एक पत्र भाग ५ (अंतिम)
सुषमाने गौरव कोण आहे? हे विचारल्यावर गौरव म्हणाला,"आत्या मी माझी ओळख स्वतःच करुन देतो. माझ्या वडिलांचे नाव अविनाश होते, तुम्हाला आठवत असेल तर अविनाश नावाचा तुमचा एक भाऊ होता."
"अविनाश माझा भाऊ होता म्हणजे?" सुषमाने विचारले.
गौरव म्हणाला," मी लहान असतानाच माझे बाबा एक्सपायर झाले."
सुषमाने सोनमच्या आईकडे आश्चर्याने बघितले तेव्हा तिने मान हलवून होकार दिला. सुषमाच्या डोळ्यात पाणी तरळले. कुणाल गौरवकडे बघून म्हणाला, "गौरव मी कुणाल, मला एक सांग की, आमच्या घरी जे पत्र आलं होतं ते तू पाठवलं होतंस का? आणि का?"
गौरव म्हणाला," कुणाल दादा मी तुला ओळखतो. तू कोणत्या कॉलेजमध्ये होतास? आता काय करतो आहेस? हे सर्व मला माहीत आहे. सोनम ताई कुठे जॉब करते? हेही मला ठाऊक आहे. दादा तुमच्या घरी जे पत्र आलं होतं ते मीच पाठवलं होतं.
दादा तुला किंवा सोनम ताईला हे ठाऊक नसेल की माझे बाबा हे तुमचे सख्खे मामा होते. माझे बाबा लहानपणी अचानक आम्हाला सोडून गेल्यावर आई व मी एकटाच ह्या घरात उरलो होतो. मी लहान असल्यापासून मला वाटायचं की इतरांप्रमाणे आपल्याला भावंडे असावीत, नातेवाईक असावेत. माझ्या मामाकडच्यांबद्दल मला सर्व काही माहिती होते पण इकडच्या नातेवाईकांबद्दल फार काही माहिती नव्हते. बाबांच्या जुन्या सामानात एक वही व त्यात ह्या तिघा बहीण भावांचा एक जुना फोटो होता, त्या वहीत ह्या बहीण भावांची नावे लिहिलेली होती.
साधारण दोन तीन वर्षांपूर्वीची गोष्ट असेल, माझी व राधा आत्त्याची भेट झाली होती, तिने मला तिचं नाव वैशाली निकम असं सांगितलं होतं, त्यामुळे सुरवातीला माझा गोंधळ उडाला होता पण एक दिवस हिंमत करुन राधा आत्त्याला तिचा बाबांसोबत असलेला फोटो दाखवला तेव्हा आत्त्याने मला तिची खरी ओळख सांगितली पण आत्त्याने माझ्याकडून प्रॉमिस घेतलं होतं की ती तिचं खरं नाव मी कोणालाही सांगणार नाही असं.
काही दिवसांपूर्वी दादा तुझा फोटो सुषमा आत्त्यासोबत सोशल मीडियावर बघितला आणि तेव्हा मी मनापासून ठरवलं की आपल्या पहिल्या पिढीला एकत्र राहता आलं नाही तर काय झालं? निदान आपण तिघे तरी एकमेकांच्या संपर्कात राहुयात. ह्या बहीण भावांमध्ये कसेही संबंध असोत पण त्याचा परिणाम आपल्या नात्यावर होऊ द्यायचा नाही."
सोनम म्हणाली," तुझं म्हणणं अगदी बरोबर आहे, मलाही माझे नातेवाईक असावेत असं वाटायचं पण हे तिघे बहीण भाऊ एकमेकांच्या संपर्कात का नव्हते?"
सोनमची आई म्हणाली," या प्रश्नाचं उत्तर मी देते. आमचे वडील एक शिक्षक होते, ते अतिशय कडक स्वभावाचे, शिस्तीचे होते, त्यांच्यापुढे तोंडातून एकही शब्द काढण्याची आमच्या हिंमत नव्हती. आमच्यावर त्यांचा सतत धाक असायचा. आमच्या आयुष्याबद्दल आमचंही काही मत असेल, हे त्यांना मान्यच नव्हतं.
सुषमा ताईची दहावी झाली तेव्हाच तिच्या लग्नाबद्दल बोलणी सुरु केली होती, तिचं मत कोणी विचारात घेतलंच नाही पण त्याच काळात सुषमा ताईची व महेंद्रची ओळख झाली, ते वयाने ताईपेक्षा बरेच मोठे होते, त्यांनी रीतसर आमच्या वडिलांकडे येऊन ताईचा हात मागितला पण त्यांची जात आमच्यापेक्षा वेगळी असल्याने वडिलांनी लग्नाला नकार दिला मग काय पुढे काही दिवसांनी सुषमा ताई महेंद्र सोबत पळून गेली आणि ती नंतर घरी कधीच परतली नाही. नातेवाईकांमध्ये घराण्याच्या नावाची बदनामी झाली होती.
दुसऱ्या मुलीने आपलं नाव अजून धुळीत मिळवू नये म्हणून माझं लग्न वयाने मोठ्या असलेल्या, एका दारुड्या माणसासोबत लावून देण्यात आले होते, तो मला दररोज मारहाण, शिवीगाळ करायचा. दिवसेंदिवस माझी सहनशक्ती संपत चालली होती, त्यात सोनमचा जन्म झाला, त्या गोंडस बाळाकडे बघून जगण्याला हुरूप आला होता पण त्यात माझ्या नवऱ्याला मुलगी नको होती म्हणून तिला त्यांनी मारण्याचा प्रयत्न केला होता तेव्हा माझ्या सहनशक्तीचा अंत झाला होता म्हणून मी सोनमला घेऊन घराबाहेर पडले आणि इकडे दूर निघून आले, त्या लोकांना माझा शोध घेता येऊ नये म्हणून मी माझं नाव बदललं.
अविनाश दादाच्या बाबतीत सुद्धा असंच काही झालं असेल म्हणून तोही गावातून शहरात निघून आला असेल. असो गौरव तुझ्यामुळे आज मला माझी बहिण इतक्या वर्षांनी भेटली. आमच्या तिघांची इच्छा असूनही आम्ही एकत्र राहू शकलो नाही पण माझी अशी इच्छा आहे की तुम्ही तिघे इथून पुढे एकमेकांच्या सुखदुःखात कायम सोबत रहा."
कुणाल म्हणाला," राधा मावशी मी तुला शब्द देतो की आम्ही तिघे बहीण भाऊ कायम एकमेकांच्या संपर्कात राहू."
गौरवने पाठवलेल्या त्या एका निनावी पत्रामुळे सुषमा व राधा इतक्या वर्षांनी भेटल्या होत्या तसेच सोनम, गौरव व कुणालला आपले नातेवाईक भेटल्याचा आनंद झाला होता.
समाप्त.
©®Dr.Supriya Dighe
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा