एक जाणीव पुरेशी भाग ४

भविष्याचा वेध घेण्या एक जाणीव पुरेशी असते
भाग ४

"आई अगं, पियूषला तू इकडे ठेऊन घेतलंस? दुसऱ्याच्या पोराची जबाबदारी, सोप्प वाटतं का तुला. मी तर म्हणतो ज्याने त्याने त्याच्या मुलांची जबाबदारी स्वीकारावी. उद्या काही कमी जास्ती झालं. मिळालेच कमी मार्क्स तर जबाबदार कोण? अजय स्पष्टच बोलला. 


"खरयं दादा, आम्ही हनिमूनला गेलेलो आणि यांच यांच काय ते ठरलं. आम्ही आलो तेव्हा पियूषची ऍडमिशन झाली होती." त्यामूळे मी काही बोललो नाही. पण बघतो आहेस ना कसा मोबाईल हातात घेऊन गेम खेळत राहतो. पलंगावर उताणा होऊन गेम खेळण्यात दंग पियूषकडे बघत आशय जरा चिडून च बोलला. आई वडिलांनी घेतलेल्या निर्णयाच्या विरुद्ध जाण्याची हिंमत आशयमध्ये नव्हती त्यामुळे तो फार काही बोलत नव्हता.


"तू तर गप्पच बस अजू. तसाही तू स्वार्थी आहेस माहिती आहे आम्हाला. तुझ्या स्वार्थापुढे ना तुला आई वडील, ना बहिण भाऊ ना भाचे दिसत. तू तर बोलूच नको यावर काही." 


"आणि हो, उगाच काही बाही बोलून आशूचे कान भरू नकोस? जेवण कर आणि जा आपल्या घरी निघून. आम्ही आमचं आमचं बघून घेऊ. सुधाताई अजयशी चिडून बोलल्या. 


"आई अगं, त्याची शाळा, शाळेचा अभ्यास, त्याचे खेळ, त्याच्यावर होणारे संस्कार या सगळ्याची जबाबदारी कोणाची?"


"तू तर घरी नसतेसच पुर्ण वेळ. तुझी शाळा असते दुपारची.  स्पष्टच विचारतो, ती बिचारी नवीन आलेली पोर, तिच्यावर सगळा भार टाकलाय का तुम्ही.  अजय आईच्या डोळ्यात डोळे घालून स्पष्टच बोलला.


"तुझ्या बहिणीचा लेक आहे तो, तुझा भाचा. परका आहे का कोणी? तो तिकडे अभ्यास करत नव्हता. नुसता मोबाईल बघायचा. मार्क्स घसरत होते त्याचे. म्हणून मग आम्ही ठरवलं, त्याला इकडेच ठेवायचं. तुझे बाबा ही रिटायर्ड झाले, त्यांचं ही लक्ष राहील."


"सध्या समिधा घरीच असते ती घेते त्याचा अभ्यास, ती चांगली उच्चशिक्षित आहे. स्वतःच म्हणणं बरोबर आहे  अजयकडे एकटक रागात सुधाताई आपलं म्हणणं पटवून देत बोलल्या. 


"तुम्ही ठरवलंय म्हटल्यावर मग योग्यच असावं. मी गप्पच बसलेलं बर, तिकडे मधुरेत कृष्णाचा कंस मामा तसा पियूषच्या वायटावर हा अजू मामा म्हणून.. दोष द्यायला तुम्ही मागेपुढे बघणार नाही. माझंच चुकलं, म्हणत खाली मान घालून त्याने मुकाट्याने जेवण आटोपलं. 


'प्रतिभाताई बोलतात ते काही सगळचं चुकीचं नाही, माझा सकाळ पासून सुरू झालेला दिवस, घरकाम, येणारे जाणारे त्यांचं बघण्यात सरतो आणि वाट्याला आलेल्या जबाबदारीच ओझ.'


'ओझ .... हो ओझच ते '


'खरच हेच हवंय का मला आयुष्यात. खरच खूश आहे का मी? सुमेधाला प्रश्न पडला. 


पण उत्तर सापडत नव्हतं.. सासरच्या जबाबदाऱ्या, सुनेची कर्तव्य यांच्यासमोर तिची सारी स्वप्नं तिला फिकी पडत  असल्याचं जाणवलं.


"पण काय करावं?"  या सगळ्याला कसं सामोरे जावं तिला कळत नव्हतं.


"अहो मी नोकरी करू का?"  तिने मनातली इच्छा आशय समोर बोलून दाखवली. 


"एवढी घाई काय आहे नोकरी करण्याची. नंतर आयुष्यभर करायचीच आहे की नोकरी." तो अजूनही त्याच्या म्हणण्यावर ठाम होता. 


पहिल्या दिवाळसणाला ती माहेरी आली होती. थोडा निवांत वेळ होता तिच्याजवळ. सहज म्हणून तिने, नोकरीसाठी दोन चार कंपन्यांमध्ये बायो डाटा सेंड केले. कंपन्यांमध्ये ती इंटरव्ह्यू देवून आली पण कुठूनच तिला नोकरीची ऑफर आला नाही. एका ठिकाणाहूनही आपल्याला जॉब ऑफर येऊ नये तिला वाईट वाटलं. 


'घर संसार या सगळ्यात अनेक मुलींची करियर नष्ट झालेली बघीतली मी,' प्रतिभाच वाक्य तिच्या मनावर घाव करत होतं. 


'हातातून असे एक एक करत वर्ष निसटून गेल्यानंतर कोण मला नोकरी देणार? आताच ही परिस्थीती.. नोकरीसाठी नकार आल्याने ती खिन्न झाली असच प्रयत्नांना अपयश येत राहिलं तर विचारानेच ती खूप दुखावली. 


"प्रयत्न करून ही नोकरी मिळत नाही.  घरकाम करून घर कोंबडी झालीय मी. तिला रडू अवरेनास झालं.


"समू बाळा अशी रडू नको. आज ना उद्या लागेलच तुला नोकरी, तुला माहिती आहे ना हे स्पर्धेच युग आहे मग, शांत हो.... शांत हो.. आणि घाई काय आहे एवढी?" आई समिधाची पाठ थोपटून समजावत होती. 


'इथे मला, स्वतःच्या भविष्याची चिंता सतवायला लागलीय आणि तिकडे आशय आणि इकडे तू म्हणतेस घाई काय आहे? म्हणून" समिधा आईवर जोरात चिडली.


"बाळा समू, घरात कमी काय आहे तूझ्या. सासू-सासरे नोकरी करणारे, पैसा पाणी भरमसाठ, शिवाय जावई सुद्धा बऱ्यापैकी कमावतात.  मग एवढी नोकरीसाठी वणवण कशासाठी? त्यांना ही वाटतं असावं. घरच्या लक्ष्मीने काही दिवस घरी राहावं ,घर सांभाळावं."


'चार-पाच ठिकाणाहून नोकरीसाठी नकार आले, नोकरी  लागत नाही आता या विषयावर सासरी बोलायचं तरी कसं? आणि नोकरी केल्याशिवाय, नोकरीचा अनुभव तरी कसा मिळणार? आणि एकदा गॅप झाली की मग मला कोण नोकरी देईल. आता पुढे काय?' समिधा गोंधळून गेली होती.


🎭 Series Post

View all