#शब्दस्पर्श_ब्लॉग्स
#इक मोड पे
“तुला कधीच माझा मोह झाला नाही.”
तो काहीशा नाराजीच्या सुरात म्हणाला.
“म्हणजे?”
“म्हणजे तू नेहमी मर्यादेतच प्रेम केलंस.. बेभान होऊन कधीच प्रेम केलं नाहीस आणि आता तर त्याला प्रेम म्हणावं का प्रश्न पडलाय मला.”
तो हताशपणे सुस्कारा टाकत म्हणाला. तिच्या डोळ्यात पाणी साठू लागलं.
“तुला माझ्या प्रेमावर शंका येतेय?”
आता मात्र तिचा आवाज कापरा झाला. तिचं मुसमुसणं त्याला ऐकू येऊ लागलं. त्याला शांत बसलेलं पाहून तिच्या जीवाची घालमेल झाली. गळ्यात उमाळे दाटून येऊ लागले.
“इतकी वर्षे मनापासून प्रेम करून, त्याच्याशी प्रामाणिक राहून आज तो म्हणतोय, मला त्याचा मोह झाला नाही? माझ्या प्रेमाला प्रेम म्हणावं का असा प्रश्न त्याला पडतोय? खरंच?”
तिलाही प्रश्न पडला. जुन्या आठवणींनी चारी बाजूंनी घेराव घातला. मैत्रीपासून सुरू झालेला हा प्रवास प्रेमाच्या वळणावर येऊन कधी थांबला हे तिचं तिलाच कळलं नाही.
“किती हरवत गेले तुझ्यात! की, माझीच मी मला नव्याने गवसत गेले माहित नाही; पण खरंच मनापासून प्रेम केलं रे मी तुझ्यावर.. आणि तू म्हणतोयस मला तुझा मोह झाला नाही? काय पुरावा देऊ तुला?”
तिचा स्वर कातर झाला.
“जिथे पुरावा द्यावा लागतो, तिथे खरंच प्रेम असतं?”
उगीचच तिला वाटून गेलं.
“सांग मला, तुला कधी मला भेटावंसं वाटलं? कधी मला आतूर होऊन घट्ट मिठी माराविशी वाटली? कधी कामुक होऊन तुझ्या ओठांना माझ्या ओठांचा ताबा घ्यावासा वाटला? कधी तुझे श्वास माझ्या श्वासात गुंतवावेसे वाटले? कधी तुझ्या देहाला माझ्या स्पर्शाची ओढ लागली? नाही ना? म्हणूनच म्हणतोय, तुला कधीच माझा मोह झाला नाही.”
आता त्याचा स्वर चिडका झाला होता. ती शांतपणे त्याचं म्हणणं ऐकत होती. मनात विचारांचं वावटळ घुमू लागलं. प्रश्नांचा ससेमिरा मागे लागला.
“खरंच मला त्याचा मोह झाला नाही? त्याच्या संकल्पनेतल्या गोष्टी म्हणजे मोह? मग माझ्या श्वासात निरंतर त्याच्या नावाचा जयघोष सुरू होता ते काय होतं? त्याच्या विचारांनी सतत झुरत राहणं, त्याची काळजी वाटणं हे काय होतं? त्याच्या आठवणींनी जीवाला कातर करणं काय होतं? त्याच्या नुसत्या स्पर्शभासाने मोहरून जाणं काय होतं? त्याच्या भारावलेल्या श्वासांनी रोमरोमात चालू ठेवलेला त्याचा संचार.. काय होतं? त्याच्या मंतरलेल्या शब्दांनी मोहवून जाणं काय होतं? त्याच्यासाठी तीळ तीळ तुटणं काय होतं? त्याला गमावण्याच्या भीतीने क्षणभर श्वास थांबलाय आणि देहातला जीव सोडून जातोय असं वाटणं काय होतं? कित्येकदा त्याने सोडून जाण्याची भाषा करत असताना त्याचा हात कायम माझ्या हातात रहावा म्हणून आर्जवे करत होते ते काय होतं? मोह नव्हता? आणि मग त्याचा मोहच नव्हता तर त्याच्यात गुंतलेला जीव माझा मला सोडवत का नव्हता? त्याला थांबवण्याच्या प्रयत्नात मी इतकी अगतिक का होत होते? त्याने सोडून जाऊ नये म्हणून इतका अट्टहास का करत होते? माझ्या तनावर उमटलेला त्याचा स्पर्शभास मला मिटवून, पुसून का टाकता येत नव्हता? मला ते मोहपाश, ते बंध तोडून का टाकता येत नव्हते? नातं तुटलंय हे माहित असतानाही मनाला लागलेलं त्याचं वेड काय होतं? खरंच मला त्याचा मोह नव्हता?”
तिच्या आसवांनी आता पापण्यांचा काठ ओलांडला होता. तिने त्याच्यासाठी तिच्या डोळ्यात भरलेलं काजळ आता अश्रू बनून वाहू लागलं. तिने दीर्घ श्वास घेतला आणि त्याला प्रश्न केला.
“मग आता..? पुढे?”
“पुढे काय? फक्त शब्द म्हणजे प्रेम असत नाही ना प्रिया.. पुढे बऱ्याच गोष्टी असतात. त्यामुळे आता तू माझ्या पायातल्या बेड्या बनू नकोस.”
त्याच्या शब्दांनी असंख्य विषारी नागांनी दंश करावा आणि मरणप्राय यातना व्हाव्यात असं तिला क्षणभर वाटून गेलं.
“माझ्या मनाला लागलेला त्याचा छंद, माझा मोह त्याच्या पायातल्या बेड्या होत्या?”
तिला प्रश्न पडला. तिने शांतपणे त्याच्याकडे पाहिलं. तिला साहिर लुधियानवीच्या काही ओळी आठवल्या.
“वो अफ़्साना जिसे अंजाम तक लाना न हो मुमकिन, उसे इक ख़ूब-सूरत मोड़ देकर छोड़ना अच्छा..
कई बातें ऐसी होती हैं, जिन्हें शब्दों की सज़ा नहीं देनी चाहिए।”
कई बातें ऐसी होती हैं, जिन्हें शब्दों की सज़ा नहीं देनी चाहिए।”
साहीर किती खरं बोलले होते नाही?
समाप्त..
©अनुप्रिया
©अनुप्रिया
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा