मागील भागात आपण पाहिले की अवनीचा बॉस आकाश तिच्यापुढे एक प्रस्ताव मांडतो. अवनी स्वीकारेल का तो प्रस्ताव? बघूया आजच्या भागात.
" अवनी, मी बघतो आहे पैशांची काही व्यवस्था होते आहे का?" अवनी घरात आल्या आल्या सुजय बोलला.
" त्याची गरज नाही.. मी आज मैत्रिणीशी बोलले. ती म्हटली की काही वेळा हे डॉक्टर उगाचच बोलतात. थोडे दिवस थांबून बघा.. तू वाटल्यास स्पर्म वाढायच्या गोळ्या सुरू कर. " सुजयकडे न बघता अवनी बोलत होती. जणू तिच्या तोंडून कोणीतरी हे वदवून घेत होते. ते शब्द ऐकून सुजय मात्र खुश झाला.
" अवनी.. मला किती आनंद झाला आहे सांगू? नाहीतर मला वाटत होते तू मला सोडून जाशील.. मी नक्की त्या गोळ्या घेईन. आणि जसे पैसे येतील तशी आपण ती ट्रिटमेंट चालू करू." अवनीला मिठीत घेत सुजय बोलला. अवनीने डोळे घट्ट मिटून घेत मनाशी एक निश्चय केला.
" सर, मी तयार आहे." अवनी आकाशच्या केबिनमध्ये जाऊन बोलली. कामात असलेल्या आकाशला पटकन समजले नाही.
" काय?"
" तुम्ही दिलेला प्रस्ताव मला मान्य आहे." अवनी मान खाली घालून बोलली.
" नक्की? मी तुझ्यावर कोणतीही जबरदस्ती करत नाहीये. हे मान्य आहे तुला?" आकाशने विचारले.
" हो सर.. "
" आता सर नाही.. फक्त आकाश.."
आकाश अवनीला घेऊन ऑफिसच्या बाहेर पडला. त्या दोघांना बघून थोडी कुजबुज झाली पण तेवढ्यापुरतीच. आकाशच्या फ्लॅटवर येताच अवनीची पावले थोडी डगमगली. आकाशने तिचा हात घट्ट धरला. काहीतरी बोलायचे म्हणून अवनीने विचारले,
" तुम्ही एकटेच राहता का?"
" हो.. मी एकटाच राहतो." सूचक स्वरात आकाश बोलला. आत येताच आकाशने अवनीला मिठीत घेतले.. आणि सुजय बाबतचे सगळे अपराधीपण त्या मिठीत विरघळून गेले.
" सुजय, बहुतेक तू घेत असलेल्या गोळ्यांचा फायदा झाला." उलट्या करून थकलेली अवनी बोलली.
" खरेच?" आश्चर्यचकित झालेला सुजय बोलला..
"हो.. आत्ताच टेस्ट केली मी.. उद्या डॉक्टरांकडे जाऊन कन्फर्म करून येऊ."
अवनीला हवे होते तेच शेवटी झाले होते. ती गरोदर होती. सुजय फारच आनंदात होता. शेवटी त्याचे बापपण सिद्ध झाले होते. दोघांच्या कुटुंबात आनंदाची लहर पसरली. मग अवनीची चोरओटी, डोहाळजेवण सगळेच चालू होते. अवनीही ते सगळे लाड करून घेत होती. नऊ महिने पूर्ण झाले आणि अवनीने एका छानशा गुटगुटीत बाळाला जन्म दिला. बाळाचे बारसे झाले. त्याचे नाव सुजयने आदित्य ठेवले. बारशाला खूप लोकं आली होती. खूप आहेर आला होता. त्यात डोळ्यात भरणारा होता आकाशचा. सोन्याची चेन, अंगठी, छोटेसे ब्रेसलेट आणि खूप सारी खेळणी.
" हे खूपच होते आहे." सुजय आकाशला बोलला.
" आपल्याच माणसांसाठी तर आहे." आकाश बाळाकडे बघत बोलला.. सुजय त्या शब्दांचा अर्थ लावत बसला.
समजेल का सुजयला आदित्य हा त्याचा मुलगा नाही ते? समजल्यावर काय असेल त्याची प्रतिक्रिया? बघू पुढील भागात. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा.
सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई
दादर मुंबई
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा