Login

एक सोन्याचा पिंजरा भाग 8

राजेंद्र स्वतः ला विकायला तयार होईल का?

एक सोन्याचा पिंजरा भाग 8

मागील भागात आपण पाहिले की राजेंद्र कुमार आणि एका बड्या फिल्म निर्मात्याने कामाच्या बदल्यात दिलेली ऑफर. आता पाहू राजेंद्र त्यावर काय निर्णय घेईल? हा निर्णय त्याला कुठे घेऊन जाईल?


निर्मात्याने दिलेली ऑफर सांगून राजेंद्रकुमार क्षणभर मौन राहिले. खरे तर बॉलीवूड किंवा कार्पोरेट वर्ल्ड मध्ये हे सगळे सर्रास चालत असल्याचे मी पहात आणि ऐकत असूनही मला धक्का बसला.

तेवढ्यात सुधांशू म्हणाला,"अक्षय,जेवणाची वेळ झालीय.आपण थोडे थांबू."


मी मान हलवली आणि उठून बाहेर आलो.


इकडे इन्स्पेक्टर शरद शोध घेत होताच.

त्याचवेळी ज्या अभिनेत्याला शरदने कामगिरी सोपवली होती त्यांनी फोन केला,"सर,एक माहिती मिळाली आहे."

शरद म्हणाला,"काय आहे बातमी."


पलीकडून उत्तर आले,"पवन नेहमी एका विशिष्ट हॉटेलवर जायचा. त्याच्याबरोबर हिराचंद दमानिया असे."


बस शरदला धागा सापडला होता. हिराचंद दमानिया, ए.जे.स्टुडिओच्या मालकांपैकी एकाचा मुलगा. शरद आणि समीर ए. जे. स्टुडिओत जायला निघाले.

जाताना रीतसर परवानगी घेतली होती. शरद आणि समीर अर्धा तास बाहेर वाट पहात होते.


अर्ध्या तासाने एक मुलगा बाहेर आला,"सर तुम्हाला बोलावले आहे."

एका भव्य दालनात प्रवेश केला. हिराचंद दमानिया,गोरापान रंग,काळेभोर डोळे,फ्रेंच दाढी,कमावलेले शरीर आणि आत्मविश्वास.

शरदला बसायला सांगून तो म्हणाला,"द सुपरकॉप इन्स्पेक्टर शरद. आमच्याकडे काय काम काढलेत?"


शरद शांतपणे डोळ्यात पाहून बोलू लागला,"पवनकुमार तुमच्या स्टुडिओ बरोबर काम करणारा चौथा अभिनेता ज्याने आत्महत्या केली."


हिराचंद हसत म्हणाला,"इथले प्रेशर,स्पर्धा सगळ्यांना झेपत नाही. चार जण गेले पण उरलेले चाळीस आहेत यशस्वी."


शरद तितक्याच शांतपणे म्हणाला,"त्यातील कोणीही करार संपला की पुन्हा इथे काम करत नाही."


हिराचंद म्हणाला,"आम्ही मुळात नवे,फ्रेश चेहरे देत असतो. जुन्या लोकांना तशी भूमिका असेल तरच संधी दिली जाते."


हिराचंद दमानिया काहीही दाद लागू देत नव्हता. शरदने समीरकडे पाहिले. समीरने हॉटेलच्या एन्ट्री रजिस्टरचे कागद पुढे टाकले.


शरद शांतपणे म्हणाला,"यावर ब्रिजेश शर्मा असे नाव लिहिले आहे जे पवनचे खरे नाव आहे. आता तुम्ही बोलणार की सी. सी. टी. वी. फुटेज दाखवू."


आता हिराचंद दमानिया चेहऱ्यावरचा घाम पुसत म्हणाले,"आमच्या गुप्त बिझनेस मीटिंग तिथे होत असत. चित्रपट कथा किंवा इतर माहिती लीक होऊ नये यासाठी."


शरद नजर रोखून म्हणाला,"मिस्टर दमानिया,हेच कारण असेल तर चांगलेच. तसेही मी खरे शोधून कढेलच."


शरद आणि समीर बाहेर पडताच हिराचंद समोर ठेवलेला थंड पाण्याचा ग्लास संपूर्ण पिला आणि चेहऱ्यावरील घाम पुसत शांत बसला.


इकडे मी जेवण करून थोडे पाय मोकळे करायला बाहेर पडलो. इतक्यात मोबाईलवर नोटिफिकेशन आले. पिंटोवर हल्ला झाला होता. जवळपास सहा गोळ्या लागल्या होत्या.


इतकी भयानक बातमी ऐकून मला प्रचंड धक्का बसला.

मी धावत आत गेलो,"सुधांशू,मला निघावे लागेल. पिंटोवर हल्ला झालाय."


माझे वाक्य ऐकून राजेंद्रकुमार म्हणाले,"पिंटोवर हल्ला झाला म्हणजे नक्कीच काहीतरी घडले असणार. मला बाहेर पडायला मदत केलेल्या मोजक्या माणसात पिंटो होता."


तेवढ्यात शरदचा फोन आला,"जिथे असशील तिथेच थांब. पिंटोवर हल्ला त्याचे आत्मचरित्र येणार म्हणून झालेला असू शकेल. तसे असेल तर तुलाही धोका आहे."


मी फोन ठेवला आणि सुन्न होऊन सोफ्यावर बसलो.


माझ्यासमोर पाण्याचा ग्लास धरत राजेंद्र म्हणाले,"हे असे हल्ले खूप झालेत त्याच्यावर. होईल तो बरा."


ते जायला निघाले तेवढ्यात मी त्यांना म्हणालो,"तुमची हरकत नसेल तर पुढे सांगाल का?"


राजेंद्र बसताना हसले,"तुझ्यात मला तरुण पिंटो दिसतो.
पण त्याने केलेल्या चुका तू करू नकोस."


खाली बसून राजेंद्रने एक खोल निःश्वास टाकला.


मी घरी आल्यावर पूर्ण कोसळलो होतो. मला तो निर्माता त्याची ती ऑफर, भुषणकुमारचे हिनवणे सगळे डोक्यात फिरत होते.


तरीही दुसरे मन म्हणत होते,"परत जा. तू एक डॉक्टर आहेस. तिकडे चांगले काम केलेस तरी नाव होईल."


दुसरे मन मात्र हसत होते,"असा हसून परत जाणार का? काय हरकत आहे शरीर दिले तर. देहधर्म आहे."


पहिले मन म्हणाले,"असा? देह विकून तर वेश्या पैसा कमावते."


दुसरे मन म्हणाले,"स्वप्न गाठायची असतील तर तुला प्रयत्न करावेच लागतील."


मी निर्धाराने ते कार्ड हातात घेतले. त्यावरचा नंबर पब्लिक बूथ वरून फिरवला,"मी तयार आहे."


पलीकडून उत्तर आले,"आज संध्याकाळी गाडी येईल न्यायला."



मी पत्ता सांगून फोन ठेवला. संध्याकाळ झाली.एक मन मागे खेचत होते. परंतु पैसा,प्रसिध्दी,यांची नशा जिंकली. मी यांत्रिकपणे गाडीत जाऊन बसलो.


गाडी एका प्रसिद्ध जेंट्स पार्लर जवळ थांबली. त्यांनी माझे सगळे सोपस्कार केले. त्यानंतर अंगावर सगळे अवयव दिसतील इतके घट्ट कपडे घालून मला तयार केले.


गाडी एका आलिशान फार्म हाऊसवर थांबली. ड्रायव्हर निघून गेला. आता समोर होता एक दरवाजा जो माझे यशाचे मार्ग उघडणार होता.


राजेंद्र शांत झाले.त्यांच्या डोळ्यातून अश्रू ओघळले होते.


काय निर्णय असेल राजेंद्रचा? तो पुढे जाईल का? पिंटोवर हल्ला कोणी केला असेल? हिराचंद आणि पवन यांचे काय नाते असेल?

वाचत रहा.
एक सोन्याचा पिंजरा.
0

🎭 Series Post

View all