***
राजा वेढ्यात अडकला असताना राजगडावर कारभार कोण चालवत होता ? तर राजांची सावली आणि माऊली असलेली थोर स्त्री राजमाता जिजाऊ.
" तानाजी , सुर्याजी तुम्ही गडावरून हजाराची फौज घ्या. शाहिस्तेखानाच्या फौजेच्या पिछाडीवर हल्ला करा आणि फौज सावध होण्याच्या आधीच फरार व्हा. कळू दे खानाला. स्वराज्याचा घास घेणे सोपे काम नव्हे. " राजमाता जिजाऊ म्हणाल्या.
तानाजी आणि सुर्याजी मुजरा करून निघून गेले.
" बहिर्जी , पन्हाळा ते राजगड सर्वत्र हेर पेरा. प्रत्येक खबर पोहोचली पाहिजे. " राजमाता जिजाऊ म्हणाल्या.
" जी. जशी आज्ञा. " बहिर्जी मुजरा करून निघून गेला.
मागे उभ्या असलेल्या महाराणी पुतळाबाई हे सर्व ऐकत होत्या. पाहत होत्या. त्या समोर आल्या. राजमाता जिजाऊ वळल्या.
" काय बघताय पुतळाबाई ?" राजमाता जिजाऊ यांनी विचारले.
" साक्षात जगदंबा. आऊसाहेब , राजे वेढ्यात अडकले असताना आपण एवढे धाडस कुठून आणता ?" महाराणी पुतळाबाईंनी कुतूहलाने विचारले.
" आणावे लागते पुतळाबाई. रयतेसाठी , स्वराज्यासाठी. हे स्वराज्य घडवणे म्हणजे अग्निदिव्य काम. शिवबा गरुड आहेत. आपण त्यांचे पंख बनायला हवे. त्यांच्या पायातले बंधन नाही. मुघलांना कळले पाहिजे की राजा वेढ्यात अडकला म्हणून स्वराज्य झुंजणार नाही ऐसे नाही. स्वराज्य झुंजणार. शेवटपर्यंत झुंजणार. " राजमाता जिजाऊ तेजस्वी मुखातून उद्गारल्या.
***
टोपीकर इंग्रजांनी डाव साधला. आता शिवाजी संपला असे समजून तोफखाना उभ्या केल्या. महाराजांचा संताप अनावर झाला. हे व्यापारी कालपर्यंत हाताचे चुंबने घेत होती ते आज ध्वज फडकवत आहेत ? पण ही वेळ नव्हती. महाराजांनी छापा टाकून तोफखाना निकामी करविल्या. इंग्रजांना धडा शिकवायचा होता. पण जौहर आणि खानाचा बंदोबस्त केल्यानंतर. मात्र दूरदृष्टी महाराजांना कपटी इंग्रजांच्या डोळ्यात भरतभूमी जिंकण्याची लालसा कळली असेल यात शंका नाही.
***
दिवस जात होते. सिद्दी वेढा उठवायला तयार होत नव्हता. उलट त्याने वेढा अधिकच कडक केला. तिकडे राजगडावर आऊसाहेब बेचैन झाल्या. अफजलवधानंतर एक वर्ष होऊनही या मायलेकराची भेट नव्हती. शेवटी आऊसाहेबांनी स्वतःच शस्त्र धारण केली. अंगावर चिलखत घातले. मस्तकावर शिरस्त्राण चढवले. कमरेवर तलवार बांधली. महाराणी सोयराबाई आणि महाराणी पुतळाबाई त्यांचा रौद्रावतार पाहून थरथरू लागल्या.
" आऊसाहेब , असे वेडे धाडस नका करू. तुम्हाला काही झाले तर आम्ही अनाथ होऊ. " महाराणी पुतळाबाई पदर तोंडावर ठेवत हुंदका देत म्हणाल्या.
" वेडे धाडस ? आम्ही सिंदखेडच्या लघुजीराव जाधवांची लेक आहोत. क्षात्रतेज रक्तात आहे. आज त्या सिद्दीला कळेल की सह्याद्रीच्या लेकींच्या हाती तलवार येते तेव्हा ती कशी तळपते ते. " आऊसाहेब गर्जल्या.
" आजीसाहेब , आम्हीही येतो आपल्यासोबत वेढा फोडायला. " अवघ्या तीनचार वर्षाचे युवराज शंभूराजे म्हणाले.
आऊसाहेब थांबल्या. महाराणी सोयराबाईंचा जीव भांड्यात पडला. वाटले आता वादळ शांत झाले. आजीचे नातवासमोर काही चालणार नाही. आऊसाहेब खाली गुडघ्यावर टेकल्या आणि शंभूराजेंच्या मऊ गालावर हात ठेवत म्हणाल्या ,
" बाळा , आम्ही जातो. तुम्ही इथेच थांबा. राजगडाचे रक्षण करायलाही कुणी मातब्बर हवे ना ?" आऊसाहेब म्हणाल्या.
युवराज शंभूराजे यांनी होकारार्थी मान हलवली. वादळ उठले. पुढे सरकले. पण समोर दोन सरदार मुजरे करत सामोरे गेले. कोण होते ते सरदार ? एक सरनोबत नेतोजी पालकर आणि दुसरे सिद्दी हिलाल.
" या. मुलूखगिरी करून आलात. आरती ओवाळा यांची. " आऊसाहेब म्हणाल्या.
" आऊसाहेब , महाराजांचाच हुकूम होता. " नेतोजी थरथरत म्हणाले.
" कुठे आहे तुमचा राजा ? सिद्दीने वेढा घातलाय. आता आम्हीच वेढा फोडतो आणि घेऊन येतो शिवबांना. " आऊसाहेब म्हणाल्या.
" नका आऊसाहेब. आम्ही असताना आपण ऐसे मोहिमेवर जाणार तर धिक्कार आहे या सरनोबत पदाचा आणि तलवारीचा. " आऊसाहेब म्हणाल्या.
" रेहम करे आऊसाहब. एक मौका दे. " सिद्दी हिलाल म्हणाले.
" आताच जातो आणि वेढा फोडून महाराजांना राजगडावर सुखरूप घेऊन येतो. तुम्ही शांत व्हा. " नेतोजी हात जोडून विनवणी करू लागले.
शांत ? भद्रकाली कधी शांत होते असुरांचे रक्त सांडल्यावाचून ? ही महिषासुरवर्धिनीही शांत झाली नव्हती. तिने तिची ऊर्जा दोन व्यक्तींमध्ये भरून त्यांना पाठवले होते खल निर्दालन करण्यासाठी. आऊसाहेबांनी स्वतः आरती केली आणि नेतोजी व सिद्दी हिलाल मोहिमेवर निघाले.
***
नेतोजी वादळाप्रमाणे आले. पण सिद्दी जौहर कसलेला सेनापती होता. तो थोडी वेढा सहजासहजी फोडू देणार होता. त्याची राजकीय गणिते वेगळी होती. त्याने यापूर्वीही आदिलशाहीत बंडाळी केली होती. तो कलंक पुसून त्याला आदिलशाहीचा सर्वात मानाचा सरदार बनायचा होता. त्यासाठी महाराजांना पकडणे अत्यावश्यक होते. सिद्दीने नेतोजीला वेढा फोडू दिला नाही. नेतोजीना माघार घ्यावी लागली. सिद्दी हिलाल यांनी तर त्यांचा पुत्र गमावला. इथे वाचकांनी नेतोजींच्या कर्तुत्वावर किंचितही शंका घेऊ नये. विजापूरपावेतो ते शाहिस्तेखानच्या फौजेवर नेतोजी सतत छापे टाकत होते. एकेठिकाणी तर ते जखमी झाले. फौज थकली होती. ऐन वक्तास महाराज शहाजीराजे आजारी पडले. नाहीतर विजापूरवर गाढवाचा नांगर फिरणार होता. केवढी क्रांती झाली असती. असो. इतिहासात जरतरला स्थान नसते. महाराजांची शेवटची आशाही मावळली.
***
" मला सोन्याच्या बांगड्या कधी देणारे ?" गोदाने विचारले.
" गोदा , अग कस सांगू तुला ? तो हैवान सिद्दी वेढा देऊन बसलाय. राजे नेहमी चिंतेत असतात. एकदा वेढा उठू दे. तुला दागिन्यांनी मढवतोच बघ. " शिवा म्हणाला.
" हम्म. ही खीर केली होती राजासाठी. द्या ना. " गोदा म्हणाली.
" खुळी झाली का गोदा तू ? राजे आपल्या घरची खीर कशी खाणार ?"
" तुम्ही द्या तर. म्या चांगलं ओळखते राजासनी. रयतेवर लई माया करतो. इतके दिवस वेढ्यात अडकले. त्यांना बी घरची चव हवी असलं. खीर खाऊन थोडं बर वाटल. " गोदा खीर डब्ब्यात बांधत म्हणाली.
" बरं. देतो. गोदा , यापुढे इथं यायला जमणार नाही. वेढा खूप घट्ट आहे. मुंगीलाही वाव नाही. काळजी घे. ज्योतीबाला सांभाळ. त्याला मर्दमावळा बनवायचे आहे. जपून रहा. " शिवा म्हणाला.
" तुम्ही काळजी नका करू. सोमेश्वरला नवस मागितला आहे. राजे नक्की सुटतील वेढ्यातून. " गोदा म्हणाली.
शिवा उठला. अंगणात खेळणाऱ्या ज्योतिबाचे लाड केले. निघून गेला. गोदा पदराने हुंदके लपवत त्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघतच बसली.
क्रमश...
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा