Login

Eka Hatane Tali Vajat Nahi Part 2

Jald Lekhan Eka Hatane Tali Vajat Nahi
"एका हाताने टाळी वाजत नाही" भाग - २
​मागच्या भागात आपण पाहिले, वनिता आणि तिची लाडकी सून सायूचं गुळपीठ कसं होतं.
​पण हीच गोष्ट, हीच 'दुखरी नस' वनिताच्या ताईच्या मनाला सारखी ठणकत होती.
एकंदरीत वनिताकडील हे खेळकर आणि आनंदी वातावरण ताईला खटकत होतं. कारण ताईकडे वनिताच्या घरापेक्षा अगदी विरुद्ध आणि तणावपूर्ण वातावरण होतं.
​ताईचा नवरा म्हणेल ती पूर्व दिशा, असं ताईच्या घरात चालायचं. त्यामुळे घरात शिस्तीपेक्षा धाक जास्त होता. यामुळे घरात कोणालाही मनासारखे वागता येत नव्हते.
​सुनेच्या (भाग्यश्रीच्या) माहेरचे लोकही घरी यायचे नाहीत. मुलगा चैतन्य आणि सून भाग्यश्री चोरून छपून माहेरी जाऊन यायचे. पण ताईला स्वतःला कुठेच मोकळेपणा नसायचा. मग तिचा सगळा राग सुनेवर, म्हणजे भाग्यश्रीवर निघायचा. कारण तीच फक्त गप्प राहून सगळं ऐकून घ्यायची. त्यामुळे त्यांच्या नात्याची वीण कधी घट्ट जोडली गेलीच नाही. ताई सतत भाग्यश्रीचा रागराग करायची.
​कारण तिला वाटायचं, 'आपला मुलगा सगळं तिचंच ऐकतो, माझं ऐकत नाही. तिला मनासारखं वागता येतं, मला मात्र नाही.' त्यामुळे घरात नेहमी खटके उडायचे. याच तुलनेमुळे की काय, हवा तितका दोघींमध्ये (सासू-सून) बंध निर्माण झाला नव्हता.
​त्यामुळेच तिला कदाचित वनिताचा हेवा वाटायचा. तरीही वनिता तिला नेहमी समजावायची, "ताई, जमाना बदलला आहे. त्यांच्याबरोबर आपल्याला चालायला हवं. नाहीतर आपण मागे पडतो, एकटे पडतो. तुला जे नाही मिळालं, ते तू सुनेला दे. तुला नाही मिळालं म्हणून तिलाही मिळालं नाही, ही कुठली ग मनोवृत्ती!"
पण ताईच्या डोक्यात घुसेल ती कुठली? ती उलट वनितालाच उपदेश करायची.
​वनिताशी ताईची सून भाग्यश्री हिचे खूप चांगले जमायचे. ती कधी आपल्या सासूचे गऱ्हाणे वनिता मावशीकडे करायची नाही; पण वनिताला तिच्या मनातील खळबळ समजायची. वनिता मावशीच्या घरातील खेळमेळीचे वातावरण तिला खूप आवडायचे.
​वनिता मावशीचे पती विनोदकाका तिला मुलीप्रमाणे 'बाळा', 'बेटा' म्हणून हाक मारायचे. तिच्या साध्या साध्या गोष्टींचे कौतुक करायचे. ते सुख तिला घरी कधीच मिळत नव्हते.
​सासूबाईंना (ताईंना) हे खटकायचं. वनिताच्या घरून आल्यावर त्यांच्या घरी भांडणं ठरलेलीच. पुढे तर भाग्यश्री वनिता मावशीकडे जायला याच कारणासाठी टाळाटाळ करायची.
यावरून मग सासूबाई अर्थ काढायच्या, 'हिला माझे नातेवाईक नको आहेत! मुद्दाम माझ्या माहेरच्या नातेवाईकांकडील समारंभात जायलाच टाळते ही!' भाग्यश्री हे ऐकून चुप बसायची, तोंडाला तोंड देत बसायची नाही.
​पुढे शशांकचे (वनिताच्या मुलाचे) लग्न झाले आणि वनिता मावशीकडे सायूच्या रूपात 'लेक' घरी आली. ती आल्यावर ताईंचा मत्सर अजूनच वाढला.
​पुढे काय होईल? ताईच्या मनातला मत्सर वाढणार तर नाही ना? पाहूया पुढील भागात.
क्रमशः
0

🎭 Series Post

View all