Login

एक नवीन प्रवास. अंतिम भाग

एका मैत्रीची गरज
एक नवीन प्रवास….. अंतिम भाग


सायली बॉसच्या केबिनमध्ये गेली. बॉस समोर तीच फाईल होती. बॉस म्हणाले, ‘अरे सायली आलीस, बस ना.’ बॉसने आपला केलेला एकेरी उल्लेख सायलीला जरा खटकलाच पण तिने दुर्लक्ष केलं. पुढे बॉस तिला म्हणाले, ‘सायली काम खूप व्यवस्थित झालंय.’ मग बॉस तिच्या जवळ येऊन म्हणाले, ‘अर्थात माझी इथे बदली झाल्यापासून मला तुझं काम खूपच आवडतय.’ सायली पटकन उभी राहिली आणि म्हणाली, ‘ थँक्यू सर, मी जाऊ का? माझी बाकीची कामं अजून बाकी आहेत.’ बॉस म्हणाले, ‘ सायली थांब. म्हणजे जाशील थोड्यावेळाने. मी इथे जे तुझं कौतुक करतोय ते जास्त महत्वाचं आहे नाही का?’ बॉसच्या चेहऱ्यावरचे भाव सायलीच्या पटकन लक्षात आले. ती घाबरून मागे आली. तेवढ्यात बॉस तिच्या अजून जवळ आले आणि तिचा हात पकडायचा प्रयत्न केला. सायली घाबरली आणि ती पळत पळत बाहेर गेली. ती पटकन बाहेर आली आणि आपली पर्स घेऊन बाहेर गेली. ती खूप घाबरलेली आणि गोंधळलेली होती. तिला काय करावं काय नाही काहीही कळत नव्हतं. एवढ्यात बाजूच्याच बँकेत कामासाठी आलेला केतन तिची ही घाबरलेली अवस्था बघून पटकन तिच्याकडे आला. आणि त्याने तिला विचारलं, ‘ सायली, काय झालं? तू बरी आहेस का?’ सायलीला काही बोलताच येईना. सायलीची ती अवस्था बघून केतनने आधी तिला पाणी प्यायला दिलं. पाणी प्यायल्यावर सायलीला जरा बरं वाटलं. ती केतनला थँक्यू म्हणाली. केतन सायलीला म्हणाला, ‘ तुला चालणार असेल तर आपण इथेच जवळ एक कॅफे आहे तिथे जाऊया का? कॉफी प्यायल्यावर तुला आणखी बरं वाटेल. सायलीने होकारार्थी मान हलवली.
सायली आणि केतन जवळच असलेल्या कॅफे मध्ये गेले. केतनने दोघांसाठीही कॉफी मागवली. केतनने सायलीला विचारले, ‘ सायली आता तुला शांत वाटत असेल आणि तुला सांगावस वाटत असेल तर मला काय झालंय ते सांगू शकतेस.’ सायलीने घडलेला सगळा प्रसंग केतनला सांगितला. केतनने सायलीला काळजी न करण्यास सांगितलं पण त्याच्या चेहऱ्यावरून केतनला खूप राग आल्याचं सायलीला कळलं. तेवढ्यात कॉफी आली. दोघांनीही कॉफी प्यायली. केतन काहीतरी विचार करत होता आणि तो सायलीला म्हणाला, ‘ सायली, हा माझा नंबर घे आणि मला तुझा नंबर दे. आणि उद्या ऑफिसला गेलीस की मला कॉल कर.’ त्याच्या डोक्यात काहीतरी चालू असल्याची कुणकुण सायलीला लागली. पण ती शांत राहिली. तिने आपला नंबर केतनला दिला. दुसऱ्या दिवशी सायलीने ऑफिसला गेल्यावर केतनला कॉल केला. केतन मुद्दामच काहीतरी निमित्त काढून सायलीच्या ऑफिसमध्ये आला पण तिला दिसणार नाही अशा जागेवर थांबला. थोड्यावेळाने सायलीला तिच्या बॉसने बोलावल्याचा निरोप घेऊन शिपाई काका आले. आधी सायलीने एक महत्वाचं काम आहे ते झालं की येते असं मुद्दामहून बॉसच्या केबिनमध्ये जायला नको म्हणून सांगितले. पण थोड्यावेळाने बॉसच तिच्या समोर येऊन म्हणाले, ‘ सायली मॅडम, तुम्ही काल दिलेल्या फाईल मध्ये बऱ्याच चुका आहेत. लगेच माझ्या केबिनमध्ये या.’ आता सायलीला काही पर्याय नव्हता. ती बॉसच्या केबिनमध्ये गेली. पुन्हा कालच्यासारखाच बॉसने तिचा हात पकडायचा प्रयत्न केला तेवढ्यात केतन केबिनमध्ये आला. केतनला असं अचानक आलेलं बघून सायलीचे बॉस एकदम घाबरले. आणि उसनं अवसान आणून म्हणाले, ‘ कोण आपण? असे अचानक केबिनमध्ये कसे आलात तुम्ही?’ सायलीला केतन आल्यामुळे जरा बरं वाटलं आणि आश्चर्य सुद्धा वाटलं. केतन म्हणाला, ‘ साहेब, आत्ता तुम्ही ह्या बाईंबरोबर जे काही करण्याचा प्रयत्न केलात ते मी माझ्या फोनमध्ये रेकॉर्ड केलेला आहे.’ असं म्हणून त्याने त्याचा मोबाईल काढला आणि काचेतून केलेला व्हिडिओ सायलीच्या बॉसला दाखवला. आणि केतन त्यांना म्हणाला, ‘ साहेब तुम्ही हे जे काही केलंत ते तुमच्या मेन ब्रँचपर्यंत पोचवायला मला एक मिनिट सुद्धा लागणार नाही. तुमचे जे साहेब आहेत ते माझे खूप जवळचे मित्र आहेत. आणि तुम्हीही त्यांना ओळखत असालच. तुम्ही तुमच्या ऑफिसमधल्या महिलांशी असं वागता हे त्यांना कळलं तर तुमची नोकरी जायला फक्त एक दिवस पुरेल.’ हे ऐकून सायलीचे बॉस घाबरले आणि म्हणाले, ‘ सॉरी सॉरी. मी पुन्हा असं सायली मॅडमशी वागणार नाही. तुम्ही प्लीज हा व्हिडिओ मेन ब्रँचपर्यंत पाठवू नका.’ केतन म्हणाला, ‘ फक्त सायली मॅडमच नाही तर ह्या ऑफिसमध्ये कोणत्याही महिलेशी तुम्ही पुन्हा असं वागलात तर तुमची नोकरी जायची मी नक्की व्यवस्था करेन. तुम्हाला काय वाटतं? सायलीसारख्या महिलांना आपण काहीही करू शकतो. कारण त्या एकट्याच आहेत असा गैरसमज दिसतोय तुमचा. मी सायलीच्या पाठीमागे आहे. आणि एक मित्र म्हणून नेहमीच मागे मी तिच्या पाठीमागे असेन.’ केबिनचं दार उघडं असल्याने हा सगळा प्रकार सगळ्या ऑफिसने बघितला. सायलीबरोबरच ऑफिसमधल्या इतर बायकांना सुद्धा हे केतनचं वागणं बघून आनंद झाला. सायली आणि केतन केबिनच्या बाहेर आले. केतन सायलीला म्हणाला, ‘ सायली, आता काळजी करू नको. आता पुन्हा तुझा बॉस तुला हात लावणार नाही. त्यातूनच पुन्हा त्याने असं काही करण्याचा प्रयत्न जरी केला तरी मला लगेच कॉल कर.’ सायलीने केतनचे आभार मानले आणि आपल्या जागेवर येऊन बसली. तेवढ्यात तिच्या बाजूला बसणाऱ्या मुलीने तिला हाक मारली आणि म्हणाली, ‘ सायली तू खरच लकी आहेस. तुला असा मित्र मिळाला आहे. असे मित्र हवेतच प्रत्येकीच्या आयुष्यात.’ सायली तिच्याकडे बघून हसली.
संध्याकाळी जेव्हा ती घरी गेली तेव्हा तिने आधी केतनला कॉल केला आणि त्याचे आभार मानले. केतन तिला म्हणाला, ‘ अगं आभार नको सायली. काल तू खूप घाबरली होतीस. आणि तू एकटी आहेस हे तुझ्या बॉसला वाटून त्याने त्याचा गैरफायदा घेऊ नये म्हणून मी हे केलं माझ्या बालमैत्रिणीसाठी. तुला एक सांगू का? तू खरंच स्ट्राँग आहेस. फक्त तुला हे कोणी सांगितलं नाहीये. आणि आता काही काळजी करू नको. हा तुझा मित्र आहे तुझ्याबरोबर आणि कधीही काहीही वाटलं तर मला कॉल कर.’ हे ऐकून सायलीला खूप आनंद झाला. ती केतनला म्हणाली, ‘ केतन, थँक्यू खरंच आत्तापर्यंत मला असं कोणी असावं ज्याच्याशी आपण बोलू शकतो असं कधीच वाटलं नव्हतं. पण काल घडलेल्या प्रसंगावरून मला खरच असं वाटलं की कोणीतरी असावं ज्याला मी कधीही मदत लागली तर कॉल करू शकेन. आणि तू माझ्यासाठी आज जे काही केलंस त्यामुळे मला खरंच खूप आधार मिळाला. मी नक्की तुला फोन करेन आणि तूसुद्धा तुला काहीही शेअर करावसं वाटलं तर मला कॉल कर.’ केतन आणि सायली नंतर खूप बोलायला लागले. आणि कालांतराने त्यांची खूप चांगली मैत्री झाली.
सायलीला एक मित्र मिळाला होता. ज्याच्याशी आपण काहीही शेअर करू शकतो असा विश्वास तिला वाटलं. आपल्या ह्या नवीन मित्राविषयी चिन्मयला सांगायचे तिने ठरवलं. आणि जेव्हा तिचा चिन्मयाबरोबर व्हिडिओ कॉल झाला तेव्हा तिने हे चिन्मयला सांगितले. हे चिन्मयला कळल्यावर त्याला सुद्धा खूप आनंद झाला. केतन आणि सायलीचा एक नवीन मैत्रीचा प्रवास सुरू झाला होता.