भाग ३....
"आज जन्माष्टमी ती येणार आहे." सासूबाई नाक मुरडत, तोंड वाकडं करत बोलल्या.
"ती म्हणजे प्रतिभा ग!" पटकन त्यांनी उत्तर दिलं.
"हे बघ, ती येईल, तिच्यापासून जरा सांभाळून. कामाशी काम फक्त. उगाच आपल्या घरातलं काही सांगत बसू नको. तिला जरा दुरचं ठेवते आपल्या घरातल्या गोष्टींपासून."
"ती येऊन चार वर्ष झाली, म्हटल तर ती या घरातली मोठी सून पण तिला तो अधिकार देण्यासाठी कधी मन वळलचं नाही."
"तू वयाने, मानाने लहान, पण तूच या घरातली आदर्श सून वाटते. हवंच काय असतं ग, सांगितलेलं ऐकावं, मान द्यावा एवढच ना..."
"आपलं ते आपलं. शेवटी ती परकीच. पर जातीची. पण आपललंचं नाण खोटं म्हटल्यावर दोष तरी कुणाला द्या. करंजा भरताना, प्रतिभासोबत कसं वागायचं वगैर बाबतीत सल्ले देत होत्या.
समिधा मात्र सगळं शांतपणे ऐकत होती.
प्रतिभाताई आणि अजय भाऊजी, सणासुदीच्या निमित्ताने येतात... पूजापाठ आटोपली की जेवणं करतात आणि निघून जातात. ताई दादाचं लव्ह मॅरेज असल्याने आई बाबांनी मात्र, प्रतिभाताईंना मनापासून आपलसं केलं नाही.
'प्रतिभाताई, आई आणि आरतीताई विषयी किंवा त्यांच्या विरोधात कधीच काहीच बोलत नाही. पण प्रतिभाताई येणार असल्या की आई मात्र त्यांच्या विषयी काही ना काही सांगून मला विचार करायला भाग पाडतात?'
'गोड नारळाचं सारण भरलेली करंजी असो की समोसा. आतल्या सारणावर सारा भार. सारण गोड की तिखट चव घेतल्याशिवाय कसं कळणार. रवा मैद्याच्या पारीवर एव्हढा भार तरी कशाला द्या' गॅसवर एका बाजुला करंजा आणि एका बाजूला समोसे तळत असलेल्या समिधाच्या मनात येऊन गेलं.
"मला काय करायचंय! कोणी कसं का असेना माझ्याशी चांगलं वागतायत ते महत्वाचं'
जन्माष्टमीच्या निमित्ताने प्रतिभा आणि अजय रात्रभर इकडेच राहणार होते. कृष्णजन्माची सगळी तयारी, सजावट सुधाताई आणि समिधाने करून ठेवली होती.
"हॅलो.... कशी आहेस?" प्रतिभाने आल्या आल्या विचारलं.
"मी मस्त..." समिधाने हसून उत्तर दिलं.
"छान काढलीस हा रांगोळी... तू काढलीस?" प्रतिभाने कौतुकाच्या सुरात विचारलं.
"हो".... समिधाने हलकेच मान डोलावली.
"हो तिनेच काढली रांगोळी आणि सजावट ही." समिधाने काढलेल्या रांगोळी आणि सजावटीचं सुधाताई भरभरून कौतुक करत बोलत होत्या.
"जी आपली आहे, तिच्यावर हक्क. ऐकते तिलाच सांगावं. शेवटी काय? आपली ती आपली आणि परक्याला आपलं मानलं म्हणून आपलं होतं नसतं?"
आशयसाठी सर्वांनी पसंत करून आणलेली समिधा कशी घराण्याला साजेशी आणि सर्वगुणसंपन्न आहे हे पटवून देण्याचा सुधाताई एक ही चान्स सोडत नव्हत्या.
कौतुकाने समिधाला भारावून जाण्यापेक्षा तिला ओशाळल्यासारखं जास्ती वाटत होतं.
अजयला आईचा स्वभाव माहिती होता. त्याला या सगळ्या वागण्याची सवय असली तरी प्रतिभाने किती दुर्लक्ष करण्याचा विचार केला तरी त्रास होत होता. सासूबाईंचा स्वभाव तिलाही माहिती असल्याने आता ती ही सगळं हसण्यावारी नेत होती.
"निर्लज्जपणाची हद्दच झाली. बघितलं कशी बाहेर माणसांमध्ये जावून बसलीय?" सुधाताईंची समिधाच्या कानाशी कुजबुज सुरु केली.
"काही काम आहे का? मदत करू का काही?" प्रतिभाताईंनी आल्याआल्या विचारलं होतं. समिधा सांगणार तोच सुधाताई तिच्या बोलण्याला मोड देत बोलल्या. "मीच म्हटल तिला, झालंय सगळं म्हणून. कशाला हवीय तिची मदत? मागून यायचं आणि पुढे पुढे करायचं, स्वभावच तिचा." सुधाताई बडबडत होत्या. समिधा शांतपणे ऐकत होती.
रात्री बाराच्या ठोक्याला, कृष्णजन्म साजरा झाला. पाळणा हलवायला सुधाताईंनी समिधाला आवाज दिला.
बाळकृष्णाच्या पाळण्याला, समिधा हलके हलके झोके देत होती. "गोपाळकृष्णा.... आता या गोकुळात, लवकरच पाळणा हलू दे... कृष्ण रुपात घराण्याला वारस मिळू दे, वंश वाढू दे" समिधाच्या डोक्यावरून आशीर्वादाचा हात फिरवत सुधाताई हळुच पुटपुटल्या.
"नवीन सूनबाई, समिधा... चार महिने झाले लग्नाला." सुधाताईंनी समिधाची ओळख करून दिली.
एक एक करून सगळे पाळण्यातल्या गोपाळ कृष्णाला झोका द्यायला पुढे आले. प्रतिभा स्वतः उठून गोपाळ कृष्णाला झोका द्यायला समोर आली.
"ही तुमची मोठी सून" भजन मंडळींपैकी कोणीतरी मध्येचं बोललं.
"हो" म्हणत सुधाताईंनी हलकेच मान डोलावली...
"पहिले नंबर इकडे. आता पाळणा इकडे हलायला हवा पहिले." गर्दीतलं कुणीतरी कुजबुजलं, प्रतिभाने फक्त हसून प्रतिसाद दिला.
"आपली मर्जी चालतेय होय. जो ऐकतो त्याला सांगावं. उगाच कशाला न ऐकणाऱ्यापुढे, तोंडाची वाफ दवडायची." सुधाताई तिरकस सुरात पटकन बोलल्या.
"हाती घोडा पालखी जय कन्हैया लाल की"
"गोपाळ कृष्ण महाराज जी जय...." म्हणत टाळ मृदुंगाच्या सुरात भजनाला सुरुवात झाली. वातावरण प्रसन्न झालं होतं.
"काय मग, नव्या नवलाईचे दिवस सरले की नाही की अजूनही!" प्रतिभाने डोळे मिचकवत विचारलं...
"काय ताई तुम्ही पण, मस्करी करता होय माझी," समिधा गालातल्या गालात फक्तच हसली.
"दिवसभर काय करतेस? नोकरी करण्याचा विचार केलास की नाही." प्रतिभाने नोकरीची तार छेडली.
"करायची आहे, म्हणजे शोधायची आहे. पण... आशय म्हणतात, आताच लग्न झालंय. थोड घरात लक्ष दे. घरात व्यवस्थित रमली की मग नोकरी. आणि खरं सांगू का ताई, दिवसभर घरात काही ना काही करण्यात माझा वेळ कसा निघून जातो कळत सुद्धा नाही.आवडतं मला घर सांभाळायला. हवंच काय असतं आपल्याला आपल्या माणसांची खुशी फक्त." समिधा बोलत होती.
"हो ... पण या सगळ्यात, स्वतःसाठी आणि आशय भाऊंजींसाठी वेळ मिळतो की नाही." प्रतिभा पटकन बोलली.
"हे बघ समिधा... घर, घरकाम होतच राहिलं. ही काम एकवेळ आताची थोड्या वेळाने केलीत तरी चालतील, पण लग्नानंतरचे हे मोरपंखी दिवस खूप खास असतात. हे दिवस आपले दोघांचे, त्या क्षणावर आपल्या जोडीदाराचा हक्क. ते क्षण हातातून निसटत नाही ना! त्याकडे बघ. प्रतिभा समजावण्याच्या सुरात बोलत होती.
दोघी मिळून गोपाळ काल्याच्या तयारीत व्यस्त होत्या. लाह्या, मुरमुरे, पोहे त्यांनी एकत्र मिसळले. त्यात तिखट, मीठ, दही, शेंगदाणे, खोबरं, लोणचं, साखर, सफरचंद, काकडी चे तुकडे, डाळिंबाचे दाने एक एक करून सगळं जिन्नस गोपाळकाल्याचा आत्मा होऊन मिसळत होता. समिधाने गोपाळकाल्यात वरून साखर भूरभुरली आणि गोपाळकाला तयार झाला..
"घरातली माणसं सुद्धा या गोपाळकाल्याच्या एकेका पदार्थासारखीच. प्रत्येकाचा स्वभाव वेगळा, वागण्या बोलण्याची पद्धत वेगळी. एकत्र राहून एकमेकांना जपण्यातला आनंद म्हणजे कुटुंब. प्रत्येकाचा स्वभाव पटेलच अस नाही. एकमेकांची मन जपता यायला हवी. साखर, मिठासारखं एकरूप होता यायला हवं पण डाळिंबाचा दाणा होऊन आपलं अस्तित्व हि जपता यायला हवं बरं का?" टपोऱ्या लाल चुटूक्क दाण्याकडे बघत, गोपाळकाला एकत्र मिसळत प्रतिभा बोलत होती. समिधा शांतपणे सगळं ऐकत होती.
"बघ सुमेधा, लग्न आशिष भाऊजींच हि झालंय. त्यांचं आयुष्य पूर्ववत् झालं. ऑफिस सुरू झालं. घर, संसार आहेच ग पण या सगळ्या गोतावळ्यात तू तूझ्या करियरची वाट लावू नकोस. घर, संसार, सासरच्या लोकांच्या अपेक्षा सांभाळण्यात मुलींची करियर नष्ट झालेली बघितलीत मी त्यामुळे सांगतेय" प्रतिभाने समिधाचा हात हातात घेतला. प्रतिभा पोटतिडकीने बोलत होती.
'आई म्हणतात ते बरोबर आहे. प्रतिभाताई परखड आणि स्पष्टवक्त्या आहेतच , पण म्हणून त्या चुकीच्या आहेत असं नाही ही nahi'... सुमेधा च्या मनात विचार शिवून गेला