Login

एक नवी पालवी भाग १

एक नवी पालवी भाग १
पुण्यातील आयटी हब मानल्या जाणाऱ्या हिंजवडीच्या एका काचेच्या इमारतीत पराग आपल्या कामात मग्न होता. परदेशी क्लायंटची मीटिंग, वाढलेले टार्गेट्स आणि सततचा मानसिक ताण हे त्याच्यासाठी आता सवयीचे झाले होते. वय अवघे ३५, पण रात्रीची अपुरी झोप आणि कॅन्टीनमधले तेलकट खाणे यामुळे त्याचे शरीर कुरकुर करू लागले होते.

त्या दिवशी दुपारी चारच्या सुमारास परागच्या छातीत अचानक कळ आली. त्याला वाटले ॲसिडिटी असावी. त्याने पाणी प्यायले, पण वेदना वाढतच गेल्या. डावा हात जड पडू लागला आणि कपाळावर घामाच्या धारा वाहू लागल्या. काही कळायच्या आत तो खुर्चीवरून खाली कोसळला. ऑफिसमधील कालिगस् नी तातडीने त्याला जवळच्या 'जीवन हॉस्पिटल'मध्ये हलवले.

हॉस्पिटलच्या आपत्कालीन विभागात धावपळ सुरू झाली. डॉ. अनिरुद्ध पटवर्धन नुकतेच एका ओपीडीतून बाहेर पडले होते. परागची अवस्था पाहून त्यांनी तातडीने सूत्रे हातात घेतली.

" पल्स खूप कमी आहे, बीपी कोलमडलंय. तातडीने ई सी जी आणि ई को करा. "  डॉक्टरांनी ऑर्डर दिली.

जेव्हा परागचे रिपोर्ट आले, तेव्हा डॉ. अनिरुद्ध यांच्या चेहऱ्यावर काळोख दाटला. परागला मॅसिव्ह हार्ट अटॅक आला होता. त्याच्या हृदयाच्या मुख्य वाहिनीमध्ये मोठा अडथळा होता. शस्त्रक्रिया करून तो काढण्यात आला, पण हृदयाचे मोठे नुकसान झाले होते.

दोन दिवसांनी जेव्हा पराग शुद्धीवर आला, तेव्हा त्याला स्वतःच्या शरीराचे वजन पेलवत नव्हते. बाजूलाच अमृता रडत उभी होती. डॉ. अनिरुद्ध आत आले आणि त्यांनी परागचा हात हातात घेतला.

"कसं वाटतंय पराग आता ? " डॉक्टरांनी मायेने विचारले. परागने अत्यंत कमकुवत आवाजात विचारले,

" डॉक्टर... मी जिवंत आहे ना ? मला काय झालं होतं ? "

डॉक्टरांनी अत्यंत शांतपणे त्याला परिस्थितीची जाणीव करून दिली.

" पराग, तुला हृदयविकाराचा झटका आला होता. आम्ही सर्जरी केली आहे, पण तुझ्या हृदयाची ताकद इ एफ आता केवळ २० टक्के उरली आहे. तुला खूप सावध राहावं लागेल."

'२० टक्के' हे आकडे परागच्या कानात घुमू लागले. त्याला वाटले त्याचे आयुष्य आता संपले आहे. तो एका खोलीत बंदिस्त झाला होता.

हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला, पण पराग पूर्वीचा पराग उरला नव्हता. जो तरुण महिन्याला हजारो किलोमीटर प्रवास करायचा, तो आता घराच्या बेडवरून बाथरुमपर्यंत जातानाही धापा टाकत होता. परागला नैराश्याने ग्रासले होते.

" अमृता, माझं आयुष्य आता संपलंय. मी अपंग झालोय. माझ्या मुलाला मी कधी कडेवर घेऊ शकणार नाही, कधी बागेत नेऊ शकणार नाही. हे जगण्यापेक्षा मरणं बरं." पराग अनेकदा हताश होऊन म्हणायचा.

दोन आठवड्यांनंतर परागला फॉलो-अपसाठी डॉ. अनिरुद्ध यांच्याकडे नेण्यात आले. परागचा पडलेला चेहरा पाहून डॉक्टरांना समजले की, त्याला आता औषधांपेक्षा उमेदीची जास्त गरज आहे.

" पराग, तू औषधं वेळेवर घेतोयस, आहार पाळतोयस, पण तुझ्या चेहऱ्यावर जगण्याची जिद्द दिसत नाहीये. शरीर मनाचं ऐकत असतं. जर तू मनातून हार मानलीस, तर हे २० टक्के हृदय सुद्धा काम करणं बंद करेल." डॉ. अनिरुद्ध गंभीरपणे म्हणाले.

पराग रडत म्हणाला,

" डॉक्टर, काय करू ? मला साध्या दोन पायऱ्या चढता येत नाहीत. मी काय करू ? "

डॉक्टरांनी एक क्षण विचार केला. त्यांनी त्याची माहिती विचारली. त्याच्या आवडी निवडी सवयी विचारल्या.त्याला काय करायची इच्छा होती त्याची माहिती विचारली.तेव्हा त्यांना समजले की परागला सिंहगड चढण्याची जुनी ओढ होती. त्यांनी त्याच्या डोळ्यांत पाहिले आणि विचारले,

" तुला ट्रेकिंगची आवड होती ना ? आपण एक पैज लावूया. जर तू पुढच्या नऊ महिन्यात मी सांगेल तसं वागलास, तर आपण दोघं मिळून सिंहगड चढूया. जर तू गड सर केलास, तर मी तुला फिट घोषित करेन. काय म्हणतोस ? "

परागला वाटले डॉक्टर थट्टा करत आहेत. पण डॉक्टरांच्या नजरेत प्रचंड विश्वास होता.

" डॉक्टर , तुम्ही चेष्टा करताय का ? माझ्या हार्टची कंडिशन तुम्हाला माहीत आहे ना ? "