Login

एक संसार असाही भाग १८

संसार म्हणजे खेळ नव्हे...
एक संसार असाही भाग १८


“अरे ऐक…” पण पलीकडून फोन बंद झाला होता.

फोन बंद होताच तो मोठमोठ्याने हसू लागला.

“प्रणव असे का हसत अहात?” गौरीने आश्चर्यचकित होऊन विचारलं.

“अमनवर हसतो आहे…फक्त पंधरा दिवस माझी बहीण जवळ नाही पण लेकाला अजिबात गमत नाहीय. त्यात सकाळपासून शेपूलां भेटायला साहेब तरसले आहेत. पण आईच्या धाकापुढे तीचही काही चालत नाही. त्यात लाडक्या लेकीला सासरी पाठवण्यासाठी आई साहेबांनी वेगवेगळ्या फराळाचा घाट घातलाय. बिचारी आईला मदत करण्यात व्यस्त असेल. आणि इकडे हे मित्र सरकार बायकोला मिठीत घ्यायला उतावीळ झालेत..” प्रणवच्या बोलण्यावर गौरीही मोठं मोठ्याने हसू लागली.


“लग्नानंतरचे दिवस खूप रोमँटिक असतात. त्यात जोडीदार जवळ असावा असं सतत वाटून जातं. नातं टिकवायला दोन मनाचं मिलन होणं तितकच गरजेचे आहे. नशीब माझी मॉम फ्री विचारसरणीची आहे नाहीतर आपलीही हीच गत असती.” गौरी प्रणवच्या मिठीत शिरत बोलली. तिकडे पहाटेचे तीन वाजले होते. आणि अजूनही प्रणव आपल्या घरच्यांशी बोलत जागाच होता. आधी वसंतराव बोलत नव्हते तेंव्हा तो रोज दुःखी असायचा. सतत आपल्या घरच्याची आठवण काढून रडायचा. गौरी त्याला नेहमी समजावून द्यायची. आज ना उद्या आपण नक्कीच आई बाबांना मनवू अस ती सांगायची. अन् आज तिची इच्छा पूर्ण झाली होती. आज कितीतरी वर्षांनी ती आपल्या नवऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद पहात होती.

“गौरी.. तुला एक बोलू?”

“बोला ना..!”

“आपल्या शेपुला…” त्याच बोलणं मधेच तोडत गौरी बोलली.

“प्रणव.. दामिनी नाव आहे तिचं.. किती वेळा सांगू तुला? इतकं गोड नाव ठेवलं आहे तुझ्या घरच्यांनी आणि तू मात्र तिला नेहमी शेपू का बोलतोस?”

“ तिला लहानपणापासून शेपू आवडते.. म्हणून मी तिला शेपू नाव ठेवलं. पण त्या नावाची इतकी सवय झालीय की.. दामिनी म्हणायला जीभ आडकळते माझी.”

“वेड्या बहिणीची वेडा भाऊ आहेस बघ..”

“तो तर आहेच ग…”

“ मला काय सांगणार होतास…सांग ना?”

“गौरी अमन माझा मित्र आहे. पण तो सैन्यदलात आहे हे मात्र अजूनही दामिनीला माहित नाही. उद्या समजल्यावर तीची अवस्था काय होईल. याची चिंता लागून राहिली आहे.

“म्हणजे…दमिनीला अमन दादा सैनिक आहेत हे अजूनही माहित नाही??”

“नाही ना…खरं सांगायचं तर अमन या लग्नाला तयार नव्हता. पण दामिनीने कॉलेजला असताना त्याला पाहिलं होतं. अन् त्याच्या प्रेमात पडल्या मॅडम. मग त्याला पहिल्यांदा पाहिल्या पासून कॉलेजचा एकही दिवस तिने चुकविला नाही. फक्त अमनला बघण्यासाठी मॅडम तरसत होत्या. कोणत्या ना कोणत्या का निमित्ताने आमच्या क्लास मध्ये तिचे येणे होत होते. आणि मग मला शंका येऊ लागली. एक दिवस ती आमच्या वर्गात आल्यानंतर मी तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव बघू लागलो. ती अमनकडे पाहून गालात हसत होती.. लाजत होती. मग मात्र मला कळून चुकलं की काहीतरी नक्की भानगड आहे.”

“ मग पुढे काय झालं? तुम्ही दामिनीला ओरडला का??” गौरीला अमन दामिनीची लव्ह स्टोरी जाणून घ्यायची होती.

“ तीन चार दिवस मी दोघांवर पाळत ठेवली. अमनच्या चेहऱ्यावर कोणतेच भाव नसायचे आणि हे आमचं येडं त्याच्याकडे बघून लाजायच काय…हसायचं काय…मध्येच डोळे मिटून मॅडम स्वप्नात डूबूनही जायच्या.”

“बाप रे…आजूबाजूला तिचं लक्ष असायचे की नाही?”

“अजिबात नाही.. मी समोर असतानाही मॅडम बेधडक अमनकडे पहायच्या…तेंव्हा मला अमन हळूच म्हणायचा.”

“काय म्हणायचे अमन दादा?”

“तुझ्या वेड्या बहिणीमुळे माझे हाल होणारेत रे बाबा आवर तिला…”

“ वेडी कुठली!” गौरीला हसू आवरता आवरेना..

क्रमशः….