एक जाणीव पुरेशी भाग २

भविष्याचा वेध घेण्या एक जाणीव पुरेशी असते फक्त
भाग २
नव्या नवलाईचे ते दिवस, मोरपंखी. आठवणींचा प्राजक्त होऊन आयुष्यभर सोबत राहावे असे. सुमेधा पण लाघवी होती लवकरच तिने सर्वांना आपलंसं केलं. सुधाताई तर समिधाला खूप जपत. 


प्रतिभा आणि अजय दोघांचं लव्ह मॅसेज. अजयने आपल्या पसंतीने लग्न करून प्रतिभासोबत लग्न केलं हे सुधाताईंना  आवडलं नव्हतं. त्यामुळे सून म्हणून त्यांनी प्रतिभाला कधी आपलंसं केलच नाही. अजय आणि प्रतिभाने राजा राणीचा संसार एकाच शहरात पण दुसऱ्या जागी आनंदाने सुरू केला होता. लग्नासाठी बऱ्यापैकी लांबच्या सुट्ट्या काढून आलेले अजय आणि प्रतिभा त्यांच्या घरी निघून गेले होते. आशयच हि ऑफिस पूर्ववत सुरू झालं. सासूबाई शाळेत शिक्षिका त्यांची ही शाळा सुरू झाली होती. सेवानिवृत्त असलेले सासरे तेवढे त्यांच रिटायर्ड दैनंदिन रूटीन अगदी व्यवस्थित सुरू होतं.


कोविडच्या सुट्ट्यांमध्ये आशयची बहिण आरती, तिच्या मुलाला पियूषला मोबाईलच भारी वेड लागलं. अभ्यासाकडे दुर्लक्ष व्हायला लागलं परिणामी तो अभ्यासात मागे पडत चालला होता. आरतीने तर त्याच्यापुढे हातच टेकले होते. स्पर्धेचे युग त्यात पियूषची अभ्यासाच्या बाबतीत हलगर्जीपणा त्यामुळे सर्वांनाच आता पियूषची काळजी सतवायला लागली होती. 


"आई, तूझ्या शाळेत ऍडमिशन करून, पियूषला तुझ्याजवळच ठेव. तूझ्या नजरेत राहील, तुझा नातू म्हणून बाकी शिक्षकांचं हि व्यवस्थित लक्ष राहील. झाला तर मार्गदर्शनाचा फायदाच होईल." आरतीने आईला पटवून दिलं. 


पियूषची ऍडमिशन, सुधाताईंच्या शाळेत झाली होती आणि आता तो नेहमीसाठी आजोळी राहायला आला होता. 


"तू घरीच असतेस, तू पियूषच्या अभ्यासाकडे लक्ष देत जा." सुधाताईंनी फर्मान सोडलं. समिधाने होकारार्थी  मान हलवली. 


"पण हा ऐकेल का? वेळप्रसंगी शिकवताना रागवावं लागलं तर..." अनेक प्रश्न समिधाच्या चेहऱ्यावर उमटले.


"मामीच ऐकायचं रे पियूष, नाहीतर मामी रागवेल तुला." सुधा ताई दम देत बोलल्या. 


नवीन मामीवर थोड इम्प्रेशन मारण्याच्या हेतूने त्याने मानेनेच होकार दिला. 


सकाळी सातच्या ठोक्याला, पियूषच्या शाळेची बसं दारासमोर येत होती. समिधाला भल्या सकाळी लवकर उठून पियूषचा टिफीन बनवावा लागत होता. त्याची वेळेत तयारी, हवं नको त्याकडे ही लक्ष द्यावं लागतं होतं. 


पियूष शाळेत निघून गेला की सुधाताई सकाळचा फेरफटका मारायला जातं. त्या फिरून आल्या की, सासू ससऱ्यांचा चहा त्यांचा नाष्टा, नंतर आशिषचा चहा, नाष्टा,  त्याच्या ऑफिसची धावपळ, त्याला हवं नको ते बघण्यात, कधीकधी तर घोटभर चहा प्यायला ही सुमेधाला वेळ मिळत नव्हता.


समिधा घरात आली होती, सगळं छान सांभाळत होती, आता त्या ही थोड्या निवांत झाल्या होत्या. थोड्या थोडक्या कामात वरवर त्या थोडी मदत करायच्या आणि आपलं आवरून शाळेत निघून जायच्या. 


सेवानिवृत्त झालेले आनंदराव, आजवर न करता आलेल्या सामाजिक कार्यात त्यांनी स्वतःला गुंतवून घेतलं होतं त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्यांची सततच वर्दळ असायची. आलेल्या गेलेल्यांसाठी चहा कर, नाश्ता आण.. चुटूकबूटूक काम दिवसभर पुरायची.  


रात्रभर नवऱ्याच्या हातांच्या उशीत, शांतपणे नीजलेल्या समिधाला असं अलारामच्या ठोक्याला उठायचा खूप कंटाळा यायचं पण पर्याय नव्ह्ता. नवीन सुनेच्या जबाबदाऱ्यांची जाणीव तिला होती. 


सकाळी सकाळी उठल्या उठल्या घाईत, स्वयंपाक घरात शिरून काम उरकायची समिधाला जीवावर येतं होतं पण पर्याय नव्ह्ता. मग एकामागे एक तयार असलेली काम... दुपारी पियूष शाळेतून आला की त्याला जेवण दे, त्याला हवं नको ते बघ, त्याचा होमवर्क, त्याचा अभ्यास पाठांतर, त्याच्या परीक्षा यासगळ्याकडे ही तिला जातीने लक्ष द्यावं लागतं होतं. त्याचा अभ्यास करायचा मूड नसायचा तेव्हा अशावेळी समिधा द्विधा मनस्थितीत अडकून जायची. अनेकदा तिला वेगळाच मनस्ताप सोसावा लागत होता.


सून म्हणून, कर्तव्य निभवण तर भाग होतं.


पियूषला भेटायचं म्हणून पराग आणि पल्लवी अनेकदा शनिवार रविवारच्या सुट्ट्यामध्ये राहायला येत आरतीच ही माहेरी वारंवार येणं व्हायचं. आल्या गेलेल्यांचा आदर सत्कार,  साग्रसंगीत पाहुणचार घरातली सून म्हणून समिधाला तिच्या जबाबदारीची जाणिव सुधाताई निग्रहाने करुन देत. 


"वहिनी असावी तर अशी." आरती पण सुमेधा वर खूप खूश होती. पियूष ही आता मन लावून अभ्यास करत होता त्यामुळे आता पियूषची ही चिंता नव्हती. सुमेधा सारखी सून, वहिनी प्रत्येकाला मिळावी... सुमेधाच कौतुक ऐकून आशय ही सुमेधा च्या दररोज नव्याने प्रेमात पडत होता.


घरातल्या सुनेच्या जबाबदाऱ्या, त्यांची कर्तव्य याचा पाढा वाचताना प्रतिभाने कसं या सगळ्यातून अंग काढून घेतलं. अंगावरच्या जबाबदाऱ्या कशा झटकल्या, आरती आणि सुधाताई.. एकच एक पाढा वाचून, प्रतिभावर दूषण लावीत. 


"आपल्या जातीत असं नाही तसं... पर जातीतल्या मुलींना कशाला असणार या सगळ्याच गांभीर्य?" प्रतिभाच्या संस्कारावर नेहमीच बोट ठेवलं जातं होतं.


प्रतिभा कशी चूक? आणि आपण कशा बरोबर आहोत हे अनेकदा पटवून देण्याच्या प्रयत्नात सुधाताई आणि आरती ही काहीबाही सांगून समिधाचे कान भरत. समिधा फक्त मुकाट्याने त्यांचं बोलणं ऐकून घेत होती. 

-©®शुभांगी मस्के...



🎭 Series Post

View all