एक पाऊस बलिदानाचा ! पार्ट 2

.

महाराज काही काळ सोमेश्वर तलावाजवळ गेले. उगवणारा सूर्य त्या तलावात स्वतःचे प्रतिबिंब पाडत होते. त्यामुळे ते तलाव विलक्षण चमकत होते. महाराजांची नजर त्या तलावाकडे खिळली.


" महाराणी सईबाई , तुम्हीही या तलावासारख्याच होत्या ना. शांत , स्वच्छ , निर्मळ. आमचे प्रतिबिंबच होत्या तुम्ही. खूप निष्ठुर आहोत ना आम्ही ? पत्नी मरणशय्येवर असताना तिचे डोके मांडीवर ठेवण्याऐवजी आणि हात हातात घेण्याऐवजी मोहिमेवर निघून गेलो. तुम्हीही कसल्या कर्तव्यनिष्ठ राणी. आमच्यामुळे हळवे न होणे. कर्तव्य बजावणे. अफजलास ठार करणे. ऐसे बोलून गेलात. मृत्यूनंतरही समाधीचेही दर्शन नाही केले. सतत मोहिमा आणि धावपळ. " महाराजांचे डोळे पाणावले.

पण छत्रपतींना आसवे कुठे असतात ? पाटील लगेच मुजरा करत पुढे आले. महाराजांची तंद्री भंग पावली. दाटलेली आसवे हवेत विरून गेली. जणू ईश्वराने ती आसवे स्वर्गात महाराणी सईबाईंपर्यंत पोहोचवण्यासाठी विचित्र योजना आखली असावी.

" महाराज , एक काम आहे. " पाटील म्हणाले.

" बोला पाटील. नेबापुरात काही समस्या ?" महाराजांनी विचारले.

" एका तरुणाला भरती व्हायचे होते लष्करात. पण तो न्हावी आहे. तरी शस्त्रे चालवतो. " पाटील म्हणाले.

" पाटीलबाबा , स्वराज्यात अठरापगड जातीच्या लोकांसाठी दारे सताड उघडी आहेत. आपण सर्व ह्या सह्याद्रीचे लेकरे. बोलवा त्याला. " महाराज म्हणाले.

तेवढ्यात शिवा घाबरतच पुढे आला. त्याने कसाबसा मुजरा केला. महाराजांसमोर तो थरथरु लागला. महाराजांनी त्याच्या दोन्ही खांद्यावर हात ठेवला.

" स्वराज्यासाठी रक्त सांडावे लागते. आमच्या येसाजी-तानाजीसारखी तलवार तळपावी लागेल. तयार आहेस ना ?" महाराजांनी विचारले.

" महाराज , तुम्ही गरीबाच्या खांद्यावर हात ठेवलात. जीवनाचे सार्थक झाले. शंभर हत्तीचे बळ आले अंगात. तपश्चर्या करणाऱ्या ऋषीला भगवंताचे दर्शन व्हावे ऐसे झाले. येसाजी-तानाजीसारखा फार पराक्रम करता येईल की नाही ठाऊक नाही पण राजासाठी मुंडके छाटावे लागले तरी मागेपुढे बघणार नाही. " शिवा म्हणाला.

" शाब्बास माझ्या नरमर्दा. " महाराजांनी शाबासकीची थाप दिली.

***

गोदा भाकरी थोपटत होती. तेवढ्यात दाराजवळून आवाज आला.

" ए बाई , तुझी झोपडी सरकारने जप्त केली आहे. " एक शेल्याने चेहरा झाकलेला मावळा म्हणाला.

गोदा उठली.

" शक्य नाही. शिवाजी राजे रयतेवर कधीच जुलुम करत नाहीत. तू कुणीतरी लबाड आहेस. मुकाट्याने मागे जायचे नाहीतर या कोलत्याने मुंडक छाटेन. स्वराज्यात चौरंगा होतो गुन्हा केला तर ठाव न्हाय का ?" गोदा हाती कोयता घेत म्हणाली.

" आता शोभतेस माझी कारभारीण. " शिवा शेला हटवत म्हणाला.

पतीला सैनिकाच्या वेषात पाहून गोदाचे नेत्रे पाणावली. शिवाने तिच्या खांद्यावर हात ठेवला.

" आता आपली सर्व स्वप्ने साकार होणार. मला दस्तुरखुद्द महाराज भेटले. " शिवा म्हणाला.

" काय म्हणता ? कसे दिसतात हो महाराज ?" गोदाने कुतूहलाने विचारले.

" हुबेहूब माझ्यासारखे. " शिवा म्हणाला.

" काही बी. " गोदा तोंड वाकडे करत म्हणाली.

" अग खर ग. तुला भेटवतोच एकदा. मग कळेल. " शिवा म्हणाला.

" कुठं आहेत महाराज ?" गोदाने विचारले.

" गरुड कुठं एकेठिकाणी राहत व्हय ? गेले मोहिमेवर. आपलं भाग्य थोर ते इथं राहिले. पावन झाली ही भूमी. " महाराजांचे चित्र डोळ्यासमोर उभे करत शिवा म्हणाला.

***

शिवा लष्करात भरती झाला. महाराज पुढच्या मोहिमेवर निघाले. पण आदिलशाही शांत बसणार होती का ? छे छे. अफजलखान संपला तरी आदिलशाही संपली नव्हती. बडी बेगमने तिचे डाव खेळायला सुरुवात केली. तिने औरंगजेबाला पत्र पाठवून मदतीची याचना केली. औरंगजेबाने त्याचा मामा शाहिस्तेखान याला दक्षिणेकडे पाठवले. स्वराज्यावर दोन्ही बाजूंनी संकटे आली. शाहिस्तेखान दिल्लीहून लाखभर सैन्य सोबत घेऊन चालून आला. इकडे विजापूरहून सिद्दी जौहर उर्फ सलाबतखान स्वराज्याचा घास गिळायला आला.

***

रात्रीचा प्रहर होता. एक पेटती मशाल टांगलेली होती. तिचा प्रकाश खोलीत सर्वत्र पसरला होता. बहिर्जी नाईक , नेतोजी पालकर , दस्तुरखुद्द महाराज आणि अनेक मंडळी जमली होती. समोर दक्खनचा नकाशा होता.

" नेतोजी.." महाराज उद्गारले.

" जी महाराज. " नेतोजी म्हणाले.

" सरनोबत म्हणून तुमची जबाबदारी आता वाढली आहे. स्वराज्यावर दोन्ही बाजूंनी संकट आले आहे. सिद्दी जौहर हा अफजलखानासारखा अहंकारी नाही. सावध वाटतो. शिस्तप्रिय वाटतो. शाहिस्तेखान आणि जौहर एकाच वेळी स्वराज्यात घुसले तर रयतेला त्रास होईल. म्हणून आम्ही जौहरचे आक्रमण सीमेवरच रोखण्याचे योजिले आहे. " महाराज म्हणाले.

" पन्हाळा ?" बहिर्जी सुचकतेने म्हणाले.

" होय. किल्ला बळकट आहे. मुबलक शिबंदीही आहे. वर पावसाळा आला की शत्रूंची कशी दाणादाण उडेल विचारु नका. " महाराज किंचीत हसले.

" खर हाय. याआधी रुस्तमे जमान असाच पाठ दाखवून पळून गेला. आमच्यासाठी काय सूचना ?" नेतोजीनी विचारले.

" तुम्ही फौज सोबत घेऊन विजापुरी मुलुखात धुमाकूळ घाला. हवं तर महाराजसाहेबांनाही सोबत घ्या. बेळगाव , धारवाड , विजापूरपावेतो मजल मारा. विजापूर घश्यात घाला. आज आमचे मोठे बंधू शंभूराजे जीवंत असते तर फार फार बरे झाले असते. अवघे दख्खन त्यांच्या पायाशी घालून आम्ही रामचंद्राचे लक्ष्मण झालो असतो. असो. विजापूर संकटात सापडले असताना सिद्दी जौहरचा बुद्धिभेद होईल. तो तिकडे सैन्य धाडेल. शाहिस्तेखानला आऊसाहेब टक्कर देतील. तुम्हीही फौज सदैव दक्ष ठेवा. वेढा फोडण्याची वेळ कधीही येऊ शकते. " महाराज म्हणाले.

" येऊ दे त्या जौहरला. चांगलाच धडा शिकवू. करनुलच्या शेराला सह्याद्रीच्या वाघांची जात दाखवू." बहिर्जी म्हणाले.

सर्वजण हसले. बैठक संपताच सर्वजण खोलीबाहेर पडले. बहिर्जीचे लक्ष पहाऱ्यावर असणाऱ्या शिवाकडे गेले.

" तुझं नाव काय ?" बहिर्जीने विचारले.

" शिवा काशिद. " शिवा उत्तरला.

" दिसायला हुबेहूब महाराजांसारखा आहेस. " बहिर्जी मिशीला पीळ मारत म्हणाले.

" जी सर्वजण असेच म्हणतात. पण महाराजांसारख दिसलं म्हणून कुणी महाराज बनत नाही. " शिवा हसत म्हणाला.

" नुसतं दिसत नाही. तर हुबेहूब नक्कल पण करतो महाराजांची. " बाजूलाच उभा असलेला गंगोजी म्हणाला.

" गप रे. " शिवा कुजबुजला.

" उद्या सकाळी भेट. गडाखालच्या सोमेश्वर मंदिरात." बहिर्जी म्हणाले.

सकाळी शिवा गडाखाली असलेल्या सोमेश्वर मंदिरात आला. सुरुवातीला तिथे कुणीच नव्हते. तेव्हा एका साधूच्या वेषात असलेल्या व्यक्तीने त्याला हाक मारली.

" महाराज. " शिवाने चरणस्पर्श केले.

इकडेतिकडे बघत तो साधू कुजबुजला.

" मी बहिर्जी. येणारा काळ अवघड आहे. तुझा चेहरा म्हाराजांसारखा दिसतो. जर कधी सोंग घेण्याची वेळ आली तर घेशील ? " बहिर्जीने विचारले.

" महाराजांच्या हितासाठी असेल तर जीवही द्यायला मागेपुढे बघणार नाही हा शिवा काशिद. " शिवा एकही क्षण न दवडता म्हणाला.

बहिर्जीने त्याच्या पाठीवर शाबासकीची थाप मारली.
मग शिवाला बहिर्जीने नेमून दिलेली माणसे रोज प्रशिक्षण देऊ लागली.

क्रमश...



🎭 Series Post

View all