एक इजाजत.भाग ८१

वाचा एक अलवार फुलणारी प्रेमकथा!
एक इजाजत!
भाग -८१


“थकलोय गं मनू मी. हा परतीचा पाऊस बघते आहेस ना? पावसाळा संपल्याची जाणीव करून देणारा हा पाऊस! तरीही पुढल्या वर्षी जोमाने पाऊस बरसणार हे आपल्याला ठाऊक असतं आणि म्हणून त्याचं हे जाणं आपण सहज स्वीकारतो. रत्नाने मात्र माझ्या आयुष्यात परत येण्याची एकही आशा शिल्लक ठेवली नाहीये गं. तिची वाट पाहून पाहून मी पार थकलोय.” चेहऱ्यावर उडालेल्या पावसाच्या थेंबात त्याच्या डोळ्यातील थेंब बेमालूमपणे मिसळून गेला.


“बाबा, असं नका ना बोलू. त्यांच्या डोळ्यातील प्रेम मी पाहिलंय की.’


“डोळ्यात प्रेम आणि ओठात नकार. ही कसली पद्धत गं? असो. आता मी हा विचार करणंच सोडणार आहे.” तो खिन्नपणे म्हणाला.


“खरंच तुम्ही असं करू शकाल?”


“माहित नाही.”


“मला माहिती आहे ना, असं कधीच घडू शकणार नाही.” ती म्हणाली त्यावर त्याने एक उसासा टाकला.


“लिव्ह इट.” तो जायला निघाला तसे तिने त्याला थांबवले.


“बाबा, असे केले तर?”


“कसे?”


“म्हणजे माझ्याकडे एक मस्त आयडिया आहे.”


“मनू, आता काहीच नको गं. प्लीज.”


“प्लीज, एकदा ऐका तरी. तर आयडिया ही आहे की हॉस्पिटलच्या इनोग्रेशनच्या वेळी आपण त्यांनाही आमंत्रित करायचं. तिथे तुम्ही सर्वांसमोर त्यांना प्रपोज करा..”


“आणि मग सर्वांसमोर तिचा नकार ऐका असंच ना? खुळी आहेस तू. मी असं काही करणार नाहीये.”तिचे वाक्य तोडत तो म्हणाला.


“बाबा प्लीज, एकदा हे करून तर बघा. नकार तर नकार. तो नेहमी मिळतोच आहे की; पण जर का या वेळी होकार मिळाला तर? आपण होप्स का सोडायच्या?”


“वेडी आहेस तू.”


“असेना का. तुमच्या वेड्या मुलीचा हा हट्ट म्हणून तरी हो म्हणा ना. प्लीऽऽज!” तिचा तो निरागस चेहरा, टपोऱ्या डोळ्यातील त्याच्यासाठीचे प्रेम.. तो विरघळणार नाही तरच नवल.


“बरं बघू. तेव्हाचे तेव्हा.” हे बोलताना त्याच्या मनावरचा भार अचानक हलका झाल्यासारखा का वाटला त्याला उमजेना.


त्याच्या चेहऱ्यावर नकळत उमटलेले आशेचे किरण मनूच्या नजरेने अलगद टिपले आणि तिच्या ओठावर आपोआप मंद स्मित स्वार झाले.


‘देवा! मला वाटते तसेच घडू दे. आता नको रे या दोन प्रेमापाखरांची अधिक परीक्षा बघू. असे एकेकट्याने विहरने पुरे झाले की. आतातरी त्यांना जोडीने विहंगू दे. मी जे करायचे ठरवलेय त्यात यश येऊ दे.’ मनातच देवाला आळवत तिने हात जोडले.


खरे तर जेव्हा प्रकाश हताश होऊन चंपाबद्दल बोलत होता, तिच्याकडून मिळणाऱ्या नकाराबद्दल सांगत होता तेव्हा तिला वाटून गेले की अण्णांची काळी बाजू त्यांच्या समोर उघड करावी आणि त्यांना सांगावं की, ‘बाबा, चंपा चुकीची नाहीये हो. केवळ तुमच्या आणि अण्णांच्या नात्यासाठी ती हे करतेय.’ मात्र यावेळीही ती काहीच बोलू शकली नाही.


‘जे करायचं आहे ते तुलाच करायचं आहे मात्र एक भाऊ म्हणून तुझ्या निर्णयात मी कायम पाठीशी असेल..’


काही दिवसांपूर्वी आदीचे बोललेले शब्द तिला आठवले आणि तिला त्याची आठवण झाली. डोक्यात काहीतरी सुचले होते. जे प्रकाशला सांगितले त्यापेक्षा आणखी काहीतरी वेगळे. क्षणाचाही वेळ वाया न घालवता आदीला कॉल करून तिने तिची कल्पना सांगितली.


“ग्रेट बहना! तू जी आयडिया सुचवलीस ती खरंच खूप भन्नाट आहे. आय एम रिअली प्राऊड यू!” तो तिचे कौतुक करायला थकत नव्हता.


“पण आदी, हे वर्क करेल ना? तोंडावर तर आपटणार नाही ना मी?”


“अजिबात नाही आणि आपटायला गेलीस तरी मी आहे की. मी तुझ्या पाठीमागे असेनच. तेव्हा अजिबात आपटू देणार नाही. तू केवळ समोर पाऊल टाक.” त्याच्या नुसत्या शब्दांनीही तिला खूप धीर मिळत होता.


‘बाबा, तुम्ही बेशक डगमगला असाल. मी मात्र ठाम आहे. मला काय करायचंय ते अगदी स्पष्ट दिसतंय. एकदा का हॉस्पिटलचे काम पूर्ण होत आले की मी माझा प्लॅन अमलात आणायला सुरुवात करेन. यू जस्ट वेट अँड वॉच!’

सिनेमातील नायिकेप्रमाणे तिने तिच्या कुर्तीची नसलेली कॉलर टाईट केली आणि स्वतःच्या प्लॅनवर खुश होऊन स्वतःला शाबासकी देत ती तिच्या खोलीत निघून गेली.


असेच दिवस भरभर पुढे सरकत होते. हॉस्पिटलचे काम झपाट्याने सुरु होते. मनूची जळगावातीलच स्त्री रोग तज्ञ आणि सोबतच प्रकाशच्या हॉस्पिटलमधली प्रॅक्टिस उत्तम चालली होती. आपल्या फ्रेंडसर्कल मध्ये आदीच्या मम्माची आणि धनराजची केस डिस्कस करून त्यांच्यावर योग्य उपचाराला सुरुवात झाली होती आणि त्याचे सकारात्मक परिणाम दिसू लागले होते त्यामुळे आदित्य देखील थोडा निवळू लागला होता.


मागच्याच महिन्यात तिच्या स्वप्नातील हॉस्पिटल पूर्णपणे उभे राहिलेले बघून आपल्या प्लॅनला सुरुवात करायची ही योग्य वेळ आहे याची तिला जाणीव झाली आणि त्या योगे तिने पाऊल उचलायला सुरवात करायचे ठरवले.


“गौरीआत्याऽऽ..”


“कोण?” समोरून आलेल्या अनपेक्षित सादेने सरपंचपदाच्या खुर्चीत विराजमान असलेल्या गौरीने मान वर करून पाहिले.


“माफ करा. कोण आपण? मी ओळखलं नाही.”


“ओह सॉरी, मी माझी ओळख करून द्यायचेच विसरले. मी बसू शकते?”

“हो बस ना.” तिच्या चेहऱ्यावर अजूनही अनोळखी भाव होते आणि काहीशी उत्सुकता देखील.


आपली कल्पना अंमलात आणायची म्हणून प्लॅनच्या सुरुवातीचा भाग म्हणून मनस्वीने हिवरेवाडीत पाऊल ठेवले होते. तिथे काय घडेल? हिवरेपाटलांचे कुटुंब तिला स्वीकारणार की अपमान करून परत पाठवणार? तिला काहीच ठाऊक नव्हते. मात्र पुढे उचललेले पाऊल आता मागे घ्यायचे नव्हते.


प्रकाशने हिवरेवाडीतून पाय काढून घेतला आणि हिवरेपाटलांच्या घरावर संकटाची जणू माळ सुरु झाली. आबासाहेबांनी प्रकाशच्या आठवणीत त्यांनी शेवटचा श्वास सोडला. वाड्यावर आता केवळ अण्णासाहेबांचे राज्य होते परंतू आबासाहेबांची सर मात्र त्या राज्याला नव्हती, उलट त्यावर अवकळा पसरू लागली होती.


पाटलांचे नाव टिकवून ठेवण्यासाठी म्हणून त्यांनी सासरी गेलेल्या गौरीला बोलावून घेतले होते आणि तेव्हापासून गौरी हिवरेपाटलांची एकुलती एक वारसदार म्हणून मिरवत होती. तिची दोन्ही मुलं आणि नवऱ्यासह ती कायमची तिथेच स्थायिक झाली आणि गेल्या काही वर्षांपासून सरपंचपदी निवडून येत तिने आपल्या घराण्याची परंपरा कायम राखली होती.


हिवरेवाडीत पाय टाकण्यापूर्वी मनस्वीने ही सर्व माहिती आधीच गोळा केली होती. त्यामुळे वाड्यावर जाण्यापूर्वी सर्वप्रथम गौरीला भेटण्यासाठी ती ग्रामपंचायतीच्या इमारतीत हजर झाली होती.


“थँक यू.” खुर्चीवर बसत मनस्वीने गौरीकडे बघून स्मित केले.


“गौरीआत्या..”


“एक मिनिट, तू मला आत्या का म्हणत आहेस?” आश्चर्याने गौरी.


“कारण तू माझी आत्या आहेस म्हणून. अगं मी मनू.. मनस्वी. डॉक्टर प्रकाश हिवरेपाटील यांची कन्या.”


“काय? तू दादाची मुलगी आहेस? अशक्य. दादाने कधी लग्नच केले नव्हते.”


“हो. तरीसुद्धा मी त्यांची मुलगी आहे. दत्तक मुलगी. मात्र त्यांनी मला सख्ख्या बाबाचे प्रेम दिलेय.” ओठ रुंदावत ती म्हणाली.


“असेल पण तू आता इथे का आलीस?”


“बाबांसाठी.”


“म्हणजे? दादा ठीक तर आहे ना?”


“हो. दोनदोन डॉक्टर्स असल्यावर त्यांना काय होतेय?”


“दोन डॉक्टर्स?”


“मी डॉक्टर मनस्वी. दोन वर्षांपूर्वीच माझे डीजीओ झालेय.”


“ओह! अभिनंदन.”


“थँक यू. खरं तर आत्या मी तुझी मदत मागायला आलेय गं. मी नाशिकला मोठे हॉस्पिटल उभारतेय. माझी इच्छा आहे की त्याच्या इनोग्रेशनला अण्णासाहेबांसह सर्वांनी उपस्थित रहावे.”


“अगं पण..”


“प्लीज आत्या नाही म्हणू नकोस ना. बाबा तुमच्यापासून दूर झाले पण त्यात ते कधीच खुश नव्हते. मला कायम तुझ्याबद्दल, अण्णा, आबासाहेब आणि आजीबद्दल सांगत असतात. वरवर आनंदी भासत असले तरी आतून फार दुःखी आहेत. तुम्ही तरी त्यांच्याशिवाय आनंदी कुठे आहात? म्हणून मला वाटतंय की तुम्हा सर्वांची एकदा भेट घडवायला हवी आणि त्यासाठी याहून चांगली संधी नाहीय.”


“अण्णासहेब परवानगी देणार नाहीत.” गौरी डोळ्यात पाणी घेऊन म्हणाली.


“तुझी परवानगी आहे ना?” तिच्या डोळ्यात बघत मनूचा प्रश्न.


“हम्म.. प्रकाशदादा माझा केवळ दादा नव्हता गं. त्याहून खूप काही होता. माझा मित्र, माझा सखा.. हिवरे पाटलांच्या घराचा दिवा! मात्र रत्नाच्या एका चुकीने त्याला आमच्यापासून हिरावून घेतले.” हुंदक्याला आवर घालत ती.


“तुलाही रत्ना दोषी होती असं वाटतं?”


“साऱ्या गावाला वाटतं. प्रकाशनेही ते मान्य केलं होतं. “


“आता तो विषय नकोच. तुम्ही सर्वांनी एकत्र यावे, किमान एकदा भेटावे असं मला वाटतं. त्यासाठी हा खटाटोप. आत्या, प्लीज तू माझी अण्णासाहेबांशी भेट घडवून आणशील? प्लीज?” ती नम्रपणे म्हणाली.


तिचा मृदू स्वर, तजेलदार चेहरा आणि झळकणारा आत्मविश्वास.. गौरीला मनू प्रचंड आवडली. मात्र अण्णासाहेब तिला स्वीकारतील का? हा प्रश्नच होता.
:
क्रमश:
©®Dr. Vrunda F.(वसुंधरा..)
*साहित्यचोरी गुन्हा आहे.*
*****

🎭 Series Post

View all