Login

एकाच ह्या जन्मी जणू... फिरुनी नवी जन्मेन मी

आयुष्याच्या आठवणीच्या हिंदोळ्यावर विहार करताना रेखाटलेले हे माझे आत्मचरित्र मी माझ्या शब्दात रेखाटले आहे
एकाच ह्या जन्मी जणू...फिरुनी नवी जन्मेन मी

   आत्मचरित्र लेखन ह्या फेरीकरिता,आत्मचरित्र लिहायचे असे समजले तेव्हा आपण कुणी खूप मोठी व्यक्ती नाही हा विचार आधी माझ्या डोक्यात आला, पण मी मिळालेली कोणतीही चांगली संधी सोडत नाही ह्या माझ्या स्वभावामुळे ठरविले हेही आव्हान स्वीकारू या. ह्या निमित्ताने आयुष्यरुपी पुस्तकात मागची पाने उलघडून पाहताना पुन्हा जीवनातील जुन्या आठवणींचा प्रवास अनुभवायला मिळाला आणि स्वतःला व्यक्त होण्याची सुंदर संधी मिळाली.

     प्रथमतः सगळ्यांना माझा सप्रेम नमस्कार,मी सुप्रिया शिंदे महादेवकर म्हणजेच माहेरची कु.सुप्रिया सुनिल शिंदे आणि सासरची सौ.सुप्रिया विक्रम महादेवकर.
   माझा जन्म पुण्य नगरीत एका मध्यम वर्गीय कुटुंबात झाला.जन्मापासून मी पुण्यात वाढले,कधी धडपडले त्यातून घडत गेले,खूप काही शिकले आणि अजूनही शिकत आहे.
माझ्या आई वडिलांची मी पहिली कन्यारत्न.
अजूनही बऱ्याच ठिकाणी आपल्या मुलाला पहिला मुलगाच व्हावा असे वाटते तसेच माझ्या आजी आजोबांना आपल्या घरात नातू जन्माला यावा असेच वाटत होते पण नातीचा जन्म झाला म्हणून त्यांच्या मनाची नाराजी झाली.पण आई पप्पांना आणि आईच्या आई वडिलांना, माझ्या चारही मामांना लक्ष्मीच्या रुपात जन्माला आलेले गुबगुबीत आणि गोरे पान बाळ पाहून खूप आनंद झाला.
आईने तेव्हाच ठरविले होते कुणाला काहीही वाटले तरी मी माझ्या मुलीला खूप मोठे करणार आणि तिला चांगले शिक्षण,संस्कार देऊन स्वतःच्या पायावर ऊभे करणार. मी घरात मोठी म्हणून समजूतदारपणा हा अंगी होताच.मला अजून एक लहान बहीण आणि भाऊ असे आम्ही तीन भावंडे.आई वडिलांनी आम्हाला वाढवताना मुलगा मुलगी असा भेदभाव कधीही केला नाही.त्यांचे संस्कार आणि प्रेम ह्यामुळे आजही आम्ही तिघेजण एकमेकांसाठी प्रत्येक परिस्थितीत खंबीर साथ द्यायला तत्पर असतो.
      मला आठवते की, घराच्या जवळपास चांगली शाळा नसल्याने आईने मला पहिलीला,घरापासून एक तासाच्या अंतरावर असलेल्या भारत इंग्लिश स्कूल मध्ये पुण्यात प्रवेश घेतला.पहिलीपासून जवळपास एक तास बसने मी प्रवास करत होते.एवढ्या लहान वयात प्रवासाच्या कमी सोयी उपलब्ध असताना तेही तितके सोपे नक्कीच नव्हते.लहानपणापासून आईने बाळकडू दिले की मुलींनी ठरवले तर त्या सगळे काही शिकू आणि चांगल्या प्रकारे करू शकतात.कधीही घाबरायचे नाही, काही अडचण आली तर न रडता त्यातून मार्ग काढायला शिकायचे.तसे मी माझ्या जीवनात नेहमी करत आले आहे.नेहमी माझ्या संपूर्ण शैक्षणिक प्रवासात मी हुशार होते.विविध स्पर्धा असो,खेळ असो की चित्रकला,हस्तकला,हस्ताक्षर,नृत्य,हिंदी,इंग्लिश आणि संस्कृत भाषा परीक्षा,वक्तृत्व स्पर्धा ह्या विविध गोष्टींमध्ये माझा शाळेत पहिला किंवा दुसरा नंबर ठरलेला असायचा.चांगले शिक्षक आणि माझी आवड ह्यामुळे संस्कृत श्लोक,सुभाषिते,कविता सगळे माझे एकपाठ असायचे.सतत नवनवीन शिकायची जिद्द मला कायम होती आणि अजूनही आहेच.मला नेहमी वाटते की,माणसाने नेहमी विद्यार्थी असावे कारण शिकायला आपल्या आजूबाजूला भरपूर आहे.ज्ञान आपल्या अंगी नम्रता,आदरभाव आणि एक गरजेचा आत्मविश्वास रुजवत असते.

आठवीत असताना ज्या स्पर्धेत मला यश मिळेल अशी आशा असताना त्यात नंबर न येता दुसऱ्या स्पर्धेत मला अपेक्षा नसतानाही बक्षीस जाहीर झाले.तेव्हा मी माझी पहिली कविता केली होती.त्याचे शीर्षक होते.. असे का घडले? तेव्हापासून माझा लेखन प्रवास खरा सुरू झाला.त्यांनतर प्रत्येक वर्षी शाळेच्या मासिकात माझे लेख आणि कविता छापून यायच्या.सगळ्या शिक्षकांना आणि माझ्या मित्र मैत्रिणींना माझे लिखाण आवडू लागले.नंतरच्या काळात माझ्या काही कविता वृत्तपत्रात प्रकाशित झाल्या.
माझ्या आईला लिखाणाची आवड आहे ती रोज डायरी लिहायची आणि अजूनही ती छान छान लेख लिहित असते.तिच्याकडून लिखाणाची हि कला माझ्यात आली असावी.ती एक उत्तम गृहिणी,कधी उत्तम अबॅकस टीचर,गणित आणि विज्ञानचे क्लासेस घेणारी आवडती शिक्षिका,अभिनयातून आपला छंद जोपासणारी खूप हौशी अशी माझी आई आहे.
पप्पांचा स्वभाव पहिल्यापासूनच शांत आणि शिस्तीचा आहे.घरात जे जेवायला बनवले जाईल ते जेवावे लागणार असे त्यांचे म्हणणे, त्यामुळे जे मिळेल ते आम्ही खायला शिकलो.ते नेहमीच आम्हा तिन्ही भावंडाना म्हणत आले आहेत की तुम्ही शिकलात, चांगले पायावर उभे राहिलात तर दिवस बदलतील ज्या काही आर्थिक समस्या आहेत त्या दूर होतील.तुम्ही शिकायची तयारी दाखवा मी तुम्हाला भरपूर कष्ट करून,ओव्हरटाईम काम करून शिकवणार.ते त्यांनी नेहमीच आमच्या पाठीशी उभे राहून केले.
    दहावीत असताना शाळेत एका सेमिनारमध्ये ऐकले होते की डिप्लोमा करूनही चांगला इंजिनिअर होता येते.आमच्या संपूर्ण घराण्यात इंजिनीयर व्हायचे स्वप्न पाहणारी मीच पहिली होते.कारण कोणालाही त्या क्षेत्रातील काहीच माहिती नव्हती.आई वडिलांनी नेहमी स्वतःचे निर्णय स्वतः घ्या त्यात अगदीच कुठे मदत लागली तर आम्ही आहोत असे म्हणणे होते.त्यानुसार दहावीनंतर मी स्वतः निर्णय घेतला तो इंजिनिअर होण्याचा आणि आयटी डिप्लोमाला एका चांगल्या टॉपच्या कॉलेजला माझा नंबर लागला.
तिथेही पहिल्या तीन मध्ये नंबर हा असायचा.डिप्लोमाच्या शेवटच्या वर्षी एका आयटी कंपनीत कॅम्पस प्लेसमेंट झाले.पण जिद्द होती ती इंजिनियरिंग पूर्ण करून इंजिनीयर व्हायची.मग पुढे जिद्दीने आयटी इंजिअरिंग डिस्टिंक्शनमध्ये पूर्ण केले.
त्या दरम्यान पप्पांच्या तब्येतीच्या तक्रारी सुरू झाल्या त्यातच त्यांना दोनदा हार्ट अटॅक येऊन गेला आणि डॉक्टरांनी तातडीने बायपास सर्जरी करायला सांगितली.ते दिवस खूप खडतर होते पण कठीण परिस्थितीत डगमगायचे नव्हते.घरातील मोठी मुलगी म्हणून मी त्या काळात घरातील सगळे संभाळून घराजवळ नोकरी करू लागले.देवाच्या कृपेने ते कठीण दिवस देखील सरले आणि पप्पांची तब्येत सुधारली.
त्यानंतर मी कॉम्प्युटर इंजिनियरिंगमध्ये एम टेक PCCOE कॉलेज मधून पूर्ण केले.तेव्हा मी पुणे विद्यापीठात युनिव्हर्सिटी रँक मिळवला आणि आई वडिलांना आपल्या मुलीने आपले नाव काढले म्हणून खूपच आनंद झाला.कॉलेजमध्ये टॉपर होतेच त्यामुळे त्याच ठिकाणी जॉबची संधी मिळाली.एका वर्षानंतर दुसऱ्या नामांकित कॉलेजमध्ये प्रोफेसर म्हणून रुजू झाले.तेव्हापासून आत्तापर्यंत शिकवण्याची आवड अंगी असल्याने नवनवीन टेक्निकल विषय,प्रॅक्टिकल ज्ञान शिकवत भावी इंजिनीयर घडविण्यात खारीचा वाटा देत आहे.शिकवताना मुलांचे मिळणारे फिडबॅक आणि मी शिकवलेल्या विषयांचे युनिव्हर्सिटीमध्ये उत्तम निकाल लावल्याचे ॲप्रिसिएशन लेटर ही माझ्यातील शिक्षिकेला मिळालेली पोचपावती. त्याबरोबर, आपले विद्यार्थी जेव्हा देशात तसेच परदेशात चांगल्या आयटी कंपनीत मोठमोठ्या पोस्टवर चमकताना दिसतात तेव्हा ऊर अभिमानाने भरून येतो.जेव्हा विद्यार्थी पुढे आयुष्यात यशस्वी होतात किंवा काहीही चांगले काम करतात तेव्हा आवर्जुन मला फोन करून,मेसेज करून कळवतात तेव्हा त्यांच्या मनात असलेला आदरभाव खूप सुखावून जातो.
   नवीन नोकरीवर कॉलेजला रुजू झाले होते, त्यातच पहिले स्थळ लग्नाकरिता आले.कांदे पोह्याच्या कार्यक्रमाला मला माझ्या होणाऱ्या आहोंनी चक्क माझे टेक्निकल पब्लिश झालेले पेपर,मी करत असलेला प्रोजेक्ट ह्यावर जास्त प्रश्न विचारले.तेव्हाच मला हे किती परफेक्शनिस्ट आहेत ह्याची प्रचिती आली.त्यांना आणि घरच्यांना मी पाहता क्षणी आवडले होते आणि आम्हालाही स्थळ पसंत असल्याने आमचे लग्न जमले.माझा स्वभाव मनमिळाऊ आणि बोलका असल्याने सासरी सगळ्यांमध्ये मी लगेच रमले.सासरी गावाला तीन भाऊ त्यांची मुले एकत्र राहतात तिथे गेल्यावर एकत्र कुटुंबात खूप छान वाटते.शहरात वाढलेली मी तिथे चुलीवर जेवण बनवण्यात,शेणाने सारवलेल्या घरात देखील आपल्या माणसांच्या प्रेमात आनंदाने रमते.असा आमचा लग्नानंतर सुखाचा संसार सुरू होता.पुढे पाच महिन्यात माझे सासरे देवाघरी गेले आणि जणू आमच्या नव्या नव्या संसाराला दृष्ट झाली.सासूबाई आणि माझे आहों सासर्यांच्या जाण्याने डिप्रेशनमध्ये गेले होते.त्यांना पुन्हा माणसात आणण्यासाठी आणि सुरळीत सगळे करायला माझी देव जणू परीक्षा पाहत होता.माझे सासरे म्हणजेच पप्पा साताऱ्यातील माण तालुक्यातील एका खेडेगावातून भरपूर खडतर प्रवास करून शिक्षण घेत बँक ऑफ महाराष्ट्र सारख्या बँकेत शाखा प्रमुख म्हणून काम संभाळत होते.ते भरपूर हुशार आणि हौशी होते.त्यांचा सहवास आजही लाभला असता तर जीवन अजून छान असते.ते गेल्यानंतर कठीण काळात,मी हार मानली नाही आणि घरातील वातावरण सावरण्याचा प्रयत्न करत राहिले. तेही दिवस सरले आणि आमच्या संसारवेलीवर एक फुल उमलले आमचे बाळ अद्वैत.त्याच्या जन्माच्या वेळी मला आणि त्यालाही खूप संघर्ष करावा लागला.जन्माला आल्यावर माझे बाळ कन्हत होते.त्याला श्वास घ्यायला त्रास होत होता तेव्हा डॉक्टर आहोंना म्हणाले "थोडा वेळ पाहू नाहीतर ह्याला NICU मध्ये ठेवावे लागेल".त्याआधी बाळाला आईजवळ द्या असे नर्सला सांगितले.जेव्हा त्याला माझ्या जवळ दिले तेव्हा माझ्या स्पर्शाने तो शांत झाला आणि कुशीत निजला.तेव्हा आई म्हणून माझा नवा जन्म झाला.दोन्ही घरी खूप आनंद झाला कारण दोन्हीकडे जन्माला येणारे हे पहिले नातवंडं होते.त्याच्या जन्मानंतर मला जाणवले की,एक स्त्री जेव्हा आई होते तेव्हा ती प्रत्येक परिस्थितीत खंबीरपणे आपल्या बाळासाठी ऊभी राहते हे मी नेहमी अनुभवत असते.

अद्वैत नुकताच चार महिन्यांचा झाला आणि कोरोनाने सगळीकडे थैमान माजले होते.बाहेर कुठेही जाण्याची सोय नव्हती.तेव्हा बाळाचा आणि सगळ्याचा सारासार विचार करून थोडे थांबुया म्हणत मॅटर्निटी लिव्ह नंतर मी कॉलेज पुन्हा जॉईन केले नाही.तो काळ मी अद्वैत सोबत त्याच्या बाळलिला अनुभवण्यात,घरून गेस्ट लेक्चर घेण्यात,विविध पाककला करण्यात आणि लिखाणात घालवला.कोरोना काळात वेळ मिळाला तेव्हा मॉम्सप्रेसो,अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद, ईरा,स्टोरी मिरर ह्या विविध व्यासपीठांवर लेखन केले आणि विविध काव्यप्रकार शिकले.बऱ्याच लेखन स्पर्धांमध्ये भाग घेतला आणि बक्षिसे देखील मिळवली.स्टोरी मिरर वर २०२१ चे ऑर्थर ऑफ द इयर नामांकन मिळाले आणि तेव्हा पहिल्या पाच लेखकात मीही एक होते. ईराच्या व्यासपीठावर मागच्या वर्षी चॅम्पियन ट्रॉफी स्पर्धेच्या वेळी लिहायला सुरुवात केली.खूप मुरलेल्या छान लेखक लेखिका मैत्रिणी झाल्या.खूप काही लिखाणातील बारकावे शिकायला मिळाले.आपल्या लिखाणावर जेव्हा वाचकांची दाद मिळते तेव्हा खूप समाधान मिळते. मी कोणी मोठी लेखिका नाही पण जेवढे लिहिते त्यातून आनंद मिळतो.

हे सगळे सुरू असतानाच, मी पी एच डीची प्रवेश परीक्षा दिली ती चांगल्या गुणांनी पास झाले नंतर दुसरा मुलाखतीचा राऊंड देखील मी पास झाले आणि मला सिम्बायोसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीमध्ये रिसर्च स्कॉलर म्हणून फेलोशिप मिळाली. तेव्हा खूप खूप आनंद झाला होता.
आजही मला तो दिवस आठवतो जेव्हा अद्वैत पावणे दोन वर्षांचा होता आणि मला घरातून बाहेर पुन्हा कॉलेज जॉईन करायचे होते.एक आई म्हणून घरातून पाय निघत नव्हता पण करियर,शिक्षण हेही पुढे करायचे होतेच.तसेच जड पावलांनी घर सोडले पण अद्वैतला आजही मी पुरेसा वेळ देण्याचा नेहमीच प्रयत्न करते.ह्या सगळ्यांमध्ये माझ्या आहोंचा, सासूबाईंचा आणि आई वडिलांचा, नणंद बाईंचा,भावंडांचा सपोर्ट खूप मोलाचा आहे.
शिक्षण,करियर,लिखाण यासोबतच मी ढोल ताशा पथकात ढोल वाजवते.मला आठवते जेव्हा पहिल्यांदा मी ढोल बांधून गणपतीच्या मिरवणुकीत ढोल वाजवला होता.त्यानंतर तो ढोल सोडताना डोळ्यात खूप आनंदाश्रू होते एक वेगळेच समाधान मिळाले तेव्हा माझ्या बकेट लिस्ट मधले तेही एक स्वप्न पूर्ण झाले होते.आताही ढोल ताशा लेझिम पथकात मी वेळ काढून जात असते.सगळे सणवार मी त्या मागचे शास्त्र जाणून घेऊन उत्साहाने साजरे करते.लिखाणासोबतच रांगोळी,मेहंदी, टाकाऊ गोष्टींपासून टिकवू गोष्टी बनविणे हे माझ्या आवडीचे छंद आहेत.कोरोना काळापासून गणपतीत मी आणि माझे अहो मिळून शाडू मातीपासून गणपती घरी बनवतो आणि त्याची मनोभावे पूजा करतो.त्या व्यतिरिक्त,आम्ही घरच्या घरी ओल्या कचऱ्यापासून कंपोस्ट खत बनवतो त्यावर आम्ही घरी जवळपास शंभर झाडे फुलवली आहेत.अश्या बऱ्याच गोष्टी रोजच्या आयुष्यात सुरू असतात.
आतापर्यंतच्या आयुष्यात बरेच चांगले वाईट अनुभव आले.जे टोचून किंवा नावे ठेवणारे लोक मला भेटले त्यांचे मी आभार मानते की त्यांच्यामुळे मी सतत नवनवीन गोष्टी शिकत राहिले,पुढे प्रगती करत गेले.माझा स्वभाव बोलका,लोकांना हसविणारा आणि प्रत्येक वयोगटातील माणसांशी जुळवून घेणारा असल्याने खूप मोठा मित्र परीवार मला लाभला आहे.देवाचे आभार मानते की, ह्या प्रवासात खूप मोलाची जिवाभावाची माणसे,मित्र मैत्रिणी दिले ज्यांच्यामुळे हा प्रवास खूप छान झाला आहे.आत्ता कुठे वयाची तिशी ओलांडली आहे. अजून बरेच काही शिकायचे आहे, माझ्याकडे जे काही थोडेफार ज्ञान आहे हे माझ्या विद्यार्थ्यांना आणि इतरांना द्यायचे आहे.लवकरच नावापुढे डॉक्टर लावलेले "Dr.Supriya Vikram Mahadevkar" हेहि स्वप्न पूर्ण झालेले पाहायचे आहे.लिखाणाचा छंद जोपासत त्यातून भरपूर लिखाण करायचे आहे.
शेवटी इतकेच म्हणेल,दुःख किंवा कठीण काळात हार न मानता थोडा धीर धरून आपले काम आणि कर्तव्य पार पाडत राहा मग पाहा सुखाचे दिवस देखील नक्की येतात.शेवटी माणूस जेव्हा आतून हार मानतो तेव्हा तो खरा हरतो तसे त्याला बाकी कोणी हरवू शकत नाही.आपले पाय नेहमी जमिनीवर राहु द्या,तुमचे शिक्षण आणि तुमचे संस्कार तुम्ही इतरांना कसे वागवता आणि इतरांशी कसे बोलता ह्यावरून आपोआप कळत असते.प्रत्येक जण आपल्याला चांगला म्हणेल अशी अपेक्षा करू नका.मला नेहमी वाटते की,मुलींनी शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभे राहावे आपल्याजवळ आपली स्वतःची एक ओळख आणि स्व कष्टाचे पैसे असले की आपण आपले निर्णय स्वतः घेऊ शकतो. गरजेच्या वेळी आपल्याला तो एक आधार असतो हे विसरू नका.हा माझा आत्तापर्यंतचा थोडक्यात जीवन प्रवास ज्यामधे मी मुलगी,बहिण,पत्नी,सून,आई,प्रोफेसर,लेखिका अश्या विविध भूमिकांमध्ये जगत आली आहे.तुम्हा सगळ्यांचा आशीर्वाद पाठीशी असुदेत हि इच्छा व्यक्त करते आणि हा लेखनप्रपंच आत्तापुरता थांबवते.
माझ्या प्रवासावर आधारित मराठी कवी,गीतकार,संगीतकार सुधीर मोघे ह्यांच्या काव्यपंक्ती आठवतात...

एकाच ह्या जन्मी जणू
फिरुनी नवी जन्मेन मी...
लहरेन मी बहरेन मी
शिशिरांतुनी उगवेन मी...

- सुप्रिया शिंदे महादेवकर