एक सोन्याचा पिंजरा भाग 3
मागील भागात आपण पाहिले,सुधांशू सापडला. शरद आणि अक्षय त्याच्यापर्यंत पोहोचले. त्याची अवस्था पाहून त्यांना आश्चर्य वाटले. राजेंद्रकुमार बद्दल विचारल्यावर त्याने टाळाटाळ केली.नंतर अक्षय आपले कार्ड देऊन निघुन गेला. इकडे पवनकुमारचा पी. एम.रिपोर्ट आला होता. आता पाहूया पुढे.
सुधांशू सुन्न होऊन बसला होता. गेले पंचवीस वर्षे जपलेले रहस्य आज जगजाहीर करायचे होते. राजेंद्रकुमार तयार होईल का? कारण अक्षय काहीही झाले तरी त्यांना शोधून काढेलच.
सुधांशूने फोन लावला. राजेंद्रकुमारने फोन उचलला,"सुधा बोल,कसा आहेस?सगळे ठीक आहे ना?"
सुधांशू थांबून म्हणाला,"सर, पवनची बातमी ऐकली असेलच."
पलीकडे शांतता पसरली. काहीच आवाज येत नाही पाहून सुधांशू म्हणाला,"सर, ऐकताय ना?"
राजेंद्रकुमार म्हणाला,"हो,दुर्दैवाने हे सगळ थांबणार नाहीच. पैसा,ग्लॅमर सगळ्याची भुरळ मोठी असते."
सुधांशू म्हणाला,"सर,ह्यावेळी तपास इन्स्पेक्टर शरद करत आहे.या बरोबर अक्षय पाटील नावाचा पत्रकार पोरगा तुमचा शोध घेत आहे."
राजेंद्रकुमार गंभीर झाला,"सुधा,आता ते सगळ मागे पडल.नको त्या आठवणी."
सुधांशू म्हणाला,"सर, ए.जे.स्टुडिओची चौकशी होईल.त्यावेळी तुमचे नाव बाहेर येईलच.चुकीच्या पद्धतीने सगळे समोर येण्यापेक्षा तुम्ही स्वतःहून अक्षयला भेटा."
राजेंद्रने काहीच न बोलता फोन ठेवला.
इकडे मी सकाळी उठून बाहेर पडलो. पिंटो फर्नांडिसकडून काही माहिती नक्कीच मिळणार.
एवढ्यात शरदचा फोन आला,"पवनचा मृत्यू होण्याआधी त्याने ड्रगचा मोठा डोस घेतला होता. तो पूर्णपणे नशेत होता."
हे ऐकून मी किंचाळलो,"कसे शक्य आहे? अरे तो पार्टीत साधे सॉफ्ट ड्रिंक घेत नसे."
मी फोन ठेवला. खरच पवन अंमली पदार्थ घेत असेल? सद्या पिंटो भेटणे म्हत्वाचे होते. डोक्यातील विचार बाजूला सारून मी पिंटोच्या घराचा रस्ता पकडला.
बॉलिवूडमधील प्रत्येक गरम खबर सर्वात आधी छापणारा अशी त्याची ओळख होती. पुढे अनेक कलाकारांची आत्मचरित्रे लिहिली. तरीही एवढ्या पॉश एरियात एका पत्रकाराचा बंगला? मला यात काहीतरी पाणी मुरत आहे असा संशय होता. मी बंगल्याची बेल वाजवली.
बाहेरून दिसत होता त्याहीपेक्षा आतून बंगला भव्य आणि प्रशस्त होता. आत गेल्यावर मला बसायला सांगून नोकराने आत निरोप दिला. त्या रिकाम्या वेळात मी सगळीकडे नजर फिरवली. अक्षरशः श्रीमंती थाट होता.
मी हे सगळे पहात असतानाच पिंटो आला. त्याने हसुन म्हंटले,"एका पत्रकाराचा एवढा मोठा बंगला,तोही मुंबईत?असा प्रश्न आला ना मनात?"
मी हसलो आणि म्हणालो,"अगदीच असे नाही. वडिलोपार्जित असू शकते संपत्ती."
पिंटो हसला,"क्या बात?पहिल्यांदा कोणीतरी बरोबरीचे भेटले."
असे म्हणून त्याने मला बसायला सांगितले. समोरच्या प्रशस्त कोचावर तो आरामात बसला आणि म्हणाला,"बोल,काय माहिती हवीय राजेंद्रबद्दल?"
आता मात्र मी ओळखले की गाठ एका मुरलेल्या पत्रकाराशी आहे.
मी एकदम शांतपणे बोलायला सुरुवात केली,"राजेंद्रकुमारचे जास्तीत जास्त इंटरव्ह्यू तुम्ही घेतले आहेत. त्याच्या अनेक बातम्या तुम्ही सर्वप्रथम दिल्या. तर मग एक उदयाला येणार तारा अचानक लुप्त कसा झाला?"
पिंटो थोडा वेळ शांत बसला आणि मग बोलू लागला,"अक्षय,मी एक खानदानी ख्रिश्चन कुटुंबात झाला. ही जागा आमची वडिलोपार्जित..बंगला मात्र मी बांधला आहे..सुरुवातीला क्राईम स्टोरी हेच माझेही ध्येय होते. परंतु माझ्या फर्ड्या इंग्लिश आणि देखण्या व्यक्तिम्त्वामुळे मला सिने पत्रकारिता विभाग देण्यात आला. सुरुवातीला मला वाटायचे आता आपले आयुष्य फक्त नटांची लफडी आणि गरम पार्ट्या यातच जाणार. परंतु मित्रा सच्चा पत्रकार घटनेमागचे पाहू शकतो.सुरुवातीला पार्ट्या अटेंड करताना मला लक्षात आले की वर दिसते ते हिमनगाचे टोक आहे. खाली अख्खा पर्वत दडला आहे."
एवढे बोलून तो थांबला. त्याबरोबर मी पुढचा प्रश्न विचारला,"ए.जे.स्टुडिओ आणि राजेंद्रकुमार यांचे काय कनेक्शन आहे?"
पिंटोने सुस्कारा सोडला,"ए.जे.नावाच्या चक्रव्यूह भेदणे त्या शापित एंजलला जमले नाही. रादर तो चक्व्यूह आहे हे समजले तोवर राजेंद्र संपूर्ण अडकला होता."
आता माझी उत्सुकता जागी झाली होती,"म्हणजे कॅस्टिंग काउच?की त्याहून वेगळे काही?"
पिंटो बोलायला सुरू करणार एवढ्यात त्याला फोन आला. फोन ठेवल्यावर तो म्हणाला,"डॉक्टरकडे जायचे आहे. तू परत येऊ शकशील का?"
माझ्या नजरेतील प्रश्नचिन्ह वाचून तो म्हणाला,"मित्रा,आता लपवायचे काहीही नाहीय. सगळे सांगणार फक्त ह्या भेटी इथून पुढे वेगळ्या कारणाने होतील. तू पिंटो वर स्टोरी करतोय.तुझ्या चॅनलवर कळवून टाक.
पिंटो वेगाने निघून गेला. जाताना त्याने मला आणि स्वतःला सुरक्षित ठेवायला केलेला उपाय पाहून मी मनोमन त्याला दाद दिली.
मी बाहेर पडताच शरदला फोन लावला,"इथून भरपूर माहिती मिळू शकते. भेटू या का?"
त्याने पत्ता पाठवला आणि दिलेल्या पत्त्यावर मी पोहोचलो. शरद म्हणाला,"आधी कॉफी आणि सँडविच मागव."
पी.एम.रिपोर्ट समोर ठेवत तो म्हणाला,"हे प्रकरण ए.जे.स्टुडिओसाठी सोपे असणार नाही. पवनकुमार उर्फ ब्रिजेश मिश्रा बिहार मधील राजकीय घराण्यातील आहे. कोणालाही सोडू नका अशा स्पष्ट ऑर्डर आहेत."
मी कॉफीचा घोट घेत म्हणालो,"त्या रात्री पार्टीचे फुटेज तपासले का?"
शरद म्हणाला,"माझ्या टीमने हे सगळ शंभर वेळा तपासले आहे."
शरद बोलत असताना त्याचा फोन वाजला,"हॅलो,काय?पोहाचतोच."
माझ्याकडे वळून म्हणाला,"अक्षय, पवनचा लॅपटॉप आणि मोबाईल मधून काही धागेदोरे मिळाले आहेत. तू चल सोबत तुला काही मदत होईल."
आम्ही पोहोचलो. शेफाली म्हणाली,"अक्की बेबी इकडे कुठे?"
तसा मी चिडलो,"शेफाली लवकरच क्राईमला परत येतो का नाही बघ."
तेवढ्यात समीर म्हणाला,"सर,मोबाईलच्या नोट्स मध्ये अनेक सांकेतिक नावे,हॉटेल्स रूम आणि पत्त्ते आहेत."
शेफाली म्हणाली,"सर,मी बाहेर जातेय."
ती बाहेर जाताच हसत शरद म्हणाला,"हिला काय झाले आता?"
तेव्हा समीरने व्हिडिओ लावला. मी डोळे फाडून पहात राहिलो. पवन अर्धवट नशेत असताना एका पुरुष मॉडेल बरोबर व्हिडिओ होता.
त्यानंतर अनेक लोकांना पैसे दिल्याच्या आणि घेतल्याच्या नोंदी होत्या.
मी हसत म्हणालो,"हे सगळ चालत तिकडे,गेले सहा महिने अनेक प्रकार पाहिलेत."
शरद म्हणाला,"आधी ड्रग कोणी दिले ते शोधायला पाहिजे."मी सगळ्यांचा निरोप घेऊन बाहेर पडलो.
घरी आलो तेव्हा रात्रीचे बारा वाजले होते.आता झोपायचे होते.
इतक्यात एका अनोळखी नंबर वरून फोन आला,"सुधांशू बोलतोय. राजेंद्रकुमार भेटायला तयार आहे. उद्या सकाळी मला भेट. त्यानंतर मी घेऊन जातो."
आता मी प्रचंड उत्साहात होतो.मला दोन किंवा कदाचित तीन खमंग स्टोरी मिळणार होत्या.
पवनकुमार,राजेंद्रकुमार आणि पिंटो. वरवर प्रचंड यशस्वी असलेल्या तीन पुरुषांच्या जीवनाचा वेगळा पैलू माझ्यासमोर उलगडला जाणार होता.
ह्या तिघांंत काय सामान धागा असेल? शरद ह्यावेळी गुन्हेगारांना पकडू शकेल का? राजेंद्रकुमार कुठे असेल?
वाचत रहा.
एक सोन्याचा पिंजरा.
एक सोन्याचा पिंजरा.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा