Login

एक संसार असाही भाग २३

संसार म्हणजे खेळ नव्हे
एक संसार असाही भाग २३

“तुम्ही त्यांना समजवायला जात अहात की त्यांचा रोमान्स बिघडवायला?”

वसंतराव दयमंती ताईंच्या बोलण्यावर जागीच थबकले.
बरोबर बोलत होत्या त्या. दोघानाही आता बोलण्यासाठी समजून घेण्यासाठी वेळ देणं आवश्यक होतं. नवरा बायकोमधले वादविवाद चार भिंतीच्या आतच असावेत. आणि त्याच भिंतीच्या आत त्यांनी ते सावरावे, कधी वादाची ठिणगी उडते अन् चांगल्या संसाराची वाट लाऊन जाते सांगता येत नाही. पण नवरा बायकोचं प्रेम इतकं दृढ असावं की, कितीही गैरसमज झाले तरी हाती घेतलेला हात कधी सुटता कामा नये.

“झोपून घ्या.. उशीर झाला आहे.” दयमंतीताईं डोळे झाकूनच बोलल्या.

“दयमंती .. मला थोड बोलायचं आहे.” वसंत रावांच्या बोलण्यावर दयमंतीताईंनी डोळे उघडले अन् बेडला उशी टेकवून बसल्या.

“बोला, काय बोलायचं आहे?”

“दयमंती आपल्या प्रणवला भारतात कायमचे वास्तव्य करायला लावलं तर? ”

“मलाही तेच वाटतं. बघू त्याचं मत सुद्धा विचारात घ्यायला हवं. त्याचं तिकडचं काम, घर सारे सोडून येईल का तो?”

“ माहित नाही. पण असं कायम आपल्या माणसांपासून, आपल्या घरापासून दूर राहण्यापेक्षा आपल्या देशात, माणसात तो राहिला तर खूप बरं वाटेल..” वसंतराव बोलले.

“तुमचं बरोबर आहे. पण आता तो एकटा नाहीय. त्याच्यासोबत त्याची जॉब करणारी बायको, मुलाचे शिक्षण आहे आणि त्याच्या जॉबचा देखील विचार करावा लागेल. मलाही खूप वाटतं की, तो आपल्या जवळ रहावा. पण तुमच्या बहिणीचा काही भरवसा नाही. कधीकधी त्या अतीच करतात. काय माहित प्रणवशी गोड बोलण्याच नाटक करून त्या आपल्या सुनेच्या आणि मुलाच्या नात्यात विष कालवून वाद निर्माण करणार नाहीत?” दयमंती ताई सारासार विचार करूनच बोलत होत्या. त्यांना त्यांच्या मुलाच्या गोड संसारात आता कोणतेच विघ्न नको होतं.

“ अग्, त्याला इथ थोडीच राहायला सांगतोय मी. तसाही आपला पुण्यातला आलिशान बंगला तसाच पडून आहे. त्यात त्याने आपला संसार थाटावा. आपलं काय आपण चार दिवस इथे चार दिवस तिथे राहू शकतोच ना. आणि सुमित्रा आता अजिबात विघ्न निर्माण करणार नाही. कारण अदितीचे लग्न झालं आहेच की, उगीच का ती आपल्या मुलाच्या संसारात विष कालवेल?” वसंतराव नेहमीप्रमाणे बोलून गेले.

सुमित्रा जरी चुकत असली तरी वसंतराव तिला आजपर्यंत समजून घेत होते. तिची एकुलती एक मुलगी तिला आपल्या मुलाला द्यायची होती. आणि आपल्या मुलाने तिला नकार दिल्यामुळेच ती खवळली होती.हे वसंतरावांना कळत होतं. प्रणव लंडनला गेल्यावर फक्त एकदाच ती आपल्या भावाला भेटायला आली होती. नाहीतर माहेरच्या माणसांशी असलेला संबंध तिने जवळजवळ तोडलाच होता. त्यात प्रणवने गौरीशी लग्न केल्यावर तर तिच्या मिस्टरनी तिला फोनवर बोलण्यास देखील बंधन घातलं होतं. असं असूनही दर रक्षाबंधनला आणि भाऊबीजेला वसंतराव स्वतः बहिणीच्या घरी जाऊन कर्तव्य निभावत असत. एकुलती एक बहिण त्यामुळे तिच्यावर त्यांचा खूप जीव होता. पण तिच्या आडमुठ्या वागण्यामुळे ती स्वतःच सगळ्यांपासून दूर गेली होती.

“हेच तुमचं बोलणं मला अजिबात पटत नाही. तुमच्या बहिणीमुळे आपला मुलगा आपल्यापासून दुरावला याचं तुम्हाला काहीच पडलेलं नाही. आजपर्यंत मुलासाठी रडत होतात. आता तो मुलगा जवळ येतोय तर तुम्हाला तुमच्या बहिणीलाही जवळ आणायचं आहे.” दयमंतीताई रागाने म्हणाल्या.

“अगं तसं नाही दयमंती… आता आपल्या मुलांचं बघ आपली दामू तिच्या माहेरच्या लोकांशी भांडली आणि तिने आपल्या घराशी संबंध तोडला तरीही आपला प्रणव तिला दूर करेल का? ” वसंतराव आपली बाजू समजावीत बोलले.

“ तुमच्या बहिणीसारखा आडमुठेपणा आपल्या दामुत अजिबात नाही. ती तुमची कॉपी आहे अगदी समजूतदार आणि प्रणव माझ्यावर गेलाय. त्याला नाती जपायला आवडतं. उगीच तुमच्या बहीण भावाचा संबंध माझ्या लेकरांशी जोडू नका.” शेवटी आईच होती ती. तिने चांगले संस्कार आपल्या लेकरांवर केलं होते. आणि त्यांच्या संस्काराना कोणी गागल बोट लावणार असतील तर ती का बरं खपवून घेईल?.

“माझ्या लेकरांशी??. तू विसरते आहेस दयमंती त्या लेकरांचा बाप आहे मी…आपल्या दोघांच्या प्रेमामुळेच तर ही कार्टी जगात आली आहेत. ” वसंतराव मिश्किलीने म्हणाले. तसे दयमंतीताई लाजल्याच कारण एखादे वाक्य जर वादाकडे सरकत असेल तर आपल्या मिश्किल बोलण्याने त्यावर पडदा कसा पाडायचा हे वसंत रावाना चांगलच ठाऊक होतं. म्हणून तर आजपर्यंत या उभयतांचे वैवाहिक जीवन सुखा समाधानात न्हाऊन निघत होते.

“ बरं तुम्ही म्हणाल तसं…चला झोपा आता.”

“ दयमंती…”

“अजून काय राहिलं?”

“आपली दामू आणि जवाईबापू झोपले असतील ना?” त्यांच्या बोलण्यावर दयमंतीताईंनी डोक्यावरच हात मारून घेतला. अन् उशी त्यांच्या दिशेने भिरकावली…