एक इजाजत.भाग -७९

वाचा एक अलवार फुलणारी प्रेमकथा!
एक इजाजत!
भाग -७९

तिला वाटलं, ‘पानगळीतील उडत आलेले मीही एक पान! मात्र या भक्कम झाडावर येऊन अडकलेय. त्याने घट्ट बांधून घेतलंय मला आणि आता त्याच्यावरून उडून जाण्याची इजाजत तो मला कधीच देणार नाही..

अन् मलाही नकोय त्याच्यापासून वेगळं होण्याची ही इजाजत!’

तिने उघडलेले डोळे परत मिटून घेतले. कितीतरी दिवसानंतर ती बाबाच्या कुशीत असे समाधानाने निजली होती.

__________


“मनू, आवरलंय ना तुझं?” हॉलमधून प्रकाशचा आवाज कानावर आला.


“हो बाबा. मी रेडी आहे. ”ओठावरून लिपस्टिक फिरवून तिने आरशात बघून क्षणभर स्वतःवरून नजर फिरवली आणि स्वतःला बघून तिच्याच ओठावर एक हास्य उमटले.


‘मनू गोड दिसतेस गं.’ तिच्या मनाने लगेच पोचपावतीही देऊन टाकली.


“बाबाऽऽ” बाहेर येत तिने प्रकाशसमोर एक गर्रकन गिरकी घेतली.


“ओहो! मनुड्या.. कसली भारी दिसतेस रे! माझीच नजर नको लागायला.” तिच्याकडे टक लावून बघत तो म्हणाला.


चापूनचोपून नेसलेली शुभ्र सिल्कची साडी. त्याचा सोनेरी काठ, त्याला मॅचिंग अशी कानात आणि गळ्यातील ऑक्सिडाइज्ड जेवलरी, मोहक डोळ्याखाली हलकीच ओढलेली काजळाची रेघ, ओठावरची न्यूड लिपस्टिक, अर्धे केस क्लचरमध्ये बांधून काहींना मोकळे राहण्याची दिलेली अनुमती, एका हाती ब्रेसलेट अन् दुसऱ्या हातात तिचे आवडते घड्याळ.. एका परफेक्ट लुकमध्ये ती त्याच्यासमोर उभी होती.


तो तिच्याकडे टक लावून बघतच राहिला. काही वर्षांपूर्वी शालिमार गल्लीत पहिल्यांदा भेटलेली ती रडणारी एक काळीसावळी बारकी पोर, तिला कायमचे घ्यायला गेला तेव्हा ‘बाबा’ म्हणून तिने घातलेली साद आणि नाजूक कोवळ्या हातांची ती मिठी.. आणि आज समोर असलेली ही परिपूर्ण वाढलेली, डोळ्यातील स्वप्न पूरी करण्याची धमक असलेली तरुणी..


‘आईबाप तसेच राहतात, लेकरं मात्र झपट्याने कसे मोठे होऊन जातात नाही?’ विचारासरशी त्याचे डोळे भरून आले.


“ओह, बाबा आता नाही हं. आता सकाळी सकाळी रडणं सुरु केलंत तर मग अख्खा दिवस रडण्यात जाईल हं. तुम्ही जरी नॅचरल हँडसम असलात तरी मला थोडा टचअप करावा लागला ना? तुमचं रडू बघून मला रडू येईल आणि मग मेकअपची पार वाट लागेल ना.” त्याच्या डोळ्यातील अश्रु टिपत ती हसून म्हणाली.


“मन्या, तू मोठी झालीस की गं. आपल्या घरी आलीस तेव्हा एवढीशी होतीस नि आता केवढी मोठी झालीस?” त्याचा आवाज हळवा झाला होता.


“पण तुम्ही मात्र अजूनही तसेच आहात, जसे मला पहिल्यांदा भेटला होतात, अगदी तसेच. माझ्यावर भरभरून प्रेम करणारे माझे हँडसम बाबा! चला आता निघायचं? नाहीतर तिथे जाऊन कळलं की पाहुणेमंडळीपेक्षा आपणच उशिरा पोहचलोय.” त्याच्या कोटची बटणं ठीक करत ती पुन्हा हसली.


“हो, हो निघायला हवं. नितिनऽऽ कार काढून रेडी रहा आम्ही दोनच मिनिटात खाली येत आहोत.”


नितीनला कॉल केल्यावर त्याने तिच्याकडे पाहिले आणि खाली चलण्याचा इशारा केला. हातात क्लच घेऊन ती रेडीच होती. इतर सामनाची बॅग नितीन केव्हाच खाली घेऊन गेला होता.


दोघा बापलेकीची स्वारी नाशिकच्या दिशेने निघाली होती. तिने मुद्दामच नितीनला सोबत घेतले होते. त्यायोगे ड्रायव्हिंग न करता प्रकाश तिच्यासोबत मागे रिलॅक्स होऊन बसला होता. आजचा दिवस तिच्यासाठी महत्त्वाचा होता, मग ती बाबाला कशाला कार चालवू देणार होती?

आज एवढे काय खास होते?


खास तर होतेच, इतक्या दिवसापासून सुरु असलेल्या कामाचे आज चीज झाले होते.


वर्षभराचा काळ हां हां म्हणता अगदी भुर्रकन उडाला होता. या वर्षभरात जोमाने कामाला सुरुवात केल्यामुळे नाशिकच्या शालिमार वस्तीजवळच्या भागात मनस्वीच्या हॉस्पिटलची भव्य इमारत दिमाखात उभी झाली होती आणि आज तिला प्रकाशने उघड्या डोळ्यांनी पहायला लावलेल्या स्वप्नातील त्याच हॉस्पिटलच्या उदघाटन सोहळ्याचे कार्यक्रम आयोजित केले होते.


हॉस्पिटलच्या इमारतीचा पायाभरणीचा कार्यक्रम केवळ दोन लोकांना घेऊन करण्यात आला होता. त्यामुळे आजचा कार्यक्रम हा अगदी सोहळा वाटावा अशाप्रकारे आयोजित केले होते. अध्यक्षस्थानी प्रकाश होताच; पण इतरही मोठमोठ्या डॉक्टरांना आमंत्रित केले गेले होते.


लेकीच्या कर्तृत्वाने प्रकाश भारावून गेला होता. हे स्वप्न पहायला जरी त्याने तिला शिकवले असले तरी ते प्रत्यक्षात उतरवण्याची जोखीम मनुने ताकदीने पेलली होती.


हो, जोखीमच! ज्या गल्लीत पाऊल टाकायला सुसंस्कृत बायकांचे मन धजावणार नाही त्या बदनाम गल्लीत दवाखाना सुरु करण्याचे धाडस तिने दाखवले होते. ही एक जोखीमच तर होती.


“मनू, आलेत की गं सगळे. कार्यक्रमाला किती वेळ आहे?” प्रकाश तिला विचारत होता.


“बाबा, आज सगळे निवांत होऊन आले आहेत. जर इमर्जन्सी केस आलीच तर गोष्ट वेगळी, तेवढं सोडलं तर आज सगळ्यांकडे वेळ आहे. तुम्ही उगाच टेन्शन घेऊ नका. माझे काही पाहुणे यायचे आहेत आणि प्रमुख अतिथीचेही आगमन व्हायचे आहेच की.” ती त्याला चिंतामुक्त करण्याचा प्रयत्न करत म्हणाली.


त्यांचे बोलणे सुरु असतानाच पार्किंगमध्ये एकापाठी एक अशा दोन कार येऊन उभ्या राहिल्या आणि तिथली मंडळी बाहेर येऊ लागली.


“मनू? कोण आलेत?”


“ओह, माझे पाहुणे आलेत वाटतं.” त्याला सोडून ती लगबगीने तिकडे गेली.


तो दुरून पाहत होता. कारमधून उतरलेल्या त्याच्यापेक्षा वयाने मोठी असलेली माणसे, नटलेल्या स्त्रिया, काही तरुण मंडळी असे एकेकजण बाहेर पडत होते आणि त्यांना उत्साहाने मदत करत, थोरांच्या पाया पडत, आशीर्वाद घेत मनस्वी त्यांचे क्षेमकुशल विचारत होती.


“आजी, नमस्कार करते हं. त्रास तर नाही ना झाला?”


“अण्णासाहेब, इंदूआजी तुम्ही ठीक आहात ना?”


“गौरी आत्या.. कशी आहेस?”


“हेय, कुणाल, रिद्धी हाय कसे आहात दोघं? अभ्यास मस्त चाललाय ना?”


कुणाच्या पाया पड, कोणाला मिठी मार तर कोणाचे हात हातात घे.. मनू एवढ्या खेळीमेळीने कुणाशी बोलतेय हे बघायला म्हणून पुढे सरसावला आणि समोरच्या मंडळींना बघून त्याच्या आश्चर्याला पारावर उरले नाही.


“आजी, अण्णा, आई..?” त्याचा स्वर थिजला होता.


“प्रकाशराव.. खूप मोठे झालात तुम्ही.” वत्सलाबाईंचा सुरुकुतलेला हात प्रकाशच्या चेहऱ्यावरून फिरताच त्याला भरून आले.


“आजीऽऽ” भावनाविवश होऊन त्याने त्यांना घट्ट मिठी मारली.


“आईऽऽ” भरल्या डोळ्यांनी त्याचे रूप नजरेत साठवत असलेल्या इंदूताईंनाही त्याने प्रेमाने आलिंगण दिले.


“अण्णा.. तुम्ही बरे आहात ना?”


“मीही रांगेत आहे म्हटलं.”अण्णासाहेबांच्या मिठीतून बाहेर पडताच गौरी समोर येत म्हणाली तसे त्याचे डोळे पाणावले.

“आणि आबासाहेब?” सर्वांशी भेटून झाल्यावर त्याने चौकशी केली.


“प्रकाश, तू घर सोडलंस आणि त्यांनी त्यांचा श्वास सोडला. मी मात्र राहिले. कदाचित तुझं हे यश त्यांना जाऊन सांगावं यासाठी देवाने मला ठेवले असावे.” वत्सलाबाईंनी डोळ्याला पदर लावला.


“पण तुम्ही सगळे इथे कसे? मनू, हे तू घडवून आणलंस ना?” मिलाफसोहळा झाल्यावर त्याने मनस्वीकडे प्रश्नार्थक दृष्टीने बघत प्रश्न केला.


“हो मीच सगळ्यांना आमंत्रित केले होते.” त्याचा हात हातात घेत ती मंद हसली.


“अगं पण तू..?”


“मी स्वतः हिवरेवाडीत जाऊन आमंत्रित केले होते.”


“मनू..तू.. तू खरंच ग्रेट आहेस गं.”


“आफ्टरऑल तुमचीच लेक आहे. यांच्याव्यतिरिक्त आणखीही कुणी आहे ज्यांना भेटायला तुम्हाला आवडेल.” कारच्या एका बाजूला अवघडून उभ्या असलेल्या वच्छी आणि गोविंदाकडे बोटाने निर्देश करत ती म्हणाली.


“वच्छी काकीऽऽ गोविंदा काकाऽऽ..”


“डॉक्टरसाहेब..” वच्छीचा आवाज कापरा झाला होता.


“आजी आजोबा, तुम्हालाही नमस्कार करतेय.”

“एवढी मोठी डॉक्टरीनबाई आमच्या पायाला कशापायी हात लावतेसं बाळा?”


“मी शिकून मोठी असले तरी तुम्ही वयाने मोठे आहात. मला तुमचाही आशीर्वाद हवाच की. या, सगळ्यांनी समोरच्या रांगेत बसा.”


त्यांचे हात पकडून समोर राखून ठेवलेल्या रांगेत ती त्यांना घेऊन आली. वच्छी आणि गोविंदाला अगदी अवघडून गेल्यासारखे वाटत होते. पाटलांच्या बरोबरीने कधी उभे न राहणारे ते आज त्यांच्यासोबत एका रांगेत बसत होते.


बाजूला निमंत्रित डॉक्टरमंडळी आणि नंतर शालिमार गल्लीतील बायका बसल्या होत्या. त्यांच्यासाठी आजचा दिवस म्हणजे एक सणच होता. त्यांच्या आरोग्याची दखल घेणारेही कोणी आहेत या भावनेने त्या भारावल्या होत्या.


गौरी, इंदुताई, वत्सलाबाईंना मात्र त्यांना बघून वेगळे वाटत होते. नेहमीसारखा भडक मेकअप करून नसल्या, तरी त्या बायका बऱ्यापैकी नटल्या होत्या. घरचा कार्यक्रम असल्यासारखे असे नटून थटून आलेल्या त्यांना बघून या तिघींना नवल वाटत होते. वच्छी तर कुणाकडे नजर वर करून पाहत देखील नव्हती. मनुने इतका आग्रह करकरून तिला बोलावणे धाडले म्हणून ते दोघे उभयंता कार्यक्रमाला हजर तरी होते.


“मनू, या सगळ्यांना बोलवायचं तुला कसं सुचलं गं?”


“असंच. माझ्या बाबांच्या चेहऱ्यावरचा हा आनंद मला बघायचा होता म्हणून हे सरप्राईज! तुम्हाला आवडलं नाही का?”


“वेडी आहेस. अगं, माणूस कितीही मोठा झाला तरी आपल्या आईवडिलांसाठी आसूसला असतोच.” तो म्हणाला तशी ती गालात हसली.

त्यांना ती इथे का घेऊन आली ते तिचे तिलाच ठाऊक होते.
:
क्रमश:
©®Dr. Vrunda F.(वसुंधरा..)
*साहित्यचोरी गुन्हा आहे.*
*****

🎭 Series Post

View all