एक शब्दबावरी (आत्मकथा)

This Is Small Blog About Myself
मी ऋचा निलिमा. म्हणजे माझे नाव ऋचा निलिमा. आता यावर बरेच जण बोलतात, हाऊ इस इट पॉसिबल व्हेन मराठी गर्ल हॅव टू नेम्स? तर माझे नाव एकच, ऋचा आणि निलिमा माझ्या आईचे नाव आहे हो. कारण माझे नाव स्वतःच्या आवडीने ऋचा ठेवण्यापासून ते मी चुकल्यावर मला बेअक्कल-मूर्ख-बावळट अशी नानाविध नावे ठेवण्याची जबाबदारी ती आज ही चोखपणे पार पाडत आहे, म्हणूनच माझे नाव ऋचा निलिमा आहे.

माझ्या लिखाणाची सुरूवात झाली तेव्हा अगदी चौथ्या इयत्तेत होते. आता चौथ्या इयत्तेत म्हणजे वयाची अवघी आठ वर्ष, खोटं वाटत असेल ना? पण हे खरंच आहे.

वर्गात बाईंनी माझी चुक नसताना मला शिक्षा केली होती. पहिल्या बाकावर बसणाऱ्या एका अबोल मुलीला शिक्षा म्हणून मागे जाऊन सबंध एक तास पूर्ण उभे राहण्याची शिक्षा दिली. ती जागा नेमकी खिडकीजवळ होती आणि खिडकीबाहेरच भल्यामोठ्या झाडावर दोन चिमण्यांची मारामारी सुरू होती, तेव्हा जे काही मनात आले ते मी माझ्या इवल्याशा मनातील भावना पेन्सिलने भराभर वहीवर मांडल्या. त्या निष्पाप मुलीचे भाव कागदावर चिमणाबाईच्या रूपाने कागदावर मांडले.


एक छोटी चिऊ, तिच्या घरट्यात पाढे लिहीत होती.
दुसर्‍याच घरट्यातली चिऊ, तिची वही खराब करत होती.
त्या चिऊ ने रागात वेड्या चिऊला, हलकेच धक्का दिला.
तेव्हा मोठी चिमणाबाई आली.
त्या चुक केलेल्या चिऊला जवळ घेऊन, माझ्यासारख्या गप्प चिऊला घरट्यातून बाहेर काढले.
तेव्हा तिचे घरटे तर तुटले पण बिचारी नुकतीच अंड्यातून आलेली पिल्ले खाली जाऊन आपटली.

नेमके हे सारे मी चुकून माझ्या गृहपाठाच्या वहीत लिहीले आणि दुसर्‍या दिवशी नेमकी ती वही बाईंकडे तपासायला म्हणून गेली. बाईंनी तेव्हा माझ्या लिखाणाचे आणि माझ्या अक्षराचे खूप कौतुक केले. दिवसेंदिवस अभ्यास आणि लिखाण सुरूच होते, नंतर सहावीत असताना माझ्या फळ्याची आत्मकथा या निबंधला पैकीच्या पैकी गुण मिळाले आणि बाईंनी निबंधाचा उल्लेख निबंध असा न करता 'काळ्या फळ्याची गोष्ट' असा केला, अशा प्रकारे माझी खऱ्या अर्थाने लिहायला सुरूवात झाली.

एक दिवस शालेय साहित्य प्रवण संमेलनात मी माझी स्वरचित कविता 'आई' कविता सादर केली आणि तिला पुन्हा सादर करण्यासाठी 'वन्स मोअर' असा प्रचंड प्रतिसाद मिळाला. आमच्या मुख्याध्यापिका बाईंनी मला बक्षिस म्हणून एक पेन दिले आहे जे मी अजूनही जपून वापरते. इंजिनीरिंगची विद्यार्थीनी असल्याने माझ्या भावना शब्दातून जरा जास्तच व्यक्त होत असतात.

मला जसे लेखन आवडते तसे वाचन पण खूप जास्त आवडते. मंगेश पाडगावकर, मधु मंगेश कर्णिक, अशोक नायगावकर, बालकवी असे कित्येक माझे आवडते लेखक आणि कवी आहेत. कवी ग्रेस यांच्याविषयीचा माझा आवडता खूप छान किस्सा आठवला, मी जेव्हा दादरला क्लासला जायचे तेव्हा घरी यायला उशीर व्हायचा, त्यातल्या त्यात घरी येण्यासाठी एकमेव स्लोऽ ट्रेन आसनगावच होती म्हणून मी ट्रेनमध्येच कधी अभ्यास करायचे, कधी कविता करायचे किंवा डुडल आर्ट करायचे. थोडक्यात प्रवासातला तो लवकर न सरणारी वेळ सत्कारणी लावण्याचा प्रयत्न करायचे.

त्या प्रवासात माझ्या शेजारी नेहमी एक काकू बसायच्या. एक दिवस त्यांनी स्वतःहून माझी कविता वाचण्यासाठी मागितली. कविता वाचल्यावर त्यांनी विचारले, "ग्रेस कवी' म्हणजे 'आरती प्रभू' किंवा व्यंकटेश माडगूळकर तुझे नातेवाईक आहेत का? तू त्यांची नातेवाईक आहेस का?"

मी त्यांना उत्तरले, "ह्या कवींची नावे मी आज पहिल्यांदा ऐकले आहे."

त्यावर काकू म्हणाल्या, "तुझ्या कवितेत त्यांची झलक दिसून येते, खास करून 'कवी ग्रेस' ह्यांची."

मी त्यावरून 'कवी ग्रेस' ह्यांची माहिती मिळवली आणि किती आभाळ ठेंगणं झालं म्हणुन सांगू!

त्यानंतर काकू मला पाच-सहा वेळा भेटल्या. दरवेळी त्यांनी मला 'ग्रेसची नात' आणि 'ग्रेसी' म्हणूनच हाक मारली. पण त्या नंतर काकू मला भेटल्याच नाहीत पण ' कवी ग्रेस' उर्फ आरती प्रभू पुस्तकाच्या रूपात माझ्या आयुष्यात आले.

आता मी त्यांचे लिखाण जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहे. त्यात माझ्या शब्दांनी मात्र मला पुरेपूर साथ दिली. माझ्या भावना शब्दात मांडून झाल्या आता स्टडी टेबलजवळ जाऊन तिथले शब्द आपलेसे करण्याचा प्रयत्न करते, नाहीतर आई नवीन नाव ठेवेल किंवा तिच्या हातचा फटक्यांचा प्रसाद खायला देईल.
®ऋचा निलिमा