एक पत्र भाग १
"हॅलो अपर्णा आज रात्री माझ्या घरी येशील का?" सोनमने फोन करुन विचारले.
"पण का?" अपर्णा कडून प्रश्न आला.
यावर सोनम म्हणाली,"अग तू इतक्यात विसरलीस सुद्धा, मी दोन दिवसांपूर्वीच सांगितलं होतं ना की माझी आई दोन तीन दिवसांसाठी बाहेर गावी जाणार आहे म्हणून. दिवसभर मला एकटीला घरी रहायला काही वाटत नाही पण रात्रीचं घर खायला उठतं आणि नको ते विचार डोक्यात घोळत असल्याने रात्रभर झोप लागत नाही."
अपर्णा म्हणाली," अरे यार मी कामाच्या गडबडीत विसरुनच गेले होते. बरं ऐक तू ऑफिस मधून घरी जाताना मला घरी न्यायला ये तोपर्यंत मी माझी कामं आटोपून ठेवते, मग दोघीजणी सोबतच घरी जाऊयात."
एवढं बोलून सोनमने फोन कट केला. ऑफिस मधून निघाल्यावर सोनम अपर्णाच्या घरी गेली व दोघी सोबत सोनमच्या घरी गेल्या. घरात जाताना लेटर बॉक्स मध्ये पत्र असल्याचे सोनमला जाणवले म्हणून तिने कोणाचे पत्र आले आहे हे बघण्यासाठी लेटर बॉक्स मधून पत्र काढले तर त्यावर तिच्या आईचे म्हणजेच वैशाली निकम हे नाव लिहिलेले होते. सोनम त्या पत्राकडे टक लावून बघत असल्याने अपर्णाने विचारले," सोनम कुणाचे पत्र आले आहे ग? आणि तू पत्र बघून एवढ्या विचारात का पडली आहेस?"
सोनम म्हणाली," अपर्णा अग आईसाठी हे पत्र आलं आहे. हल्ली व्हाट्सअप्प, मेलच्या जगात असं पत्र कोणी पाठवत नाही ना? म्हणून मला पत्र बघून आश्चर्याचा धक्का बसला होता."
अपर्णा म्हणाली," बरं आपण पहिले घरी जाऊयात, मग तू निवांत बसून पत्र वाच, म्हणजे कोणी पत्र पाठवले आहे हेही कळेल आणि त्यात काय लिहिलंय हेही कळेल."
सोनम व अपर्णा घरात गेल्या. सोनम फ्रेश झाली. अपर्णाने घरुन येताना दोघींसाठी जेवणाचा डबा आणला होता. दोघींनी जेवण केलं. अपर्णा टीव्ही बघत बसली होती तर सोनमला पत्र वाचल्याशिवाय चैन पडणार नव्हती म्हणून ती दुसऱ्या रुममध्ये जाऊन पत्र वाचू लागली.
"प्रिय राधा,
पत्र बघून तुला शंका आली असेल की आजकालच्या सोशल मीडियाच्या जगात आपल्याला कोणी पत्र पाठवले असेल? तुझा फोन नंबर किंवा मेल आयडी मला माहित नसल्याने पत्राचा आधार घ्यावा लागला आहे. राधा आपल्याला भेटून किती वर्षे झाली आहेत. तू कोणालाही काहीही न सांगता अचानक गायब झालीस. मी तुला शोधण्याचा खूप प्रयत्न केला होता पण तुझ्याबद्दल कोणाकडे काहीच माहिती नव्हती.
आता तुला प्रश्न पडला असेल की मला तुझा पत्ता कसा मिळाला असेल? आणि मी पत्र पाठवण्या ऐवजी स्वतः का आली नाही? तर तू जेव्हा मला भेटायला येशील तेव्हा तुला तुझ्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर मिळेलच. मी मुद्दाम तुझ्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर देणार नाहीये म्हणजे तू त्या निमित्ताने का होईना माझ्या घरी येशील. राधा काही दिवसांपूर्वी मी तुला एका हॉस्पिटलमध्ये बघितले होते, मी तुझ्याकडे बघून स्माईल दिली होती पण तू माझ्याकडे बघितलं सुद्धा नव्हतं. तुला मी राधा म्हणून आवाज देणार होते पण नेमकं त्याच वेळी रिसेप्शनिस्टने वैशाली निकम हे नाव घेतलं व तू डॉक्टरांच्या केबिनमध्ये गेलीस तेव्हा मला वाटलं की तू राधा नाहीयेस आणि माझा उगाच गैरसमज झाला असेल म्हणून मी त्यावेळी शांत बसले होते.
तुला हॉस्पिटलमध्ये बघितल्यापासून माझ्या डोक्यात तुझाच विचार चालू होता. मी याबद्दल माझ्या मुलासोबत चर्चा केली तेव्हा त्याने सोशल मीडियावर वैशाली निकमला शोधले तेव्हा मी तुझे फोटोज पाहून तुला ओळखले त्यावेळी माझ्या मनात एकच प्रश्न होता की राधाने आपलं नाव का बदललं असेल? यावर माझ्या मुलाने तुझा पत्ता शोधून काढला व हे पत्र लिहिण्यास सांगितले. पत्राच्या शेवटी मी माझा फोन नंबर व पत्ता देत आहे. शक्य असल्यास मला लवकरात लवकर येऊन भेट. त्यानंतर तू माझ्यासोबत बोलली नाहीस तरी चालेल पण एकदा शेवटचं का होईना येऊन भेट."
तुझीच,
सखी
(मला इथे माझं नाव लिहिण्याची गरज नाहीये, पत्राच्या भाषेवरुन,अक्षरावरुन तुला हे पत्र कोणी लिहिले असेल? हे कळालं असेलच)
पत्र वाचून झाल्यावर सोनमच्या मनातील गोंधळ अजून वाढला होता.
क्रमशः
©®Dr Supriya Dighe
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा