रिमझिम गिरे सावन - एक सल -३
(विषय -खेळ नशिबाचा)
लेखिका - स्वाती बालूरकर, सखी
" अहो पण मी आता भिजले तर?" ती लाजून म्हणाली.
" विदुला, तुला आवडलं तर नक्की भीज पण भिजायला नको वाटलं तर खिडकीतून किमान पाऊस सोबत पाहू. त्यातही किती रोमँटिक वाटते हे मी तुला वेगळं सांगायला नको. तुझा नवरा बाकी तुझ्याशी रोमँटिक होता की नाही माहित नाही ."
" तुम्हाला सांगितलं नाही मी कधी पण . . .ते म्हणजे आमचे हे खूप रोमँटिक होते. . . . पण माझ्यासोबत नाही, त्यांच्या गर्लफ्रेंड सोबत! . . आणि म्हणून तर मला आणि मनूला, आम्हाला वेगळं राहावं लागलं. दहा वर्षे झाले कौशिक, नोकरीच्या बळावर एकटीने अर्ध आयुष्य काढलं. मुलगी सॉफ्टवेअर इंजिनियर झाली आणि मी स्वेच्छा निवृत्ती घेऊन घरी बसले."
"म्हणूनच म्हणतो . . . ये! अगं पावसाचा जोर खूप वाढला आहे बघ इकडे. कर ना बुकिंग, एकदाच भेटू ." तो आज का कुणास ठाऊक खूप आग्रह करत होता.
"म्हणूनच म्हणतो . . . ये! अगं पावसाचा जोर खूप वाढला आहे बघ इकडे. कर ना बुकिंग, एकदाच भेटू ." तो आज का कुणास ठाऊक खूप आग्रह करत होता.
"" पण मला भीती वाटते की ज्याप्रकारे गेल्या एक वर्षापासून आपण फक्त मेसेज मध्ये एकमेकांशी कनेक्ट आहोत, मग फोनवर बोलून मी तुम्हाला खूप चांगली ओळखते. अगदी तुम्ही खरं बोलताय, खोटं बोलताय, सगळं मला कळतं. . आपण इतक्या गोष्टी शेअर केल्या पण भेटणं म्हणजे?"
" विदुला, आपल्या बाकी सगळ्या आवडीनिवडी किती सारख्या आहेत , विचार जुळतात. मुळात एकमेकांसोबत खूप सुरक्षित वाटतं, नाही का! का देव अशा माणसांची गाठ घालत नाही ? मला माहित आहे . . तू मला भेटलीस की. . . . तुला परत जावं वाटणार नाही ,म्हणून तर भेटायचं टाळतेस नाही का?" आणि तो खळखळून हसला.
"अहो काहीही काय? इतका काय आत्मविश्वास स्वतःवरती!"
" अगं, मी तुला खूप छान ओळखायला लागलो आहे. खूपदा तू. . ' मी ठीक आहे' म्हणतेस त्यादिवशी तू कधी रडलेली असतेस, कधी उदास असतेस. सगळं कळतं मला इकडे, जाणवतं , फक्त तुझ्या आवाजावरून नाही, तुझ्या मेसेज लिहिण्याच्या पद्धतीवरून ही !"
" का अशी इतकी समजून घेणारी माणसं, आयुष्यात उशिरा भेटतात, मला कळत नाही ?" विदुला हताश होऊन म्हणाली.
" तोच तर राग माझा देवा वरती पण आहे. एकतर मला उशिरा जोडीदार दिला, ती जशी पण होती तिच्याशी मी संसार केला. पण ती कॅन्सरच्या दुखण्याने अर्धवट सोडून गेली आणि आता इतक्या उशीरा त्याने मला तुझ्याशी भेटवलं."
"माझी देवावर श्रद्धा आहे. देवाला जर आपल्याला भेटवायचं नसतं तर त्याने आता पण भेट घडवली नसती. त्यामुळे त्याच्या विरुद्ध मी काही ऐकून घेणार नाही. पण हो आपले काहीतरी ऋणानुबंध असतील, हे मात्र खरं."
"मागच्या जन्मात तुझा हात सुटला असेल का ग ,माझ्या हातातून! म्हणून तू भेटलीस आता."
" या जर तरच्या गोष्टी मला कळत नाहीत पण तुम्ही तुमच्या मुलाच्याच मना विरुद्ध जाऊन आता काही करणार नाही, कारण तुम्हाला तुमच्या सुखापेक्षा तुमची सामाजिक प्रतिष्ठा जास्त महत्वाची आहे हे मी जाणते. मी पण माझी मुलगी लग्नाची झाल्यावर आता दुसऱ्या जोडीदाराचा विचार करणार नाही हेही तितकच खरं आहे !"
"म्हणजे आपण दोघांनी देखील ही सल अशीच मनात घेऊन जगायचं आहे का? या श्रावणाच्या झडी सारखं पडत राहायचं आणि भिजत राहायचं, इतकच."
"ऐका ना कौशिक! अहो, इथे पण पाऊस सुरूच आहे. बाल्कनीतून पाऊस पाहिला, खूप छान वाटतंय मला. तुम्हीही तिकडे तुमच्या खिडकीतून पहा. पकोडे बनवाच मी पण थोडी कांदाभजी इकडे बनवते .आणि हो तुम्ही दोन कप चहा बनवा आणि मी दोन कप बनवते. सोबत पावसाची मजा घेऊ ."
" असं म्हणतेस? मग तो ,रिमझिम गिरे सावन, शूटिंगचा प्लॅन पुढच्या वर्षी पर्यंत पुढे ढकलूयात का?" आणि तो मस्त हसला.
इकडे विदुलाला देखील हसू आलं की किती सकारात्मक माणूस आहे.
" कौशिक असं नशिबात लिहिलं असेल तर आयुष्य असच काढूयात . उत्तरार्धात काय लागतं, मानसिक समाधान आणि मनाने आनंदी राहणं. म्हणजे अपेक्षा नकोत आणि गैरसमजही नकोत ."
" एक सांगू का? तुझं नाव तुझ्या आई-वडिलांनी विदुला अगदी बरोबर ठेवलं आहे. विद्वान स्त्रीच्या प्रेमात पडू नये हे मला आता कळालं , पण अगोदर कळालं नाही काय करणार? आता आलिया भोगासी !"
"आणि कौशिक तुम्ही या वयातही बोलण्या बोलण्यात कन्फेशन द्यायची कला तर या तरुण पोरांना पण जमणार नाही . . . !"
" मनात सगळं असूनही मर्यादे पोटी कशाचीच कबुली द्यायची नाही हे सोळा वर्षांच्या पोरीने तुझ्याकडून शिकावं." आणि दोघेही मनमोकळे हसले. तिने फोन ठेवला.
हातात चहाच कप घेऊन तो त्याच्या खिडकीतून पाऊस पाहत होता आणि ती तिच्या बाल्कनीतून , पण दोघेही एकमेकांची संगत अनुभवत होते. . . मनाने सोबत असले तरीही, प्रत्यक्ष सोबत नसलेली. . ती रिमझिम सावन . . अशी सल घेऊन!
समाप्त
©® स्वाती बालूरकर, सखी
दिनांक ०३.०२.२०२६
दिनांक ०३.०२.२०२६
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा