एक इजाजत.भाग -७८

वाचा एक अलवार फुलणारी प्रेमकथा!
एक इजाजत!
भाग-७८


“पैंसों की बात गैरों के लिए, तू तो हमारी अपनी हैं।” हे बोलताना तिला किती भरून आले होते. कमलीवर तिचीही माया होती म्हणून तर ही मनू तिला ‘अपनी’ वाटत होती.

कोठीवरचा पहिला नियम.. कुणीही कोणाला जीव लावायचा नाही! मात्र शीलाआँटीपासून प्रत्येकीनेच तर इथे प्रत्येकीला जीव लावला होता.


कमलीची लेक म्हणून शीलाआँटीने मनुच्या गालावरून फिरवलेला तो अलवार हात.. “तुझी आई कोण गं?” असा पहिल्या भेटीत चंपाने तिला विचारलेला प्रश्न.. सगळ्याच कड्या कशा एकमेकांशी जुळत होत्या.


“तुमच्यातीलच कुणीतरी एक. पण जर तुम्ही असतात तर मी आणखी सुंदर दिसले असते.” तुझी आई कोण या प्रश्नावर मनुने चंपाला हे उत्तर दिले होते आणि आज तिला तिच्या खऱ्या आईचे नाव कळले होते..

कमली!


‘कशी दिसत असेल ती? सुंदर असेल का? धनराजची चॉईस होती म्हणजे नक्कीच सुंदर असेल.’ तिच्या मनात विचार चमकून गेला.


धनराज सेठ! ज्याने चंपाला कोठीवर आणून बसवले त्याच्या नावाचे वलय तर तिच्याशी चंपाच्याही पूर्वीपासून जुळले होते. चंपाची कहाणी तिला ठाऊक झाली होती; मात्र जिने जन्म देऊन तिला या जगात आणले त्या आईबद्दल मात्र फारसे काहीच ठाऊक नव्हते.

“कमली..”

धनराज सेठची ती हाक अजूनही तिच्या कानात गुंजत होती. तिला पाहूनच तर त्याला कमली आठवली होती.


‘म्हणजे कमली माझ्यासारखी दिसत होती तर?’ तिने झटक्याने डोळे उघडले आणि मोबाईलमधील कॅमेरा सुरु करत सेल्फी मोडमध्ये स्वतःला निरखू लागली.


तिचेच काळेभोर डोळे अन् लांबसडक पापण्या.. प्रकाश किती स्तुती करायचा तिच्या डोळ्यांची. हे डोळे कमलीची देण आहे हे उमगून तिचे डोळे भरून आले आणि डबडबलेल्या डोळ्यांना स्वतःचा चेहरा स्पष्ट दिसत नाहीये म्हणून तिने कॅमेरा बंद करून मोबाईल पर्समध्ये ठेवून दिला आणि पुन्हा डोळे मिटून घेतले.


‘कमली.. धनराज.. माझ्या आयुष्यात कुणीच नको. माझे बाबाच माझी आई आहेत. मी केवळ त्यांचीच मुलगी आहे. ज्यांनी स्वतःच्या जीवापेक्षा मला जास्त जपले त्यांच्याशिवाय आयुष्यात मला कोणीच नको आहे.’ मिटलेल्या डोळ्यातून अश्रू गालावर ओघळू लागताच तिने भानावर येत ते टिपून घेतले.


“आणि आदी? तो? तोही नकोय का तुझ्या आयुष्यात?” तिचेच मन तिला विचारत होते.

त्या प्रश्नासरशी तिला तो आठवला. त्याचे ते सयंत वागणे, तिची काळजी घेणे, तिला क्षणात त्याची छोटीशी बहीण म्हणून स्वीकारणे! आपल्याच माणसांच्या प्रेमासाठी आसूसलेला आदी डोळ्यासमोर उभा राहिला आणि नकळत ओठातून शब्द बाहेर पडले..

“मला हवाय तो.” स्वतःच्याच अचानक बाहेर पडलेल्या आवाजाने ती दचकली.

‘त्याला माझी गरज आहे आणि मीही त्याला माझा भाऊ मानलेय तेव्हा तो मला हवा आहे. पण आईबाबा म्हणून केवळ माझे बाबाच मला हवे आहेत.’ आकाशातील विमान खाली येत होते तसे तिचे मन बाबाजवळ येऊन थांबले होते.


जळगाव एअरपोर्टला आल्यावर तिला परत आदीची आठवण आली. तिला सोडायला तो आला तेव्हा त्याच्या डोळ्यात तिच्यासाठी प्रेम आणि ती जातेय म्हणून दुःख याचा अनोखा संगम तिच्या नजरेने टिपला होता.

‘खरंच बाबासारखाच आहे हा. यांच्यात एवढं कसं साम्य?’ विचार करत ती रिक्षा घ्यायला बाहेर पडली आणि तिचे लक्ष समोर उभ्या असलेल्या प्रकाशकडे गेले.


“मनूऽऽ”


“बाबाऽऽ” त्याच्या हाकेसरशी तिने धावतच जाऊन त्याला मिठी मारली. जणू तो तिला तिथे अपेक्षित होता.


“मनुड्या? काय झाले?”


“मला तुमची खूप आठवण येत होती. यापुढे तुम्हाला सोडून मी कुठेच जाणार नाही.” त्याच्या मिठीत शिरताच इतकावेळ रोखून धरलेला अश्रुंचा बांध फुटला होता.


“अगं आता तू माझ्या सोबत आहेस की. मग का रडतेस? चल काही खायचंय का? तुझं फेवरेट आईस्क्रीम घेऊयात का?” तिच्या पाठीवरून हळूवार गोंजारत तो विचारत होता.


“अहं, मला काहीच नको. तुमच्या मांडीवर डोके ठेवून फक्त झोपायचे आहे.” ती हुंदका देत म्हणाली.


“ए लाडोबा, इथेच झोपायचं आहे का? घरी जायचंय की नाही?” तिचे गाल ओढत तो हसला आणि तिला सोबत घेऊन गेला.


नेहमी बडबडणारी त्याची मनुडी गप्प गप्प असूनही त्याने अजूनपर्यंत तिला काहीच विचारले नव्हते. ती नसताना तिच्या काळजीने ग्रासलेला तो तिला न सांगताच घ्यायला आला होता आणि आता तिला पाहताच तिच्या मनात कसलीतरी खळबळ माजलीय हे लक्षात घेऊन तो आधी तिला शांत करण्याचा प्रयत्न करत होता.


घरी आल्यानंतर रात्री ती जेवायला म्हणून जेवली. आदी, त्याची आजारी मम्मा आणि धनराज सेठ.. तिच्या मनात तिघांनी चांगलेच ठाण मांडले होते. त्यांचा विचार बाजूला करायला गेले की शीलाआँटी, चंपा आणि तिला चेहराही न आठवणारी कमली आपल्याभोवती रिंगण घालून आहेत असे वाटत होते आणि त्यांना बाजूला करायला गेले तर अण्णासाहेब, गजा, दिनकर आणि धनराजने चंपावर केलेले अत्याचार आठवत होते.


आज दिवसभरातील घडलेली चांगली गोष्ट म्हणजे आदीला भाऊ म्हणून तिच्या मनाने त्याचा केलेला स्वीकार. मात्र त्याबरोबर उघड पडलेली इतर गुपितं तिला केवळ छळत होती.


“मनू, येऊ ना गं?” प्रकाशच्या प्रेमळ आवाजाने तिला गलबलून आले. जसे काही ती त्याच्या येण्याची वाटच बघत होती.


“तेल घेऊन आलोय. बरेच दिवसांपासून तुझ्या केसांना मालिश करून दिली नाही ना?” वाटीतील कोमट तेल तिच्या केसांच्या मुळाशी चोळत तो म्हणाला आणि त्याच्यासमोर बसलेल्या मनस्वीने डोळे मिटून घेतले.


‘माझी माऊली ती हीच. हाच स्पर्श माझ्या बाबांचा आणि आईचाही. तरी मग मन का अस्वस्थ होतेय?’ आदित्यच्या बंगल्यातून बाहेर पडताना तिने परत एकदा त्याच्या मॉम आणि धनराजच्या रूममध्ये डोकावून त्यांचे निजलेले रूप पाहिले होते ते आठवून तिला कसेतरी व्हायला लागले.


“मनू, काय झालं गं? आज का इतकी अस्वस्थ आहेस? उद्या पुण्याला निघते आहेस म्हणून नाराज आहेस का?” तिच्या केसातून हात फिरवत प्रकाश तिला विचारत होता.

ती तर आज दिवसभरात हे विसरूनच गेली होती.


“बाबा, मी तुम्हाला सोडून कुठेच जाणार नाही.” त्याच्या मांडीवर डोके ठेवून ती म्हणाली.

“का गं?”

“कारण मी आज मुंबईला पेशन्ट बघितले ना तेव्हापासून असं वाटायला लागलंय.”


“काय?”


“की माझे बाबा किती किती चांगले आहेत. मग मी त्यांना सोडून कुठे कशाला जाऊ?”


“खरंच? मग हॉस्पिटलच्या बांधकामाला पैसा कुठून उभा करणार आहेस? त्याने कालचा तिचाच डायलॉग तिला ऐकवला.


“ते हॉस्पिटल गेले उडत.”


“अस्सं होय? मनुड्या तू खरंच केवळ पेशन्ट बघायला म्हणून मुंबईला गेली होतीस का?”


“नाही. ॲक्च्युली आपल्या नाशिकच्या हॉस्पिटलसाठी एक मोठा देणगीदार मिळालाय. त्याला भेटायला गेले होते.” अर्ध सत्य सांगत ती म्हणाली.


“कोण गं? आणि ते का देणगी देत आहेत?”


“मोठे बिसनेसमन आहेत. सामाजिक कार्यात त्यांना रस आहे म्हणून ही देणगी.” ती ओठ रुंदावले.


“पण ती माणसं विश्वास ठेवण्यासारखी आहेत ना?”


“शंभर टक्के.” ती मान डोलावून म्हणाली.


“पण त्यात त्यांचा काय फायदा?”


“तसा फायदा आहे. शालिमार वस्तीतील बायकांचे त्यांना आशीर्वाद मिळतील ना?” तिचे हसून उत्तर.


“म्हणजे त्यांना एकदा भेटायला हवं तर.”


“हो, भेटायला हवे. पण आताच नको. वेळ आली की स्वतःच भेट घडवून आणेल ना.”


“आणि त्या पेशन्टचे काय?”


“ते होय? डिप्रेशनमध्ये गेलेले दोघं नवरा-बायको आहेत. बायको आपलं वर्चस्व गाजवायची म्हणून नवऱ्याने बाहेर लफडी केली आणि नंतर त्याच्या पश्चातापाने तो डिप्रेशन मध्ये गेला आणि नवऱ्याने आपल्याशी प्रतरणा केली म्हणून बायकोही डिप्रेशन मध्ये आहे.” तिला सांगताना हसू आले.


“मनू,असे कोणावर हसू नये गं.” तो तिला चापटी मारत म्हणाला.

तिला वाटलं सांगावं की त्या दोघांमुळे ती आज दिवसभरात किती रडली आहे; पण तिच्या मुखातून ते बाहेर येऊ शकले नाही. दिवस कसाही गेला असला तरी
आता या घडीला तिच्या लाडक्या बाबाच्या कुशीत ती स्वतःला खूप भाग्यवान समजत होती.


“बाबा, आज आपलं नेहमीच गाणं म्हणाल? ते इजाजत मागणारे आपले अंगाईगीत?” डोळे मिटून घेत तिने प्रकाशला अर्जव करत विचारले.

“मेरा कुछ सामान
तुम्हारे पास पडा हैं..”

भिंतीला डोके टेकून त्याने नेहमीच्या त्याच्या खड्या आवाजात गायला सुरुवात केली.

ती मात्र विचार करत होती.. शीलाआँटी, चंपा, धनराज अन् कमली.. आणखी कोणाकोणाकडे आपल्या आठवणींचे सामान विखूरले असेल? की त्या साऱ्या आठवणी पानगळीतील पानासारख्या इतस्तत: उडून गेल्या असतील?

तिने हलकेच डोळे उघडून प्रकाशकडे पाहिले. तो डोळे मिटून तल्लीन होऊन गात होता. तिला वाटलं, ‘पानगळीतील उडत आलेले मीही एक पान! मात्र या भक्कम झाडावर येऊन अडकलेय. त्याने घट्ट बांधून घेतलंय मला आणि आता त्याच्यावरून उडून जाण्याची इजाजत तो मला कधीच देणार नाही..

अन् मलाही नकोय त्याच्यापासून वेगळं होण्याची ही इजाजत!’

तिने उघडलेले डोळे परत मिटून घेतले. कितीतरी दिवसानंतर ती बाबाच्या कुशीत असे समाधानाने निजली होती.
:
क्रमश:
©®Dr. Vrunda F.(वसुंधरा..)
*साहित्यचोरी गुन्हा आहे.*
*****

🎭 Series Post

View all