Login

एक पत्र भाग ४

उलगडा एका पत्राचा

एक पत्र भाग ४


दुसऱ्या दिवशी अपर्णाच्या मामांकडून ते पत्र कोणत्या एरियातून आले आहे? हे समजले पण त्या एरियात सोनमच्या ओळखीचं कोणीच राहत नव्हतं म्हणून तिने याबद्दल सुषमाला फोन करुन विचारलं तर तिचंही त्या एरियात कोणीच ओळखीचं राहत नव्हतं. 


पुढील दोन दिवसांनंतर सोनमची आई गावावरुन परत आली, त्यावेळी सोनम ऑफिसला गेलेली होती. सोनम ऑफिस मधून आल्यावर आईने तिला विचारले," मी नसताना अपर्णा आपल्याकडे रहायला आली होती ना?"


"हम्मम." सोनम आईकडे न बघता उत्तर देऊन आपल्या रुममध्ये निघून गेली. सोनमचे काहीतरी बिनसलं असल्याचे आईला जाणवले होते.

सोनम आपल्यासोबत अशी तुटक का बोलत आहे? हे तिच्या आईला समजत नव्हते म्हणून ती सोनमच्या रुममध्ये जाऊन म्हणाली," सोनम तू माझ्याशी नीट बोलत का नाहीयेस? काय झालं? मी गावाला गेलेली तुला आवडलं नाही का?"


सोनम म्हणाली," आई ही राधा पाटील कोण आहे?"


सोनमच्या अचानक आलेल्या प्रश्नाने तिची आई थोडी गोंधळलीच पण ती तसं चेहऱ्यावर न दाखवता म्हणाली," कोण राधा पाटील? मी ह्या नावाच्या व्यक्तीला ओळखत नाही. आता तिचा काय संबंध?"


सोनम चिडून म्हणाली," आई अजून किती खोटं बोलणार आहेस. तू नसताना तुझ्या नावाने आपल्या घरी तुझ्या मोठ्या बहिणीचं म्हणजे सुषमा मावशीचं पत्र आलं होतं त्यात तुझ्या खऱ्या नावाचा उल्लेख होता."


त्यानंतर सोनमने न थांबता आपल्या आईला घडलेली पूर्ण हकीकत सांगितली. सोनमच्या आईचे डोळे पाणावले होते. सोनम शांत बसल्यावर तिची आई म्हणाली," मला माहीत आहे की, सुषमा ताईला ते पत्र कोणी पाठवलं असेल म्हणून. मी नाव का बदललं? किंवा मी तुझ्या पासून हे सगळं का लपवलं? या तुला पडलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे मी तुला देईल. त्याआधी तू सुषमा ताईला फोन करुन मी सांगते त्या पत्त्यावर बोलावून घे. आपण पण तिकडे जाऊयात म्हणजे ते पत्र कोणी पाठवले आहे हे सगळ्यांना कळेल पण ते पत्र अश्या रीतीने का पाठवले? हे मलाही ठाऊक नाही. हे पत्र एक सर्वांसाठीच रहस्य बनले आहे, आज ह्या रहस्याचा सर्वांसमोर पूर्ण उलगडाच करुयात."


सोनमने सुषमाला फोन करुन सर्व घडलेली हकीकत सांगितली व तिच्या आईने सांगितलेल्या पत्त्यावर ताबडतोब यायला सांगितले. सोनम व तिची आई दोघी पुढील काही वेळातच त्या पत्त्यावर पोहोचल्या. पुढील दहा मिनिटांत कुणाल व सुषमा हे दोघे तिथे पोहोचले. सुषमाला व्हीलचेअर वर बघून सोनमच्या आईच्या डोळयात पाणी आले.


"राधा इथे कोण राहतं?" सुषमाने सोनमच्या आईकडे बघून विचारलं.


"आपण आत जाऊयात, म्हणजे इथे कोण राहतं? हे तुला कळेल." सोनमच्या आईने उत्तर दिले.


घराचा दरवाजा बंद असल्याने सोनमच्या आईने दारावरची बेल वाजवली, दरवाजा उघडला गेला तेव्हा सोनमची आई म्हणाली," गौरव आत येऊ का?"


"या ना." गौरवने स्माईल देऊन सर्वांना आत येण्यास सांगितले. 


गौरवचं घर छोटं होतं, त्याच्या घरात बसण्यासाठी सोपा किंवा खुर्ची नव्हती. गौरवने सर्वांना बसण्यासाठी चटई टाकली. 

"राधा हा गौरव कोण आहे?" सुषमाने विचारले.


हा गौरव कोण होता? त्याने सुषमाला ते पत्र का पाठवलं होतं? राधाने तिचं नाव बदलून वैशाली का ठेवलं होतं? या सर्व प्रश्नांची उत्तरे बघूया पुढील भागात…


©®Dr Supriya Dighe


0

🎭 Series Post

View all