Login

एकदा पहावे मरून

Fantasy
चॅम्पियन्स ट्रॉफी - २०२५
जलदकथा लेखन

एकदा पहावे मरून भाग १

©® सौ.हेमा पाटील.

"व्हय गं सुमे, कुटं गेली व्हतीस? दोन दिस झालं तुजं दार बंदच हुतं." भागूने विचारले.

"अवं माजी ती बेलवड्याची भन न्हाय का, तिला बगाय गेलते. हतरुणावर हाय." सुमी म्हणाली.

"कदीपासनं?" भागूने विचारले.

"झाला की म्हयना. पावन्यांची रीघ लागलीया. मानसाला जोडून मानूस हाय रोजचं. घरातली समदी मानसं कटाळलेती. भीक नगं पन कुत्रं आवर अशी गत(अवस्था ) झालीया. त्येंचं बी बराबर हाय. जाग्याव असलेल्या मानसाकडं बगावं का येनाजानाराची उठाठीव करावी? "

"इतकी मानसं येत्याती बगायला?" भागूने विचारले.

"आता बगा. मरनाच्या पंथाला लागलीया ती, यकदा मातीआड झाली तर पुन्यांदा दिसंल का? म्हनून मानसं भेटाय जातेती." सुमी म्हणाली.
(मातीआड होणे- मरणे)

हे ऐकून भागू विचारात पडली. तिला गप्प झालेली पाहून सुमीने विचारले,

"का वं बाईसाब? काय झालं? गप झालासा."

"काय नाय गं. आजकाल मानसाचं काय खरं नाय. झटका आला की पटुककरनं ( पटकन) जीव जातुया. मंग आपल्यासाटी कोन रडतंया, कोन भेटायला येतंया कसं समजायचं? आजारी पडलं तर समाजतंय तरी." भागू म्हणाली. तो विषय तेवढ्यावरच थांबला, पण भागूच्या मनात त्याविषयाने घर केले होते.

रात्री झोपताना पण तिच्या मनात तोच विचार घोळत होता. तिला असे वाटत होते की, 'अजून आपुन धडधाकट हाये, पर उद्याचा काय भरवसा? डागटरनं बीपीची गोळी चालू केलीया. चुकवायची न्हाय, न्हायतर झटका यील आसं सांगितलं हाय. आपली तर चुकती गोळी. ध्येनात आलं की घेतो आपुन. झटका यिऊनच मरनार आपुन. मंग आपुन मेल्यावर कोन बगाय आलं कोन न्हाय ह्ये कसं समजायचं?'

हा विचार करुन करुन तिचे डोके फुटायची वेळ आली. कुणीही पै-पाहुणा आजारी पडला तरी आपण बघायला जातोच. ते सगळे आपल्याकडे येतील का? असे तिला वाटत होते.

खरंतर जीव गेल्यावर कुणी आले काय आणि नाही काय, काय फरक पडतो? जिवंतपणी मला भेटायला, मला बघायला कोण कोण येते हे कसे समजायचे? यासाठी काय करायचे याचा बेत तिच्या मनात शिजू लागला. तिने मनाशी एक निश्चय केला.

काहीतरी मिळवण्यासाठी कशाचा तरी त्याग करावा लागतो हे निश्चित आहे. भागूने अन्नत्याग करायचा ठरवले. आपल्याला बघायला कोण कोण येईल याची शहानिशा करायची या विचाराने तिला इतके पछाडले की, तिने जेवण सोडले. आपण जर जेवलोच नाही तर एक दिवस मरून जाऊ असे अनुमान तिने काढले होते. यातून पुढे काय काय होते? तिचा उद्देश सफल होतो का? पाहूया पुढील भागात.