Login

एक संसार असाही भाग २४

संसार म्हणजे खेळ नव्हे..
एक संसार असाही भाग २४

“ दयमंती आपली दामू आणि जवाईबापु झोपले असतील का गं?”

वसंरावांच बोलणं ऐकून दयमंतीताईनी डोक्यावरच हात मारून घेतला आणि रागाने उशी वसंतरावांच्या अंगावर भिरकावली.

पुढे….

“किती काळजी करता ओ तुम्ही? अं अपल्या घरात याक्षणी फक्त आपण चौघेच आहोत. दामूची बेडरूम जरी वरच्या माळ्यावर असली तरी साधा पेन ग्लास पडला तरी आपल्याला ऐकायला येतं येतं की नई??”

“ हं..” वसंतरावांनी मुंडी हलवली.

“ अहो झोपा ना…आणि बाकीच्यानाही झोपू दया. तुम्हाला कितीवेळा…” त्यांचं बोलणं पूर्ण होण्याआधीच दमिनीचा कॉल वसंतरावांच्या फोनवर झळकला.

“पाहिलं आपली दामू झोपली नाही अजून…त्यांच्यात नक्कीच काहीतरी बिनसले आहे. तुला सांगत होतो ना…पण नाही मलाच मोठं मोठे लेक्चर देत होतेस. बघ बीचारीने फोन केलाय काहीतरी सिरियस नक्कीच असेल”.

वसंतरावांची काळजी त्या डोळ्यांनी पाहत होत्या. आपल्या लेकिवर जीव ओवाळून टाकत होते ते, त्यामुळे दयमंती ताईंना देखील आपण चुकीचे असल्याचे जाणवले. तरीपण आपल्या जावयावर त्यांचा विश्वास होता. एखादेवेळी दामिनी ऐकणार नाही पण अमन कोणाचे मन मोडणारे नव्हते. तसेच स्वभावाने प्रेमळ आणि समजूतदार होतेच. त्यामुळे त्यांनाही यांच्यात पुन्हा काय बिनसले की काय याची काळजी लागली.

“बाबा…तुम्ही झोपला नाही अजून? आईची तब्बेत बरी आहे ना? आज दिवसभरात खूप धावपळ केलीय बिचारीने आणि कामाच्या जास्त व्यापाने तर नेहमी तिचे पाय सुजतात. आईचे पाय तरी सुजले नाहीत ना?” फोन होल्डर वर असल्याने दामिनी काय काय बोलत होती ते दयमंतीताई देखील ऐकत होत्या. आपली लेक इतकी काळजी करते म्हणून त्यांचाही ऊर अभिमानाने भरून आला.

“दामू आईला झोप येत नव्हती म्हणून आम्ही गप्पा मारत बसलो होतो आणि गप्पा मारता मारता कधी झोपी गेली मलाही कळलं नाही..”

“बाबा.. तुम्ही पण ना आई झोपली असेल तर तुम्हीही झोपा उशीर झाला आहे.”

“हो झोपत होतो तोच तुझा फोन आला…काय ग् सगळ ठीक आहे ना? नाही म्हणजे इतक्या उशिराने मला फोन केलास म्हणजे काही प्रॉब्लेम तर नाही ना?”

“अहो,बाबा काहीही प्रॉब्लेम झालेला नाही. आमच्यात सगळ काही ठीक आहे काळजी नका करू. रूम मधल पाणी संपले होते. मला तहान लागली होती म्हणून मी पाणी न्यायला किचन मधे जात होते, तेंव्हा तुमच्या रूमची लाईट पेटलेली दिसली. मला वाटलं आईची तब्बेत बिघडली की काय.. म्हणून तुम्हाला फोन लावला. चला झोपा सकाळी आपल्याला लवकर उठायचं आहे. आणि हो आईला सकाळी अजिबात उठवू नका मी लवकर उठून सारे आवरून घेईल.”

“ठीक आहे…जा जाऊन झोप तूही शुभ रात्री ” वसंत रावांनी फोन बंद केला आणि समोर नाकपुड्या फुगवून हातात तलवार नाही नाही उशी घेऊन त्यांनी रागाने त्यांच्याकडे पाहणाऱ्या काली माते कडे पाहिलं. क्षणभर आपण पुढचा विचार न करता बोलून गेलो याचा पश्चाताप त्यांच्या चेहऱ्यावर साफ दिसत होता. आपण कुठे माती खाल्ली हे समजताच त्यांनी खाली पडलेली उशी उचलून बेडवर ठेवली आणि बसणार तोच बाजूने एक बॉम्ब त्यांच्या कानावर आदळला.

“ झालं ना…ठीक आहे तुमची लाडाची लेक.. मला माझ्या जावयावर पूर्ण विश्वास आहे. ते कधीच तुमच्या लेकीला…” त्या पुढे बोलणार तोच वसंत राव म्हणाले

“आपल्या लेकीला…बोल पुढे”

“तेच आपल्या लेकीला तळहातावरच्या फोडाप्रमाणे जपतील ते.”

“ बरं..”

“ इथूनपुढे तुमच्या लेकीला…. नाही आपल्या लेकीला बजावून ठेवा. नशिबाने चांगला नवरा मिळाला आहे. त्याला दूर करू नकोस, दुखवू नकोस, त्याच्या जिव्हारी लागेल असं वागू नकोस…” दयमंतीताई वसंत रावाना दामिनीला समजवायला सांगत होत्या.

“हे तू सांगितलं तरी चालेल ना..” लाडक्या लेकीला हे समजावून सांगणे या पित्याच्या जीवावर आलं होतं.

“मी जरा बोलली की, लगेच रडायला लागते तुमची लाडकी.”

“जरा प्रेमाने बोललीस तर ऐकेल ना.. नेहमी तिला ओरडत असतेस. प्रणव कितीही चुकू देत त्याच्या मात्र सगळ्या चुका हसत हसत पोटात घालतेस..”


“हो ना बरोबर…तो समजूतदार आहे. आणि ही पोरं मुलखाची हट्टी.”

“त्या पोरांचे जाऊ दे…आपल्या लग्ना आधी तू कशी होतेस सांगतेस का जरा.” विषय पुन्हा वाद निर्माण करण्याकडे जातोय म्हणून वसंत राव मधेच पिसकले.

“म् म मी…” दयामंती ताईंना आपले आधीचे दिवस आठवले अन् त्या भूतकाळात जाऊन पोहचल्या.