एक संसार असाही भाग 16
“सासूबाई कशा अहात?” एक गोड आवाज कानावर पडला आणि आतापर्यंत रागात असलेल्या दयमंती ताईच्या चेहऱ्यावर स्मित पसरलं.
“ मी ठीक आहे जावईबापू .. तुम्ही कसे अहात?.” दयमंतीताई अमनच्या बोलण्यावर थोड्या गडबडल्या होत्या.
“ मी मस्त सासूबाई…आज घरभर घमघमाट सुटला आहे. काय बनवता अहात? काय विशेष आहे का आज?” चकलीच्या वासाने अमनचे लक्ष वेधले.
आतापर्यंत चकली तळणाऱ्या वसंत रावांना गरम तेलात टाकलेल्या चकल्याची आठवण आली. हळू आवाजात बोलवणाऱ्या आपल्या बायकोच्या हकेसरशी ते पळून आले होते. आणि समोरचे आपल्या नव्या दापत्याचे रोमँटिक दृश्य पाहून रागाने फणफणत असलेल्या आपल्या बायकोला मनवण्यात गुंतून गेलेल्या वसंत रावांना येताना आपण तेलात चकल्या सोडल्या होत्या ते आठवलं. तसे ते पळत पुन्हा किचन मध्ये गेले. पाहतात तो काय तेलात चकल्याचां कोळसा फिरत होता. तरी नशीब त्यांनी गॅस बारीक ठेवला होता. वसंत रावांना असं पळत जाताना पाहून बाकीचे तिघेही त्यांच्या मागून धावले. समोरच्या काळ्याकुट्ट चकल्या पाहताच दयमंती ताईंनी डोक्यावर हात मारून घेतला. तर अमन आणि दामिनी खो खो हसायला लागले. गरीब झालेले वसंतराव चिंताग्रस्त चेहरा करून आपल्या बायकोकडे पाहण्याचा केविलवाणा प्रयत्न करत होते. पण समोर उभ्या असलेल्या आपल्याच बायकोकडे पाहण्याचे धाडस काही केल्या त्यांच्याने होईना. त्यांची ती अवस्था बघून हे दोघे काय ते समजून गेले. अन् अमनने घसा खाकरला.
“ सासूबाई मला आता एक मसाले चहा मिळेल का? खूप मिस केलं आहे तुमच्या हाताच्या चहाला.”
“ हो.. का नाही. आलेच घेऊन तुम्ही गप्पा मारा तोवर. दामे चल माझ्याबरोबर.” दामिनी अमन आल्यापासून त्याच्यातच गुंतून गेली होती. त्यामुळे दयमंती ताईंनी तिला डोळे वटारून आपल्या सोबत येण्यास खुणावले.
“अमनराव कसं वाटलं बायकोला भेटून ?” हसत हसत वसंतरावानी विचारलं.
कसली भेट अन् कसलं काय? बायकोला क्षणभर मिठीत घेण्याचाही इथे गुन्हा अमन मनातच बोलत होता. त्यांचं लक्ष नाही हे बघून पुन्हा वसंत रावांनी हाक मारली.
“अमनराव.. अहो मी तुम्हाला काहीतरी विचारतोय?”
“ अं…हं बोला बाबा.” अमन बोलले.
“ बायकोला भेटायला अजून थोडा वेळ लागणार.. तोवर खाऊ पिऊन घ्या. कसं आहे न तुमच्या सासूबाई जरा तापल्या आहेत. त्यांना थंड करायला मलाच डोकं चालवावे लागेल.” वसंत रावांच्या बोलण्याचा रोख अमनना समजला तसे तेही हसू लागले. एवढे रोमँटिक सासरे मिळणे म्हणजे अमनसाठी पर्वणीच होती.
“बाबा.. मी आज दामिनिला घेऊन जाणार आहे.” अमन बोलले.
“ आज…अजिबात सोडणार नाहीत तुमच्या सासूबाई.. लेकीला तिखट गोडाची शिदोरी बांधून दिल्याशिवाय तुमच्या बायकोला माहेरचा उंबरा ओलांडता येणार नाही. तसा तुमच्या सासूबाईंचां नियम आहे बरं का!”वसंतराव म्हणाले.
“ म्हणजे?”
“ दामूच्या सासरी देण्यासाठी आताशा चकल्या झाल्यात अजून मॅडम लाडू करणार आहेत. ”
“हे हवंच का बाबा? सारे विकत मिळतं उगीच एवढा त्रास का करून घेतात सासूबाई.”
“अहो जवाईबापु लेकीला गोड धोड बनवून देणं म्हणजे प्रत्येक आईचं आवडीचं काम. बाकीची काम करताना या बायका शंभर दुखणी काढतील पण आपल्या लेकीला गोड धोड करून देण्यासाठी कुठून एवढी ताकत येते कुणास ठाउक.” वसंतराव आज खूप खुश दिसत होते. पण आतून आपल्या लेकीला सासरी पाठवायच्या जाणिवेने दुःखही होत होतं. त्यांची लेक जरी भांडून आली असली तरी स्वभावाने खूप गोड आणि प्रेतेकाला आपलंसं करण्याचा तिचा गुण सर्वानाच आवडत असे. आई वडिलांचं लाडकं शेंडेफळ आणि भावाची लाडकी शेपू लग्न झाल्यापासून आणखीन समजूतदार झाली होती.
दयमंती ताईंना एका गोष्टीची घाई झाली होती. ती म्हणजे दामूच्या घरी लवकरात लवकर पाळणा हलावा आणि हेच तिच्या सासूनेही बोलून दाखवलं होतं. नातवंडांना खेळण्यासाठी दोन्ही घरचे आज्जी आजोबा इच्छुक होते. पण अमन आणि दामूला एवढ्या लवकर चान्स घ्यायचा नव्हता. अजून एक वर्ष त्यांना एकमेकाच्या सहवासात घालवायचे होते. आणि तसे दोघांनीही आपापल्या घरी सांगून टाकलं होतं. त्यांचं बरोबरच.. कारण अमनची नोकरी अशी होती की तो कामानिमित्त आठ दहा दिवस बाहेरच असायचा. आणि घरी त्याचां जास्त वेळ आई वडिलांची ट्रीटमेंट घरच्या अनेक गरजा भागवण्यात जायचा. त्यामुळे दोघानाही अजून एक वर्ष मनमुराद जगायचं होतं. अस नव्हत की, घरी बाळ आले तर त्यांना वेळ मिळणार नव्हता. उलट घरातलं वातावरण अधिक प्रसन्न होणार होत.
नवरा बायकोला काय करायचं ते करू देत म्हणून बकीच्यानीही त्याकडे दुर्लक्ष केलं.
नवरा बायकोला काय करायचं ते करू देत म्हणून बकीच्यानीही त्याकडे दुर्लक्ष केलं.
“वाह!!” नाकात घमघमाट वास येताच अमन बोलले.
“ असा नाकात वास आल्यावर माणसाला स्वस्थ बसता येईल का?”
“नाही ना.. पण कसला वास येतोय?”
“तुमची लाडकी बायको बेसन भाजत आहे…लाडू साठी.”
“वाव्व!” अमनना बेसन लाडू खूप आवडायचे. म्हणून चकली, रवा लाडू, बेसन लाडू यांचा घाट घातला होता दयमंती ताईंनी.
क्रमशः….