Login

Eka Hatane Tali Vajat Nahi Part 3

Jalnd Lekhan Eka Hatane Tali Vajat Nahi Part 3
"एका हाताने टाळी वाजत नाही"
भाग- ३ (अंतिम)
​ताईच्या मनातला मत्सर आणखीनच वाढला होता. शशांक आणि सायलीचं लग्न खूप थाटामाटात झालं. वनिता आणि विनोदचे सायलीच्या आई-वडिलांशी जुळलेले मैत्रीपूर्ण संबंध, सगळे कार्य आनंदानं आणि खेळामेळीनं पार पडण्यासाठी कारणीभूत ठरले. पण ताईचा या सगळ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन मात्र वेगळाच होता.
​तिला वाटायचं, "वनिता, तुला सून चांगली मिळाली. शशांकला सासुरवाडी गर्भश्रीमंत मिळाली. माझं कर्म! मला ना माझं सासर धड, ना नवरा, आणि आता सून पण तशीच! तुझं सगळं कसं छान ग... सासर छान, नवरा तुझ्या मुठीत, मुलगा तुझं ऐकतो." असे ती नेहमी वनिताला बोलून दाखवायची.
​मग खूपदा वनिता तिला चिडून म्हणाली, "अगं ताई, तू माझी मोठी बहीण आहेस की सवत? अगदी सगळ्या गोष्टीत तुझा सवती मत्सर! एवढा मत्सर बरा नव्हे ग! अगं, स्वभाव बदल तुझा. तुझ्या लग्नाला आता तीस वर्षे झाली, भाऊजींच्या स्वभावाला तूच खतपाणी घातलंस. आता काय उपयोग? तुला जे मिळालं नाही, ते सुनेला मिळतंय म्हणून तुझी चिडचिड होते आहे. पण अगं, तिचा काय दोष?"
​"तुझा लेक तुलाही तितकंच करतो आहे ना? देतो ना तुला जे हवं ते! तरीही तुझं समाधान नाही. तिनं तुझ्यासाठी काही केलं की, तू तिचं कौतुक करण्याऐवजी तिचा अपमान करतेस. तू काय म्हणतेस तिला, 'आम्हाला नाही बुवा जमले, तुम्हाला जमते. नवरा सगळ्या गोष्टीला परवानगी देतो. तुमच्या हातात सगळी सत्ता, म्हणून निर्णय घेता, भरमसाठ खर्च करता!' तिचा विरस होतो, ताई, तुझ्या अशा बोलण्यानं. अगं ताई, जमाना बदलत चालला आहे. आपण त्याप्रमाणे वागायला हवं. त्या प्रवाहात स्वतःला झोकून दे, बघ तुझं जगणं सुखकर होईल."
​वनिता पुढे म्हणाली, "जरा थोडं बदल. जे भाऊजींच्या राज्यात तुला करायला जमलं नाही, ते आता कर. भाऊजींशी वाद न घालता या नवीन पिढीशी जुळवून घे. बघ जमेल तुला. सुनेची आई नको, मैत्रीण नको, शेजारीण बनून बघ. अगं, शेजारीण पण खूपदा आपलीशी वाटते ग सासुरवाशिणीला! नको तुझं-माझं करूंस. उद्या तीच तुझ्या कामाला येणार, म्हणून जीव लावायला शिक, कौतुक करायला शिक. म्हणजे मागाहून पश्चात्तापाची वेळ येणार नाही."
​"शेवटी 'एका हाताने टाळी वाजत नाही,' दुसऱ्या हाताची मदत घ्यावीच लागते. मी लहान आहे तुझ्यापेक्षा, पण मोठे चुकत असतील, तर लहानांना पण अधिकार आहे बरं का मोठ्यांचे कान पकडण्याचा!"
​का कोणास ठाऊक, ताई विचारात पडलेली दिसली. तिच्या डोळ्यांत मात्र अपराधी भावना होती.
​इतक्यात भाऊजींचा फोन वाजला. "येताय ना घरी? चार दिवस झाले वनिताकडे जाऊन. पाहुणचार संपला नाही वाटतं!"
"अहो, आज निघणारच आहे. सकाळची गर्दी कमी झाली की निघतेच. दुपारपर्यंत येईल," ताईनं फोन ठेवला.
​ती वनिताला म्हणाली, "बघ, अजूनही मला मनासारखं स्वातंत्र्य आहे का?"
वनिता म्हणाली, "हो ताई, मान्य आहे. पण तूच सांग, ही एका हाताने टाळी वाजली का? तू सहन करत गेलीस, म्हणून ते तुला नाचवत गेले. वेळीच प्रतिकार केला असतास, तर ही वेळ तुझ्यावर आली नसती. तूच शोध तुझं सुख. फक्त एक लक्षात ठेव, 'हो' ला 'हो' मिळवू नकोस. नकार द्यायला शिक, आत्मसन्मान जपायला शिक. मुख्य आणि महत्त्वाचे म्हणजे, जे आपला मान जपतात, त्यांना सन्मान द्यायला शिक. हा सकारात्मक बदल करून नक्कीच तुझा आत्मविश्वास वाढेल."
​"अगं, तुझी सून भाग्यश्री तुझ्याकडून फक्त तेवढीच अपेक्षा करते — तिला फक्त 'आपलं' म्हण. ती स्वभावानं खूप प्रेमळ आहे ग. प्रेम दे, प्रेम मिळव."
​यावर ताई म्हणाली, "पटतंय ग मला. पण ना काय होतं काय माहीत, माझ्या मनासारखं होत नाही म्हणून तिच्यावर राग निघतो! तीच फक्त प्रत्युत्तर देत नाही, माझं ऐकून घेते. बाकी तुझ्या भाऊजींशी बोलायची सोय नाही. चैतन्य तर ऐकूनच घेत नाही."
​"सोड सगळे आता," वनिता म्हणाली. "तूच भाग्यश्रीला फोन लाव. बोल तुला कसं तिच्याशी बोलायचं तसं. आणि सांग तिला, 'तू मला घ्यायला ये.' हा छोटा बदल बघ काय चमत्कार करतो ते! कर फोन, बघ काय होतंय ते!"
​ताईनं सुनेला, भाग्यश्रीला फोन लावला. "भाग्यश्री, मला आज वनिताकडे राहायचं आहे ग, पण बाबा आजच बोलवतात तिकडे. काय करू? सांभाळून घेशील एक दिवस?"
भाग्यश्री म्हणाली, "अरे आई, राहा एक दिवस काय, अजून दोन दिवस! बघते मी इकडचं. बाबांशी काय बोलायचं ते मी बघते आणि घ्यायला मी येते. उगाच लोकलची दगदग नको!"
​ताईंनी फोन स्पीकरवर ठेवला होता. वनिताला सगळं ऐकायला आलं. वनितानं ताईकडे बघितलं. ताईला आता पुढे काही बोलायला सुचत नव्हते.
​वनिता म्हणाली, "ताई, ही फक्त छोटीशी सुरुवात! 'आगे आगे देखो होता है क्या!' थोडे कौतुक केले, चिमुटभर प्रेम दिलं की, मूठभर परत मिळतं ग! तू न बोलताच ती तुला येऊन घेऊन जायला निघाली!"
​"चल, माझी सायू येईल आता. तिला आल्यावर गरम गरम आल्याचा चहा लागतो. ठेवते आधण. तू घेशील का ताई, थोडा?" वनिता स्वयंपाकघराकडे वळता वळता ताईला म्हणाली.
"अगं, चहा काय नुसता! थोडे दडपे पोहे होऊन जाऊ दे तुझ्या हातचे. नेहमी माझी सून भाग्यश्री कौतुक करते त्याचं!" ताई पटकन म्हणाली, "मी देते कांदे चिरून."
​"क्या बात है ताई! माझी ताई 'भाग्यश्री-मय' झाली," म्हणत वनिताने दडपे पोहे करायला घेतले.
​समाप्त
​©️®️सौ. उज्वला रवींद्र राहणे
0

🎭 Series Post

View all