Login

एक पत्र भाग 2

उलगडा एका पत्राचा

एक पत्र भाग २


सोनम पत्र घेऊन अपर्णा जवळ येऊन बसली. सोनमने टीव्ही बंद केला. सोनमने टीव्ही बंद केल्यावर अपर्णा रागाने तिच्याकडे बघून म्हणाली,

"सोनम तुला टीव्ही बघायला आवडत नाही तर नको बघुस पण मला तर बघूदेत."


सोनम पत्राकडे बोट दाखवत म्हणाली," अपर्णा तुझ्या सिरिअल्स पेक्षा हे जास्त महत्त्वाचं आहे."


अपर्णा चिडून म्हणाली," तू अजून या पत्रातच अडकून बसली आहेस का?"


सोनम म्हणाली," अपर्णा पत्राच्या वर आईच नावं होतं तर पत्रात सुरवातीला प्रिय राधा असं लिहिलेलं होतं आणि हे पत्र एका स्त्रीने लिहिलं असेल एवढंच कळालं आहे. तिने या पत्रात असा उल्लेख केला आहे की आईने तिचं नाव बदललेलं आहे म्हणजे पहिले आईचं नाव राधा होतं आणि विशेष पत्राच्या शेवटी पत्र लिहिणाऱ्याचा पत्ता व फोन नंबर आहे पण नाव लिहिलेलं नाहीये. असं कोणी पत्र लिहितं का?"


अपर्णाने सोनमच्या हातातून पत्र घेतले व त्याच्यावर एक नजर फिरवली मग ती म्हणाली," अरे हो की इथे काकूंच नाव राधा असं लिहिलं आहे. तुला काकूंची जुनी मैत्रीण माहीत आहे का? तिनेच हे पाठवलं असेल. काकूंना फोन करुन विचार म्हणजे तुला सर्व काही कळेल."


सोनम म्हणाली," नाही अपर्णा आई मला काहीच सांगणार नाही कारण मी तिला भरपूर वेळा आमच्या नातेवाईकांबद्दल विचारलं होतं तेव्हा तिने आम्हाला कोणीच नातेवाईक नसल्याचं सांगितलं होतं आणि आताही ती मला खरं काही सांगेल याची मला शंका आहे. आपण या पत्त्यावर जाऊयात का?"


यावर अपर्णा म्हणाली," आपण तिथे जाऊ शकतो पण जर एखाद्याने खोड करण्यासाठी हे पत्र लिहिलं असेल तर?"


सोनम म्हणाली," तू डोक्यात असे विचार आणू नकोस. ह्या पत्त्यावर पोहोचायला आपल्याला दोन तास लागतील, दोघीजणी सोबत असू तर भीती वाटणार नाही. प्लिज आपण उद्या सकाळी जाऊयात का? हे पत्र कोणी व का पाठवलं आहे? हे मला जाणून घ्यायचं आहे."


अपर्णा म्हणाली," बरं ठीक आहे, आपण उद्या तिथे जाऊयात म्हणजे तुझ्या डोक्यात काही शंका राहणार नाही आणि तू माझं डोकं खाणार नाहीस."


दुसऱ्या दिवशी अपर्णा व सोनम तो पत्ता शोधत शोधत गेल्या. समोर एक मोठा आलिशान बंगला होता, त्या बंगल्यात घुसण्याची दोघींमध्ये हिंमत होत नव्हती. एखाद्या अनोळखी घरात जायचं कसं? हा विचार त्या करत होत्या. जवळजवळ पाच ते दहा मिनिटे त्या दोघीजणी बंगल्याच्या गेटजवळ उभ्या होत्या, तेवढ्यात एक मुलगा गेटमधून बाहेर येऊन म्हणाला,


" तुम्ही दोघी आमच्या घराजवळ उभ्या का आहात? आमच्या घरावर नजर ठेवून उभ्या आहात का? इथे सगळीकडे सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले आहेत. तुम्ही इथून लवकरात लवकर निघून जा नाहीतर मी पोलिसांना बोलावून घेईल."


सोनम घाबरत म्हणाली," दादा आमचा असा काही हेतू नाहीये, माझ्या आईसाठी एक पत्र आलं होतं आणि त्यात इथला पत्ता दिला असल्याने आम्ही इथे आलो आहोत."


सोनमने बोलता बोलता आपल्या हातातील पत्र त्या मुलाच्या हातात दिले तेव्हा त्याने ते पत्र बघितले व तो म्हणाला," तू राधा मावशीची मुलगी आहेस का?"


" माझ्या आईच नाव राधा नाहीये, तिचं नाव वैशाली निकम आहे." सोनमने उत्तर दिले.


तो मुलगा म्हणाला," तुम्ही दोघी घरात या, माझ्या आईला भेटा म्हणजे जो काही हा नावाचा गोंधळ आहे, तो मिटेल. माझा नाव कुणाल आहे, हे पत्र माझ्या आईने लिहिलं आहे."


कुणालच्या आईचा व सोनमच्या आईचा काय संबंध असेल? बघूया पुढील भागात…


©®Dr Supriya Dighe


0

🎭 Series Post

View all