Login

एक संसार असाही भाग २०

संसार म्हणजे खेळ नव्हे...
एक संसार असाही भाग २०


“बरोबर माझी बहिण कितीही अल्लड असली तरी ती अशी गल्फत कधीच करणार नाही. कदाचित याला काहीतरी कारण होते. नाहीतर आई बाबांना ही गोष्ट समजल्यावर तीची अवस्था शब्दात सांगणे कठीण होते.”

“ अमन दादा तुमची थट्टा करत असताना तुम्ही एवढे शांत कसे काय?”

“गौरी अमन माझा जिवलग मित्र होता. आमचे सगळे प्रॉब्लेम आम्ही एकमेकाशी अगदी मनापासून शेयर करायचो. कधी कधी हा माझा मित्र मला खूप आधार द्यायचा. आदिती (सुमेधा आत्याची मुलगी) तर माझा लहानपणापासून पिच्छा सोडत नव्हती. त्यात एवढी समजूतदार असणारी माझी बहीण असं वेड्यासारखी वागत होती. मग त्रास तर होणारच ना?” प्रणव बोलला.

“अमन दादा तुमचे मित्र होते..तेही जिवलग मग तुमच्या बहिणीने एका चांगल्या मुलाचीच निवड केली होती. कारण एका छप्परी मुलाशी नातं जोडण्यापेक्षा तुमचा मित्र कितीतरी श्रेष्ठ होता. तुम्ही राग न धरता होकार द्यायला हवं होतं.” गौरीला दामिनीचां निर्णय योग्य वाटत होता.

“ मला मान्य होतं गौरी. अमन माझा दोस्त म्हणून मला हे नातं मान्य होतं पण…अमनचे आर्मी ऑफिसर होण्याचे स्वप्न होतं. आणि आर्मीवाल्यांना घर आणि देशसेवा या दोन्ही भूमिका तटस्थ राहून सांभाळाव्या लागतात. देशासमोर कधी कधी आपल्या घरादाराला विसरावे लागते. त्यात त्यांना त्याची कर्तव्ये बाजूला सारून नाही चालत. त्यांना सतत देशसेवेत स्वतः ला झोकून द्यावे लागते. त्यामुळे घरी सतत चिंतेत असलेले कुटुंबीयांची अवस्था मी डोळ्यांनी पाहीली आहे. माझ्या दामिनीला सतत काळजीत आणि दुःखात मला लोटायच नव्हत. आणि जरी माझ्या मनात माझ्या मित्राने माझ्या बहिणीशी लग्न करावं अशी इच्छा असली तरी अमन मात्र माझ्या शब्दाच्या विरुद्ध होता. ”

“म्हणजे? मला नाही कळलं.”

“ गौरी…अमनलाही मुळात दामिनी आवडत होती. पण त्याच स्वप्न आणि दामिनी यांच्यात त्याला एकाची निवड करावी लागणार होती. जर त्याने दामिनीची निवड केली तरी तो आपल्या स्वप्नाला मुकणार होता. आणि स्वप्नांची निवड केली तर दामिनीला मुकणार होता. ”

“ मग पुढे काय झालं अमन दादांनी आर्मी केंव्हा जॉईन केली.”?

“ त्याच वर्षी त्याने आर्मी जॉईन केली. प्रशिक्षणासाठी तो नागपूरला गेला. त्यानंतर सहा महिन्यांनी तो मला भेटायला जेंव्हा आमच्या घरी आला होता. तेंव्हा त्याची बदललेली पर्सनलिटी पाहून आम्ही सर्वजण अवाक् झालो. पण तो आर्मी ऑफिसर झालाय हे फक्त बाबांना आणि मला दोघांनाच माहिती होतं.”

“ अमन दादांच्या घरी कोणालाच माहीत नव्हते का?” गौरी कुतूहलाने म्हणाली.

“अजूनही त्याच्या बाबा व्यतिरिक्त कोणालाच तो आर्मी ऑफिसर आहे हे माहीत नाही.”

“ कोणाला माहित नाही तर मग अमन दादा कर्तव्य कसे पार पाडतात…वेगवेगळ्या मिशन मधे कसे सहभागी होतात.?”

“ जेंव्हा त्याला बोलावणे येते तेंव्हा तो ऑफिसच्या कामासाठी म्हणून बाहेर पडतो. पण त्याच्या बाबांना सगळ खरं खरं सांगतो. तेही आपल्या मुलाला समजून घेतात. तो मिशन वर जाताना हातावर दही साखर ठेवून त्याला आशीर्वाद देतात.”

“ बाबांना सांगितलं पण त्यांनी आईला का बरं नाही सांगितलं?”

“ त्याचा लहानपणापासून देश सेवेकडे ओढा होता. शाळेत असताना तो सतत परेड बघायचा.. कधी कधी शाळेला दांडी मारून आमच्या शाळेच्या पुढे असणाऱ्या सैनिकी प्रशिक्षण केंद्राबाहेर उभे राहुन सैनिकांना दिले जाणारे प्रशिक्षण पहात बसायचा. आणि त्याच्या याच सवयीमुळे त्याची तक्रार घरी गेली. खूप ओरडा बसला इतकचं नव्हे त्याच्या आईने त्याचा जाब विचारल्यावर त्याने मला आर्मी मधे जायचं आहे अस सांगून टाकलं. तेंव्हा त्याला त्याच्या आईने घरातून बाहेर काढलं होतं. त्यात त्या खूप आजारी पडल्या. पुढे कधीही त्याने हा विषय आईजवळ काढला नाही..”