Login

एक संसार असाही भाग..15

संसार म्हणजे खेळ नव्हे...
एक संसार असाही भाग..15


“अमन..!” अस्पष्ट उच्चार दामिनीच्या तोंडातून बाहेर पडले.

“हो..”अमन अजूनही दामिनीच्या डोळ्यात हरवून गेला होता.

“तू.. म्ही..के.. न्हवा आलात?” अमन तिच्या इतका जवळ होता की, दोघात मुंगीला शिरायला देखील जागा नव्हती. त्याचे धडधड करणारे गरम श्वास तिला प्रकर्षाने जाणवत होते. तिचीही वेगळी अवस्था नव्हती. त्याच्या जवळ घेण्याने ती पूर्णपणे मोहरुन त्याच्यातच गुंतून गेलेली. आजूबाजूच्या वातावरणाचा तिला क्षणभर विसर पडलेला.आपण हॉल मधे आहोत हेही ती विसरून गेलेली. हॉलला लागून काही अंतरावर किचन होतं. किचन मध्ये खाली बसून वसंतराव आणि दयामंती ताई चकल्या बनवत होत्या त्यामुळे त्यांना त्यांचे जावई आल्याचे दिसले नव्हते.

“दामू..” अमनने हाक दिली. जी त्याच्या डोळ्यात आरपार गुतली होती.

“हम्म..” भानावर येत ती बोलली.

“ दामू.. पुरे ना गं हा रुसवा फुगवा.. मला तुझा विरह अजिबात सहन होत नाहीय. ” अमन मनापासून बोलत होता. अमन दामिनी वर जीवापाड प्रेम करत होता. लग्नानंतर देखील त्याचं प्रेम कमी झालेलं नव्हत. तर दिवसागणिक वाढतच होतं.

“ अमन.. आपण हॉल मध्ये आहोत.. आई बाबा आपल्याला असं बघून काय म्हणतील?” ती पूर्णपणे भानावर आली होती.

“ काय म्हणणार आहेत.. आपल्या बायकोला जावईबापूंनी मिठीत घेतलं आहे. इतकचं तर बोलतील ना.” अमन मिश्किलिने बोलला. तशी दामिनी लाजून चूर झाली. तिलाही त्याची मिठी हवीहवीशी वाटत होती. पण आपण हॉल मध्ये आहोत याची जाणीव होती तिला. जर का ते दोघे रूम मध्ये असते तर आतापर्यंत त्याच्या प्रेमाने ओठांचा ताबा कधीच मिळवला असता.


“अजून मुलगी फोनवरच बोलत आहे कार्टी जरा म्हणून मदत करणार नाही.. कसं होणार या पोरीचे? देव जाणे..”दयमंती ताई तणतणत दामिनीला बोलवण्यासाठी हॉल मधे येत होत्या. पण समोरचं दृश्य बघून त्या जागीच थबकल्या. त्यांनी हळू आवाजात वसंत रावांनाही बोलावलं. आपली बायको एवढ्या हळू आवाजात खाणाखुणा करून का बोलावते आहे हे जाणून घेण्यासाठी तेही घाईघाईत आले होते. कदाचित त्यांना आपल्या घरात साप बिप तरी आला नाही ना याची शंका आली होती. जेंव्हा त्यांचं समोर लक्ष गेलं तेंव्हा.. त्यांनी आपल्या शंकेला धूडकावून लावत समोर उभ्या असलेल्या त्या दोन्ही नाग नागीनीचा चाललेला रोमान्स पहात डोक्यावर हात मारून घेतलाच.

“या आजकालच्या मुलांना आजुबाजूच भान अजिबात नसते.. कुठेही चालू होतात.” दयमंती ताई पुटपुटल्याच.

“ हे काही आजकालच नाही ग .. आपल्या वेळेला देखील होतं. पण काय करणार.. आमच्या नशिबी आमच्या सासूबाई एवढ्या कडक भेटलेल्या..की आपल्याच बायकोकडे साधं बघायचाही आमच्यासाठी खूप मोठा गुन्हा होता. बरोबर ना?” वसंत रावांनी दयमंती ताईंना सणसणीत टोला लगावला होता. पण त्या आपल्या मुलीला रागात पहात असल्याने वसंत रावांचे बोलणे त्यांच्या डोक्यात घुसलेच नाही.

“हो..ना”

“पण नशीब किती चांगल आहे नाही का?” वसंतराव बोलले.

“कुणाचं??”

“आपल्या पोरांचं..”

“ ते कसं??”वसंतरावांचे बोलणे कदाचित दयमंती ताईंना समजले नव्हते.

“ किती प्रेम करणारे जोडीदार भेटले आहेत त्यांना…आणि आम्ही थोड जवळ आलो की लगेच आमच्या मदर इंडिया आणि सासूबाई इंडिया लगेच या ना त्या कारणाने हजर व्हायचाच बायकोला भेटायला देखील रात्री अपरात्री कारणे शोधावी लागायची तीही या दोघींच्या नजरा चुकवून..” वसंत राव आपल्या भूतकाळात जाऊन पोहचलेले आपल्याच तंद्रीत बोलत होते. तर त्यांच्या राणीसरकार त्यांच्याकडे तापलेल्या तव्यासारख्या लालेलाल होऊन पाहत होत्या.

“या पोरांना एक अक्कल नाही ते नाहीच…पण डोक्याचे केस पिकले तरी बाप अजून मोठा झाला नाही.. तुमच्यापुढे ना माझी नेहमीच हार होते. आता कृपा करून या दोघांना भानावर आणता का?? नाहीतर ही बिघडलेली पोरं काळ वेळ काहीही बघत नाहीत.. ते जाऊ दे मी काय म्हणते तिथले पातेले दया जरा..” दयमंती ताई रागारागात बोलत होत्या.

“ कशाला??” न समजून वसंत राव बोलले.

“आधी तुमचे मग तुमच्या लेकीचे डोके फोडायला..” दयमंती ताईंचा राग वाढत होता.

“ माझे का??” वसंतराव म्हणाले.

“ कारण या वयात तुम्हाला नाही ती थेर सुचू लागली आहेत.”

“ बरं बाई चुकलो झालं…माय माफी असावी.” वसंत राव माफी मागण्याची ॲक्टिंग करत बोलले.

“ते भांडं देता का आता??” वसंत रावांच्या थेराना कंटाळून दयमंती ताई बोलल्या.

वसंत रावांनी भितभित भांडे दयमंती ताईंच्या हातात दिलं. बिचारे वसंत राव आपल्या डोक्यावर हेल्मेट घालण्याचा विचार करत असतानाच दयमती ताईंनी भांडे जोरात जमिनीवर आपटले. त्याचा आवाज इतका मोठा होता की…एकमेकात गुंतलेले हे लैला मजनू धपकन भानावर आले..

“ भूकंप sss” भानावर आलेली दामिनी किंचाळली.

“ आई…भूकंप..!” ती पुढे बोलणार तोच डोळ्यात राग घेऊन तिच्याकडे पाहणाऱ्या दयमंती ताई तिच्या दृष्टीस पडल्या. आईचा राग बघून आपण कुठे फसलो याची तिला जाणीव झाली. आणि ती पटकन अमन पासून दूर झाली.

“ सासूबाई ss कशा अहात?” दयमंती ताईंच्या कानावर गोड आवाज पडला तशा त्या भानावर आल्या.

क्रमशः…..