एक इजाजत. भाग-८४

वाचा एक अलवार फुलणारी प्रेमकथा!
एक इजाजत!
भाग -८४

“तुम बराबर बात कर रहे हो अण्णा। एका वेश्येला इज्जत असतेच कुठे? तुमच्यासारख्या श्रीमंतानीच तर ती लुटली असते.”


“ए बाई..”


“शिलाबाई! शिलाबाई हूं मैं। अन हा सगळा इलाका माझा आहे. इथे दुसऱ्यांनी आवाज चढवून बोललेलं मी खपवून घेत नसते.” तिने अण्णासाहेबांच्या डोळ्यात आरपार पाहिले आणि त्या करारी नजरेने त्यांना धडकीच भरली.


“रत्नी, आम्हा सगळ्यांना टाकून तू कुठं गेलती लेकरा? तो गजा अन् दिना बोलले होते की तू एका श्रीमंतासंग पळून गेलीस. आमालाबी ते मान्य करावं लागलं. मन म्हणत होतं की माझी रत्नी तशी नाहीय; पण डोळयापुढे जे घडत होतं, दिसत होतं त्यावर विश्वास ठेवावा लागला.


दोन वर्षांनी तू पैसे पाठवायला लागली. शऱ्याच्या तब्येतीसाठी तो पैसा आम्ही खर्च करत होतो. वाटलं पोरीला खरच कामधंदा मिळाला असेल, पण तू तर खरंच धंद्याला लागलीस की गं. बरं झालं, शऱ्या हे जग सोडून गेला. तुझ्या धंद्याच्या पैशाने तो बरा झाला असता तर मला हाय लागली असती.” वच्छीने हुंदका दिला.


“वाह! आतापर्यन्त लेकीसाठी जीव तुटत होता आणि आता ती धंदा करते हे कळल्याबरोबर तुमची माया आटली होय? अशी कशी गं तू आई?” शीलाआंटीने परखडपणे सवाल केला.


“एक आई आपली लेक धंद्याला लागलेली कशी सहन करणार?” वच्छीच्या डोळ्यात पाणी होते.


“त्या धंद्याचा पैसा तुम्हाला चालतोय की.” शीलाआँटी.


“मी थुकतेय त्या पैश्यांवर. जवळ काही नसतानाही आबासाहेब अन् अण्णासाहेबांच्या आधाराने आम्ही जगत होतोच की. पुढेही जगू.”ती त्वेषाने म्हणाली.


“डॉक्टरसाहेब मला माफ करा. माझ्यामुळे तुमच्या कार्यक्रमाचा पार विचका झालाय. मला इथून जाऊ द्या. आदी तू येतोस ना?”

इतका वेळ निश्चलपणे उभी असलेली चंपा वच्छीचे शब्द ऐकून तुटली होती. ज्या शरदला बरे करण्यासाठी ती पैसे पाठवत होती तो या जगात नाहीये ही कल्पना तिला करवत नव्हती.


“तू कुठेही जाणार नाहीयेस. जर संपूर्ण गावाने तुला बदनाम साबित केलं आहे तर तू या वस्तीत कशी दाखल झालीस हे तुला इतक्या लोकांसमोर सांगावेच लागेल. इतके दिवस या प्रश्नापासून तू दूर पळत आलीस, आता मात्र पळून चालणार नाही. जे सत्य आहे ते सगळ्यांना कळू दे.”

तिचा हात घट्ट पकडून थांबवत प्रकाश म्हणाला. त्याच्या डोळ्यात तिच्याविषयी तक्रार नव्हतीच; पण तिच्यावरचे आरोप मान्यही नव्हते. जे सत्य आहे ते त्याच्यासह साऱ्यांना कळावे एवढीच कळकळ होती.


“बाबा, या प्रश्नाचे उत्तर चंपाजींपेक्षा अण्णासाहेब चांगल्याप्रकारे देऊ शकतील असे मला वाटते. बरोबर ना अण्णासाहेब?” मनस्वी त्यांच्याकडे पाहत म्हणाली.


“काय बोलतेय ही पोरगी? यात माझा काय संबंध?”


“संबंध आहे की. कारण निरागस रत्नाला मुंबईला तुम्ही घेऊन होतात. मग तुम्ही पुढे न जाता रत्नाला गजा आणि दिनकरला का सोपवलीत?” मनुने सवाल केला.


“तुझं काय म्हणणं आहे? मी मुंबईला का गेलो नाही याचं कारण साऱ्यांनाच ठाऊक आहे. माझं मुंबईचं काम ऐनवेळी कॅन्सल झालं होतं. म्हणून मी गेलो नव्हतो.”


“म्हणून असं वेळेवर पूर्वकल्पना न देता दोन तरुण मुलांबरोबर तुम्ही तिला पाठवलीत? माफ करा; पण एक प्रश्न पडलाय, तुम्ही तुमच्या लाडक्या गौराईला असं कुणा परक्याबरोबर पाठवली असती?”


“ए पोरी, तोंड सांभाळून बोलायचं. आमची गौराई घरंदाज आहे. हिच्यासारखी नाही. आमच्याच तुकड्यावर जगणारी ही आमची सून होवू पाहत होती म्हणून मग हिचा काटा काढण्यासाठी गजाबरोबर धाडली होती. आम्हाला काय माहित की ही ब्याद पुन्हा गळ्यात येऊन अडकणार आहे ते?” तिच्या अंगावर धावून ते स्वतः कबुली देत म्हणाले.


त्यांच्या अशा अंगावर येण्याने मनू एक पाऊल मागे सरणार मात्र तेवढ्यात अण्णाच मागे खेचल्या गेले आणि पुढच्याच क्षणी त्यांच्या गालावर एक भारदस्त हाताची बोटे उमटली. एका हाताने त्यांची कॉलर घट्ट पकडून वत्सलाबाई उभ्या होत्या तर दुसऱ्या हाताची बोटे अजुनही अण्णासाहेबांच्या गालावर उमटत होती.


“अण्णा तू या पोरीला देशोधडीला लावलंस रे. तिच्याबद्दल तुझ्या मनात असा विचार आला त्याच क्षणी तू मला एक आई म्हणून चुकीचं ठरवलंस. आई म्हणून तर चुकले रे मी, एक स्त्री म्हणूनही चुकले. तुझ्यावर विश्वास ठेवून मी त्या पोरीला चुकीचे ठरवून बसले. ही थापड तुला नव्हे तर मला बसायला हवी.” त्यांना सोडून स्वतःच्या कानाखाली त्यांनी मारायला सुरुवात केली.


“आई, काय करताय?” इंदुताई त्यांना सावरत म्हणाल्या.


“इंदू, आई म्हणून मी चुकले गं. तू तुझ्या मुलाला जे संस्कार दिलेस ते मी माझ्या मुलाला नाही देऊ शकले. आता मेल्यावर आबासाहेबांना मी काय उत्तर देणार गं?”


“आई, माझी लेकरं तुमच्याच पदराखाली वाढलीत की. तुमचेच संस्कार घेऊन मोठी झालीत. तुम्ही स्वतःला दोष देणं बंद करा बघू.” स्वतःच धक्क्यात असलेल्या इंदुताई वत्सलाबाईंची समजूत घालत होत्या.


“अण्णा, माझं रत्नावर प्रेम आहे हे केवढ्या विश्वासाने मी तुम्हाला सांगितले होते हो आणि तुम्हीच माझ्या प्रेमात खलनायक झालात? डॉक्टर होऊन समाजाची सेवा करण्याची स्वप्नं पाहणारी ती निरागस रत्ना, तुम्ही तर तिला मारूनच टाकलीत हो. केवळ तुमच्यामुळे गेली पंचवीस वर्षे ती हे इथले आयुष्य जगते आहे.” प्रकाशच्या डोळ्यात अश्रू होते. अण्णासाहेब असे काही करू शकतात हे त्याच्या कल्पनेपलीकडे होते.


“मी तर गजा आणि दिनकरला हिला मारायचेच पैसे दिले होते, कारण ही मला डोळ्यासमोरही नको होती. काम झाल्यावर ती दुसऱ्या कोणाशी पळून गेल्याची बतावणी करायला सांगितले होते त्याप्रमाणे त्यांनी ते केले. मात्र ही कशी वाचली आणि या दलदलीत कशी अडकली ते मला ठाऊक नाही हो डॉक्टरसाहेब.” अण्णासाहेब हात जोडत म्हणाले.


“मग कोणाला ठाऊक आहे?” प्रकाशचा स्वर वज्राप्रमाणे कठोर झाला होता.


“मला ठाऊक आहे.”शांत असलेली मनस्वी पुढे येत म्हणाली.


“मनू?”


“हो बाबा, मला ठाऊक आहे हे. कित्येकदा वाटलं की तुम्हाला हे सांगावं पण माझी हिंमत झाली नाही. मग ठरवलं की जेव्हा अण्णासाहेब त्यांच्या कृष्णकृत्याची कबुली देतील तेव्हा हे तुम्हाला सांगावं, तेही सर्वांसमोर म्हणजे सर्वांना कळेल की चंपा म्हणून जगणारी ही रत्ना काय काय सोसून इथवर आली आहे.” ती शांतपणे म्हणाली.


“मनू माझा धीर सुटत चाललाय. प्लीज काय ते सांग ना.” प्रकाश अजीजीने म्हणाला.


“गजानन आणि दिनकर.. अण्णासाहेबांचे दोन प्यादे. अण्णासाहेबांनी त्यांना रत्नाला मारण्याची सुपारी दिली मात्र त्या रात्रौ दोघांनी तिला ठार न करता रात्रभर तिच्यावर बळजबरी करून घाटात ढकलून दिले.


त्यांना वाटलं की ती जीवानिशी गेली असेल आणि त्यामुळे अण्णांचे काम झाल्याच्या आनंदात दुसऱ्या दिवशी पहाटे हिवरेवाडीत ते परतले आणि प्लॅननुसार रत्ना पळून गेल्याची बतावणी केली. मात्र रत्नाच्या नशिबाने ती जिवंत राहिली आणि टिच्या दुर्दैवाला सुरुवात झाली..”


एक आवंढा गिळून मनस्वीने पुढे धनराज सेठचे रत्नाच्या आयुष्यात येणे, त्याचे तिला नाशिकला शिलाबाईकडे आणणे आणि रत्नाची चंपा होणे हा सारा प्रवास कथन केला.


“गजा आणि दिन्या असले पापकृत्य करणे शक्य नाही. त्यांनी असे काही केले असते तर तेव्हाच त्यांनी मला हे संगितले असते. रत्ना आमच्या आयुष्यातून निघून गेली त्यामुळे आम्ही निश्चिन्त होतो. तिचा विषय विस्मरणात जात असतानाच दोन वर्षांनी एक पत्र आलं. तिच्या अक्षरातलं. ती मजेत असल्याचं सांगणार आणि आमच्या पायाखालची जमीनच सरकली. आम्ही दिना आणि गजला बोलावून घेतले आणि याचा जाब विचारला..


“गजा, काय आहे हे? हे पत्र कसं आलं?” अण्णासाहेब भूतकाळातील आठवणीत गेले होते.

त्यांच्या आवाजातील जरबेने सेकंदभर गजा आणि दिनकर घाबरले.

“अण्णासाहेब, म्हणजे रत्ना जिवंत हे तर?”


“आम्ही तेच विचारतोय, ती जिवंत कशी? तुम्ही तिला खरंच मारली की मला नुसत्या थापा मारताय?”


“अण्णासाहेब, देवाच्याने सांगतोय आम्ही तिला खरंच मारले. आम्ही तुमचे मीठ खाल्ले आहे अण्णासाहेब, तुमच्याशी दगाफटका का करू?” दिनकर काही बोलायच्या आत गजाने बाजू सावरून घेतली.


“मग ही जित्ती कशी? आज पत्र आलं. उद्या आमच्या
समोर उभी राहिली तर आम्ही काय करायचं?


“ती मेली असं वाटलं होतं पण तिचे दैव बलवत्तर म्हणू. ती वाचली असावी. पण ती इथे नाही येणार. यायची असती तर तिने पत्र धाडलंच नसतं आणि येईल तरी गाठ आता आमच्याशी आहे, तेव्हा तुम्ही काळजी करू नका.

अण्णासाहेब तुम्ही आमच्यासाठी देवमाणूस आहात. तुमच्यासाठी आम्ही काहीही करू शकतो मग ही रत्नी काय चीज आहे? तेव्हा वाचली असेल; पण परत आली तर तिला सोडणार नाही.” गजा उत्तरला.


“..गजा माझा माणूस आहे. माझा उजवा हात. तो मला न सांगता असे काही करेल हे केवळ अशक्य आहे.” भूतकाळातील प्रसंग आठवून अण्णासाहेब गजा आणि दिनकरला पाठीशी घालत म्हणाले.

प्रकाश यावर विश्वास ठेवेल का? की त्याचा कल मनस्वीच्या बाजूने झुकेल? कळण्यासाठी स्टे ट्यून्ड!
:
क्रमश:
©®Dr. Vrunda F.(वसुंधरा..)
*साहित्यचोरी गुन्हा आहे.*
*****

🎭 Series Post

View all