Login

एकदा पहावे मरून भाग २

Fantasy
चॅम्पियन्स ट्रॉफी -२०२५
जलदकथा लेखन

एकदा पहावे मरून
भाग २
©® सौ.हेमा पाटील.


मागील भागात आपण पाहिले, भागूच्या मनाला प्रश्न पडला आहे की, आपण अंथरुणाला खिळलो तर आपल्याला कोण कोण भेटायला येईल? आता पुढे..

पहिल्या दिवशी सुनेने जेवायला हाळी मारली.

" अवं आत्या, या आत, ताटं केलेती."

"न्हाई, नगं." भागू म्हणाली.

"म्हंजी? जेवाय वाढलंया म्हनून हाळी मारतीया. मला रानात जायाचं हाय. बायका केलेती भांगलणीला. घरातलं किती बी उराकलं तरी हुतच न्हाय समदं. आता तुमचं आणि काय मदीच जेवायचं न्हाय? रोज तर जेवतासा याच येळंला."

"झाकून ठीव...मला न्हाय जेवायचं. भूक न्हाई."

"बरं ठीवती झाकून, भूक लागली की घ्या हातानं. मी जातीया आता रानात." असे म्हणत सुनबाईने आपला डबा भरला व तिने शेताची वाट धरली.
दिवसभर घरात म्हातारी एकटीच असायची, घराला राखण. त्यामुळे ती जेवली नाही हे कुणालाच कळले नाही. संध्याकाळी जेव्हा सुनबाई रानातनं आली तेव्हा तिला समजलं की, आज आत्याबाई काही जेवल्या नाहीत.

तिने विचारले,
"काय झालं, आज जेवला का म्हन न्हाईसा? कोरड्यास आवडलं न्हाय का?"(कोरड्यास म्हणजे कालवण)

"मला जिवूसंच वाटंना. जेवनाचा वास बी घिऊ वाटंना."

"गोळी आनूद्या का मेडिकलमदनं? पित्त झालं असंल."

"काय बी नगं. आता परमेशानं यवडं डोळं झाकावत पटकरनी."

"आता गं बया! यका यळंला जेवला न्हाईसा तर लगीच मरान येतं व्हय?" सारजा म्हणाली.

"सारजे, फुडं फुडं बोलू नगंस. मरान याचं तवा ईल पर आज रातच्याला माजी भाकरी करु नगंस."

"असं काय करता आत्या? खावंल त्येवडं चार घास खावा. रिकाम्या पोटी झ्वाप तरी लागंल का? बोटवं करु का उलीसं? दुदाबर खावा."

"नगं, काय बी नगं. माज्याफुडं अन्नाचं नाव बी काडू नगंस."

आवं धनी, ऐकलंसा का? आत्या जेवान नगं म्हनतेती.

भागूताईंचा मुलगा विलास शेतातून कंटाळून आला होता. तो बसल्या जागेवरून म्हणाला,

"नगं म्हनतीया तर ऱ्हाऊदे की. कशापायी तिच्या मागं लागतीयास? भूक लागली की खाईल आपल्या मनानं." लेकाने आपली बाजू क्लिअर केली.

"आवं, दुपारी बी जेवल्या नायत्या आत्या. आता बी बिन काय खातापिता झोपू दिऊ व्हय त्येस्नी? उद्या समदी मलाच म्हनतील सून हाय का भिताड? तुमी ऱ्हाल नामानिराळं."

"सारजे, तुजं त्वांड आदी बंद कर. मी जेवनार नाय म्हंजे नाय." असे म्हणत म्हातारी तरातरा बाहेर निघून गेली.

ती गेली त्या दिशेला पहात सून हातावर हात धरून बसली. विलासने विचारले,

"भाकरी झाल्या का?"

"हो." सारजा म्हणाली.

"वाड मला. भूक लागलीया. कदी दुपारी जेवलो त्यावर काय बी खाल्लं न्हाय."

सारजाने नवऱ्याला जेवायला वाढले व ती सासुबाई घरात येण्याची वाट पाहत बसली. भुकेने तिच्या पोटात कावळे अक्षरशः कोकलत होते, पण सासू जेवली नाही तर आपण कसे जेवायचे या दुविधेत ती पडली होती.

क्रमशः ©® सौ.हेमा पाटील.

काय होते पुढे? अन्नत्याग करण्याचा भागूचा संकल्प पूर्णत्वाला जातो का? तिच्या अपेक्षेप्रमाणे कोण कोण तिला भेटायला येते? पाहूया पुढील भागात...

0

🎭 Series Post

View all