Login

एक संस्कार असाही

एक संस्कार असाही
ओठांचा चंबू आणि शीळ वाजवत तो खुर्चीवर येऊन बसला.
" आई नाष्टा दे, कॉलेजला जायचं आहे."

" अरे झालच बघ दोन मिनिटात देते." गौरी म्हणाली.

तिने त्याची नस्तायची प्लेट त्याच्या समोर ठेवली. त्याची आई गौरी ने आज त्याच्या आवडीची थालीपीठ बनवली होती.

" आई हे ग काय बनवते ? मला नको हे. मला फ्रँकी बनवून दे." अनिश कुरकुरला.

" अरे आता हे खा. उद्या बनवते." गौरी ने समजावले. त्याने आई कडे बघितलं.' नाही ऐकणार माझं. माझ्या मनासारख कधीच नाही बनवणार ' अस पुटपुटत त्याने नाष्टा करायला सुरवात केली.

" आई मला नविन लॅपटॉप कधी घेउन देणार ? "
चहाचा घोट घेत त्याने आईला विचारले.

" हे बघ अनिश बाबांनी सांगितल आहे तू जो लॅपटॉप घ्यायचा म्हणत आहेस तो खूप महाग आहे. तर "

" तर काय आई ? "

" तु तूझ्या कडे असलेल्या लॅपटॉप वर काम कर. नंतर घेऊ." गौरी त्याला समजावत म्हणाली.

" आई काय ग हे तुझ, मला कॉलेज मध्ये प्रॉजेक्ट सबमिशन आहे. त्यासाठी मला जे व्हर्जन हवं आहे ते या लॅपटॉप मधे नाही."

" मग तू लॅपटॉप अपग्रेड करुन घे. या आधी पण एकदा तू लॅपटॉप अपग्रेड करुन घेतला होतास की."

" आई त्यावेळीं केलं पण या वेळीं ते जमण अवघड आहे. " अनिश म्हणाला.

" मग तु तुझ्या फ्रेंड कडे जावून प्रॉजेक्ट कर. तुझे तर खूप सारे मिञ आहेत."

" आई मी कॉलेज मधे जातो. मी नाही कोणत्या मित्राकडे प्रॉजेक्ट करण्यासाठी भीक मागणार " अनिश तडकून म्हणाला. त्याला ती कल्पना सहन झाली नाही.

' मला प्रॉजेक्ट करण्यासाठी तुमचा लॅपटॉप उधारी वर दया '

" अरे अस काय वागतो, अरे खरचं खुप महाग आहे तो लॅपटॉप. तितके पैसे नाहीत."

" आई मला लॅपटॉप हवाच आहे. नाहीतर मी कॉलेज मध्ये जाणारं नाही." तो चिडून म्हणाला.

" कॉलेजला नाही जाणारं म्हणजे ?"

" आई प्लिज. बास ना. मी जातो क्लासला." तो

" अनिश नीट सांग काय झालं ? इतक का रिॲक्ट होत आहेस. अरे तूझ्या कॉलेजची फि, क्लास फी,तुला बाईक घेतली त्याचे ईएमआय हे सगळ कोणा साठी करतो. तुझ भविष्य चांगलं असावं म्हणून ना " गौरी पण चिडली होती. मग थोडी शाब्दिक चकमक झाली. त्यात अनिश म्हणत होतं, जणू काही त्याच्या शिक्षणाचा खर्च उचलणं आमचं कर्तव्य आहे. तो जे शिक्षण घेत आहे ते आमच्यावर उपकार म्हणून घेत आहे.

" लॅपटॉप घेऊन दिला नाही तर कॉलेजला जाणारं नाही ?"

" तुला लाज नाहीं वाटतं बाबा कमावतात नी तुला शिकवतात. त्यापेक्षा तु कमव आणि शिक. त्यांना नसेल राग येत, नसेल त्यांना तुला शिकवायच तर बंद करून टाकते सगळं." गौरी पण चिडली होती.

" इंजिनियरिंग कॉलेजची फी परवडत नव्हती तर कशाला घालायचं या कॉलेज मध्ये." असं पुटपुटत तो आई कडे न बघता त्याच्या रुम मधे गेला.

गौरी पण चिडली होती. पण त्या पेक्षा अधिक, ती दुखावली गेली होती. नशीब आज तिचे मिस्टर घरी नव्हते. नाहीतर या बाप लेकाच्या खडाजंगी मध्ये तिचं पिसणं नक्की होत.

मनातला राग शांत करण्यासाठी ती बाहेर बाल्कनीत येऊन ऊभी राहिली. तर शेजारच्या बंगल्यात एक मुलगा शास्त्री आजोबांच्या सोबत बोलत होता. वयाने अनिश इतकाच होता. ती त्याला नेहमी बघत होती. शास्त्री आजोबांच्या घरी काही काम असेल तर तो यायचा.त्याच्या हातात इलेक्ट्रिशियन ची काळी बॅग होती. ती सावरत तो त्या बंगल्यातुन बाहेर आला. त्याची सायकल गौरीच्या बंगल्याच्या भिंतीला टेकुन लावली होती. तो ती बॅग सायकलला अडकावत होता. त्याला बघून गौरी ने त्याला हाक मारली.

" ए.. शुक शुक.."

" काय झालं मॅडम ? काही काम आहे का ? " आवाजाच्या दिशेनं बघत त्याने अदबीने विचारले.

" तु काय करतों रे ? म्हणजे शिक्षण वगेरे ?" तिने चाचपडत विचारलं.

" मी कॉलेज मध्ये जातो."

" काय शिकतो ?"

" इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये आहे. आता शेवटचं वर्ष आहे."

" कुठल्या कॉलेज मध्ये आहेस ? "

" सिनर्जी टेक इंजिनियरिंग कॉलेज." हे नाव ऐकल्यावर तिच्या भुवया उंचावल्या गेल्या.

हे या शहरातील टॉप चे कॉलेज होते. याचं कॉलेज मध्ये अनिश देखील शिकत होता. अनिशला या कॉलेज मध्ये अडमिशन घेताना पैसे मोजावे लागले होते. मग हा समोरचा मुलगा ? या कॉलेज मध्ये कसा ? मग तिने तिच्या मनातला प्रश्र्न विचारलाच.

" मग हे काम ? म्हणजे इलेक्ट्रिशियन ?"

" मी माझ्या शिक्षणाचा निम्मा खर्च स्वतः उचलतो."

" नोकरी वगेरे करतों का ? म्हणजे शिक्षण आणि नोकरी ? सगळं कसं जमणार ?"

" मॅडम सकाळीं दहा ते चार कॉलेज असते. सकाळी ही इलेक्ट्रिशियनची छोटी छोटी काम करतो.संध्याकाळी बारावी चे सायन्स आणि मॅथस चे टूशन घेतो. जमतात थोडे फार पैसे."

" मग अभ्यास कधी करतो ?"

" अभ्यास रात्री करतो."

" तुला राग नाही येत तुझे वडील तूझ्या शिक्षणाचे पैसे भरण्यात सक्षम नाही. तुला कधी वाटतं नाही शिकणं सोडून द्यावं ? कशाला दोन्ही गोष्टी करायच्या ?" गौरी ने कुतूहलाने विचारले.

" मला का वाईट वाटेल. मी शिकतो, कारण मला माझ भविष्य चांगलं असावं असं वाटतं. माझे वडील माझा शिक्षणाचा खर्च पेलू शकत नाही असं नाही. ते तर एक हाती पैसे देऊ शकतात. पण मला वाटतं माझ्या शिक्षणाचा खर्च मी उचलायला हवा. त्याशिवाय मला कष्ट म्हणजे काय हे सगळं कसं समजणार.

मी माझ्या शिक्षणाचा खर्च पेलू शकतो तर बाबांच्या कडे खर्च करायला पैसे कशाला मागायचे ?

मला नाही आवडत कुणापुढे हात पसरवायला."

तो शांत आवाजात म्हणाला. त्याचे विचार ऐकुन गौरी च्या भुवया उंचावल्या होत्या.

" मॅडम काही काम आहे का ? "

" न.. नाही." ती गडबडून म्हणली.

" मॅडम काही काम असेल तर नक्की सांगा. मी निघू का ? मला कॉलेजला जायला उशीर होत आहे." त्याने तिच्या कडे परवानगी मागितली.

ती काहीच बोलू शकली नाही. तो त्याच्या सायकल वर बसून निघून गेला. ती वळून बघते तर समोर अनिश उभा होता.

" आई बाबांना सांग माझ्या लॅपटॉप "

हे विचारायला आलेल्या अनिश ची पावलं जागेवरच थिजली होती. तो त्याची आई आणि त्या मुला सोबतच बोलणं ऐकत उभा होता.

" हा प्रथमेश इथ काय करतो ?"

" तु ओळखतो याला ?"

" हो. माझ्याच वर्गात आहे. युनिव्हर्सिटी मध्ये थर्ड रँक आहे त्याचा."

तो बोलून गेला. पण त्याची हिंमत होत नव्हती आईच्या नजरेला नजर देण्याची. तो नजर झुकवून बाहेर गेला.

त्या दिवसाच्या नंतर अनिश ने त्या दोघांच्या कडे नविन लॅपटॉप साठी हट्ट केला नाही. पण तो पूर्वी पेक्षा कसून अभ्यासाला मात्र लागला होता. कदाचित त्याला त्याची चूक समजली असेल.

मी सगळा खर्च नाही उचलू शकत, पण माझे स्वतः चे खर्च पेलण्यासाठी पैसे कमवण्या इतका सक्षम तर मी नक्कीच आहे ?

खरं आहे ना !

आपण पाश्चा्त्य संस्कृती चे अवलोकन करतों. ते फक्त पेहराव, त्यांचं मौज मजा करणं इतपत. पण त्याच संस्कृतींची दुसरी बाजू पण आहे. वयाच्या सोळाव्या वर्षा नंतर तो मुलगा त्यांचे मौज मजा करण्याचे खर्च स्वतः कष्ट करून कमावतो. त्यावेळीं त्याला कोणत्याही कामाची लाज वाटत नाही. त्याच्या विरुध्द परिस्थिती आहे इथं.

तुमचं काय मत आहे ?

समाप्त

© ® वेदा

कथा आवडल्यास कॉमेंट मध्ये सांगा.

या कथेचा वापर यू ट्यूब किंवा इतर कुठेही आढळून आल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.