एक इजाजत.भाग -८०

वाचा एक अलवार फुलणारी प्रेमकथा!
एक इजाजत!
भाग -८०


“मनू, या सगळ्यांना बोलवायचं तुला कसं सुचलं गं?”


“असंच. माझ्या बाबांच्या चेहऱ्यावरचा हा आनंद मला बघायचा होता म्हणून हे सरप्राईज! तुम्हाला आवडलं नाही का?”


“वेडी आहेस. अगं, माणूस कितीही मोठा झाला तरी आपल्या आईवडिलांसाठी आसूसला असतोच.” तो म्हणाला तशी ती गालात हसली.

त्यांना ती इथे का घेऊन आली ते तिचे तिलाच ठाऊक होते. मागच्या वर्षीचा तो दिवस आठवला नि त्या आठवणीसरशी तिच्या अंगावर एक शहारा उमटला. आदीला भेटायला म्हणून मुंबईला गेलेली ती.. तिच्यासह चंपाचा भूतकाळ मनात साठवून ती जळगावी परतली होती. ज्या गोष्टिंपासून आजवर ती अनभिज्ञ होती त्या सर्व तिच्यासमोर उघड्या झाल्या होत्या.


धनराज, चंपा, कमली, शीलाआँटी आणि या सर्वांशी जुळलेली ती. कधी कधी या साऱ्यांचा खूप त्रास व्हायचा आणि मग अशावेळी तिच्या मदतीला धावून यायचा तो आदी!


“मनू, तू त्रास करुन घेऊ नकोसं गं. उलट विचार कर ना की ह्या साऱ्या गोष्टी तुला इतक्या वर्षांनी आत्ताच का कळल्या? कारण त्यांचेही काही प्रयोजन असेल.”


“कसलं प्रयोजन आदी? हे सत्य जाणून घेऊन मला काही उपयोग असता तर मग मला इतका त्रास का झाला असता?” ती त्याला उलट विचारायची.


“मनू, तसे पाहिले तर फायदाच आहे की. तूच सांग, तुला एक बिझनेसमन म्हणून फायदा जाणून घ्यायचा आहे की एक माणूस म्हणून?”


“आदी, प्लीज मला काही जाणून घ्यायचे असले तर आधी माझ्याकडून उत्तर काढून घ्यायची ट्रिक आता जुनी झालीये. तसेही मी हँग झाले आहे. माझ्याने कुठलेच उत्तर नीट देता येणार नाहीये” एका हाताने डोके पकडत ती म्हणाली.


“अगं, ऐक. अशी एकदम निराश होऊ नकोस. तू जर तुझ्या इमोशन्स बाजूला ठेवून विचार केलास तर कळेल की तू धनराज सेठची मुलगी आहेस हे किती फायद्याचे आहे. तू सरळसरळ कंपनी आणि बंगल्यावर वारसदार म्हणून दावा ठोकू शकतेस. त्यांच्या इस्टेटीमध्ये भागीदारी मागू शकतेस. लक्ष्मीमाता चारही बाजूने तुझ्यावर धनवर्षाव करायला सज्ज असताना मग त्या वेश्यावस्तीत तुला हॉस्पिटल काढायची काय गरज उरणार आहे?” त्याने मुद्दा स्पष्ट करत म्हटले.


“हे बघ आदी, तुझ्या आणि धनराजच्या संपत्तीचा मला हव्यास नाही हे मी तुला आधीच क्लिअर केले आहे. त्यामुळे मनाला न पटणारा विषय तू मला सांगू नकोस.”


“मग हा विचार नकोच करू. जस्ट लिव्ह इट! आता मी तुला एक मनुष्य म्हणून काय सांगतोय ते ऐक. तुला हे सगळं कळल्यावरही तू तुझ्या निर्णयावर ठाम आहेस यावरून तू किती प्युअर आहेस हे समजतं.


मनू तशीही डॉक्टर म्हणून तू त्या बायकांच्या आरोग्यासाठी झटणार आहेसच गं. पण शीला आँटी, चंपा किंवा कमली या तुझ्या आयुष्याशी जोडलेल्या स्त्रियांमुळे तू हे काम आणखी उत्तमप्रकारे करू शकशील. कारण या स्त्रियांच्या व्यथा केवळ त्यांच्या नाहीत.. तर कुठेतरी तुझ्याशी जुळल्या आहेत, तुझ्यापाशी येऊन थांबल्या आहेत. मी काय सांगायचा प्रयत्न करतोय ते तुला कळतंय ना?


मनू, डॉक्टर म्हणून तू पेशंटला योग्यप्रकारे ट्रीट करशीलच गं; पण माणूस म्हणून जेव्हा त्यांच्या हसऱ्या चेहऱ्यामागच्या वेदनेशी कनेक्ट होशील ना तेव्हा खऱ्या अर्थाने तू त्यांना बरं करू शकशील आणि ही कनेक्टिव्हिटी तुझ्या आयुष्यातील या तीन स्त्रियांमुळे प्राप्त झाली आहे हे लक्षात ठेव. कदाचित त्यांच्याबद्दल तुला आत्ता कळणे यामागचा हेतू हा असावा असं समज. काय? ध्यानात येतंय ना?”


त्यानेच प्रश्न विचारत तिला उत्तराची एक दिशा दिली होती.


“आदी, यू आर सिम्पली ग्रेट! जस्ट लाईक..”


“जस्ट लाईक युअर बाबा! आय नो इट.” त्यानेच तिचे वाक्य हसत पुरे केले होते.


“यस! यू आर राईट.” त्याच्यासोबत तिही हसली.


दहा-बारा महिन्यातपूर्वीचा हा संवाद.. मात्र मनू पुरती बदलली होती. त्याच्या वक्तव्याने तिला किती धीर आला होता. चंपा, शिलाबाई किंवा कमली यांच्या आठवणीने जो त्रास होत होता तो आदीने एका क्षणात फुंकर घालून नाहीसा केला होता.


त्यांचे सत्य याच घडीला समोर येणं गरजेचं होतं हेही पटवून दिले होते आणि त्याची परिणती म्हणून तिने हॉस्पिटलच्या कामात स्वतःला पुरते झोकून दिले होते. ही वास्तू केव्हा उभी राहतेय असे तिला झाले होते. अडीनडीला आदी होताच. देणगीदार म्हणून पैशांचा हातभारही लावत होता.


“बाबांवरून आठवलं. त्यांच्याबद्दल काय विचार केला आहेस? अण्णासहेबांची करतूद त्यांच्या कानवर घातली की नाही?” एकदा त्याचा प्रश्न.


“अजून तरी नाही. त्यांच्याच वडिलांबद्दल त्यांना असं सांगायची माझी हिंमतच होत नाहीये रे. आता मला कळतंय बाबाबरोबर नात्यात पुढे जायला चंपाजी का नकार देतात ते. स्त्री कायम नातं जोडत आली आहे. तोडणे तिचा धर्मच नव्हे. अण्णा आणि बाबांच्या नात्यात फूट पडू नये हेच त्यांना कायम वाटत आले असावे.


“मनू, जे काही करायचंय ना ते तुला करायचं आहे. यात मी तुला फारशी मदत नाही करू शकणार कारण तुझ्या बाबाबद्दल तू किती हळवी अँड एट द सेम टाईम किती अग्रेसीव्ह आहेस हे मी स्वतः अनुभवलं आहे. पण लक्षात ठेव तुझा निर्णयात मात्र मी कायम तुझ्या पाठीशी असेन. तुझे पुढे पडलेले प्रत्येक पाऊल कधीच चुकीच्या दिशेने नसेल याची मला खात्री आहे.”


“आदी किती छान सांगतोस रे. असं वाटतंय की..”


“की बाबाच बोलत आहेत, होय ना? तू हेच म्हणशील हे ठाऊक आहे मला.” तो पुन्हा हसला.


“आदी, किती ओळखायला लागलाहेस तू मला? थँक्स फॉर धीस सपोर्ट. मला एकटीला हे सगळं फार जड गेलं असतं.”


“ए वेडूली, सपोर्ट तर करावाच लागणार आहे. आखिर भाई हूं मैं तेरा। इतना तो हक बनता ही हैं!”


त्याने तिला समजावले तर होते मात्र नेमकं काय करायला हवे हे सांगितले नव्हते. एक भाऊ म्हणून मात्र तो तिच्यासोबत कायम असणार होता. नव्यानेच जुळलेल्या नात्याची ही सुंदर बाजू लवकरच तिला एक निर्णय घ्यायला लावणार हे तिला इतक्यात ठाऊक नव्हते.


“बाबा, आज ओपीडीला चक्क सुट्टी?”

दुसऱ्या दिवशी जळगावातील प्रसिद्ध स्त्री रोग तज्ञाकडे प्रॅक्टिसला गेलेली मनस्वी परतली तेव्हा त्यांच्या हॉस्पिटल मधला शुकशुकाट बघून आश्चर्यचकित झाली होती. नर्सकडे विचारणा केल्यावर कळलं की प्रकाशने आज अचानक ओपीडी कॅन्सल करण्याचे आदेश दिलेत. असे फार क्वचित करणाऱ्या बाबांच्या मनात काय दडलंय हे जाणून घ्यायला ती झपाट्याने वर आली. बघते, तर प्रकाश गॅलरीत उभा राहून बाहेर कोसळणाऱ्या परतीच्या पावसाकडे नुसता बघत उभा होता.

त्याच्यासाठी कॉफी घेऊन येत ती गॅलरीत त्याच्या शेजारी येऊन उभी राहिली तरी त्याला कळले नाही.


“बाबा, आज ओपीडीला चक्क सुट्टी?” तिने हलकेच त्याला विचारले.


“हम्म.” त्याची बाहेरची नजर बाहेरच होती.


“अचानक?” तिचा प्रश्न.


“सहजच.“ त्याचे जेवढ्याला तेवढे उत्तर.


“कॉफी घेणार?” त्याच्यासमोर कप धरत ती.

“थँक्स! तशी मला हवीच होती.” तिच्या हातातील कप पकडत तो.


“का?”


“सहजच.”


“डॉक्टर प्रकाश कुठलीही गोष्ट इतक्या सहजतेने कधीपासून करायला लागलेत? बाबा, मनात काय चाललंय ते मला कळेल का?” त्याच्यावर नजर खिळवून बघत तिने विचारले.


“मनू, काही कळेनासे झालेय गं. कितीदा वाटतं की सारं काही विसरून जावं. रत्ना आपल्या आयुष्यात होती हे आठवूच नये असं वाटते.” दोन्ही ओठांना एकमेकांनी दाबून घेत त्याने तिच्याकडे पाहिले.


“बाबा..” त्याच्या हताश डोळ्यात ती आरपार पाहत म्हणाली.


“मनू, मी थकलोय गं आता. रत्नावर मी प्रेम केलं होतं.. करतोय. त्याबदल्यात तिची केवळ साथच तर मी मागतोय तर तेवढीही द्यायला ती तयार नाही. दरवेळी नकार आणि फक्त नकार. आणखी कितीवेळा असा नकार पचवायचा गं? त्यापेक्षा तिचा ध्यास कायमचा सोडून द्यायचा असे मी ठरवले आहे.” एका दमात कप रिकामा करत तो म्हणाला.


“बाबा, हे तुम्ही बोलताय? द ग्रेट डॉक्टर प्रकाश..”


“डॉक्टर असलो तरी मीदेखील एक साधा मनुष्यच आहे ना गं?”


“बाबा, तुम्ही साधेसुधे मनुष्य नाहीत हो आणि असे हार मारणाऱ्यातील तर मुळीच नाहीत.”


“थकलोय गं मनू मी. हा परतीचा पाऊस बघते आहेस ना? पावसाळा संपल्याची जाणीव करून देणारा हा पाऊस! तरीही पुढल्या वर्षी जोमाने पाऊस बरसणार हे आपल्याला ठाऊक असतं आणि म्हणून त्याचं हे जाणं आपण सहज स्वीकारतो. रत्नाने मात्र माझ्या आयुष्यात परत येण्याची एकही आशा शिल्लक ठेवली नाहीये गं. तिची वाट पाहून पाहून मी पार थकलोय.” चेहऱ्यावर उडालेल्या पावसाच्या थेंबात त्याच्या डोळ्यातील थेंब बेमालूमपणे मिसळून गेला.


मनू प्रकाशचा हा निर्णय बदलवू शकेल? कळण्यासाठी स्टे ट्यून्ड!
:
क्रमश:
©®Dr. Vrunda F.(वसुंधरा..)
*साहित्यचोरी गुन्हा आहे.*
*****

🎭 Series Post

View all