एक इजाजत. भाग -८५(अंतिम भाग)

वाचा एक अलवार फुलणारी प्रेमकथा
एक इजाजत!
भाग -८५ (अंतिम भाग.)


“..गजा माझा माणूस आहे. माझा उजवा हात. तो मला न सांगता असे काही करेल हे केवळ अशक्य आहे.” भूतकाळातील प्रसंग आठवून अण्णासाहेब गजा आणि दिनकरला पाठीशी घालत म्हणाले.


“मला वाटलंच होतं की तुम्ही असेच काहीसे उत्तर देणार म्हणून तर त्या दोघांना आम्ही आधीच इथे घेऊन आलोय. आदी त्यांना घेऊन यायला सांगशील?”


मनुने इशारा करताच आदीने एक कॉल केला आणि पुढच्या दोन मिनिटात गजा आणि दिनकरची मनगुटी पकडून आदीची माणसं त्यांना घेऊन आली.


“मिस्टर गजानन, मिस्टर दिनकर तुम्ही यांना ओळखता?” मनुने प्रश्न करताच दोघांनी चंपाकडे पाहिले आणि त्यांची बोबडी वळली.


“ओळखत नसलात तरी काही हरकत नाही. मला सांगा, रत्ना नावाच्या एका निरागस मुलीला तुम्ही मुंबईला घेऊन जात असताना घाटामध्ये ती आपल्या प्रियकारासोबत पळून गेली हे खरं आहे का? की तुम्ही दोघांनी तिच्यावर अत्याचार करून तिला घाटात ढकलून दिले हे खरे आहे?” मनूचा डायरेक्ट हल्ला आणि कारमध्ये मार खाल्ल्यामुळे अर्धमेले झालेल्या दोघांनी खाली मान घातली.


“गजा हे खरं आहे?” अण्णासाहेबांचा अजूनही विश्वास बसत नव्हता.


“रत्ना, ती हीच दोघं होती ना ज्यांनी तुझ्यावर..” प्रकाशला पुढचे शब्द बोलवत नव्हते. तिचा हात पकडून तो तिला त्यांच्या अगदी समोर घेऊन आला.


चंपा.. गजा आणि दिनकरला असे समोर बघून तिच्या शरीराला कंप फुटला होता. आजवर कोठीवर वेश्या म्हणून जगलेली ती; मात्र या दोघांनी मिळून तिच्या देहाचे तोडलेले लचके आणि आणि केलेली क्रूर विटंबणा आठवून तिच्या डोळ्यात अंगार उभा राहिला. अचानक तिचा हात पूर्ण ताकदीनिशी उचलल्या गेला आणि पाळीपाळीने गजा आणि दिनकरच्या श्रीमुखावर जाऊन बसला. तिच्या डोळ्यातून अश्रुंनी गालावर ओघळायला सुरुवात केली.


“गजा तू..?” चंपाच्या कृतीने अण्णासाहेब चमकून म्हणाले.


“माफ करा अण्णासाहेब. माझं चुकलं. मी.. आम्ही असं वागायला नको होतं.” दिनकरसोबत मान खाली घातलेला गजा हात जोडून उभा होता.


“कसली माफी मागतोस गजा? तू आमचा विश्वासघात केला आहेस.”


“विश्वासघात तर तुम्हीही केलात अण्णा. माझ्या प्रेमाचा, माझ्या विश्वासाचा तुम्ही घात केला आहे. जसे तुम्ही, तसेच तुमचे हे नोकर. खाल्लेल्या मिठाला जागणारे.” त्यांच्याकडे तुच्छतेने पाहत प्रकाश म्हणाला.


“हो, चुकलंच आमचं. आम्हाला असं वागायला नको होतं. गरीब श्रीमंतीच्या दुनियेत प्रेमाला आम्ही पार शेवटावर नेवून ठेवलं. आपल्या घरण्याचं नाव, इज्जतीपेक्षा मला काहीच महत्त्वाचं वाटलं नाही म्हणून आम्ही तुमच्या प्रेमाचा विरोधक झालो. आम्हाला माफ करा प्रकाशराव. रत्ना, तूही जमल्यास माफ कर.” यावेळी त्यांच्या डोळ्यात खऱ्या पश्चातापाचे अश्रू होते.


“पोरी, तुझ्यावर अन्याय झाला हे खरं आहे. तुला या अण्णाला आणि त्याच्या साथीदाराला जी शिक्षा द्यायची ती दे. हवं तर पोलिसात दे. यावेळी मी तुझ्या पाठीशी आहे.” वत्सलाबाई जवळ येत म्हणाल्या.


“हो रत्ना, अण्णांचा चुकलंय गं. त्यांना सजा देण्याचा तुला पूर्ण अधिकार आहे.” गौरी तिचे हात हातात घेत म्हणाली.


“हो बाळा, लग्न करताना बायको म्हणून नवऱ्याची सोबत करण्याचे मी वचन दिले होते; पण एक स्त्री म्हणून या वेळी मी तुझ्यासोबत आहे.” डोळे पुसत इंदुताई म्हणाल्या.


“थोरल्या पाटलीणबाई, धाकल्या पाटलीणबाई, गौरी.. माझा कोणावरही राग नाहीये. कारण राग करायला, काही वाटून घ्यायला मी ती पूर्वीची रत्ना उरलीच नाहीये. मी आता केवळ शीलाआंटीच्या कोठीवरची चंपा म्हणून स्वतःला ओळखते आणि तीच ओळख पुरेशी आहे.


डॉक्टरमॅडम, मला वाटतं इथे आयोजित केलेल्या कार्यक्रमाची वेळ संपत आलीय. तेव्हा आता मला इथून निघायला हवे. शीलाआँटी, सख्यांनो चला गं.” शीलाआँटी आणि बाजूला बसलेल्या वस्तीतील स्त्रियांकडे पाहत चंपा जायला निघाली.


“चंपाजी, तुम्ही असे कसे जाऊ शकता?” मनस्वी तिच्या मागे येत म्हणाली.


“कसे म्हणजे? कार्यक्रमाला आले होते, आता जाते आहे.” हसण्याचा केविलवाणा प्रयत्न करत चंपा उत्तरली.


“तुम्ही खूप महान आहात हे मला माहिती आहे. तुमचा मला खूप आदर आहे. खूप खूप जास्त. कारण तुमच्यामुळे ही मनू इथे आहे. तुमच्यामुळे मला एवढं प्रेम करणारे बाबा मिळालेत. मला नाव मिळालं, शिक्षण मिळालं. एक समृद्ध आयुष्य मिळालं. या साऱ्यांसाठी तुमची मी खूप खूप ऋणी आहे.


पण मला एक सांगा, या सर्वात माझ्या बाबांचं काय चुकलं? तुमच्या परवडीबरोबर त्यांचीही परवड झालीच की. त्यांच्याही नशिबी त्यांच्या कुटुंबापासून दूर होणं आलं. त्यांच्या प्रेमाची वाट बघत प्रत्येक क्षणी तीळतीळ तुटणं आलं. काही गुन्हा नसताना त्यांना का ही सजा भोगावी लागतेय?” ती हळवी होत बोलत होती.


“हे बघा डॉक्टर मॅडम..”


“मनू..! मनू आहे मी तुमची. मी लहान असताना माझ्या जन्मदात्रीच्या हातून मला उचलून घेत तुम्हीच माझं नामकरण केलं होतं हे मला ठाऊक आहे आणि तुम्हीही ते विसरला नाहीत हेही माहिती आहे. ती तुमची मनू आज तुम्हाला विनंती करतेय की प्लीज माझ्या बाबांना असं एकटं सोडून जाऊ नका. त्यांना एकदा स्विकारून बघा. ते तुम्हाला कायम आनंदी ठेवतील ही मी माझ्या बाबांची तुम्हाला खात्री देते.”


“मनू, तुला माहिती आहे..”


“खरं काय ते आता साऱ्यांनाच ठाऊक झालंय आणखी काय हवं? बाबा, तुम्ही तरी काही बोला ना. मी एकटीनेच किती खिंड लढवू? एवढं बोलून, विचारून झालंय. आता तुमच्या वतीने प्रपोजदेखील मीच करायचं का?” तिने लटक्या रागाने प्रकाशकडे पाहिले तसा तो पुढे सरसावला.


“नाही रे मनुड्या, बाकी मलाच करावं लागेल. रत्ना.. माझं तुझ्यावर खूप प्रेम होतं. अगदी बालपणापासून. प्रेम काय असतं हे उमजण्या पूर्वीपासून. दिवासेंदिवस ते वाढतच गेलं. माझं अवघं आयुष्य तू व्यापून टाकलं होतंस. तू असताना आणि नसतानाही. तू नव्हतीस तरी प्रत्येक क्षणाला माझ्याजवळ होतीस. माझ्या आठवणीत, माझ्या साठवणीत!’


“बाबा, मुद्द्याचं बोला ना.” मनू मध्ये म्हणाली.


“हो की गं. बोलतोय आहे.” तो तिच्याकडे एक कटाक्ष टाकत म्हणाला.


“तर रत्ना, हे एवढं सारं पालूपद सांगायची गरज म्हणजे आजही माझं तुझ्यावर तितकंच प्रेम आहे. कदाचित पूर्वीपेक्षा कणभर जास्तच आहे. तू चंपा असू दे किंवा आणखी कोणीही.. माझ्यासाठी मात्र कायम माझी रत्ना आहेस. तेव्हा या सगळ्या मंडळीसमोर तुला विचारण्याचं मी धाडस करतोय की तू माझी होशील? माझी रत्ना म्हणून माझ्या आयुष्यात परत येशील? माझ्याशी लग्न करशील?”

गुडघ्यावर बसत फिल्मी स्टाईलने त्याने खिशातून अंगठी काढत त्याने ती तिच्यासमोर धरली.


“रत्ना, प्लीज हो म्हण.”

“तुम्ही दोघांनीही खूप सोसलेय. आता एक व्हायची वेळ आली आहे. ते नाकारू नकोस गं. दे त्याला होकार.”

“चंपाजी, प्लीज हो म्हणा, प्लीज, प्लीज, प्लीज.”

गौरी, वत्सलाबाई, इंदूताई, मनू साऱ्याजणी तिच्या उत्तरासाठी अधीर झाल्या होत्या.


“चंपाजी, द्या की होकार.” आदीने नजरेने खुणावले.


“प्रकाश, तुझं प्रेम मला कळतंय रे. पण मी ही अशी.. माझं मन मला परवानगी नाही रे देत. माझ्यातील चंपा मनात कुठेतरी दडलेल्या माझ्यातील रत्नावर कायम भारी पडते आणि मग तुझी होण्याची इजाजत ते द्यायला नाकारते रे. मला माफ कर.” त्याच्याकडे बघत तिने हात जोडले.


तिच्या उत्तराने खट्टू होत प्रकाश उभा झाला. कदाचित तिचे हेच उत्तर त्याला अपेक्षित असावे. त्याने खिन्नपणे मान हलवून मनूकडे पाहिले. तिचाही पूर्ण विरस झाला होता.


“अरे, कैसी माफी?” क्षणभर पसरलेली शांतता भंग करत शीलाआँटी पुढे आली.


“तुझे तुम्हारे इस चंपा होने से परेशानी हैं ना? तर आजपासून तू चंपा आहेस हे विसरून जा. शीलाआंटीने तुला आझाद केलंय असं समज.” चंपाचा चेहरा ओंजळीत पकडून ती म्हणाली.


“शीलाआँटी..”


“कुछ मत बोल पगली। अरे, इतना प्यार करनेवाला हर किसी को नहीं मिलता, उसे हां कह दे। चंपा तो तू कोठेपर आने के बाद बनी रे, पहले तो तू रत्ना थी; इस प्रकाश की रत्ना! उसकी होने के वास्ते यह शीलाआँटी तुझे पुरे दिल से इजाजत देती हैं।


जा रत्ना, उसके साथ जाकर अपनी जिंदगी खुशी खुशी जी ले।” डोळ्यात पाणी घेऊन शीलाआँटी म्हणाली तसे चंपा.. अहं, रत्नाने तिला गच्च मिठी मारली आणि हुंदके देत रडू लागली. शीलाआँटीलाही तिचे अश्रू सावरणे कठीण झाले होते.


“डॉक्टरसाहेब, ही शीलाआँटी पत्थर दिलाची आहे. किसी के सामने कभी रोती नहीं, पर आपके प्यार ने रुला दिया। अपनी रत्ना को ले जाओ और मेरी बच्ची का खयाल रखों।” डोळे पुसत तिने रत्नाला प्रकाशजवळ ढकलले.


“ओह, शीलाआँटी तू खूप ग्रेट आहेस!” मनुने एकदम तिची पापीच घेतली आणि ते बघून आदी हसू लागला.


रत्ना प्रकाशच्या जवळ होती. दोघांच्याही डोळ्यात पाणी होते. किती वर्षांनी दोघं एकमेकांना असे जवळून पाहत होते.


“रत्ना माझ्याशी लग्न करशील? त्याने पुन्हा एकदा अलवारपणे विचारले.


“हम्म..”

मान हलवून तिने होकार दिला आणि कुणाचीही तमा न बाळगता ती तशीच त्याच्या मिठीत शिरली. त्यानेही तिच्या कपाळाव ओठ टेकवत मिठी घट्ट केली. कितीतरी वेळ दोघेही मिठीत तसेच होते अन् अचानक आकाशातील मेघांनी बरसायला सुरुवात केली. त्यांच्या प्रेमाची कहाणी पावसाविना कुठे शक्य होती?


पावसापासून वाचायला म्हणून सर्व आत आले. मात्र हे जगाचा विसर पडलेले हे दोघे तसेच चिंब भिजत होते. एकाचवेळी आकाशातील आणि डोळ्यातील बरसात सुरु होती. इतक्या वर्षांचा दुरावा इतक्या सहजी मिटणारा नव्हताच; मात्र मनुने धावत येऊन त्यांच्यात खोडा घातला.


“बाबाऽऽ तुम्हाला पाऊस बाधतो हे ठाऊक आहे ना? चला दोघेही आत या बघू.” तिने अक्षरशा: दोघांना ओढत स्टेजवर आणले.


“तसाही मघाचा हा पडदा दूर होण्याचा कार्यक्रम बाकी उरला होता तो पुरा करूया.”

“काय आहे हे?”


“बघा तरी.. ती गालात हसली.

दोघांनी मिळून पडदा बाजूला सारला.

‘रत्नप्रकाश नर्सिंग होम!’

दोघांचे नाव मिळून तयार केलेले ते हॉस्पिटलच्या नावाचे मोठे होर्डिंग होते.


“माझ्या आयुष्यातील रत्न आणि तुम्ही त्याचा प्रकाश! म्हणजे रत्नप्रकाश. आवडलं ना?”


“मनुड्या, किती काय काय केलंस गं तू? खूप मोठी झालीस रे तू.” त्याने तिला कवेत घेत म्हटले.


“अहं! मोठी कुठे? मी तर लहानच आहे.” ती म्हणाली तसे सर्व हसले.


“लहान असलीस तरी मोठीच आहेस. तुझ्यामुळे आपल्या आयुष्याचा त्रिकोण पुरा होतोय.”


“त्रिकोण नाही बाबा, चौकोन. हा आदी माझ्यासोबत होता म्हणून तर ही फ्रेम पूर्ण होवू शकली. आदी, इकडे ये ना.”


“मघापासून बघतोय पण मी ओळखले नाही. हा कोण?” प्रकाशने डोक्यावर ताण देत विचारले.

“तुमची झेरॉक्स कॉपी!” तिचे उत्तर आणि रत्ना अन् आदीचे हसू.


“म्हणजे?”


“म्हणजे हा आदी, आदित्य. तुम्हाला सांगितलेला आपला मोठा देणगीदार. रत्नाआईंचा मानसपुत्र आणि माझा लाडका भाऊ.” त्याला मिठी मारत ती म्हणाली.


“भाऊ? हे तुला kswकळले?” रत्नाने आश्चर्याने विचारले.


“तुमच्या दोन करोडच्या चेकचा कमाल.” ती मंद हसली.


“दोन करोड?” प्रकाशला हा मोठा धक्का होता.


“बाबा, ती खूप मोठी गोष्ट आहे. तुम्हाला नाही कळायची. नंतर निवांत सांगेन हं. आधी आपला एक फॅमिली पीक तर होऊन जाऊ द्या.” तिने मोबाईल मध्ये सेल्फी आणि मग फोटोग्राफरकडून फोटो काढून घेतले.


“रत्ने, तू मला माफ नाही केलेस होय?” वच्छी तिच्याजवळ येत म्हणाली.


“आई-बाबा, तुमच्या प्रेमासाठी मी खूप आसूसले होते हो. ”तिने दोघांनाही आलिंगण दिले.

गौरीची गळाभेट घेतली, इंदूताई आणि वत्सलाबाईंना दोघांनी मिळून नमस्कार केला आणि शेवटी मनूच्या गालावर दोघांनीही ओठ टेकवले. त्यांचा हा क्षण आदीने कॅमेऱ्यात अलगद टिपला आणि इतक्या वर्षांच्या दुःखाची सांगता झाली.

***समाप्त***
©®Dr. Vrunda F. (वसुंधरा..)

सदर कथेचा कॉपीराईट लेखिकेकडे असून youtube चॅनेल अथवा इतर कुठेही याचा वापर केला गेल्यास ईरा कडून कडक कायदेशीर कारवाई केली जाईल याची नोंद घ्यावी.


आता मला द्या इजाजत!

नव्या कथेसह पुन्हा भेटू लवकरच. मात्र इतक्यात नाही. कारण सध्या जुनी कथा पूर्ण करायची आहे. तेव्हा वाचत रहा आणि कमेंट्स करत रहा. आजवरच्या भागाला तुम्ही इतक्या कमेंट्स केल्यात, मात्र दरवेळी रिप्लाय द्यायला मला जमले नाही. त्याबद्दल क्षमस्व! आणि सर्व वाचकांचे खूप खूप आभार!
धन्यवाद!
__________


🎭 Series Post

View all