एक संसार असाही भाग..13
दयमंती ss त्याला सांग या घराचे दरवाजे तुझ्यासाठी कायम खुले आहेत.. तुझ्या कुटुंबाला घेऊन तू इकडे ये..” वसंतरावांना आता पुत्रविरहाचे दुःख सहन होत नव्हते.
“बाबा…! अजूनही रागावला अहात माझ्यावर?” प्रणव भरल्या कंठाने बोलला.
“ कोणता बाप इतके दिवस इतकी वर्ष आपल्या लेकरावर रागावून बसेल पोरा.. तूच आहेस या बापाला मेल्यावर आपल्या खांद्यावर घेऊन माझी शेवटची यात्रा करणारा…तूच आहेस रे माझ्या या देहाला अग्नी देणारा. कसा रागावू पोरा सांग कसा रागावू??”
“आहों..काय बोलत अहात?” वसंतरावांचे बोलणे दयमंती ताईंच्या जिव्हारी लागलं होतं.
“बाबा…असं अभद्र नका बोलू.. मला माहित होतं माझे बाबा कणखर आहेत. आपल्या मुलावरचे प्रेम ते समोर कोणालाही दाखवून देणार नाहीत. पण रोज तुम्ही माझ्या आठवणीत रडत होतात. खरं बोलतोय ना बाबा??” प्रणवचे बोलणे ऐकून वसंतराव चमकले.
“तू,,तुला कसं माहित?”
“बाबा तुमचा मुलगा आहे मी.. तुम्ही दुःखात आहात की सुखात याची जाणीव होत असते मला. तुम्ही माझ्या आठवणीत रोज रडायचा आणि मला इथे नकळत दुःख व्हायचं का ते नव्हते माहित.”
“प्रणव तू तुझ्या जागी अगदी बरोबर होतास.. मीच चूक केली माणसं ओळखायला. बहिणीवरच्या आंधळ्या प्रेमाला जवळ केलं अन् पोटच्या लेकराला मात्र दूर करत राहिलो…प्रणव मी गुन्हेगार आहे रे तुझा.” वसंतराव आपल्या चुकीचा पाढा वाचत होते.
“नाही बाबा…तुम्ही तुमच्या जागी बरोबर होता. आत्याने तुमच्याजवळ आपल्या मुलीसोबत माझं लग्न लाऊन द्यायचा हट्ट धरला नसता तर मला आपला देश, आपली माणसं आणि आपले घर सोडावे लागलेच नसते. खूप प्रेम करतोय बाबा मी तुमच्यावर.” प्रणव मनात साठवून ठेवलेले सगळे प्रेम आपल्या पित्यासमोर ओतत होता.
“प्रणव, एका गैरसमजुती मुळे आपली तुटलेली नाती,आपलं मोकळं झालेलं घर, आणि आपल्या नातवाला कडेवर घेण्याची अपूर्ण राहिलेली आस तुझ्या येण्याने भरून जाऊ दे…बाळा आता तरी सगळा राग,रुसवा बाजूला ठेऊन आपल्या घरी ये…” वसंत राव मनापासून बोलले.
“हो बाबा…मी लवकरच आपल्या घरी येईन. मलाही तुम्हा सगळ्यांच्या प्रेमात न्हाऊन निघायचं आहे…आईच्या हातचं पिठलं भाकरी खायची आहे.. आपल्या दामूच्या हातची खोबऱ्याच्या वडीची चव चाखायची आहे. बाबा! इथ सगळ मिळतं पण आपल्या माणसाच्या हातची चव कुठेच नाही भेटत.”
“खरं बोललास पोरा…आता पण बिन काहीही नाही माझ्या सुनेचे आणि नातवाचे पाय लवकरच या घराला लागू देत..” वसंतराव बोलले.
“हो बाबा लवकरच येईन मी.. पण दामू का बोलत नाहीय दोन दिवसापासून बघतोय ती फोन रिसिव्ह करतच नाहीय. काही प्रॉब्लेम तरी झाला नाही ना?”दोन दिवसापासून प्रणव दामिनीला फोन लावत होता. पण आपल्या नवऱ्याच्या विरहात तुडुंब बुडालेल्या दामिनीने कोणाच्याच फोनला प्रतिसाद दिला नव्हता. त्यामुळे तिचे नातेवाईक,भाऊ, सगळेच चिंतेत पडले होते.
“प्रणव ती तिच्या नवऱ्याशी वाद करून पंधरा दिवसापूर्वी माहेरी आलीय..” वसंतरावांनी सांगितलं.
“म्हणजे जिजूनी त्रास दिला की काय बघतोच त्यांना…”बहिणीच्या काळजीने प्रणव रागाने चवताळून उठलाच.
“अरे प्रणव असं काहीही नाहीय बाबा…खूप तुमच्याच बहिणीचीच चुकी आहे. एवढ्याशा कारणाने झालेल्या गैरसमजुतीने मॅडम नवऱ्याची लायकी काढून माहेरी येऊन बसल्या आहेत…”
“म्हणजे मला सविस्तर काय झालं आहे ते सांगा ना बाबा.” वसंतरावांचे बोलणे प्रणवला समजले नाही.
“सांगतो…” वसंतरावांनी सगळी हकीकत सांगितली. यावर प्रणवही हसू लागला. ह्योच नवरा पाहिजे म्हणून सोळा सोमवार व्रत करणारी आपली बहीण असं वागेल अस त्याला मुळीच वाटलं नव्हतं.
“बिचारे जिज्जू…या लक्ष्मीमुळे अधिकच धास्तावले असतील..”
“हो ना.. पण त्यांनीच सांगितलं आहे.. तुम्ही कोणी मुळीच मनवू नका म्हणून तिला जेंव्हा माझ्या प्रेमाची जाणीव होईल तेंव्हा ती स्वतःहून माझ्याकडे येईल. जितके दिवस राहायचे तेवढे दिवस खुशाल राहू दे…”
“अरे व्वा म्हणजे मॅडमनी सोळा सोमवार व्रत करून प्रत्यक्षात महादेवाला प्रसन्न केलंय तर.. इतका जीवापाड प्रेम करणारा नवरा आपल्या दामूला मिळालाय खरचं या माकडाला मानलं पाहिजेत..” प्रणव हसत हसत बोलत होता.
“होय बाबा…जावई मनासारखा मिळाला आहे. प्रेमळ तर आहेच पण खूप समजूतदारही आहेत.”
“हो ना…खूप भाग्यवान आहे आपली शेपू..”
“ गप्प रे गधड्या.. अजूनही तिला तू शेपुच बोलतो..?”
“हो, माझी लाडकी शेपू आहे ती…तिच्यामुळे तर शेपूची भाजी खाऊ लागलो आहे हल्ली मी.”
“अरे हो…आणि याच शेपुच्या भाजीमुळे ती वाद घालून माहेरी आलीय…तुला सांगतो प्रणव त्या दिवसापासून या पोरीने शेपूच्या भाजीला हात सुद्धा लावला नाहीये..” वसंतराव हसून हसून सांगत होते. खूप खुश होते आपल्या मुलाशी इतक्या वर्षांनी बोलताना.
“ बाबा! मी माझ्या घरी निघतेय…!” प्रणव आणि वसंत राव बोलत असतानाच दामूचा आवाज संपूर्ण हॉलभर गुंजला.
क्रमशः…..
माझ्या प्रिय वाचक मित्र मैत्रिणीचे मी मनापासून माफी मागते मी खूप दिवसांनी हा भाग पोस्ट करत आहे. खरतर माझ्या फोनने शेवटी टांग दिलीच आणि आजारी पडला. धड चार ओळी टाईप होईनात अशी अवस्था झालेली. त्यामुळे मनात नसतानाही मला भाग लिहून पोस्ट करणे जमले नाही त्याबद्दल क्षमस्व…