एक इजाजत. भाग -८२

वाचा एक अलवार फुलणारी प्रेमकथा!
एक इजाजत!
भाग -८२


“आता तो विषय नकोच. तुम्ही सर्वांनी एकत्र यावे, किमान एकदा भेटावे असं मला वाटतं. त्यासाठी हा खटाटोप. आत्या, प्लीज तू माझी अण्णासाहेबांशी भेट घडवून आणशील? प्लीज?” ती नम्रपणे म्हणाली.


तिचा मृदू स्वर, तजेलदार चेहरा आणि झळकणारा आत्मविश्वास.. गौरीला मनू प्रचंड आवडली. मात्र अण्णासाहेब तिला स्वीकारतील का? हा प्रश्नच होता.


“अण्णा, नमस्कार करते हं.” गौरी तिला वाड्यावर घेऊन येताच मनू त्यांच्या पायाशी झुकली.


“अहो, कोण तुम्ही? आमच्या रिद्धीच्या मैत्रीण काय?”


त्यांच्या आवाजाने मनस्वीने नजर वर केली. त्यांचा गोरा, करारी चेहरा. वाढत्या वयाच्या खुणा चेहऱ्यावर उमटल्या होत्या आणि त्या आड दडलेली स्वभावातील मग्रुरी.. तिही तिच्या नजरेला स्पष्ट ओळखू येत होती.


“नाही.. रिद्धीची मैत्रीण नव्हे. ही एक मोठी डॉक्टर आहे..” गौरीला कशी ओळख करून द्यावी ते समजेना. अण्णांचा राग तिलाही ठाऊक होता.


“मी डॉक्टर मनस्वी, डॉक्टर प्रकाश हिवरे पाटलांची लेक आणि तुमची नात.”:गौरीची मदत करत तिने आपली ओळख पटवली.


“प्रकाशची लेक?” धक्का बसल्यागत त्यांनी तिच्याकडे पाहिले.


“प्रकाश? कुठे आहे प्रकाश? ए, बाळा तू अजुनही रागायला आहेस होय?” वत्सलाताई भ्रमिष्टासारख्या बडबडत बाहेर आल्या.


“वत्सलाआजी? अहो, अशा उठून का आलात? आणि बाबा कुणावरही रागावले नाहीत. आपल्या माणसांवर कोण रागावतं होय?” वत्सलाताईंना आधार देत असताना कोपऱ्यात उभ्या असलेल्या इंदूताईकडे लक्ष गेले.


“इंदूआजी, तुम्ही डोळ्यात पाणी आणू नका.” त्यांच्याजवळ जात डोळे पुसत मनू म्हणाली.


“आमच्या बद्दल सारंच ठाऊक आहे असं दिसतंय. आमची खबरबात घ्यायला त्याने तुला पाठवलं होय?” अण्णासाहेब.


“नाही, मीच आलेय. तुम्हा सर्वांना निमंत्रण द्यायला आलेय आणि राहिली गोष्ट तुम्हा सर्वांना ओळखण्याची, तर बाबा कायम तुम्हा सर्वांबद्दल सांगत असतात. त्यामुळे मी सहज साऱ्यांना ओळखले.”


“कसलं निमंत्रण? कुठे आहे माझा प्रकाश?”


“अहो आजी, तुमचा प्रकाश खूप मोठे डॉक्टर आहेत आणि मी त्यांची लेक, मी सुद्धा डॉक्टर आहे. तुम्हा सर्वांच्या कृपेने नाशिकला मोठे हॉस्पिटल बांधले आहे, त्याच्याच उदघाट्नला बोलवायला आलेय.”


“माफ कर, आम्ही कोणीही येऊ शकणार नाही..”


“आम्ही येणार. नक्की येणार. माझ्या प्रकाशला भेटायला नक्की येणार. अण्णासाहेब बोलत असताना वत्सलाबाई मध्येच म्हणाल्या.


“हो, यावेच लागेल. हिवरेवाडीच्या लेकाचा आनंदसोहळा आहे. तेव्हा घरातील सदस्य म्हणून ना सही तर गावचे प्रमुख, पोलीस पाटील आणि सरपंच या भूमिकेला न्याय देण्यासाठी तरी या.” अण्णासाहेबांच्या हाती निमंत्रण पत्रिका ठेवत मनस्वी म्हणाली.


“बरं, निघते मी.”


“अगं बाळा, असं कसं? काही खाऊन तर जा.” मनू जायला वळताच इंदूताईंचा शब्द बाहेर पडला.


“नाही आजी, आता नको. पुढच्या खेपेला मात्र तुमच्या हातचं नक्की जेवून जाईल. आता मला निघायला हवं. गौरी आत्या, सरपंच म्हणून सगळ्यांना घेऊन यायची जबाबदारी तुझी हं.” ती अंगणात येत म्हणाली. गौरीही तिच्यासोबत होती.


“वच्छीआजी, गोविंदा आजोबाऽऽ” बाहेर अंगणात काम करणाऱ्या वच्छीकडे लक्ष जाताच ती आनंदाने त्यांच्याजवळ जाऊन उभी राहिली.


“मी मनस्वी..”

स्वतःची थोडक्यात ओळख करून देत तिने त्यांनाही आग्रहाचे निमंत्रण दिले.


“गौरीआत्या, यांनाही आठवणीने घेऊन यायचं हं. आता खरंच मी निघते.” ती गेली त्या दिशेने मनस्वी आणि वच्छी कितीतरी वेळ बघत होत्या.

मनू आनंदात नाशिकला परतली होती. सगळ्यांना कार्यक्रमाला येण्यासाठी मनवण्यात ती यशस्वी झाली होती.


.. आणि आज महिन्याभरानंतर तोच आनंद तिच्या चेहऱ्यावर उमटला होता कारण म्हटल्याप्रमाणे सारी मंडळी नाशिकला उपस्थित होती. अगदी अण्णासाहेबांपासून तर वच्छी आणि गोविंदादेखील. तिने जे ठरवले होते ते करून दाखवले होते.


आनंदी तर प्रकाशही होता. त्याच्या लेकीने त्याला हे मोठे सरप्राईज जे दिले होते. अण्णा, आई, आजी त्याची गौरी आजही सारे त्याच्यावर तितकेच प्रेम करत होते.


मात्र मनातील आनंद लगेचच चिंतेत बदलायला वेळ लागला नाही. वच्छी आणि गोविंदाला पाहून आनंद झाला खरा; पण जर का रत्ना इथे आली आणि चंपाच्या रुपतीला तिला सगळ्यांनी ओळखले तर? तर काय होईल हा प्रश्न त्याला सतावत होता.


“मनू..”


“काय बाबा?”


“अगं आता आलीत ना सगळी मंडळी? तुझे पाहुणे देखील आलेत. मग आता कार्यक्रमाला सुरुवात करायची ना?”


“अहो बाबा, किती ती गडबड? जरा चिल करा की. अजून मुख्य पाहुण्यांचे आगमन व्हायचे आहे आणि तुम्ही किती घाई करताय?”


“अगं पण..”


“मला कळतेय तुमच्या मनाची घालमेल. तुम्हाला चंपाजींचं टेन्शन आलंय ना? अहो पण काळजी करू नका. इतक्या वर्षांनी सगळ्यांना बघून त्यांना आनंदच होईल की आणि काही झालंच तर तुम्ही आहात ना? आपल्या प्रेमाच्या बाजूने एकदा ढाल बनून पुढे या. विषय तिथेच संपला.”


“मनू, तुला वाटतं तेवढं हे सोपं नाही.”


“तुम्ही उगाचच टेन्शन घेताय. काय बाबा मी लहान असून तुम्हाला सांगावं लागतंय? आणि आज इथे तुम्हाला चंपाजींना प्रपोज करायचे आहे हे विसरू नका. हाच चान्स आहे.” त्याच्या कोटावरून हात फिरवत ती कानात कुजबुजली.


इंदुताई आणि गौरी दुरूनच प्रकाश आणि मनुकडे पाहत होत्या. दोघांचे बोलणे कानी ऐकू येत नसले तरी त्यांच्यातील घट्ट बंध दुरूनही लक्षात येत होते. गौरीने नजर कलती करून अण्णांकडे पाहिले. त्यांच्याबद्दल तिच्या मनात कायम आदरयुक्त भीती असायची. मात्र असे लाडकौतुक करणे त्यांना कधी जमले नव्हते. उलट आबासाहेब.. त्यांच्यातीलच प्रेमळ वृत्ती प्रकाशमध्ये झळकत होती.


“आत्या, सॉरी हं. तुम्हाला थोडं ताटकळत राहावं लागतंय. मुख्य पाहुण्या आता येतीलच.” मनू गौरीजवळ येत म्हणाली.


“या चंपाजी म्हणजे कोण आहेत गं? तुमच्यासारख्याच मोठया डॉक्टर आहेत का?” इंदुताईंनी मनातील प्रश्न विचारला.


“छे हो आजी. डॉक्टर कसल्या, त्या खूप मोठ्या समाजसेविका आहेत. शाळा काय, दवाखाने काय नि अनाथाश्रम काय सगळीकडे देणग्या देत असतात आणि तेही स्वतःच नाव बाहेर येऊ न देता. खूप मोठ्या मनाच्या आहेत त्या. मी तुमची भेट घडवून देईन की.”


ती बोलत असताना एका ऑडी तिथे येऊन थांबली.


“बहुधा आल्यात वाटतं. त्यांना मी घेऊन येते.” त्यांच्याजवळून उठून ती पुढे गेली.

एवढ्या महागड्या गाडीतून येणारी ही व्यक्ती कोण म्हणून सगळ्यांच्या नजरा तिकडे वळल्या होत्या..

ड्रायव्हिंग सिटवरून बाहेर येत आदीने मागच्या बाजूचा दरवाजा उघडला आणि हात समोर घेत आतमध्ये असलेल्या एकीला बाहेर येण्यास मदत केली.


सुंदर साडी नेसलेली, कपाळावरच्या ठसठशीत कुंकवाने आणि तोंडातील पानाने सगळ्यांना आपल्याकडे आकर्षित करून घेत शीलाआँटी बाहेर आली.


“ती चंपा ही आहे होय? मोठी समाजसेविका आहे म्हणे.” इंदुताई आणि गौरी कुजबुजत म्हणाल्या. तोंडात पान चघाळत असलेल्या शीलाआँटीबद्दल त्यांच्या मनात फारसे चांगले मत बनले नव्हते.


“चंपाजी तुमचे स्वागत आहे.” शीलाआँटीनंतर आदीने हात देत चंपाला बाहेर येण्यास मदत केली.


आजही ती शुभ्र शिफॉनची साडी नेसली होती. त्यावर गुलाबी रंगाचा स्लीव्हलेस ब्लाऊज, मात्र साडीचा पदर खांद्यावरून ओढलेला. गोऱ्यापान चेहऱ्यावर गॉगल घातलेले काजळी आणि सरळ नासिकेच्या खाली गुलाबी गुलाबपाकळ्या! आजच्या तिच्या गुलाबी आणि धवल कॉम्बिनेशनमध्ये ती एकदम सोबर आणि तरीही सर्वात उठून दिसत होती.

“चंपा म्हणजे ही आहे तर. कसली सुंदर आहे.” गौरीच्या तोंडून बाहेर पडले.

मनस्वीने शीलाआंटीला पहिल्या रांगेत इंदूताई शेजारी बसायला जागा करून दिली अन् चंपा आणि आदीसह ती समोर आली.

“आजच्या प्रमुख पाहुण्या चंपाजीचे आगमन झाले आहे आणि आता त्यांच्या हस्ते रिबीन कापून आजचा सोहळा सुरु होतो आहे..” आयोजक म्हणून आलेली मनूची एक मैत्रीण माईक सांभाळत म्हणाली.


तिने रिबीन कापताच टाळ्यांचा जल्लोष झाला आणि मग इतर मान्यवरांसोबत ती वर आली.


“मी एक स्वप्न पाहिलं होतं.. डॉक्टर होण्याचं. अर्थात ते स्वप्न पाहण्याचं आणि प्रत्यक्षात साकरण्याचं धाडस मला माझ्या बाबांमुळे करता आले. हॉस्पिटलची ही इमारत प्रत्येक पेशंटकरिता खुली आहे, मात्र इथे दवाखाना उभारण्याचा मुख्य उद्देश इथल्या वस्तीतील स्त्रियांच्या आरोग्याच्या समस्यांविरुद्ध लढणे हा आहे. आम्ही आमचे काम निष्ठेने करू यात शंका नाही. फक्त तुम्हा सर्वांचे आशीर्वाद कायम सोबतीला असू देत एवढीच अपेक्षा.”


मनस्वीने तिचे मनोगत व्यक्त केले. त्यानंतर पुन्हा दोघांतिघांनी शुभेच्छा देणारे भाषण केले आणि त्यानंतर आयोजकांनी चंपाला दोन शब्द बोलायची विनंती केली.


“इस पुरे बस्ती की शान हैं यह.. मेरे कोठी की राणी हैं चंपा!”


चंपा उठून उभी राहिली तसे बाजूला बसलेल्या इंदुताईंच्या जवळ झुकत शीलाआँटी म्हणाली. ते ऐकताच त्यांनी चमकून शीलाआंटीकडे पाहिले.
:
क्रमश:
©®Dr. Vrunda F.(वसुंधरा..)
*साहित्यचोरी गुन्हा आहे.*
*****

🎭 Series Post

View all