“ बाबा !मी माझ्या घरी निघतेय..”दामिनीचा आवाज संपूर्ण हॉलभर गुंजला.
फोनवर बोलणारे बाप लेक दोघेही दामिनीच्या आवाजाने आश्चर्यचकित झाले. दामू ने आपलं बोलणे तर ऐकले नसेल ना? आणि म्हणूनच ती घर सोडून तर जात नाहीय ना? आपले बोलणे ऐकून तिला वाईट वाटलं असेल का? वसंतरावाना सगळ्या प्रश्नानी एकदमच घेरलं.. तिकडे फोनवर बोलणाऱ्या प्रणवची अवस्था देखील काही वेगळी नव्हती.
“काय झालं दामू??” असंख्य प्रश्न चेहऱ्यावर घेऊन आ वासून बघणाऱ्या वसंत रावांच्या कडे एकवार पाहून दयमंती ताई बोलल्या.
“ आई मला माझ्या घरी जायचं आहे…माझ्या सासरच्या लोकांची माफी मागायची आहे. अमन बघ ना..ते तर किती प्रेम करतात माझ्यावर.. आणि मी असा वेडेपणा करून इथ राहिले आहे. सासू सासरे तर लेक मानतात मला.. आणि माझा धाकटा दीर तर माझ्या दादुची उणीवही भासू देत नाही मला…” दामू भरल्या डोळ्यांनी बोलत होती. पण तिच्या बोलण्याने प्रणव मात्र रडु लागलेला. त्याच्या डोळ्यातले अश्रू आनंदाचे की दुःखाचे होते त्यालाच माहित नव्हतं.
“ दामू काय झालं…तुला कोणी बोललं का??” वसंत राव तिच्या मनात काय चालू आहे हे जाणून घेण्याच्या उद्देशाने बोलले.
“नाही बाबा…”
“मग? असा वेडेपणा का करत आहेस समजेल का?” दयमंती ताई म्हणाल्या.
“ आई माझ्या चुकीची मला खऱ्या अर्थाने जाणीव झालीय.. मला जायचं आहे माझ्या घरी.”
“ वेडी आहेस का दामू…कधीही यायचं, कधीही जायचं.. अस काही रीती रिवाज आहेत की नाही? जरी रागावून आली असलीस तरी आता माहेरहून तू जाणार आहेस.. आणि असं रिकाम्या हातांनी तुला पाठवलेलं शोबते का?? अहो बोला ना काहीतरी. हिला आता अक्कल आलीय पण हिला अस पाठवलं ना तर सासरची मंडळी खरोखर शेण घालतील आपल्या तोंडात.” दयमंती ताईंना अजिबात आवडलं नव्हतं.. लेकीने असं रिकाम्या हातांनीच सासरी जाणं.
“तू जरा शांत हो दयानंती..” वसंतराव बोलले.
“आई…आई…”पलीकडून प्रणवचा आवाज आला तसे वसंतराव भानावर आले. आपण फोन चालूच ठेऊन दामुशी बोलत आहोत हे लक्षात येताच त्यांनी कपाळावर हात मारला.
“थांब हा प्रणव मी आईकडे देतोय फोन..”
प्रणवच नाव ऐकताच दामिनीला आश्चर्य वाटलं.
“दादू sss ?”
“दादू sss ?”
“ हो प्रणव बोलतोय…घे तूही बोल.”
भलं मोठं आश्चर्य चेहऱ्यावर घेऊन वसंत रावांकडे पाहणाऱ्या दामिनीला वसंत रावांनी आपले दोन्ही हात पसरून मिठीत बोलावलं. शेवटी कितीही चुकली तरी पोटची लेकरं होती ती. एक लेकरू कोसो दूर होतं आणि एक समोर उभ होतं. त्याला आपल्या काळजाशी घट्ट पकडून उभा होता.
“बाबा…दादूला तुम्ही नक्की माफ केलं ना?” अजूनही दामूला विश्वास बसत नव्हता.
“हो ग राणी…माफ केलं आहे. आणि तुझा दादू लवकरच आपल्या घरी परत येणार आहे.” वसंतरावांनी आनंदाची बातमी आपल्या लाडक्या लेकीच्या कानावर घातली.
“काय ss!”
“हो..”
बोलणाऱ्या दयमंती ताईंच्या कानाचा फोन काढून घेत दामू घर भर फिरू लागली. आपल्या वडिलांनी आपल्या भावाला माफ केलं आणि तो आपल्याला भेटायला घरी येतोय याचा आनंद तिच्या चेहऱ्यावर साफ दिसत होता.
“काय मुलगी आहे ही…पोराशी मला धड बोलूही देत नाहीय.”दयमंती ताईंनी तोंड वाकडं केलं.
“दयमंती.. अग् तिला आपल्या भावाला मी माफ केलं याचा खूप आनंद झालाय.. पाहते आहेस ना? मघाशी किती तोंड पडलं होतं आणि आता बघ किती आनंद ओसंडून वाहतोय तिच्या चेहऱ्यावर.” वसंतराव दयमंती ताईंना जवळ घेत म्हणाले.
“आहों.. मला माझ्या मुलाशी अजून बोलायचं होतं ना..”
“रात्री पुन्हा करतो मी कॉल तू आता दामूच्या सासरी देण्यासाठी काहीतरी गोड बनव तिला तिच्या सासरी सोडून वहिनींना देखील पाहून येऊ..” वसंत राव म्हणाले.
“ठीक आहे.. करते पण कार्टीला एक चकली देणार नाहीय मी आधीच सांगून ठेवते..” दयमंती ताई तणतणत किचन मधे निघून गेल्या. अन् वसंत राव हसायला लागले.
“वेडी आहे ही…आणि हीची लेक पण! आरे ती माझीही लेक आहे म्हटलं.” वसंत राव स्वतः च्या डोक्यात टपली मारत बोलले.
दामिनी कितीतरी वेळ आपल्या लाडक्या दादूशी गप्पा मारत होती. हसत होती. मध्येच गंभीर होऊन ऐकत होती. किचन मधुन पालटणारे तिच्या चेहऱ्यावरचे हाव भाव दयमंती ताई आणि वसंतराव पहात होते जे आपल्या बायकोला चकल्या करायला मदत करत होते... तिचा हसरा चेहरा पाहून त्या माय बापाला समाधान वाटत होतं.
बघता बघता तास कसा निघून गेला कळलेच नाही. जेंव्हा नाकात चकलीचां घमघमाट वास येऊ लागला तसे ती भानावर आली. केंव्हापासून ती आपल्या भावाला झालेलं सगळ सांगत होती. प्रणव देखीलतिची समजूत काढत होता. सोबत गौरी देखील तिला संसारातील बारीक सारीक गोष्टी समजावून देत होती. आणि त्यांच्याशी बोलण्यात ती इतकी गुंतली होती की, केंव्हापासून तिच्याकडे एकटक बघणाऱ्या त्याला तिने पाहिलंही नव्हतं…फोन ठेऊन मागे वळली…मागे उभा असलेला तो मात्र तिच्यात हरवून गेला होता. त्याच्याही नकळत तो कधी तिच्या अगदी जवळ येऊन उभा राहिला त्यालाही कळलं नाही. ती मागे वळताच त्याने तिला आपल्या मिठीत ओढलं..अन् तिच्या तोंडातून अस्पष्ट उच्चार बाहेर पडले..
“अमन sss!”