाआंटीच्या कोठीवरचे दृश्य तिच्या डोळ्यासमोर तरळत होते.. पहिल्यांदा चंपाला भेटायला तेव्हा तिला पैशांशिवाय आत न सोडणारी शीलाआँटी.. दुसऱ्या भेटीत चक्क तिच्या गालाला प्रेमाने स्पर्श करत बोलत होती. तिच्या डोळ्यात तिच्याबद्दल उमळलेले प्रेम स्पष्ट दिसत होते.

“पैंसों की बात गैरों के लिए, तू तो हमारी अपनी हैं।” हे बोलताना तिला किती भरून आले होते. कमलीवर तिचीही माया होती म्हणून तर ही मनू तिला ‘अपनी’ वाटत होती.

कोठीवरचा पहिला नियम.. कुणीही कोणाला जीव लावायचा नाही! मात्र शीलाआँटीपासून प्रत्येकीनेच इथे प्रत्येकीला जीव लावला होता.
:
क्रमश:
©®Dr. Vrunda F.(वसुंधरा..)
*साहित्यचोरी गुन्हा आहे.*
*****

🎭 Series Post

View all