एका चाकावरचा संसार

Eka chakavarcha sansar

संसाराची दोन चाके अर्थातच पती आणि पत्नी, असं म्हणतात की संसाराचा गाडा सुरळीत चालू राहण्यासाठी ही दोन्ही चाके नीट असावीत कारण यातील एक जरी ढासळले ‌तर अख्ख्या संसाराची घडी विस्कटते.पण काहीजणांच्या बाबतीत असे घडले तर नवलच. आता असेच एक उदाहरण म्हणजे आमच्या शेजारच्या रेखाकाकू.
काकूंच्या माहेरची परिस्थिती तशी बेताचीच.शिक्षणही जेमतेमच तरीही त्यांच्या बाबांनी अगदी सुयोग्य वर बघून त्यांचे लग्न एका बँकेत नोकरीला असलेल्या रमेश काकांशी लावून दिले.
नवरा रमेश हा एका बँकेत नोकरीला होता.सुरूवातीला सगळे काही सुरळीत चालू होते पण तरीही कालांतराने काकांच्या काही गोष्टी तिला खटकत होत्या.हळूहळू तिला समजले की त्याला दारू पिणे, तंबाखू ,गुटखा खाणे, सिगारेट ओढणे, जुगार खेळणे अशी अनेक व्यसनं होती.
सुरूवातीला काकूंनी त्याला समजावण्याचा खूप प्रयत्न केला पण तो काही केल्या ऐकत नव्हता.रोज  काकूंना शिवीगाळ,मारहाण करायचा.शेवटी एका दिवशी पैशांच्या गैरव्यवहार प्रकरणी त्याला निलंबित करण्यात आले.
रेखा काकूंसमोर आता मात्र अगदी दुष्काळात तेरावा महिना अशी परिस्थिती निर्माण झाली होती.घरी अंथरुणाला खिळलेले सासू सासरे,त्यात दोन्ही मुलींच्या शिक्षणाचा खर्च आणि काकांच दारू पिऊन लिव्हरही खराब झालं होतं,म्हणावी तशी जमा अशी रक्कमही नव्हती कारण महाशयांनी सगळे पैसे उधळले होते.
आणि आता सध्याची परिस्थिती अशी आहे की एवढे घडूनही त्याला मात्र अजूनही अक्कल आलेली नाही.तो आतासुद्धा काकूंकडे पैसे मागतो, मारहाण करतो.खूप दिवसांपासून खटपट करून शेवटी काकूंना अंगणवाडीत मदतनीस म्हणून कामावर घेतले होते आणि त्याच तुटपुंज्या पगारात काकू उदरनिर्वाह करतात.
आता मात्र अख्ख्या संसाराची मदार काकूंच्या खांद्यावर आहे.सासूसासरे यांच्या औषधपाण्याचा‌ खर्च हा काकू करतात त्यातच दोन्ही मुलींच्या शिक्षणाचा खर्च.कारण मोठी रेवा बारावीत व लहान ओवी दहावीला असताना त्यांनी कुठल्याही खाजगी शिकवणीशिवाय नेहमीच अव्वल स्थान मिळवलं होतं आणि यातच काकूंना त्यांच्या कष्टाचे सार्थक झाल्यासारखे वाटते.अगदीच आईप्रमाणे दोन्ही मुली कष्टाळू, हुशार आणि समजूतदार आहेत.
काकू इतक्यातच थांबत नाहीत तर गावातील इतरही अनेक कामे करतात.जसे की काही घरची जेवण बनवणे, बारीक सारीक कामं करणे, वाती, पापड बनविणे, शिवणकाम करणे अशी कामे करतात.सकाळी चार वाजता सुरू होणारा काकूंचा दिवस रात्री उशिरापर्यंत संपतो.
एकीकडे काकूंची ही तारेवरची कसरत चालू असतानाच नवरा हा काकूंना शिवीगाळ  करतच असतो. हा संसार एका चाकावर चालविणारी रेखाकाकू नेहमी हसतमुख असते.तिच्या चेहऱ्यावर कसलाही ताण किंवा थकवा दिसत नाही.नेहमीच चेहऱ्यावर स्मितहास्य असलेल्या रेखा काकू मनानेसूद्धा खूप मनमिळाऊ आणि मायाळू आहेत.आपल्या या परिस्थितीचा दोष त्या कोणालाही देत नाहीत.
कोणत्याही गरीब किंवा गरजूंना त्या होईल तेवढी मदत करतात.
आपल्या समाजात अशी अनेक उदाहरणे आपण पाहतो ज्यात आपल्याला अशा अनेक रेखा काकू दिसतात की ज्या आपल्या संसाराचा गाडा एकाच चाकावर हाकताना दिसतात.ज्यांना सौभाग्य अर्थातच कुंकू हे फक्त नावालाच असतं म्हणजेच त्या पुरुष आणि स्त्री अशा दोन्ही प्रकारच्या भूमिका निभावतात.