Login

एक नवीन प्रवास.... भाग २

एका मैत्रीची गरज
एक नवा प्रवास. भाग २


केतन आणि सायली खूप दिवसांनी भेटत होते. ते दोघे शाळेत असताना एकत्र एकाच वर्गात होते. त्यामुळे त्यांची ओळख होती. आज खूप वर्षांनी दोघं एकमेकांना भेटत होते. सायली आणि केतनच्या खूप गप्पा चालल्या होत्या. सायलीने तिच्या आयुष्यात घडलेल्या गोष्टी केतनला सांगितल्या. केतन सुद्धा सायलीला त्याच्या आयुष्यात घडलेल्या घटनांविषयी सांगत होता. केतन आणि माधुरीचं ५ वर्षांपूर्वी लग्न झालं होतं. पहिलं एक वर्ष छान गेलं. पण एक वर्षांनंतरच दोघांमध्ये छोट्या छोट्या गोष्टींवरून भांडण व्हायला लागलं. नंतर एके दिवशी एका छोट्या भांडणाचं रूपांतर मोठ्या भांडणात झालं. शेवटी दोघांनी संगनमताने वेगळं व्हायचा निर्णय घेतला. आधी दोघांच्याही घरच्यांना हा निर्णय मान्य नव्हता. पण शेवटी केतन आणि माधुरी ह्यांच्या ठाम निर्णयापुढे घरच्यांचं काही चाललं नाही.
केतन जेव्हा सायलीला हे सगळ सांगत होता तेव्हा त्याच्या बोलण्यात असं काही आलं की सायली विचारात पडली. तो सायलीला म्हणाला, ‘ सायली, मला वाटत एका वयानंतर माणसाला जगण्यासाठी एक असा माणूस पाहिजे जो आपल्याला समजून घेईल. ज्याच्याशी आपण कोणत्याही विषयावर चर्चा करू शकतो. थोडक्यात ह्या माझ्या अनुभवाने मला एक शिकवलंय आता पुन्हा लग्न करून नवीन नातं निर्माण करण्यापेक्षा एक कोणीतरी छान मैत्रीण असावी जी आपल्याला समजून घेईल.’ सायलीने पण हसून ह्याला होकारार्थी मान हलवली. घरी गेल्यावर सायली ह्याचाच विचार करत होती. तिच्या मनात आलं की आलोक गेल्यापासून आपण हा असा विचार केलाच नाही. आपण आतापर्यंत फक्त चिन्मयचा आणि त्याच्या भविष्याचाच विचार केला.
त्याच दिवशी संध्याकाळी चिन्मयचा व्हिडिओ कॉल आला. चिन्मय कॉलवर त्याचा दिनक्रम सांगत होता. पण आज सायलीचं त्याच्याकडे लक्ष नव्हतं. हे लक्षात आल्यावर मध्येच चिन्मयने सायलीला हाक मारली. आणि म्हणाला, ‘ आई, लक्ष कुठंय?’ सायली भानावर आली आणि म्हणाली, ‘ हा बोल ना. माझं लक्ष आहे बोल अजून काय म्हणतोयस?’ मग चिन्मय तिला म्हणाला, ‘ आई, मला तुला एक मज्जा सांगायची आहे. अगं आज ना क्लासमध्ये माझ्या मित्राने मोबाईल आणला होता. तो मला म्हणत होता की तू पण घे मोबाईल. म्हणजे मग तुला आईशी बोलायला व्हिडिओ कॉल करायच्या दिवसाची वाट बघत बसायला नको. तू कधीपण आईशी बोलू शकतोस.’ हे ऐकून सायली चिन्मयला म्हणाली, ‘ आपलं काय ठरलंय? की तू एकदा बारावीची परीक्षा देऊन चांगल्या मार्कांनी पास झालास की तुला मोबाईल घ्यायचा.’ त्यावर चिन्मय म्हणाला, ‘ काय ग आई, घेऊया की मोबाईल. तसही मी बारावीत चांगले मार्क्स मिळवणारच आहे. तुझं माझ्यावर प्रेम नाहीये का? आपण दररोज बोलू ना कॉलवर?’ हे ऐकून सायली हसून म्हणाली, ‘ अरे राजा, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे म्हणूनच तुला सांगतेय की एकदा परीक्षा होऊदे. चांगले मार्क्स पडूदेत मग लगेच मोबाईल घेऊया. तुझा माझ्यावर विश्वास आहे ना?’ त्यावर चिन्मय म्हणाला, ‘ बरं आई, ठीक आहे. माझा विश्वास आहे तुझ्यावर. पण आई मला तुला अजून एक सांगायचं होतं. जसं तुझं माझ्यावर प्रेम आहे तसंच माझंपण तुझ्यावर प्रेम आहे. म्हणूनच मी तुला घरी आलो तेव्हा सांगत होतो की आई आता कोणीतरी मित्र किंवा मैत्रीण कर जेणेकरून तुला तुझ्या मनातलं सगळ त्या व्यक्तीला सांगता येईल. अगं तुला माहिती आहे का? माझ्या वर्गात माझी एक खूप जवळची मैत्रीण आहे. आम्ही दोघं एकमेकांशी सगळ शेअर करतो. अर्थात मी तिच्याविषयी तुला सांगितलच आहे. पण आज ती मला सांगत होती. तिच्या मावशीने ह्या वयात दुसरं लग्न केलं. कारण तिच्या मावशीचं असं म्हणणं आहे की आपल्या आयुष्यात असा एक मित्र असावा ज्यावर फक्त आपला हक्क आहे. घरचे आपल्याबरोबर असतातच पण एक असा व्यक्ती असावा ज्याच्याबरोबर आपण काहीही शेअर करू शकतो. हे ऐकून आई मला तुझी खूप आठवण आली. आता मी नक्कीच एवढा मोठा झालोय की मला काय म्हणायचंय ते तुला कळेल. बरं चल आता मी तुझा जास्त वेळ नाही घेत. नाहीतर नेहमीप्रमाणे म्हणशील मी तुझी आई आहे मला सगळ कळत.’ सायली चिन्मयचं हे बोलणं ऐकून आश्चर्यचकित झाली. तिला वाटलं खरच आपला मुलगा आपल्याला किती ओळखतो.आपण खरंच ह्यावर विचार करायला हवी. आणि खरंतर आज केतनला भेटून, त्याच्याशी आपल्या सगळ्या जुन्या गोष्टींबद्दल बोलण्यामुळे तिला मोकळं वाटलं होतं. पण तिचं मन हे मानायला तयार नव्हतं.
तिच्या मनात हे सगळं चालू असतानाच तिला तिच्या बॉसचा कॉल आला.हे बॉस तिच्या ऑफिसमध्ये नव्याने आलेले होते. काही दिवसांपासून बॉस तिच्याशी जवळीक साधायचा प्रयत्न करत होते. खरतर तिला तो कॉल उचलायचा नव्हता. पण शेवटी काहीतरी कामाचं असेल असं वाटून तिने कॉल उचलला. बॉस म्हणाले, ‘ हॅलो सायली. कशी आहेस? अगं आज मी तुला माझ्या केबिनमध्ये एका फाईलसाठी बोलावलं होत. तू त्या फाईलचं काम केलंस का?’ सायली म्हणाली, ‘ सॉरी सर, मी ती फाईल अजून पूर्ण केलं नाहीये. उद्या ती फाईल पूर्ण करून पाठवते सर तुमच्या केबिनमध्ये.’ बॉस म्हणाले, ‘ अगं सॉरी काय? उद्या ती फाईल पूर्ण झाली की आणून दे माझ्या केबिनमध्ये.’ सायली म्हणाली, ‘ थँक्यू सर, मी ती फाईल उद्या पूर्ण करते. ठेवते सर फोन कामात आहे जरा.’ सायलीने लगेच फोन ठेवून दिला. खरतर तिला ह्या नवीन बॉसची जरा भीतीच वाटत होती. तिच्या मनात रागाने एक विचार आला की एकट्या बाईने राहूच नये का ह्या समाजात. एकट्या बाईला कधी ना कधी अशा माणसांना सामोरं जावंच लागतं अशा पद्धतीचा नियम असल्यासारखे हे लोक का वागतात. थोड्यावेळाने शांत झाल्यावर तिने हा विचार झटकला. पण खरतर तिला आता थोडी भिती वाटायला लागली होती.
दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये गेल्यावर पहिलं तिने ते काम पूर्ण केलं. आणि शिपाई काकांना हाक मारली आणि ती फाईल त्यांना बॉसच्या केबिनमध्ये द्यायला सांगितली. थोड्यावेळाने शिपाई काका आले आणि म्हणाले, ‘ सायली मॅडम, साहेबांनी तुम्हाला त्यांच्या केबिनमध्ये बोलावलंय.’ आता मात्र सायली घाबरली आणि तशीच घाबरत साहेबांच्या केबिनमध्ये जायला निघाली.


क्रमशः
( बाकी कथा पुढील भागात)

0

🎭 Series Post

View all