Login

एकच क्षण अधःपतनाचा.. भाग ३

कथा एका चुकीची


एकच क्षण अधःपाताचा.. भाग ३


मागील भागात आपण पाहिले की मध्यमवर्गीय सुजय आणि अवनीला आयव्हीएफसाठी येणारा खर्च सध्यातरी परवडणारा नसतो. आता बघू पुढे काय होते ते.


" सुजय, तुझा स्वयंपाक करून ठेवला आहे. मी निघते." उदास आवाजात अवनी बोलली.

" अग पण तू ही सुट्टीवर आहेस ना?" सुजयने आश्चर्याने विचारले.

" होते.. पण आता मी निघते आहे. संध्याकाळी येते." अवनी अजूनही स्वतःच्याच दुःखात होती. ऑफिसला आल्यावर मात्र इतका वेळ धरून ठेवलेला तिचा बांध फुटला. तिला खूप रडू फुटले. तिथेच एका बाथरूममध्ये थांबून तिने पोटभर रडून घेतले. डोळे पुसत ती बाहेर आली.

" काही प्रॉब्लेम?" पाठून आवाज आला. अवनीने पाठी बघितले. तिचा बॉस आकाश उभा होता. अवनीची थोडी धांदल उडाली. तिने स्वतःला सावरले.

" काही नाही सर.."

" तुमच्यावर विश्वास ठेवावासा वाटतो आहे पण तुमचा चेहरा आणि डोळे वेगळेच काही सांगत आहेत. हा रुमाल घ्या. डोळे पुसा आणि माझ्या केबिनमध्ये या.." अवनी ही ओढल्यासारखी त्याच्या मागे मागे गेली.

" बोला, काय झाले?" आकाशने अवनीला बसायला सांगत विचारले.

" काही नाही सर.." अवनी बोलत होती.. पण तिचे डोळे परत पाझरू लागले होते. आकाश उठला. त्याने तिच्या खांद्यावर हात ठेवला. आणि प्रेमाने विचारले,

" सांग आता काय झाले?"

त्या प्रश्नाला अवनी दुर्लक्षित करू शकली नाही. तिने हुंदके देत सगळी कथा सांगितली. आकाशने तिचे डोळे पुसले.

" बस.. एवढंच? मी तुझी अडचण दूर करू शकतो." अवनीने आशेने त्याच्याकडे बघितले.

" तुम्ही मला पैशांची मदत करणार?"

" अंहं.. मी तुला आई व्हायला मदत करणार.." सूचकपणे आकाश बोलला. आकाशचे बोलणे ऐकून अवनी ताडकन उठली.

" एवढं चिडायची गरज नाही. विचार कर आणि सांग." आकाश शांतपणे बोलला.

" हे पाप आहे.." अवनी थरथरत होती.

" महाभारत कालापासून मान्य आहे. जेव्हा पती स्त्रीला मातृत्व देऊ शकत नाही तेव्हा ती दुसर्‍या पुरुषाकडून ते प्राप्त करून घेते. हे जर पाप असते तर त्याकाळी ही याला नाकारले असते." आकाशचा सूर बदलला नव्हता.

अवनी तशीच उठून बाहेर आली.. तिला धक्क्यावर धक्के बसत होते. एक काल सुजयचा स्पर्म काउंट कमी असल्याचा धक्का आणि आज आकाशचा. आकाश तिचा बॉस होता. सुंदर व्यक्तिमत्त्वाने तो इतरांचे लक्ष वेधून घ्यायचा. अवनीला ही तो आवडायचा. पण तिने कधी त्या दृष्टीकोनातून त्याच्याकडे पाहिले नव्हते. त्याचे बायकांसोबत असलेली संबंध या बाबतीत तिच्या कानावर खूप काही आले होते. त्याचे तिच्यासोबतचे आतापर्यंतचे वागणे बघता तिचा कधी विश्वास बसला नव्हता. पण आता तो जे काही बोलला त्याने ती थरारून गेली होती. एकाबाजूला मातृत्वाची लागलेली ओढ, त्यासाठी असणारी पैशाची अडचण तर दुसरीकडे आकाशसारखे उमदे व्यक्तिमत्त्व.. तिचे मन भावनांच्या या आंदोलनात हेलकावे घेऊ लागले.


काय घेईल अवनी निर्णय? बघू पुढील भागात. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा.

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई
0

🎭 Series Post

View all