Login

एक नवीन प्रवास...... भाग १

एका मैत्रीची गरज

खूप दिवसांनी सायली समुद्रावर आली होती. तिला नेहमी समुद्राच्या पाण्यात चालायला आवडत असे. पण तिला तिच्या नोकरीमुळे बरेच दिवस स्वतःसाठी वेळच मिळत नव्हता. आज मात्र तिने ठरवून आपल्यासाठी वेळ काढला. आणि ती समुद्रावर आली होती. तिला समुद्रावर आल्यावर खूप शांत वाटायचं. खरतर त्याच्यासाठीच ती समुद्रावर यायची. जवळपास १० वर्षांपूर्वी तिच्या सगळ्यात जवळच्या व्यक्तीचं म्हणजे तिच्या नवऱ्याचं आलोकचं अपघाती निधन झालं होतं. तिचा मुलगा चिन्मय जेमतेम ८ वर्षांचा होता. त्याच्या शिक्षणाची आणि सगळीच आर्थिक जबाबदारी एकट्या सायलीवर आली होती. सासरच्या माणसांनी त्रास दिला नाही. पण विशेष कसलीच मदतही केली नाही. ती जेमतेम २३ वर्षांची होती तेव्हा तिचं लग्न झालं होतं. त्यानंतर लगेच वर्षभरातच चिन्मयचा जन्म झाला. घरात त्याला बघायला कोणीही नव्हतं. आणि तशी आर्थिक बाजू आलोक खूप चांगल्या पध्दतीने सांभाळत होता. त्यामुळे तिला कधी नोकरी करायची वेळ आली नाही. चिन्मयचा जन्म झाल्यावर सायलीचा सगळा वेळ चिन्मय बरोबरच जाऊ लागला. चिन्मयला सांभाळत घरातली कामे करणे आणि आलोक सुद्धा तिला तिच्या कामांमध्ये खूप मदत करायचा. एकंदरीत दोघांचा संसार खूप छान चालला होता.
आलोक गेला त्यादिवशीची सकाळ सायली कधीही विसरू शकत नव्हती. सकाळी सगळं आवरून आलोक कामावर जायला निघाला आणि सायलीला हाक मारून म्हणाला, ‘ सायली, आज संध्याकाळी लवकर आवरून तयार रहा. मस्तपैकी नाटकाला जाऊ. खूप दिवस झाले आपण दोघं नाटकाला गेलोच नाही. चिन्मयला संध्याकाळी आजीकडे सोडून आपण नाटकाला जाऊया बाहेरच जेवून घरी येऊ.’ आणि चिन्मय आजूबाजूला नाही ना ह्याची खात्री करून सायलीला जवळ घेऊन म्हणाला, ‘ तसही बरेच दिवस झाले. लग्नाच्या आधी कसे छान फिरायला जायचो तेव्हा तू छान दिसायचीस. म्हणजे अजूनही छानच दिसतेस पण आता खुलेआम माझ्या बायकोचं कौतुक करता येत नाही. मग राणी सरकार जाऊया न रात्री नाटकाला?’. त्याला सायलीने हसत दूर लोटले आणि म्हणाली, ‘ राजे, जरा आजूबाजूला पण बघत जा अचानक छोटे सरकार येतील. आणि मी संध्याकाळी तयार राहते. एवढा नाटकीपणा नकोय करायला.’ हे ऐकल्यावर आलोक आनंदला आणि हसत तिला म्हणाला, ‘ हे जे तुझ्या चेहऱ्यावरचं लाजणं आहे ना ते बघून पुन्हा नव्याने प्रेमात पडायला होते.’ हे ऐकून सायलीने हसून आलोकच्या हातात डबा दिला आणि आलोकसुद्धा हसत हसत ऑफिसला गेला. संध्याकाळी सायलीने आपलं सगळं छान आवरलं. चिन्मय शाळेतून आल्यावर त्याला नाश्ता दिला आणि त्याला जवळच राहत असलेल्या आलोकच्या आईकडे ठेवून आली. घरी येऊन आलोकला कॉल केला. तर तो नुकताच निघाला होता. त्याला घरी यायला साधारण पाऊण तास तरी जाणार होता. मग तिने घरातलं बाकीचं सगळं आवरलं. आणि बघितलं तर तास उलटून गेला होता. पण आलोक आलेला नव्हता. तिला वाटलं आता नाटकाला उशीर होईल आणि आलोक पण दमलेला असेल म्हणून तिने ठरवलं की आलोक आला की त्याला सांगायच की नको जायला नाटकाला नुसतेच बाहेर फिरून येऊ. त्यानंतर जवळपास अर्धा तास गेला. तरीही आलोक आलेला नव्हता मग मात्र तिला काळजी वाटली. आणि तिने त्याला पुन्हा एकदा कॉल केला. तो कॉल उचलला गेला नाही. एवढ्यात तिला आलोकच्या मित्राचा प्रशांतचा कॉल आला आणि त्याने तिला लगेच सिटी हॉस्पिटलला बोलावून घेतले. तिला खूप टेंशन आलं त्याच काळजीने ती हॉस्पिटलला पोहचली. आणि तिथे गेल्यावर तिला कळलं की प्रशांत आणि आलोक दोघे एकत्र ऑफिसवरून निघाले होते. पण वाटेत अचानक एक कार समोर आली आणि कारच्या ड्रायव्हरचा गाडीवरचा कंट्रोल सुटल्यामुळे मोठा एक्सिडेंट झाला. सुदैवाने प्रशांत त्या अपघातात वाचला पण आलोकचं मात्र त्या अपघातात दुर्दैवी निधन झालं. ह्या सगळ्या घटनांचा खूप मोठा परिणाम सायलीवर झाला. पण चिन्मयकडे बघून सायलीने दुःख आवरलं. आलोकचे सगळे दिवसकार्य मी झाल्यानंतर महिन्याभरातच सायलीने एक नोकरी बघितली. आणि आलोकची आठवण येत असून आणि तो नसल्याची जाणीव होत असून सुद्धा दुःख आवरून ती चिन्मयासाठी परत उभी राहिली. चिन्मयला सुद्धा ह्या सगळ्या गोष्टींचीं जाणीव होती. तो सुद्धा खूप गुणी होता. कालांतराने चिन्मयला चांगले शिक्षण मिळावे म्हणून तिने त्याला शहरातल्या एका चांगल्या शाळेत शिकायला घातले. त्या शाळेच्याच हॉस्टेल मध्ये चिन्मयला ठेवले. आणि ती मात्र त्याच्या शिक्षणाला कसली आर्थिक अडचण व्हायला नको किंवा एकंदरीतच पुढे कोणत्याही प्रकारे अडचण यायला नको म्हणून फक्त नोकरीवर लक्ष देऊ लागली. ह्या सगळ्या मध्यंतरीच्या जवळपास १० वर्षांच्या काळात तिने स्वतःकडे लक्षच दिले नव्हतं.
तिचा आणि चिन्मयचा आठवड्यातून एकदा व्हिडिओ कॉल व्हायचा. त्यात तो तिला शाळेतल्या सगळ्या गमती जमती सांगायचा. चिन्मयसुद्धा आता १८ वर्षांचा झाला होता. त्यामुळे साहजिकच तो वयात येऊ लागला होता. पण तो कोणत्याही वाईट मार्गाला जाऊ नये आणि मुळात त्याला कोणत्याही विषयावर आपल्याशी बोलायला कसतरी वाटायला नको ह्याची सायलीने त्याच्या लहानपणापासूनच काळजी घेतली होती. चिन्मय आणि सायलीमध्ये जसं आई मुलाचं नातं होतं त्याही पेक्षा त्यांच्यात खूप छान मैत्री होती. त्यामुळे चिन्मय सायलीशी अगदी कोणत्याही विषयावर चर्चा करू शकायचा. एक दोन दिवसांपूर्वी चिन्मय घरी येऊन गेला होता. परवा तो नाश्ता करत असताना मध्येच सायलीला म्हणाला, ‘ आई, मी नेहमी तुला सगळं सांगतो. आपल्यात अगदी मैत्रीच नातं आहे . म्हणजे कधी कधी तर तू मला आईपेक्षा मैत्रीण म्हणून जास्त जवळची वाटतेस. पण तू जशी माझी मैत्रीण आहेस तसे माझे अनेक मित्र आहेत मैत्रिणी आहेत. ते सगळे माझ्याशी त्यांच्या गोष्टी शेअर करतात पण तू मात्र मला काहीच सांगत नाहीस. म्हणजे तुझे पण असे तुझ्या वयाचे मित्र मैत्रिणी असतील ना ज्यांच्याशी तू सगळं शेअर करतेस. आणि आई तुला एक सांगू का तसं तुझ्या बोलण्यात कधी आलं नाहीये म्हणून मला तुझी काळजी वाटते. तू पण असं कोणीतरी छान मित्र किंवा मैत्रीण कर ज्यांच्याशी तू सगळ बोलशील. म्हणजे मला तुझी काळजी वाटणार नाही.’ चिन्मयचं हे मोठ्या माणसासारखं बोलणं ऐकून तिला हसायला आलं. ती त्याला म्हणाली , ‘ हवा कशाला कोणी मित्र किंव्हा मैत्रीण? तू आहेस की माझा जवळचा मित्र.’ हे ऐकून चिन्मय हसला आणि म्हणाला, ‘ अगं आई मी इथे नसतो ना. इथे कोणीतरी पाहिजे तुझ्यासाठी असा म्हणतोय मी.’ ह्यावर सायलीने हसून विषय बदलला. पण आज समुद्रावर आल्यावर तिला पुन्हा त्या प्रसंगाची आठवण झाली. ती विचार करत होती की खरच आलोक गेल्यापासून आपल्याला तसे मित्र मैत्रिणी नाहीयेत. आपण ऑफिसमध्ये अनेक माणसांना ओळखतो आपल्या ऑफिसमध्ये मैत्रिणी पण आहेत. पण असं कोणीही नाही ज्याला आपण सगळं सांगू शकतो. तिच्या मनात हा विचार चाललेला असतानाच मागून तिला कोणीतरी हाक मारली. तिने पटकन वळून मागे बघितलं. तर एक माणूस तिच्या कडे चालत येत होता. तो कोण आहे ते तिच्या लक्षात येत नव्हतं. पण जवळ आल्यावर तिच्या लक्षात आलं तो केतन होता. शाळेत ते दोघ एकत्र होते. हा इकडे कसा काय आणि त्याने आपल्याला इतक्या वर्षानंतर सुद्धा कसं काय ओळखलं ह्याचं आश्चर्य तिच्या चेहऱ्यावर दिसायला लागलं.


क्रमशः
( बाकी गोष्ट पुढील भागात. )

0

🎭 Series Post

View all