एक संसार असाही भाग २५
“त्या पोराचं जाऊ दे…आपल्या लग्नाआधी तू कशी होतेस सांगतेस का?” विषय वादाकडे वळतो आहे हे बघून वसंत रावांनी दयमंती ताईंचे लक्ष दुसरीकडे केंद्रीत केले.
“ म् ..म..मी” दयमंती ताई भूतकाळात जाऊन पोहचल्या.
पुढे…..
सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेलं पहिलं अपत्य…अगदी आई वडिलांचं लाडकं लेकरू.. कशाचीही कमी नाही. जे मागेल ते नेहमी हजर होई. आई वडील दोघेही सुशिक्षित दोघेही एका कंपनी मधे नोकरी करणारे असल्याने छोट्या दयमंतीला सांभाळायला घरी दयमंती च्याआईच्या वयाचीच एक मेड होती. त्यांचं खरं नाव मालती होतं. पण लहानगी दयमंती मात्र त्यांना माई म्हणायची. त्यांना एक मुलगी होती तिचं नाव होतं मीनाक्षी.
मीनाक्षी आणि दयमंती दोघीही एकत्रच लहानाच्या मोठ्या झालेल्या त्यामुळे दोघींची दाट मैत्री होती. मालती मात्र आपल्या लेकीला आपण गरीब आहोत याची वेळोवेळी जाणीव करून देत असायच्या आणि याच त्यांच्या कृतीने मीनाक्षी नेहमी आपल्या गरीब परिस्थितीचा सन्मान करायची. नेहमी दोघी एकत्र असल्यामुळे दयमंतीला जे जे दिलं जायचं ते ते मीनाक्षी लाही मिळायचे. पण नेहमी मिनाक्षी प्रामाणिकपने वस्तू घेण्यास नकार द्यायची. आणि मालतीला आपल्या लेकीचा अभिमान वाटायचा. दयमंतीचे सर्व शिक्षण मोठ्या स्कूल मधे पूर्ण झालं होतं. पण दयमंतीच्या हट्टाने का असेना मीनाक्षी देखील त्यांच्याबरोबरच मोठ्या स्कूल मधून शिकली होती. पुढे दयमंतीनी पुण्यातल्या नामांकित कॉलेजला ऍडमिशन घेतल अन् मीनाक्षीलाही घ्यायला भाग पाडले. मध्यंतरी दायमंतीच्या मॉम डॅडनी आपली स्वतः ची कंपनी सुरू केली होती.आणि दिवसेंदिवस कंपनीची भरभराट होत होती.
पुण्यातल्या कॉलेज मधेच वसंतराव देखील शिक्षण घेत होते. घरची हालाखीची परिस्थिती असल्याने ते सकाळी कॉलेज आणि दुपारी एका हॉटेल मध्ये काम करून कॉलेजची फी भरत होते. आठवड्यातून एक दिवस जी सुट्टी मिळायची त्याच सुट्टीचा आठवडाभराची कपडे, भाड्याने घेतलेल्या खोलीची साफसफाई आदी कामातच निघून जाई. रात्री उशिरा अभ्यास करून पहाटे तीन तासांची झोप पूर्ण करुन पुन्हा सकाळी सात वाजता कॉलेजला हजर व्हायचे. दुपारी बारा ते रात्री साडे अकरा वाजता ते खोलीवर परतत असत. ज्या हॉटेलात ते काम करायचे तिथे दुपार आणि रात्रीचे दोन टायमाचे जेवण मिळायचे तर सकाळी कॉलेजच्या कॅन्टीन मधे ते नाश्ता करायचे. एकाच कॉलेज मधे दोघेही शिकत होते. पण वसंतराव दयमंती ताईंना सिनियर होते.
कॉलेजचे दिवस म्हणजे तरुणाईचा कल अल्लड अवखळ वागण्यकडे असायचा. अनेक श्रीमंतांची मुलं त्या कॉलेज मधे शिकायला होती. श्रीमती पायाशी लोळण घेत असल्याने त्यांचे राहणीमान अगदी पॉश आणि बेधडक होते. कोणी कोणाच्या दुःखाचा कधीच विचार करायचे नाहीत. आपण आपल्या धुंदीत शिकायचं, मजेत राहायचं.. बस् इतकचं त्या मुलांना माहित होतं.
मुलं मुली अगदी बिनधास्त एकमेकांच्या हातात हात घालून फिरायचे. मैत्री आणि मैत्रीच्या पलीकडे प्रेमाचा अर्थ कळू लागलेली मुलं मुली नसत्या उचापत्या करण्यात माहीर होते. कॉलेजला आलेली ही मुल कॉलेजवर कमी कॅन्टीन आणि गार्डन मधेच जास्त वेळ घालवायची. बिघडलेली बड्या बापाची औलाद समजून शिक्षक देखील त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचे. अनेक वेळा त्यांच्या घरी तक्रारी करूनही सुधारणा होत नसल्याने शिक्षकांनी तो विषय सोडून दिलेला.
दयमंती जरी श्रीमंत घरातल्या असल्या तरी लहानपणा पासूनच मालतीच्या छत्र छायेत वाढल्याने तिच्यावर चांगले संस्कार झाले होते. सर्वांनी प्रेमाने राहणारी दायमंती श्रीमंत असूनही कोणत्याच वाया गेलेल्या तरुणीशी मैत्री करायची नाही. स्वभावाने प्रेमळ साध्या असलेल्या सर्व मुली दयमंतीसोबत असायच्या. आणि सर्वांचा मिळून एका सुंदर ग्रुप तयार झाला होता. बाकीच्या तरुणी मात्र मुलांच्या सोबत कॉलेज बाहेरच जास्तीत जास्त वेळ व्यतीत करायच्या.
वसंतरावांनी आपल्या परिस्थिती विरुद्ध कधीच पाऊल टाकले नव्हते. आपल्या संस्कारांना कधीच गालबोट लागू दिलेही नव्हते. त्यामुळे त्यांचे साधे सरळ राहणीमान अनेकांचा थट्टेचा विषय असायचा. पण कितीही थट्टा, टीका झाली तरी, आपली शांत संयमी प्रतिमा त्यांनी काळजापरी जपली होती. कधीच त्या प्रतिमेला छेद लागू दिला नव्हता. त्यामुळे कॉलेज मधल्या सर्वसामान्य विद्यार्थ्याचे आवडते सिनियर विद्यार्थी म्हणून परिचित होते. हुशार प्रेमळ असलेले वसंतराव सर्व शिक्षक वर्गाचे आवडते शिष्य होते. सर्व शिक्षकाना त्यांच्या शिकण्याच्या दृष्टिकोनाचे नेहमीच कौतुक वाटे.
सायन्स हा विषय दयमंतीना नेहमीच अवघड वाटायचा. विज्ञान शाखेची पदवी घेण्याचं दयमंतीच स्वप्न होतं. डॉक्टर होण्यासाठी तिची धडपड सुरू होती. पण घरचे वातावरण बिझनेसचे असल्यामुळे तिच्या स्वप्नांना नक्की पंख फुटण्याचे मार्ग अवघड होते. कारण त्यांनी इंजिनिअर होऊन आपल्या कंपनीकडे पाहावं ही त्यांच्या वडिलांची इच्छा होती. आपण विज्ञान शाखेची पदवी प्राप्त केल्यानंतर बिझनेसचे धडे घेण्याचे आश्वासन देऊन त्यांनी विज्ञान विषय घेतला. मीनाक्षी मात्र हिंदी विषयात पदवी घेणार होती. तशी ती सगळ्या विषयात फस्ट क्लास असल्याने शिक्षिका म्हणून कुठेही काम करण्याची तिने तयारी केली होती.
क्रमशः…
