एक इजाजत. भाग -८३

वाचा एक अलवार फुलणारी प्रेमकथा!
एक इजाजत!
भाग -८३


मनस्वीने तिचे मनोगत व्यक्त केले. त्यानंतर पुन्हा दोघांतिघांनी शुभेच्छा देणारे भाषण केले आणि त्यानंतर आयोजकांनी चंपाला दोन शब्द बोलायची विनंती केली.


“इस पुरे बस्ती की शान हैं यह.. मेरे कोठी की राणी हैं चंपा!”


चंपा उठून उभी राहिली तसे बाजूला बसलेल्या इंदुताईंच्या जवळ झुकत शीलाआँटी म्हणाली. ते ऐकताच त्यांनी चमकून शीलाआंटीकडे पाहिले.


“कोठी?” शब्द उच्चारतानाही इंदुताईच्या घशाला कोरड पडल्यासारखी वाटली.


“एक छोटे से लब्ज से इतनी डर गई? तुम तो बडे शरीफ घर की लगती हो।”


“तुम्हाला काही गैरसमज झाला असावा. त्या चंपाजी तर समाजसेविका आहेत ना?”


!समाजसेविका? हा वैसे हमारी जैसी कोठेवालीयां समाज की सेवा ही तो करती हैं।” फिसकन हसत ती उत्तरली.


“छोडो ये बातें। हमारी चंपा क्या भाषण देती हैं, जरा सुन लेते हैं।” पाय लांब करून खुर्चीवर आरामात रेलून बसत शीलाआँटी चंपाचे शब्द ऐकू लागली.


इंदुताईही चंपाकडे बघत होत्या. इतकी सुंदर आणि तरुण समाजसेविका बघून त्यांच्या मनात तिच्याबद्दल आदर वाढला होता तो जवळ बसलेल्या त्या बयेने झटक्यात नष्ट करून टाकला होता.


चंपा बोलायला लागली आणि त्या जरा निरखून तिच्याकडे पाहू लागल्या. कुठेतरी ओळखीच्या खुणा त्यांना जाणवत आहेत असे वाटत होते; पण एका कोठेवालीच्या कसल्या ओळखीच्या खुणा? असे मन त्यांना सांगत होते.


“नमस्कार! एवढ्या मोठ्या हॉस्पिटलच्या उदघाटनासाठी माझ्यासारख्या स्त्रीला बोलावलंय हा आपल्या डॉक्टर मॅडमचा मोठेपणा आहे. जेव्हा त्यांनी हॉस्पिटलचा विचार मला सांगितला तेव्हाच मी म्हणाले होते की या बदनाम गल्लीत येणार तर तुम्हीही बदनाम होणार. मात्र त्या बधल्या नाहीत. उलट मलाच चिखलातील कमळाची उपमा देऊन त्यांनी आपला मानस पुरा केला.


एवढया तरुण वयात इतके चांगले विचार बाळगणाऱ्या डॉक्टर मनस्वीचे मला खरंच कौतुक वाटते. असे विचार अंगी बाणायला घरातूनच संस्काराची शिदोरी हवी असते. डॉक्टरसाहेबांनी आपल्या लेकीवर असे संस्कार केलेत त्याबद्दल त्यांचेही अभिनंदन!” चंपा माईक हातात घेऊन बोलत होती. बोलता बोलता तिने एक ओझरता कटाक्ष प्रकाशकडे टाकला.


“पण डॉक्टर साहेब, सगळ्यांसमोर मला हेही कबूल करावे लागेल की तुमच्याहून तुमची लेक कणभर सरस आहे हो. काय ना, सगळेच आईवडील आपल्या लेकरांवर ढीगभर संस्कार करतात, चांगल्या गोष्टी शिकवतात; पण प्रत्येकच मूल ते अमलात आणत नाही. मात्र डॉक्टर मनस्वीने तुमचे संस्कार स्वीकारले, ते अमलात आणले म्हणून तिचं अधिक कौतुक हं.” तिने पुन्हा डोळ्याच्या कोनातून त्याच्याकडे पाहिले.


“डॉक्टरमॅडम म्हणाल्या की त्यांनी इथे हॉस्पिटल उभारण्याचे धाडस त्यांच्या वडिलांमुळे करू शकल्या. मी म्हणेल नाही, तुमचं धाडस तुम्ही स्वतःमुळेच करू शकलाय. तुमच्या वडिलांनी लाख सांगितलं असतं अन् तुम्ही पुढे पाऊलच टाकलं नसतं तर ही इमारत इथे उभी राहिली नसती. तेव्हा खरं धाडस तुमचंच.


आमच्या आयुष्यातदेखील असे धाडस करण्याचे क्षण आले होते. मात्र पहिलं पाऊल टाकतानाच मी धडपडले, डगमगले आणि आयुष्याची दिशाच बदलवून टाकली. त्यावेळी जर ताकदीने, धाडसाने पाऊल उचलता आले असते तर कदाचित मीही डॉक्टर असते.” तिचा आवाज जरासा कातर झाला; पíण तिने स्वतःला सावरले.


“असो, माझ्याशी जे घडलं तो भूतकाळ होता. त्याचा इथे संबंध नाही. ज्या धाडसाने तुम्ही हॉस्पिटल उभारलेय त्याच धडाडीने इथल्या बायकांच्या समस्या सोडवू शकाल यासाठी खूप खूप शुभेच्छा!” मनुकडे बघून तिने स्मित केले आणि खाली बसली.


“धन्यवाद चंपाजी. आता मी डॉक्टर प्रकाश आणि चंपाजींना विनंती करते की दोघांनी मिळून समोर दिसणारा पडदा वर करावा.” आयोजकांनी दोघांना विनंती केली.


“हे आता नवीन काय?” प्रश्नार्थकपणे प्रकाशने मनुकडे पाहिले.


“काय आहे ते बघा तरी.” ती हसून म्हणाली.


तिच्यासोबत प्रकाश आणि चंपा उभे राहिले आणि अचानक चंपाचे लक्ष समोर बसलेल्या मंडळीकडे गेले. समोर पहिल्याच रांगेत बसलेले अण्णासाहेब, मोठ्या आणि लहान पाटलीणबाई आणि गौरी.. मध्ये इतका काळ लोटला तरी तिने सर्वांना बरोबर ओळखलं होतं. हे सारे इथे कसे असे वाटत असताना नजर बाजूला फिरली आणि तिथे बसलेल्या वच्छी आणि गोविंदाकडे तिने पाहिले. वच्छी केव्हाची तिच्याचकडे टक लावून बघत होती.


वच्छीशी नजरानजर झाली आणि चंपाला अचानक बसलेल्या धक्क्याने गरगरल्यासारखे झाले. ती कोसळणार तोच प्रकाशने तिला अलगद सावरले.

“रत्नेऽऽ”

तिला तसे कोसळताना बघून वच्छी उभी राहिली.


“रत्नी.. माझी रत्नी.. “ कुणाचीही तमा न बाळगता वच्छीने तिच्याकडे धाव घेतली.


क्षणभर काय घडलंय हे कोणालाच कळले नाही. प्रकाशने तिला सावरले होते त्याबरोबर मनूदेखील तातडीने तिचा हात हातात घेऊन तब्येतीचा अंदाज घेत होती. स्टेजवर आलेल्या वच्छीला बघून काय समजायचे ते ती समजून गेली.


“ही लेक हाय माझी. रत्नी हाय ही.” वच्छी पोटतिडकीने बोलत होती.


“यह चंपा हैं; मेरी बच्ची।” तिच्या पुढ्यात उभी राहत शीलाआँटी म्हणाली.


मनुने सगळं नीट व्हावं म्हणून सर्वांना आमंत्रित केले होते. प्रत्यक्षात मात्र इथे सारं काही विस्कळीत झाल्यासारखे वाटत होते.


“मनू, चिल! काही होणार नाही. तू रिलॅक्स हो बघू.” आदी तिला सावरत म्हणाला.


“चंपा, तू ठीक हैं ना रे?” शीलाआंटीने प्रेमाने तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवला तसे तिने होकारार्थी मान हलवली.


“तू रत्नी आहेस ना?”


“नाही. मी चंपा आहे. या वस्तीतील एक कोठेवाली.. चुकलंच, सगळ्यात जास्त भाव असणारी कोठेवाली.”

वच्छीच्या नजरेत नजर मिळवत चंपा उत्तरली तोच तिच्यावर वच्छीने हात उगारला मात्र शीलाआंटीने तो वरच्यावर झेलला.

“ही हरकत पहिली आणि शेवटची. माझ्या चंपावर हात उगरण्याची गुस्ताखी पुन्हा करायची नाही.” वच्छीचा हात खाली झिडकारत शीलाआंटीने तिला तंबी दिली.


“आतड्याची ओढ आतड्यालाच ठाव असते. माझ्या लेकीसाठी इतकी वर्ष तिळतीळ तुटणारं आतडं आज कुठं शांत झाल्यासारखं वाटतंय. बाई, एकडाव तुम्ही तरी म्हणा की, की ही माझी लेक आहे.” शीलाआँटीपुढे हात जोडत वच्छी रडत होती मात्र काही उत्तर न देता ने तोंड फिरवून घेतले.


“अण्णासाहेब, पाटलीणबाई तुम्ही तरी सांगा, ही माझी पोर आहे नव्हं? गौरीताई, तुम्ही तर तिच्या मैत्रीण. तुम्ही तरी काही बोला.”

वच्छीच्या अशा आकांताने सगळ्यांच्या डोळ्यात पाणी होते. चंपा मात्र एका जागेवर निश्चल उभी होती. स्वतःला सावरण्यात यावेळीही ती यशस्वी झाली होती.


“रत्ना.. तू रत्नाच आहेस. पण तुझे हे रूप फार वेगळे आहे गं. कल्पनेच्या पलीकडले.” गौरी हिंमत करून तिच्याजवळ येत म्हणाली.


“कारण मी केवळ चंपा आहे आणि माझे हेच रूप भल्याभल्यांना आवडते. माझ्यातील रत्ना तर कधीची हरवून गेली आहे.” गौरीला बघून चंपाला अगदी भरून आले.


“रत्ना..” कुणाचीही तमा न बाळगता गौरीने तिला मिठी मारली आणि दोघींच्या डोळ्यात अश्रु तरळले.


“गौरी, भल्या घरच्या मुली अश्या वेश्येच्या गळाभेटी घेत नसतात. कुठून दुर्बद्धी सुचली आणि या कार्यक्रमाला आलोय असं झालंय. सर्वांनी आताच्याआता येथून बाहेर पडा.” अण्णासाहेब गरजले आणि ताडताड जायला निघाले. रत्ना कधी अशाप्रकारे समोर येईल हे त्यांनीही कधी कल्पलेले नव्हते.


“अण्णा, थांब की जरा. ती पोर खरंच रत्ना असेल तर ती इथे कशी हे तरी जाणून घेऊयात.” वत्सलाबाई त्यांना रोखत म्हणाल्या.


“त्याची काही गरज नाही. अख्ख्या गावाला ठाऊक आहे की मेडिकल राऊंडझाठी म्हणून गेलेली ही घाटातून तिच्या यारासह पळून गेली होती. मौजमजा मारल्यावर त्याने हिला सोडली असणार आणि ही इथे आली असणार.” ते तुच्छतेने म्हणाले.

“अण्णासाहेब, काय बोल्ताय? आमच्या लेकीच्या इज्जत्तीला अशी सर्वांसमोर नका हो खोटी ठरवू.” कधी नव्हे ते गोविंदाने आज तोंड उघडले.


“इज्जत? एका वेश्येला कुठली आलीय इज्जत?”


“अण्णाऽऽ” प्रकाशला हे बोलणे सहन झाले नाही.


“तुम बराबर बात कर रहे हो अण्णा। एका वेश्येला इज्जत असतेच कुठे? तुमच्यासारख्या श्रीमंतानीच तर ती लुटली असते.

“ए बाई..”


“शिलाबाई! शिलाबाई हूं मैं। अन हा सगळा इलाका माझा आहे. इथे दुसऱ्यांनी आवाज चढवून बोलायचं नसते.” तिने अण्णासाहेबांच्या डोळ्यात आरपार पाहिले आणि त्या करारी नजरेने त्यांना धडकीच भरली.
:
क्रमश:
©®Dr. Vrunda F.(वसुंधरा..)
*साहित्यचोरी गुन्हा आहे.*
*****

🎭 Series Post

View all